Quote of the day 8

#Quote_of_the_day8

घरी खूप मस्का मारल्यावर नेहाला हव्या त्या डान्सच्या कोर्सला बाबांनी एडमिशन घेऊ दिली होती. कारण तिचं रेग्युलर कॉलेज क्लासेस ह्या सगळ्यात खूप कमी वेळ तिच्याकडे उरत असे. तिला नाही म्हणण्यामागे तिचीच दमणूक होऊ नये असा त्यांचा विचार होता. पण नेहाच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. उत्साहाने क्लास सुरू झाला होता. बडबड्या स्वभावाने तिने इथेही भरपूर मैत्रिणी जमवल्या. ह्या सगळ्यात एक जण होती स्मिता. नेहा आल्यापासून सगळ्या तिच्याभोवती असतात हे ती सुद्धा बघत होती. द्वेष किंवा इर्षेने नाही तर कुतूहलाने कारण स्मिताला अस मोकळं बोलणं वागणं जमतच नसे का कुणास ठाऊक पण ती शांत शांतच असायची. घरीही सगळे तिला समजावत की अग हेच वय आहे मजा मस्ती करण्याचं पण स्मिता आपली स्वतःच्याच विश्वात असे. नेहा मात्र इतरांच्या सोबत स्मितालाही आपल्या मस्तीमध्ये घेत असे. हळूहळू स्मितालाही स्वतःहून ओळख करून घेणं, बोलणं जमू लागलं. 
अशातच एके दिवशी क्लासमध्ये लवकरच मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी तयारी सुरू झाली. 
सगळ्याच जणी उत्साहात होत्या. फ्युजन प्रकार निवडून काहीतरी नवीन सादर करावं असं ठरलं. मग विषय सुचवणे, त्यावर चर्चा सुरू झाल्या. सगळ्याबाबतीत उत्साही असणारी नेहा इथेही होतीच. तिनेच विषयही सुचवला आयुष्यातील अपयश किंवा वाईट घटनेमुळे खचलेला व्यक्ती आणि मग कशी त्याला प्रेरणा मिळून तो नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न करतो. विषय पटण्यासारखाच होता. मग काय गाणी , संगीत वगैरे निवडत छोटे छोटे गट करत गोष्ट गुंफली जाऊ लागली. 
प्रॅक्टिस करता करता एक महिना उलटला. आणि तो दिवसही उजाडला. एक एक करत सगळ्या जणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जमल्या तयारी सुरू झाली. आधी त्यांचा परफॉर्मन्स आणि मग बाकी सगळे अस नवीनच प्रकार होता. स्मिता आणि नेहा सुरुवात करणार असल्याने त्या पुढे होत्या. गार पडलेल्या हातानी स्मिताने नेहाचा हात धरला. ती नर्व्हस झाली आहे हे नेहाच्या लक्षात आलं तिने तसाच तिचा हात हातात ठेवत डोळ्यांनी सांगितलं आपण मस्तच करणार आहोत काळजी नको करुस. स्मिता थोडी रिलॅक्स झाली. नाव पुकारले जाताच दोघीही स्टेजवर गेल्या म्युझिक सुरू झाले आणि अगदी स्टेज ओळखीचं असल्याप्रमाणे दोघींची पावले टाकली जाऊ लागली. हळूहळू गोष्ट पुढे सरकत गेली 15 मिनिटांचा तो परफॉर्मन्स जेंव्हा संपला तेंव्हा सगळं सभागृह उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करत होतं. कौतुकाचा स्वीकार करत सगळ्या जणी जाऊन ठरलेल्या जागी बसल्या. मग कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली जाऊ लागली. 
तो कार्यक्रम आयोजित केला होता दुर्धर रोग, भयंकर अपघात ह्यातून बरच काही गमावूनही पुन्हा नव्या दृष्टीने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी. हा एक छोटासा क्लब होता जिथे अशा घटनांमधून जाणाऱ्या लोकांना वाईट मनस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली जात असे. 
कारण कस असत न माणसाकडे जेव्हा सगळं काही असत तेंव्हा त्याला त्याची किंमत नसते पण जेव्हा एखादी घटना आयुष्यात अशी उलथापालथ घडवते तेंव्हा माणूस कोसळतो. तिथे त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मानसिक आधार आणि पाठिंब्याची. तोच देण्याचा प्रयत्न ह्या क्लबचे मेम्बर करत होते जे सर्व कधी न कधी त्यामधून गेले होते आणि काही जण जात होते. 
अशातच नेहाचं नाव घेतलं गेलं आणि तिला स्टेजवर बोलाविले गेले. सगळ्या जणी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागल्या. हलकेसे हसत ती स्टेजवर गेली आणि जे बोलली त्यामुळे प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. नेहा आणि तिची आई ह्या क्लबच्या सगळ्यात जुन्या सभासद होत्या. होत्या कारण नेहाची आई कॅन्सरशी लढा देत होती. त्याच ट्रीटमेंट च्या वेळी ह्या क्लबची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि मग हळूहळू समविचारी लोक जोडले गेले. नेहाची आई तर ह्या जगात नव्हती पण नेहा मात्र आईचं व्रत हसतखेळत पूर्ण करत होती. हसतखेळत अशासाठी कारण आई गेल्यानंतर काही दिवसातच नेहाचा भयानक अपघात झाला होता आणि त्यात तिचे दोन्ही पाय तिला गमवावे लागले होते. एकामागे एक धक्के कुणालाही मोडून गेले असते पण नेहा तिच्या आईची लेक होती. जिद्दीने ट्रिटमेंटला प्रतिसाद देत तिने कृत्रिम पायांच्या मदतीने सगळ्यावर मात केली होती. सतत सगळ्यांना हसवताना जगण्यासाठी बळ देताना कुणालाही तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे हे रहस्य कळत नसे. 
आज मात्र ते समोर आले तेंव्हा स्मिताला ही गोष्ट सगळ्यात जास्त जाणवली कारण खुश रहा ग अस सतत तिला नेहा सांगायची आणि स्मिताला मात्र आपले छोटे छोटे प्रॉब्लेम तिला ऐकवायचे असायचे. नेहाने नकळतच स्मिताला आयुष्यातील एक महत्वाचा धडा दिला होता तो म्हणजे आपल्याला देवाच्या कृपेने जे धडधाकट शरीर मिळाले आहे त्याचा आदर करत आनंदाने जगावं. 
म्हणतात न आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही न काही शिकवत असते त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून. बऱ्याचदा खूप कमी वेळासाठी आयुष्यात आलेली माणसं खूप छान अस काहीतरी मनावर उमटवून जातात. 
Temperory people teach permanent lessons. फक्त ही लेसन्स कोणती आहेत हे कळायला हवं. 
हा होता माझा स्वतःसाठी lesson म्हणजेच #Quote_of_the_day #गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी