शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

#देवाक_काळजी_रे

#देवाक_काळजी_रे

नुकतंच हे गाणं कानावर पडलं. आणि नेहमीसारखं आम्ही आपले शब्दांवर आणि अर्थावर रेंगाळून गाण्याच्या प्रेमात पडलो. फार काही तत्वज्ञान नाहीये अगदी साधं सोपं आहे सगळं पण माणसाला मात्र साध्या गोष्टींनाही अवघड करायची सवय असते.
आयुष्यातले चढ उतार, सतत होणारे बदल त्यामुळे येणारे चांगले वाईट अनुभव विशेषतः वाईट जास्तच ह्यांच्यामुळे एक क्षण असा येतो की सरळमार्गी माणूसही चुकीच्या मार्गावर जातो किंवा जायचं ठरवतो. आणि हल्लीच्या फास्ट आयुष्यात तर संयम उर्फ पेशन्स फारच कमी लोकांकडे असतात. पण चुकीच्या मार्गाचे फायदे आणि तोटेही  प्रत्यक्ष लक्षात येईपर्यंत न भरून येणारं नुकसान करून मोकळे झालेले असतात. त्यानंतर हाती उरलेली निराशा सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार दाखवत असताना ज्याची गरज भासते तो असतो "देव". इथे मी देव ही संकल्पना फक्त मूर्ती अशी नाही म्हणत तर माझ्यासाठी देव म्हणजे मनाच्या कोपऱ्यात सदैव वसणारी अशी एक श्रद्धा असते जी योग्य वेळी,योग्य प्रकारे आणि योग्य रूपातही मदतीला धावून येतेच. गरज असते ती फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या चांगल्या कृत्यांवर किंवा कर्मांवर ठाम विश्वास असण्याची आणि थोड्या संयमाची.

सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा

हे कडवं तर मला फारच आवडलं. जर काहीतरी वाईट, चुकीचं घडलंय तर सगळं नीट होण्यासाठी किंवा करण्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट बघण्याची काय गरज?? "त्या"ने आपल्याला निर्माण करताना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत मग तरीही आपण त्याची वाट बघत का बसतो? तो सुद्धा विचार करत असेल न की बाबा रे चालू तर लाग पुढे फक्त दहा पावलांवर खूप काही चांगलं होणार आहे. पण नाही आपण प्रत्यक्ष कृतीपेक्षा इतर फाफट पसाऱ्यातच जास्त गुंततो आणि परिणामी गुंता वाढतच जातो.
हातापायाने धडधाकट असण्याऱ्या माणसाला तर जास्तच सवय रडगाण्याची. आणि काही झालं की उत्तरं शोधण्याआधीच मीच का? हा प्रश्न विचारण्याची. अशा लोकांनी विचार करण्याची पद्धत बदलण्याची फार गरज असते.
कर्मकांड वगैरे माझा प्रांत नाही आणि मी देवाला सतत धरते अशातलीही नाही. माझ्या मेंदूला पटतील आणि जगताना योग्य वाटतील अशी साधी सोपी तत्व माझी मी ठरवली आहेत. हरण्याचे प्रसंग माझ्याही आयुष्यात खूप आले मीही इतरांसारखी "त्याच्या" शी भांडले पण त्यातून प्रत्येक वेळी बाहेर पडताना मी मनाला एक बजावलं की कधीही असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी असं नाही करायचं. शक्य असतील ते सगळे प्रयत्न करूनही हरलो तर अर्थातच त्याला प्रश्न विचारण्याचा हक्क तो देतोच. हा माझा अनुभव पण प्रयत्न न करताच त्याच्यासमोर कधीच नाही जायचं.
शेवटी तात्पर्य काय तुमची काळजी घ्यायला तो आहेच पण त्याआधी तुम्ही काहीतरी सुरुवात तर करा.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. नुसतं गाणं ऐकूनही बरंच काही कळेल, ऐकून बघा एकदा💐 
#गौरीहर्षल #१४.९.२०१८

#मीच_चांगलं_वागायचं_का?

#मीच_चांगलं_वागायचं_का?
नेहा नव्यानेच आली होती सोसायटीमध्ये. अजून कुणाशी फारशी ओळख नव्हती त्यामुळे ती शांतच असायची. हळूहळू मुलांना खाली खेळण्यासाठी नेल्यानंतर ओळखी होऊ लागल्या. तरीही आपण नवीन आहोत याचं भान ठेवून ती वावरत असे. तशीही तिला इकडंच तिकडे करण्याची सवयही नव्हती.
रोज सगळ्यांसोबत गप्पा मारल्या जाऊ लागल्या. लवकरच  तिला वॉट्सअप्प ग्रुपमध्ये पण घेतलं. पण राहून राहून तिला एक गोष्ट खटकायची घरात असो किंवा बाहेर सगळीकडच्या व्यक्तींबाबत बोलणं सुरू झालं की जास्तीत जास्त जणींचा सूर असायचा #मीच_चांगलं_वागायचं_का? नेहाला समजयचंच नाही की अस का?? म्हणजे इतर सर्वांसारखेच तिच्या घरातही मतभेद, वाद होतेच नाही असं नाही पण तिला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता किंवा तिने शोधला होता अस म्हणूया. मग हळूहळू तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या जणींचा मूळ प्रॉब्लेम #मीच_चांगलं_वागायचं_का? हा नसून कुणीच माझं कौतुक करत नाही हा आहे. आणि खरं तर तो अनंत काळापासून स्त्रियांच्या बाबतीतील मोठ्ठा प्रश्न आहे.
होतं काय सणवार म्हटलं की 3,4 जणी एकत्र येतात बरं तिथे त्या एकमेकींना मदत करण्याऐवजी कुरघोडी कशी करता येईल हाच विचार जास्त करत असतात. मग पुढे जाऊन त्याची परिणीती एकमेकींना टोमणे मारणं, कामात अडथळे निर्माण करणं सुरू होतं. परिणामी कामं बिघडतात , घरातलं वातावरण बिघडतं. आनंदाचे चार क्षण एकत्र घालविण्यासाठी आलेली मनं खट्टू होऊन दूर जातात. पुरुषांचं काय त्यांना वेळ मारून  नेण्याशी मतलब असतं त्यामुळे काही ठिकाणी मन मारून वर्षानुवर्षे हे सगळं असंच चालू राहतं. काही ठिकाणी जिथे एखाद्याचं अरेरावी वागणं इतरांना असह्य होतं तिथं फाटे फुटतात. चूक कुण्या एकाचीच असते असे वरवर पाहता सगळे दाखवतात. पण प्रत्यक्षात मात्र सगळेच कळत नकळत त्यात सहभागी असतात. साधी सोपी गोष्ट असते जी करता येते. ती म्हणजे थोडंसं गोड बोलून प्रत्येकाला आपण महत्वाचे आहोत हे जाणवून देणं.

का जमत नाही हे आपल्याला??? प्रत्येक घरात, समाजात दोन प्रकारचे लोक असतात
एक जे प्रत्येक गोष्टीत अरेरावी, आकांडतांडव करून सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणतात. कधी कधी हे करण्यासाठी हव्या त्या पद्धतीही वापरतात. मग त्यात कुणाला बोलून दुखावणे असो किंवा न बोलता. असे लोक कितीही सगळ्यांमध्ये मिसळल्या सारखे वाटत असले तरी मनाने मात्र कोसो दूर असतात. कारण त्यांना सुख वाटण्यापेक्षा दुःख वाटण्यात जास्त रस असतो. अर्थात कधीनकधी त्यांना त्याचं फळ मिळतच. असो

आता दुसऱ्या प्रकारचे लोक हे आपले गुपचूप आपलं काम भलं नि आपण भले असे असतात. इतर लोक ह्यांच्याशी वाईट वागतात तेंव्हा ह्यांना वाईट वाटतं, प्रसंगी रागही येतो. पण मुळात पिंड सगळं सहन करण्याचा असल्याने वेळ मारून नेत राहतात. मग हळूहळू ह्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ह्यांना गृहीत धरून चालण्याची सवय लागते. ती जेंव्हा टोकाला जाते तेंव्हा हे लोक जागे होतात पण तोपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलेलं असतं. आता ह्यांच तोंड उघडणे इतरांना त्रासदायक वाटू लागतं आणि मग शेवटी कित्ती वाईट आहेत असा शिक्का माथी बसतो. 🤦

ह्याव्यतिरिक्त ही एक जमात अस्तित्वात आहे पण ती फटकळ, माणुसघाणी ह्या कॅटेगरी मध्ये असते. अशी लोकं शक्यतो खऱ्याला खरं नि खोट्याला खोटं च अस ठणकावून वागत असल्याने त्यांना जनरली सण उत्सव समारंभ अशा ठिकाणी मनापासून वेलकम नसतं. आणि ते पोहोचले तरी सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी बाकी लोक एकत्र येतात😄

तर कुणी म्हणेल ह्या सगळ्याचा नेहाच्या प्रश्नाशी काय संबंध? आहे आहे करते एक्सप्लेन नेहाने ही थियरी आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी लागू करत लोकांचे स्वभाव लक्षात ठेवले. त्यामुळे झालं काय कुणाशी कसं वागलं की वाद टाळून सगळं गोड होतं हे तिला कळालं. अर्थात हे काही तिचं स्वतःचं ज्ञान नव्हतं तर तडकू, सनकी अशा आपल्या पणतीला पणजी आजीने सासरी जाण्याआधी हळूच दिलेला कानमंत्र होता. इतर कुणाचं काही न ऐकणार्या नेहाला आजीने आधी हा प्रयोग घरातच करायला लावला. सुरुवातीला तिला काहीच पटलं नव्हतं पण ट्राय करू म्हणून तिने जन्माला आल्यापासून सतत तिच्यावर नाराज असणाऱ्या घरातल्या काही लोकांबाबत आपलं वागणं बदललं. उदा. जी काकू तिला बघितलं की चिडचिड करायची तिच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते प्रत्येक गोष्टीला दाद देणं नेहाने सुरू केलं. दाद द्यायची म्हणजे नुसतं काहीही बोलायचं नाही हं तर अगदी क्षुल्लक गोष्ट नोटीस करून सांगायची. जड तर गेलंच नेहाला आणि ते पचवताना काकुलाही पण आठवड्यात फरक जाणवला. शॉपिंगला गेल्यावर नेहासाठी काहीही उचलून आणणाऱ्या काकूने तिच्या आवडत्या रंगाचा स्कार्फ आणला चक्क. ही बघितल्यावर नेहाला सवयच लागली सगळीकडे हा फंडा वापरायची. त्याचा फायदा असा झाला की आपलं लेकरू इतकं गुणी कसं झालं अचानक ह्यामुळे आईबाबा कन्फ्युज होऊनही खुश झाले. आणि नेहा तिला तर अलिबाबाची गुहाच सापडली. कारण ज्या लोकांमुळे आनंदाच्या क्षणीही तिचा मूड जायचा आता त्याच लोकांसोबत राहून तिला आनंद साजरा करता येत होता. हे सगळं सुरू असताना आजी गालातल्या गालात हसत तिला एकच प्रश्न विचारायची काय मग नकटु आता म्हणशील का ? #मीच_चांगलं_वागायचं_का?😉
आजीचा हा कानमंत्र इतर मैत्रिणींबरोबर शेयर करायचं तिने ठरवलं. त्यातल्या त्यात ज्या तिला प्रॉमिसिंग वाटल्या त्यांना तिने चहाच्या निमित्ताने बोलावून सहज बोलता बोलता सुचवलं. 15 जणी होत्या त्यातल्या 5 जणींनी लगेच हे वापरून बघायचं ठरवलं त्यातील चौघीना आठवड्यात थोड्याफार फरकाने हवे तसे प्रतिसाद मिळाले मग काय त्यांनी इतरांना सांगताच त्याही ट्राय तर करू म्हणून कामाला लागल्या. अर्थात हे सर्व करताना प्रत्येक वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळेलच अस नाही हे सांगायला नेहा विसरली नव्हती. कारण प्रत्येक व्यक्ती , तिचा स्वभाव, त्यावेळेसचा मूड, परिस्थिती ह्यावर तिची प्रतिक्रिया अवलंबून असणार होती. कधी कधी कौतुकाऐवजी आधारासाठी हात पुढे करण्याची गरजही पडणार होती तर कधी फक्त एक मनापासून मिळणारी मूक साथही सगळं नीट करू शकत होती. हे सगळं जाणून घेत पाऊल टाकलं तर नाती निभावताना निदान गोष्टी सुसह्य होतील हे मर्म कळालं तर आनंदी आनंद होणार होता.
मग मंडळी आम्ही बायका तर हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे असे गोंधळ घालतच राहणार आहोत. पण तुमचं काय तुम्हाला कळलं असेलच ना तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते😉😉 जसं हा लेख वाचताना बऱ्याच मैत्रिणींनाही कळलं आहे. कारण मुळात गम्मत अशी होते की आपण माणसं परिस्थितीनुसार कॅटेगरी बदलत असतो अहो 😆😆 एकाच  कॅटेगरीत कुणीच नसतं आयुष्यभर. कधी आपण असे वागतो तर कधी तसे. फक्त चांगलं वागण्यात सातत्य ठेवण अवघड जातं सगळ्यांनाच. आणि मग ओठावर नकळतच प्रश्न येतो #मीच_चांगलं_वागायचं_का?😉😉
आता हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं बरं का!!
बाकी कसेही वागलात तरी त्याचे परिणाम आपल्यावरच होतात त्यांना वेलकम करण्याची तयारी ठेवत मजा करा.

बाप्पाच्या आगमनाने एक सकारात्मक सुरुवात तुमच्या , माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यात होवो ही सदिच्छा.
बाकी ??? दत्तात्रेयार्पणमस्तू ♥️♥️ शुभं भवतू!!!

#गौरीहर्षल #१४.९.२०१८

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

मितवा

तुझा वाढदिवस जगासाठी जरी तो एक सण वगैरे टाइप दिवस असला तरी माझ्यासाठी मात्र माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राचा बड्डे. अगदी मॉर्डन भाषेत म्हणायचं तर माझ्या पहिल्या आणि शेवटच्या बॉयफ्रेंडचा बड्डे. इतरांपेक्षा मला जास्त उत्सुकता असायची त्या दिवशी. त्याला कारणही तसंच काहीसं तुझं सगळं आवरणं, डेकोरेशन करणं जाम आवडायचं मला. पहिल्यांदा तू घरी आलास तेंव्हा आजीने तुझी काही देव म्हणून ओळख करून दिलीच नव्हती. ती म्हणाली होती , तुला जे काही बोलायचं असेल, सांगायचं असेल ते मोकळेपणाने याला सांग हा तुझं सगळं ऐकेल आणि इतर कुणापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुला सल्ला पण देईल. मग अगदी घरातून बाहेर पडतानाही तुला येते रे म्हणत बाहेर पडण्याची सवय लागली. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तू सोबत आहेसच हा विश्वास येणाऱ्या अनुभवांनी हळूहळू पक्का होत गेला. शाळेत किंवा घरी कुठेही काहीही सांगण्यासारखं घडलं की ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे धावत येऊ लागले. बाकी सगळे नंतर. तुझं माझं नातं कुणालाही न समजता छानपैकी बहरत राहिलं. मलाही कधी मनातलं बोलून दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाची गरज पडलीच नाही. भल्याबुऱ्या सगळ्या प्रसंगातून तू मला अगदी सुखरूप बाहेर काढत आलास. चूक केली तरी त्यातून मार्ग ही शोधून दिलेस. पुढे लग्न झालं मी दुसरीकडे आले पण इथेही तू आहेसच याची प्रचिती पावलोपावली आली. धडपडताना सावरणारा तूच होतास हे तेंव्हा समजत नाहीच नंतर मात्र नक्की लक्षात येतं की आपण जरी नाकारलं तरी तो मात्र आपली मदत करतच राहतो करतच असतो. विनातक्रार, विनाअपेक्षा निरंतर...
आपल्या नात्याला नक्की किती वर्षं झाली माहीत नाही पण आजही तू तितक्याच ठामपणे सगळ्याच बाबतीत माझ्या पाठीशी उभा आहेस. जगासाठी जरी तू देव असलास तरी माझा मात्र कायम मित्रच राहिलास एक असा मित्र ज्याच्याजवळ मी हट्ट करते, ज्याच्यावर हक्काने रागावते, कडाडून भांडते. पण शेवटी मला माहित असत तुझ्याइतकी पक्की साथ मला कुणाकडून मिळणार नाही. खरं तर मी काही अवघड क्षणी तोंड फिरवलही पण तू मात्र सदैव माझ्या सोबत राहिलास. योग्य वेळी स्वतःच्या असण्याची जाणीवही करून दिलीस. माणसांच्या भाषेत जिला खरी मैत्री म्हणतात ती तू निभावलीस. अजून काय लिहू ? लिहावं तितक थोडं आहे शब्द ही तुझेच आणि अर्थही तूच. असाच सदैव माझ्या पाठीशी राहा आणि नेहमीप्रमाणे गरज पडली तर जी पडतेच कानही धर. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा💖💖  जोपर्यंत माणूस पृथ्वीवर आहे त्याला तुझ्या अस्तित्वाचा विसर पडू नये हीच अपेक्षा... बाकी दत्तात्रेयार्पणमस्तू. ।।शुभं भवतु।।
#गौरीहर्षल
२.१२.२०१७

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

स्वप्नांची खिडकी

#स्वप्नांची_खिडकी
"पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले" असं म्हणत देव आनंद हेमा मालिनीच्या मागे स्क्रीनवर धावू लागला. तशी ऋतुजा हातातलं काम टाकून देत लगबगीनं टीव्हीसमोर येऊन बसली. लहानपणापासून तिला हे गाणं प्रचंड आवडत होतं. तुम्ही समजताय तसं हिरोईन, हिरो किंवा गाण्यामुळे नाही तर त्यातल्या खिडक्यांमुळे. जेंव्हा पहिल्यांदा तिने चित्रपट बघितला तेंव्हा ते कळण्याचं तिचं वयही नव्हतं. पण ते गाणं त्या खूप सगळ्या मोठ्या मोठ्या खिडक्यांमुळे तिच्या मनात घर करून राहिलं कायमचं. त्यांचं घर तसं खूपच छोटं होतं त्यामुळे एकच खिडकी तिच्यातून प्रेक्षणीय असं काय दिसणार ना... असो तर त्या बंगल्याच्या खिडक्या तिला आवडल्या लहान असताना लपाछपी खेळायला किती मज्जा येईल तिथे म्हणून आणि मोठी झाल्यावर आणखी गोष्टी लक्षात आल्यामुळे. घरात सगळेच तिची ह्या वेडामुळे चेष्टा करायचे पण तिला काही फरक पडत नव्हता. पुढे मागे माहेरचं घरही मोठ्ठ झालं हवे तसे बदल घरच्यांनी केले पण ती सासरी जाणार असल्याने तिच्या आवडीनिवडी कुणी फारश्या लक्षात घेतल्या नाही. तिचं मन थोडंसं खट्टू झालं पण तिने स्वतःला समजावलं की इथे नाही पण स्वतःच्या हक्काच्या घरात मात्र एक तरी खिडकी अशी बनवून घेणार. त्या हक्काच्या खिडकीत स्वप्नांची माझी भेट नक्की होणार.
काही दिवसांतच तिच्यासाठी तन्मयचं स्थळ तिला सांगून आलं.सगळं काही पटण्यासारखं असल्याने तिनेही होकार दिला. आता ती आणि तन्मय  खरेदीच्या निमित्ताने वारंवार भेटुही लागले. त्यातच तन्मयने लवकरच नवीन घर घेणार असल्याचं तिला सांगितलं. आणि त्याला आवडलेल्या एका साईटवर तिला घेऊनही गेला. घर तसं मस्तच होत रो हाऊस असल्याने मोकळी जागा भरपूर होती. अजून बांधकाम सुरू होतं.हळूहळू घराचं निरीक्षण ऋतुजा करत होती आणि तन्मय तिचं. घर आवडल्याच सांगताना तिच्या आनंदात काहीतरी मिसिंग आहे हे त्याला जाणवलं. पण काय ??? त्याचं उत्तरही त्याला घरी आल्यावर मिळालं. तिच्या भावाने घराचा विषय निघताच तिला खिडकीवरून चिडवण चालू केलं. पण तिने त्याला गप्प करत विषय थांबवला. मग तन्मय हळूच नंतर त्याला नेमकं काय गुपित आहे ते विचारलं. नवीन घरातच नवीन सुनेचा गृहप्रवेश करायच ठरलं होतं. इकडे ऋतुजा आपलं स्वप्न मिटून घेत लग्नाच्या धावपळीत गुंतून गेली होती. पण तन्मय मात्र कसल्यातरी खटपटीत होता त्याचा पत्ता त्याने घरात कुणालाच लागू दिला नाही. घराचं थोडं काम राहील आहे असं सांगत तो कुणालाही तिकडे फिरकू देत नव्हता. हा हा म्हणता धुमधडाक्यात लग्न पार पडलं. वरात नवीन घरी आली. वाजतगाजत ऋतुजाचे नवीन आयुष्यात पहिले पाऊल पडले. सगळे विधी, सोपस्कार पार पडल्यानंतर मात्र सगळ्यांनाच बंद असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाण्याची घाई झाली होती. तन्मय स्वतः आर्किटेक्ट असल्याने त्याने स्वतःच्या मित्राच्या मदतीने घराचं डिझाइन थोडंसं बदललं आणि एक छानसा कोपरा ऋतुजा साठी स्पेशल तयार केला होता. म्हणायला तो कोपरा पण प्रत्यक्षात त्याने सगळ्यात वरच्या मजल्याचा पूर्ण कायापालट करून टाकला होता. ऋतुजा सोबत सगळेच जण वरचा मजला बघण्यासाठी निघाले वर जाण्यासाठी जिथून पायऱ्या होत्या तिथे पहिल्या पायरीपासून सुरेख अशा दिव्यांची सजावट होती. दरवाजा उघडताच ऋतुजाला अगदी आकाश खाली उतरून आलं आहे असं वाटलं. जास्तीत जास्त काम सूर्यप्रकाशावर होईल अशी रचना केलेली होती. त्यामुळे सगळ्याच गोष्टींना एक वेगळा टच मिळाला होता. अर्ध्या भागात सुरेखशी बाग आणि झोपाळा होता तर उरलेल्या भागात छोटीशी लायब्ररी असणारी एक मोठीशी खिडकी होती.  तिथेच लॅपटॉप टेबल आणि इतर गोष्टी मस्तपैकी मांडल्या होत्या. कधीकाळी ऋतुजाने बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी तन्मयने खूपच जास्त प्रयत्न केले होते. त्यांचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंमध्ये त्याला दिसत होत. ऋतुजाची स्वप्नांची खिडकी पलभर साठी नाही तर आयुष्यभरासाठी तिच्यावर स्वप्नांची बरसात करायला सजली होती ते ही तिच्या आवडीच्या माणसासोबत.....
#गौरीहर्षल
२८.१०.२०१७

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

हुलकावणी

हुलकावणी.......
सकाळी सकाळी ‘ती’ टेस्ट तिच्या चेहऱ्यावर न मावणारं हसू देऊन गेली. उत्साहाने भरून जात दोघेही स्वप्नांत गुंग झाले. अनपेक्षितपणे मिळालेला आनंद खूप काही क्षणार्धात बदलून गेला. कालपरवापर्यंत इतरांसाठी तर सोडाच पण स्वतःसाठीही महत्वाची नसणारी ती खूप महत्वाची असल्याप्रमाणे स्वतःलाच वागवू लागली होती.
पुन्हा एकदा ते सगळं अनुभवताना , मनापासून तो त्रास सहन करताना ती मोहरत होती. पण का कुणास ठाऊक मनातली जुनी भीती नकळतच डोके वर काढू लागली कि तिच्या अंगावर नकोसे शहारे येऊन जायचे. तरीही एकमेकांना सावरत,सांभाळत ते दोघेही परत उभे राहिलेच होते. काही दिवसातच तिला डॉ कडूनही सगळं ठीक आहे असा सिग्नल नक्की मिळणार याची तिला खात्री वाटत होती.
गेली काही वर्षं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असूनही ते दोघे सततच्या या हुलकावणीला वैतागले होते. त्यात नातेवाईक,शेजारी यांच्याकडून काहीही शहानिशा न करता हीन आणि टोमण्यांच्या रुपात होणारी चौकशी भरच घालत असे. आता मात्र असं होऊ नये अशी दोघांनाही आशा वाटत होती , तशी मनोमन प्रार्थनाही ते देवाजवळ करत होते.
अखेर तो दिवस उगवला धडधडत्या हृद्यानेच तिने डॉ च्या केबिनमध्ये प्रवेश केला. डॉ सोनोग्राफी झाल्यावरच काय ते सांगणार होते. ती उत्सुक चेहऱ्याने डॉ कडे बघत होती. डॉक्टर मात्र क्षणाक्षणाला नकारार्थी मान हलवू लागले. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. डॉ त्या दोघांकडे बघत म्हणाले, “गर्भाची वाढ जरी अपेक्षित अशी असली तरी अजूनही बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत. तरीही आपल्याकडे काही दिवसांचा वेळ आहे आपण आवश्यक ते प्रयत्न करू.” शेवटचे दोन शब्द तिला खूप जास्त धीर देऊन गेले. पुढचे १५ दिवस गोळ्या, इंजेक्शन आणि वेगवेगळ्या तपासण्या यातच जाणार होते. पण तरीही त्या दोघांनीही कसलीच कमतरता ठेवायची नाही असा निश्चय करत घराचा रस्ता पकडला. घरी पोहोचल्यावर इतक्या वेळ बांधून ठेवलेल्या अश्रूंना तिने त्याच्या कुशीत शिरत मोकळी वाट करून दिली. पुन्हा एकदा देव आपल्याला इतकी वाईट शिक्षा नक्कीच देणार नाही असं तो तिला आणि स्वतःलाही समजावत होता. पुन्हा १५ दिवसांनी काय घडेल याची पुसटशी कल्पना येऊनही दोघेही बोलून दाखवत नव्हते.
त्या १५ दिवसात जवळपासच्या देवळांच्या पायऱ्या झिजवत प्रत्येकाने सांगितलेले उपायही दोघांनी केले. आपल्याकडून कुठलीच चूक होऊ नये म्हणून ते मनापासून समोर येणारा प्रत्येक उपाय करत होते. अशावेळी काहीतरी नक्की चांगल होईल या अपेक्षेने माणूस पटत नसणाऱ्या गोष्टीही करतो असच काहीसं त्यांचंही झालं होत. इकडे तिचे २ महिने संपून ३रा सुरु झाला आणि डॉ कडे जाण्याचा दिवसही उगवला.........

दोघेही डॉक्टरकडे पोहोचले. तिचे बाकीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे बघून डॉक्टरांच्या कपाळावरील आठ्या काहीश्या कमी झाल्या. हे बघून तिलाही जरा हायसं वाटलं. आता पुढची पायरी होती नेहमीप्रमाणे सोनोग्राफीची. सोनोग्राफी करत असताना आज काहीही न बोलता डॉ खूप शांतपणे तिला तपासत होते. क्षणोक्षणी तिचा जीव मात्र कसानुसा होत होता. शेवटी डॉक्टरांनी मौन तोडत तिच्याकडे रोखून बघत तेच शब्द उच्चारले जे तिला ऐकण्याची इच्छा नव्हती. १५ दिवसांपूर्वीची अवस्था न बदलल्याने तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करावी लागणार होती. जास्त उशीर केल्यास अर्थातच तिच्याही जीवाला धोका होताच. डॉक्टर आधीपासूनच काहीसे साशंक होते त्यांनी पुढच्या प्रोसिजरची तयारी ठेवली होती. मूकपणे ह्या सगळ्याला ते दोघेही सामोरे जात होते.
काही तासांनी ती जेंव्हा शुद्धीवर आली तो तिच्या उशाशी शांतपणे बसला होता. त्याच्या डोळ्यात खोलवर बघत तिने विचारलं, “मी आई उरले नाही नं रे पुन्हा एकदा?” तितक्यात जवळूनच एक आवाज तिच्या कानावर पडला. जो तिच्यासारख्याच काही प्रॉब्लेम्समुळे नुकतच आपल बाळ गमावणाऱ्या एका आईचा होता.
ती म्हणाली, “भलेही थोड्या काळासाठी का होईना पण तू तुझ्या शरीरात,मनात त्या बाळाला जपलं होतस त्यामुळे तुझं आई असण त्याचं जाणं पुसून टाकत नाही ग. आणि ती  आई सगळ्यात जास्त ग्रेट असते जी आपल बाळ त्याला परत देऊनही खंबीरपणे उभी राहते.” तिचे ते शब्द त्या क्षणी तिला खूप काही सांगून गेले आणि गमावण्याचं दुखःही काहीसं सुसह्य झालं.
कुठल्याही आईचं मातृत्व तिचं मूल जन्माला येण्याआधीच गेलं म्हणून संपत नाही. जगातल्या त्या सगळ्याच स्त्रिया ज्यांनी कुठल्या नं कुठल्या कारणामुळे आपल मूल जन्माला येण्याआधीच गमावलं आहे त्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही त्या बाळाला जपत असतात. त्यांच्यामधली आई सदैव कधीही न भेटलेल्या ,न बघितलेल्या त्या पिल्लाला स्पर्श करण्यासाठी तळमळत असते. अर्थातच ह्या सगळ्या फेजमधून काही बाबाही गेलेले असतात मनाने तेही त्याच्याशी जोडलेले असतातच. पण अशा सगळ्याच जणींनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे तुम्ही दुर्दैवी आहात म्हणून असं घडत नाही तर इतरांपेक्षा सहन करण्याची ताकद तुमच्यात कदाचित जास्त आहे म्हणून देवाने तुम्हाला निवडलं. जे बाळ कधीच तुम्हाला दिसणार नाही अशा बाळासाठी नेहमीच एक खास जागा देवाने आपल्या मनात तयार केलेली असते त्यापेक्षा योग्य जागा दुसरी कुठली असूच शकत नाही. नाही का???
#गौरीहर्षल
११.१०.२०१७