गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

Quote of the day 2

#Quote_of_the_day2

प्रतिक्षा आणि तिच्या जिवलग मैत्रिणीचं दिक्षा च एकत्रच पण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. प्रतिक्षाला नव्याने मार्केटमध्ये आलेल्या एका ठिकाणी नोकरी मिळाली तर दिक्षाच मात्र एका मोठ्या कम्पनीत सिलेक्शन झालं. पगार दोघींना जवळपास सारखाच होता पण प्रतीक्षा मात्र नाराज झाली. अर्थातच कारण योग्य होत तिच्या दृष्टीने. हळूहळू दोघीही कामाच्या ठिकाणी रुळू लागल्या. दीक्षा जिथे होती तिथे कामाचे स्वरूप आणि नियम ठराविक होते आणि ते तसेच असावे असासुध्दा नियम होता. त्याउलट प्रतिक्षाच्या कंपनीत मात्र नवनवीन प्रयोग , कल्पना मांडणे , चर्चा करणे व्हायचे. कामाची पद्धत प्रतिक्षाला  सुरुवातीला कळतच नसे. कारण वर्षानुवर्षे आजूबाजूला सगळ्यांना एका साच्यातच काम करताना बघितलं होतं. पण जसजसा वेळ गेला तिलाही वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तो ठामपणे मांडणं जमू लागलं. खरं तर सिलेक्शन च्या वेळी ग्रुप डिस्कशन मध्ये  तिला हिरीरीने बोलताना बघूनच तिचं सिलेक्शन झालं होतं. इथे फक्त एकच केलं जातं होत की एखाद्या महिन्याचा वेळ प्रत्येक एम्प्लॉयीला न सांगता दिला जात असे. ह्या महिन्यात ती व्यक्ती काम कस करतेय, की फक्त सांगेल तेवढंच करतेय , आऊट ऑफ द बॉक्स आहे का हे निरीक्षण करून मगच लेटर हातात मिळे. अर्थात ही कल्पना आधी दिलेली असायची की आमच्या पद्धतीत, विचारसरणी मध्ये तुम्ही फिट असाल तर आम्ही तुम्हाला कंटीन्यु करू. 
प्रतीक्षा हळूहळू सगळं एन्जॉय करत काम करू लागली. एक दिवस तिची आणि दिक्षा ची भेट झाली. दिक्षा रुटीनला खूप वैतागली होती. तिचं सगळं ऐकून प्रतीक्षा घरी आली तेच विचारांच्या नादात. तिच्या बाबांनी तिला थांबवत विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिलाही आधी वाटलं होतं आपल्याला तिथे जॉब का नाही मिळाला. पण आता अस वाटतय की जे आहे ते खूप छान आहे. मी बरच काही शिकते आहे स्वतःला डेव्हलप करतेय. हे त्या ठिकाणी कदाचित शक्य झालं नसतं. मग तिचे बाबा हसून तिला म्हणाले की मी तुला हेच समजावून सांगत होतो की आत्ता जिथे आहेस तिथून पुढे जायचं आहे हे नक्की. पण त्यासाठी आत्ता जे समोर आले आहे ते नको नाकारू. 
Appreciate where you are in your journey even if it's not where you want to be.  Every season serves a purpose.
एक दिवस नक्की तू तुला हव्या असलेल्या ठिकाणी असशील पण त्यासाठी प्रवासातला प्रत्येक प्रसंग, ठिकाण काय शिकवत आहे त्याकडे लक्ष दे. त्या गोष्टींचा भविष्यात उपयोग नक्कीच होईल. 
आपण खऱ्या आयुष्यात पण असेच वागतो बऱ्याचदा आपल्याकडे जे असतं, आपण जिथे असतो त्या गोष्टीची किंमत नसते आपल्याला. उलट समोरच्या कडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे का नाही म्हणून आपण हळहळत बसतो.  Every season serves a purpose , फक्त तो हेतू ओळखून स्वतःला ग्रुम करणं जमायला हवं. आपली लेटेस्ट फेज कोणती का असेना मग विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी.  आताच्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल तर त्या परिस्थितीला स्वीकारून आवश्यक ते बदल करायला हवेत. हाच होता आजचा #Quote_of_the_day❤️❤️ #गौरीहर्षल

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

Quote of the day 1

#Quote_of_the_day 
     जराशी तणतणत अनुजा तिच्या डेस्कवर येऊन बसली. आज मीटिंगमध्ये पुन्हा बॉसशी वाजलं होतं. तसा अनुजाचा मुद्दा बरोबर होता पण बोलताना जीभ घसरली अन् पुढचं रामायण घडलं. थोडं पाणी पीत तिने तिच्यासमोर असणाऱ्या कम्प्युटर वर आवडतं ब्लॉग पेज ओपन केलं. कामाच्या ठिकाणी हे करणं खर तर योग्य नसतं पण ते ब्लॉग पेज त्यांच्याच कम्पनीने डिझाइन केलेलं होत आणि आता ते बऱ्यापैकी पॉप्युलर असल्याने नवीन प्रोजेक्ट वेळी त्याचा उल्लेख नक्कीच व्हायचा. 
असो. तर बघूया तरी आज काय नवीन आहे म्हणून अनुजाने ब्लॉग ओपन केला होता. 
तिच्या समोर नवीन quote म्हणजेच सुविचार आला आणि तिचं विचारचक्र सुरू झालं. 
“You can give a person knowledge but you can't make them think. "
 खरंय न नकळतच अनुजा पुटपुटली. काही लोकांना बदल करावा लागेल म्हणून सत्य नाकारणं किती सोयीचं वाटतं. पण त्याचा तोटा काय होईल हा विचार करत नसतील का अशी लोकं? स्वतःचे विचार थोडे बाजूला सारून ती पुढे वाचू लागली. 
पुढे लिहिलं होतं, असं अनेक लोक वागतात अगदी पावलोपावली आपली त्यांच्याशी गाठ पडते. ही लोकं  खोटया किंवा चुकीच्या बाजूने अगदी ठामपणे उभी असतात. खर तर त्यांना माहीत असत की कधी न कधी ह्यामुळे आपलं नुकसान होऊ शकत पण ते क्षणिक फायद्याचा विचार करून अस वागतात. त्याउलट जे लोक खरं किंवा योग्य काय आहे ह्याचा विचार करून वागतात त्यांना सुरुवातीला बऱ्यापैकी त्रास होतो पण त्या वागण्याचे लॉंग टर्म चांगले इफेक्ट त्यांना नक्कीच मिळतात. हे वाचल्यावर आपसूकच तिचा मूड बदलला. कारण आज न उद्या आपल्याला आपल्या कामाची योग्य ती पोचपावती मिळणार यावर तिचा ठाम विश्वास होता.  
        मनोमन लिहिणाऱ्याला धन्यवाद देत अनुजा प्रोजेक्ट मध्ये सांगितलेले बदल करण्यात गुंतली. बदल करून होताच तिने प्रेझेंटेशन ला एक फायनल टच देत सुटकेचा श्वास सोडला. दहा मिनिटातच क्लायंट समोर तिला सगळं एक्सप्लेन करायचं होतं. लॅपटॉप घेऊन तिने कॉन्फरन्स हॉल मध्ये प्रवेश केला. क्लायंट बऱ्यापैकी मोठी पार्टी असल्याने आज कंपनीमधले सिनियर मेम्बरही मिटींगला हजर होते. अनुजाने प्रेझेंटेशन सूरु केलं ते जसं जस पुढे जात होतं क्लायंट नाराज होत असल्याचं अनुजाच्या लक्षात आलं. शेवटी मधेच प्रेझेंटेशन थांबवून त्यांनी अनुजाला विचारलं की आपलं जे बोलणं झालं होतं त्यानुसार इथं काहीच दिसत नाही असं का? ती काही बोलणार इतक्यात तिचे बॉस बोलले की ते मी नको अस सांगितलं कारण मला ते बदल फारसे लक्ष वेधून घेतील असे वाटले नाहीत. मधेच बोलण्या मागे बॉसला वाटलं होतं की आता क्रेडिट आपल्याला मिळून हिचं प्रमोशन कॅन्सल होईल. पण झालं उलटंच अनुजाने ते प्रेझेंटेशन बंद करून आपण अजून एक प्रेझेंटेशन तयार केले आहे असं सांगितलं. आणि ते सादर करण्याची परवानगी मागितली. क्लायंट हातातून जाऊ नये म्हणून तिच्या बॉसच्या बॉसने तिला परवानगी दिली. जसजशी अनुजा एक एक मुद्दा मांडत होती तसतसा क्लायंट रस घेऊन ऐकत होता आणि प्रश्न ही विचारत होता. आधी आणि नंतरच्या प्रेझेंटेशन मध्ये मुख्य फरक होता तो टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी वापरण्याचा. बॉसच्या म्हणण्यानुसार नवीन गोष्टी एड केल्या तर खूप काही बदल करून काम करावे लागेल आणि त्यामुळे सगळ्यानाच जास्त वेळ काम करावे लागेल. पण अनुजाने ते आपल्या पध्दतीने मांडत काही उपाय सुचवले होते  ज्यामुळे काम मॅनेज करणं शक्य होते. सकाळी मीटिंगमध्ये ती हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं ऐकून न घेताच बॉसने सुनावलं आणि वाद झाला. आता मात्र हे क्लियर झाल्याने क्लायंट आणि सिनियर यांच्यासमोर अनुजाचं पारडं जड झालं होतं. 
तिचा बॉस मात्र आज ह्या पदावर इतरांचं क्रेडिट स्वतःच्या नावावर करतच आलेला होता त्याला बसलेली ही मोठी चपराक होती. कारण मिटिंग संपता संपता तो प्रोजेक्ट कंपनीला मिळाला आणि त्याच मीटिंगमध्ये उत्तम कामगिरी केली म्हणून लवकरच अनुजाला त्याचं फळ मिळणार अस सुचवत कंपनीचे सिनियर मेम्बर बाहेर पडले. 
©गौरीहर्षल ११.९.२०१९

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

शुद्ध बिजापोटी....

#शुद्ध_बिजापोटी...
नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली एका राजाची आणि चंदनाच्या व्यापाऱ्याची. व्यापारी त्याचा धंदा होत नसतो म्हणून राजाच्या मरणाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे होतं काय राजाच्या मनातही त्याला न बघता , न भेटता फाशीवर लटकवायचा विचार येऊ लागतो. गोष्टीचं तात्पर्य अस होतं की आपण मनात ज्या व्यक्तीबद्दल , जसे विचार करत असतो तशीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून नकळत आपल्याला दिली जाते. कारण आपल्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल विष किंवा साखर पेरण्याचं काम करत असतात. पेरलेले उगवतेच फक्त ते आपल्या फायद्याचे ठरते की नाही हे वेळ ठरवते.
सरिता ला सुद्धा अशीच सवय होती.कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं अस ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होतं. त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव, नवीन लोक म्हटलं की सरीताच सुरू झालं नेहमीप्रमाणे. नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस. पण ऐकेल ती सरिता कसली नवीन ठिकाणी आली की तिने नुसत्या हाय हॅलो वरून सगळ्या शेजारच्या लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली. पाटील असे,  पवार तसे वगैरे वगैरे. हळूहळू ज्या शेजारणी तिच्यासारख्या होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं. रोज मुलं, नवरा शाळा ऑफिसमध्ये गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या. बायको रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे. अशातच सोसायटी मध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलं. नवरा बायको दोघेचजण 2,3 दिवस घर लावण्यात गेले मग तीही ह्या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली. ह्या काळात सरिता नवरा आणि मुलासोबत गावी गेली होती त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती. गावाहून आल्यानंतर जेंव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेंव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला. कुणीतरी म्हणत होते किती छान राहते न ती, घरही टापटीप असतं. कौतुक सुरू होतं. तितक्यात सरीताची जिवलग मैत्रीण वनिता म्हटली त्यात काय मुलं होस्टेलवर आहेत म्हटल्यावर हे राजराणी मज्जाच करणार ना? 😏 तितक्यात ती नवीन शेजारीण म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्याजणी शांत बसल्या. तीही सगळ्यांशी बोलत होती. तस बघायला गेलं तर तिने अजून कुणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती पण म्हणतात न रिकाम डोकं सैतानाच घर त्या नुसार ह्या सगळ्यानी मिळून ऐकीव माहितीवर आपले अंदाजच खरे अस ठरवलं होतं. सरिता मॅडम तर त्यात सगळ्यात पुढे गेल्या अजून पुरेशी ओळख न होताच तिला म्हणाली तुमची मज्जा आहे न मुलं होस्टेलवर सासुसासरे पण लांब आमचा इथं काम करून करून जीव जातो. नीता शांतपणे हसली आणि म्हटली अस काही नाही हो उलट कुणीच नाही त्यामुळे घर खायला उठत पण नोकरीही महत्त्वाची आहे त्यामुळे काही करता येत नाही. नीता दुखावली पण तिने स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जाणच निवडलं. सरीताने ह्यावरून काहीतरी शिकायला हवं होतं पण जित्याची खोड मेल्याशिवाय कुठली जाणार ती अजून अजून कुरघोड्या करु लागली नीताला त्रास देण्यासाठी . नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत ह्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हते.
त्यातच सरीताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्याचे कुणीतरी बॉस त्यांच्या सोसायटीत राहण्यासाठी आले आहेत. तर त्यांच्या घरच्यांशी नीट वाग आणि मला अजून नाव कळले नाही त्यामुळे कुणीही नवीन असतील तर तोंड उघडून घाण करु नकोस माझं प्रमोशन जवळ आल आहे.पर्सनल गोष्टींमुळे  मला ऑफिसमध्ये कुणाशी शत्रुत्व नको आहे. आता तुम्ही म्हणाल की अस का बोलला तो तर सरीताने आधीच्या बॉसच्या आईसोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे ह्याला स्वतःच्या प्रमोशन वर पाणी सोडावे लागले होते. कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल अस होत नाही. आणि चूक सरीताची असल्याने त्याला काही बोलताही आलं नाही. बॉसच्या आईला सरीताच्या मुळेच खूप त्रास झाला होता. असो तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता पण सुधारेल ती सरिता कसली.
फायनली कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली सरीताच्या नवऱ्याचे ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने ह्या वर्षी प्रमोशन मिळणार अस त्याला वाटत होतं. त्याच पार्टीत कंपनीचा नवीन हेड कोण आहे कळणार होत. सरीतासोबत तो पार्टीत पोहोचला. सगळ्यांशी ओळख करून देत असतानाच अचानक सरीताला दोन ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हटली हे इथे काय करतात? तो काही बोलणार इतक्यात स्टेजवरून त्याच दोघांच्या नावाचा पुकारा झाला मि. अँड मिसेस जाधव प्लिज स्टेजवर या. आणि विवेकचे बॉस बोलू लागले मला तुम्हांला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की जाधव यांनी आपली xyz गावाची ब्रँच यशस्वीपणे हाताळल्यामुळे आता कंपनीने त्यांना आपली ब्रँच सांभाळण्यास इथे बोलावले आहे. गेले काही महिने ते अगदी सामान्य कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते. पण आता येणाऱ्या 1 तारखे पासून दोघेही आपापल्या डिपार्टमेंट ची जबाबदारी घेतील. हे सगळं ऐकत असताना सरीताला मात्र दरदरून घाम फुटला होता. आणि त्याचं कारणंही  तिला माहीत होत. कारण होतं मि अँड मिसेस जाधव दुसरं तिसरं कुणी नसून नीता आणि तिचा नवरा होते😂  आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती. विवेकला सरीताची अवस्था पाहून अंदाज आला होता पण त्याने फक्त इतकंच विचारलं हे आपल्या सोसायटीमध्ये राहतात? सरिताने होकारार्थी मान डोलावली. तसा तो म्हटला तुला मी घरी गेल्यावर बघतो. आता सरीताची अवस्था अजूनच अवघड झाली.
स्टेजवरून आभारप्रदर्शन झाल्यावर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली. ती विवेकसमोर आली आणि हात मिळवत म्हटली कसे आहात मि अँड मिसेस काळे? मिसेस काळे तर फार चांगलं ओळखतात आम्हाला हो ना? सरीताला काय बोलावे सुचत नव्हते ती कसनुस हसली. नीता पुढच्या कपलशी बोलू लागली. पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन कळणार होते. त्यानुसार एकेक नाव घेतले जात होते. नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते. सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नावं घेतली जाऊ लागली जसजशी लिस्ट पुढे सरकत होती तसतशी सरिता अस्वस्थ होत होती. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले पुन्हा एकदा विवेकचे नाव वगळले गेले. पार्टी पुढे सूरु राहील म्हणत सगळे जिकडेतिकडे गेले. नीता सरिता समोर आली आणि म्हटली तो वरचा असतो न सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजासह परतफेड करण्याची. आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची पण तू आमचं कुटुंब जे इथे नसत त्यांच्याबद्दलही वाईट बोललीस तेही तुला काही माहीत नसताना आणि आम्हा दोघांच्या चरित्र्यावरही नको नको ते आरोप केलेस तुझा काही संबंध नसताना, आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळलं ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर. शहाणी असशील तर सुधारशील नाहीतर जे हातात आहे ते ही गमावशील विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली.

ह्या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे आहे. अशा अनेक सरिता आपल्याला पावलोपावली भेटतात ज्या काहीही संबंध नसताना पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात. ही जी जमात असते ती असमाधानी असते स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखानी भरलेले असले तरी त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय, दुखावल्या शिवाय घास घशाखाली उतरत नाही. त्याबतीत आपण ऊँ इग्नोराय नमः हाच मंत्र वापरू शकतो. कारण अस वागून हे लोक स्वतःचं काय नुकसान करून घेत आहेत हे त्यांना कळत नाही. आणि सांगून सुधारण्या इतकी अक्कल त्यातल्या फार कमी लोकांकडे असते.
बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतो आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेडही करतो. बघण्याची दृष्टी हवी फक्त.#गौरीहर्षल #४.१०.१९

बुधवार, २४ एप्रिल, २०१९

अलक

#अलक

१.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती.
कारण एकच ती मुलगी होती

२. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली .
कारण तेच ...

३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या.
कारण तेच ....

४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
पण ह्यावेळी कारण वेगळं होतं
तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला.
कारण तेच ....

©गौरीहर्षल
#२४.४.२०१९

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

#देवाक_काळजी_रे

#देवाक_काळजी_रे

नुकतंच हे गाणं कानावर पडलं. आणि नेहमीसारखं आम्ही आपले शब्दांवर आणि अर्थावर रेंगाळून गाण्याच्या प्रेमात पडलो. फार काही तत्वज्ञान नाहीये अगदी साधं सोपं आहे सगळं पण माणसाला मात्र साध्या गोष्टींनाही अवघड करायची सवय असते.
आयुष्यातले चढ उतार, सतत होणारे बदल त्यामुळे येणारे चांगले वाईट अनुभव विशेषतः वाईट जास्तच ह्यांच्यामुळे एक क्षण असा येतो की सरळमार्गी माणूसही चुकीच्या मार्गावर जातो किंवा जायचं ठरवतो. आणि हल्लीच्या फास्ट आयुष्यात तर संयम उर्फ पेशन्स फारच कमी लोकांकडे असतात. पण चुकीच्या मार्गाचे फायदे आणि तोटेही  प्रत्यक्ष लक्षात येईपर्यंत न भरून येणारं नुकसान करून मोकळे झालेले असतात. त्यानंतर हाती उरलेली निराशा सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार दाखवत असताना ज्याची गरज भासते तो असतो "देव". इथे मी देव ही संकल्पना फक्त मूर्ती अशी नाही म्हणत तर माझ्यासाठी देव म्हणजे मनाच्या कोपऱ्यात सदैव वसणारी अशी एक श्रद्धा असते जी योग्य वेळी,योग्य प्रकारे आणि योग्य रूपातही मदतीला धावून येतेच. गरज असते ती फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या चांगल्या कृत्यांवर किंवा कर्मांवर ठाम विश्वास असण्याची आणि थोड्या संयमाची.

सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा

हे कडवं तर मला फारच आवडलं. जर काहीतरी वाईट, चुकीचं घडलंय तर सगळं नीट होण्यासाठी किंवा करण्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट बघण्याची काय गरज?? "त्या"ने आपल्याला निर्माण करताना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत मग तरीही आपण त्याची वाट बघत का बसतो? तो सुद्धा विचार करत असेल न की बाबा रे चालू तर लाग पुढे फक्त दहा पावलांवर खूप काही चांगलं होणार आहे. पण नाही आपण प्रत्यक्ष कृतीपेक्षा इतर फाफट पसाऱ्यातच जास्त गुंततो आणि परिणामी गुंता वाढतच जातो.
हातापायाने धडधाकट असण्याऱ्या माणसाला तर जास्तच सवय रडगाण्याची. आणि काही झालं की उत्तरं शोधण्याआधीच मीच का? हा प्रश्न विचारण्याची. अशा लोकांनी विचार करण्याची पद्धत बदलण्याची फार गरज असते.
कर्मकांड वगैरे माझा प्रांत नाही आणि मी देवाला सतत धरते अशातलीही नाही. माझ्या मेंदूला पटतील आणि जगताना योग्य वाटतील अशी साधी सोपी तत्व माझी मी ठरवली आहेत. हरण्याचे प्रसंग माझ्याही आयुष्यात खूप आले मीही इतरांसारखी "त्याच्या" शी भांडले पण त्यातून प्रत्येक वेळी बाहेर पडताना मी मनाला एक बजावलं की कधीही असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी असं नाही करायचं. शक्य असतील ते सगळे प्रयत्न करूनही हरलो तर अर्थातच त्याला प्रश्न विचारण्याचा हक्क तो देतोच. हा माझा अनुभव पण प्रयत्न न करताच त्याच्यासमोर कधीच नाही जायचं.
शेवटी तात्पर्य काय तुमची काळजी घ्यायला तो आहेच पण त्याआधी तुम्ही काहीतरी सुरुवात तर करा.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. नुसतं गाणं ऐकूनही बरंच काही कळेल, ऐकून बघा एकदा💐 
#गौरीहर्षल #१४.९.२०१८

#मीच_चांगलं_वागायचं_का?

#मीच_चांगलं_वागायचं_का?
नेहा नव्यानेच आली होती सोसायटीमध्ये. अजून कुणाशी फारशी ओळख नव्हती त्यामुळे ती शांतच असायची. हळूहळू मुलांना खाली खेळण्यासाठी नेल्यानंतर ओळखी होऊ लागल्या. तरीही आपण नवीन आहोत याचं भान ठेवून ती वावरत असे. तशीही तिला इकडंच तिकडे करण्याची सवयही नव्हती.
रोज सगळ्यांसोबत गप्पा मारल्या जाऊ लागल्या. लवकरच  तिला वॉट्सअप्प ग्रुपमध्ये पण घेतलं. पण राहून राहून तिला एक गोष्ट खटकायची घरात असो किंवा बाहेर सगळीकडच्या व्यक्तींबाबत बोलणं सुरू झालं की जास्तीत जास्त जणींचा सूर असायचा #मीच_चांगलं_वागायचं_का? नेहाला समजयचंच नाही की अस का?? म्हणजे इतर सर्वांसारखेच तिच्या घरातही मतभेद, वाद होतेच नाही असं नाही पण तिला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता किंवा तिने शोधला होता अस म्हणूया. मग हळूहळू तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या जणींचा मूळ प्रॉब्लेम #मीच_चांगलं_वागायचं_का? हा नसून कुणीच माझं कौतुक करत नाही हा आहे. आणि खरं तर तो अनंत काळापासून स्त्रियांच्या बाबतीतील मोठ्ठा प्रश्न आहे.
होतं काय सणवार म्हटलं की 3,4 जणी एकत्र येतात बरं तिथे त्या एकमेकींना मदत करण्याऐवजी कुरघोडी कशी करता येईल हाच विचार जास्त करत असतात. मग पुढे जाऊन त्याची परिणीती एकमेकींना टोमणे मारणं, कामात अडथळे निर्माण करणं सुरू होतं. परिणामी कामं बिघडतात , घरातलं वातावरण बिघडतं. आनंदाचे चार क्षण एकत्र घालविण्यासाठी आलेली मनं खट्टू होऊन दूर जातात. पुरुषांचं काय त्यांना वेळ मारून  नेण्याशी मतलब असतं त्यामुळे काही ठिकाणी मन मारून वर्षानुवर्षे हे सगळं असंच चालू राहतं. काही ठिकाणी जिथे एखाद्याचं अरेरावी वागणं इतरांना असह्य होतं तिथं फाटे फुटतात. चूक कुण्या एकाचीच असते असे वरवर पाहता सगळे दाखवतात. पण प्रत्यक्षात मात्र सगळेच कळत नकळत त्यात सहभागी असतात. साधी सोपी गोष्ट असते जी करता येते. ती म्हणजे थोडंसं गोड बोलून प्रत्येकाला आपण महत्वाचे आहोत हे जाणवून देणं.

का जमत नाही हे आपल्याला??? प्रत्येक घरात, समाजात दोन प्रकारचे लोक असतात
एक जे प्रत्येक गोष्टीत अरेरावी, आकांडतांडव करून सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणतात. कधी कधी हे करण्यासाठी हव्या त्या पद्धतीही वापरतात. मग त्यात कुणाला बोलून दुखावणे असो किंवा न बोलता. असे लोक कितीही सगळ्यांमध्ये मिसळल्या सारखे वाटत असले तरी मनाने मात्र कोसो दूर असतात. कारण त्यांना सुख वाटण्यापेक्षा दुःख वाटण्यात जास्त रस असतो. अर्थात कधीनकधी त्यांना त्याचं फळ मिळतच. असो

आता दुसऱ्या प्रकारचे लोक हे आपले गुपचूप आपलं काम भलं नि आपण भले असे असतात. इतर लोक ह्यांच्याशी वाईट वागतात तेंव्हा ह्यांना वाईट वाटतं, प्रसंगी रागही येतो. पण मुळात पिंड सगळं सहन करण्याचा असल्याने वेळ मारून नेत राहतात. मग हळूहळू ह्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ह्यांना गृहीत धरून चालण्याची सवय लागते. ती जेंव्हा टोकाला जाते तेंव्हा हे लोक जागे होतात पण तोपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलेलं असतं. आता ह्यांच तोंड उघडणे इतरांना त्रासदायक वाटू लागतं आणि मग शेवटी कित्ती वाईट आहेत असा शिक्का माथी बसतो. 🤦

ह्याव्यतिरिक्त ही एक जमात अस्तित्वात आहे पण ती फटकळ, माणुसघाणी ह्या कॅटेगरी मध्ये असते. अशी लोकं शक्यतो खऱ्याला खरं नि खोट्याला खोटं च अस ठणकावून वागत असल्याने त्यांना जनरली सण उत्सव समारंभ अशा ठिकाणी मनापासून वेलकम नसतं. आणि ते पोहोचले तरी सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी बाकी लोक एकत्र येतात😄

तर कुणी म्हणेल ह्या सगळ्याचा नेहाच्या प्रश्नाशी काय संबंध? आहे आहे करते एक्सप्लेन नेहाने ही थियरी आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी लागू करत लोकांचे स्वभाव लक्षात ठेवले. त्यामुळे झालं काय कुणाशी कसं वागलं की वाद टाळून सगळं गोड होतं हे तिला कळालं. अर्थात हे काही तिचं स्वतःचं ज्ञान नव्हतं तर तडकू, सनकी अशा आपल्या पणतीला पणजी आजीने सासरी जाण्याआधी हळूच दिलेला कानमंत्र होता. इतर कुणाचं काही न ऐकणार्या नेहाला आजीने आधी हा प्रयोग घरातच करायला लावला. सुरुवातीला तिला काहीच पटलं नव्हतं पण ट्राय करू म्हणून तिने जन्माला आल्यापासून सतत तिच्यावर नाराज असणाऱ्या घरातल्या काही लोकांबाबत आपलं वागणं बदललं. उदा. जी काकू तिला बघितलं की चिडचिड करायची तिच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते प्रत्येक गोष्टीला दाद देणं नेहाने सुरू केलं. दाद द्यायची म्हणजे नुसतं काहीही बोलायचं नाही हं तर अगदी क्षुल्लक गोष्ट नोटीस करून सांगायची. जड तर गेलंच नेहाला आणि ते पचवताना काकुलाही पण आठवड्यात फरक जाणवला. शॉपिंगला गेल्यावर नेहासाठी काहीही उचलून आणणाऱ्या काकूने तिच्या आवडत्या रंगाचा स्कार्फ आणला चक्क. ही बघितल्यावर नेहाला सवयच लागली सगळीकडे हा फंडा वापरायची. त्याचा फायदा असा झाला की आपलं लेकरू इतकं गुणी कसं झालं अचानक ह्यामुळे आईबाबा कन्फ्युज होऊनही खुश झाले. आणि नेहा तिला तर अलिबाबाची गुहाच सापडली. कारण ज्या लोकांमुळे आनंदाच्या क्षणीही तिचा मूड जायचा आता त्याच लोकांसोबत राहून तिला आनंद साजरा करता येत होता. हे सगळं सुरू असताना आजी गालातल्या गालात हसत तिला एकच प्रश्न विचारायची काय मग नकटु आता म्हणशील का ? #मीच_चांगलं_वागायचं_का?😉
आजीचा हा कानमंत्र इतर मैत्रिणींबरोबर शेयर करायचं तिने ठरवलं. त्यातल्या त्यात ज्या तिला प्रॉमिसिंग वाटल्या त्यांना तिने चहाच्या निमित्ताने बोलावून सहज बोलता बोलता सुचवलं. 15 जणी होत्या त्यातल्या 5 जणींनी लगेच हे वापरून बघायचं ठरवलं त्यातील चौघीना आठवड्यात थोड्याफार फरकाने हवे तसे प्रतिसाद मिळाले मग काय त्यांनी इतरांना सांगताच त्याही ट्राय तर करू म्हणून कामाला लागल्या. अर्थात हे सर्व करताना प्रत्येक वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळेलच अस नाही हे सांगायला नेहा विसरली नव्हती. कारण प्रत्येक व्यक्ती , तिचा स्वभाव, त्यावेळेसचा मूड, परिस्थिती ह्यावर तिची प्रतिक्रिया अवलंबून असणार होती. कधी कधी कौतुकाऐवजी आधारासाठी हात पुढे करण्याची गरजही पडणार होती तर कधी फक्त एक मनापासून मिळणारी मूक साथही सगळं नीट करू शकत होती. हे सगळं जाणून घेत पाऊल टाकलं तर नाती निभावताना निदान गोष्टी सुसह्य होतील हे मर्म कळालं तर आनंदी आनंद होणार होता.
मग मंडळी आम्ही बायका तर हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे असे गोंधळ घालतच राहणार आहोत. पण तुमचं काय तुम्हाला कळलं असेलच ना तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते😉😉 जसं हा लेख वाचताना बऱ्याच मैत्रिणींनाही कळलं आहे. कारण मुळात गम्मत अशी होते की आपण माणसं परिस्थितीनुसार कॅटेगरी बदलत असतो अहो 😆😆 एकाच  कॅटेगरीत कुणीच नसतं आयुष्यभर. कधी आपण असे वागतो तर कधी तसे. फक्त चांगलं वागण्यात सातत्य ठेवण अवघड जातं सगळ्यांनाच. आणि मग ओठावर नकळतच प्रश्न येतो #मीच_चांगलं_वागायचं_का?😉😉
आता हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं बरं का!!
बाकी कसेही वागलात तरी त्याचे परिणाम आपल्यावरच होतात त्यांना वेलकम करण्याची तयारी ठेवत मजा करा.

बाप्पाच्या आगमनाने एक सकारात्मक सुरुवात तुमच्या , माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यात होवो ही सदिच्छा.
बाकी ??? दत्तात्रेयार्पणमस्तू ♥️♥️ शुभं भवतू!!!

#गौरीहर्षल #१४.९.२०१८