अलक

#अलक

१.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती.
कारण एकच ती मुलगी होती

२. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली .
कारण तेच ...

३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या.
कारण तेच ....

४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
पण ह्यावेळी कारण वेगळं होतं
तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला.
कारण तेच ....

©गौरीहर्षल
#२४.४.२०१९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी