पहाटे उठून कधी आकाश बघितलं ? हळूहळू आगमन करणारा सूर्य आणि त्याच्यासाठी असंख्य रंगांच्या पायघड्या घालणारे ढग. मुक्तहस्ताने निसर्ग रंगांची उधळण करत असतो. नकळत जरी लक्ष वेधलं तरी मन प्रसन्न होतं.
आपला दिवसच काय पूर्ण आयुष्यच असं रंगीबेरंगी असतं. रंग मनाचे, रंग माणसांचे, रंग स्वभावांचे रंगच रंग सगळीकडे. काही रंग आवडते तर काही नावडते. पण रंग हवेतच रंगांमुळे एक जिवंतपणा रसरशीतपणा असतो जगण्यात.
आपणही भरू शकतो ना रंग? भरतोच खरंतर कळत नकळत. स्वतःच्या आयुष्यातले रंग टिकवण्यासाठी आपली सतत धडपड सुरू असते. या सगळया गडबडीत कधी ना कधी दुसऱ्यांच्या रंगांना आपला धक्का लागतो लागणारच. पण मग काय करायचं ?थोडंसं थांबून मागे वळून पाहत त्या व्यक्तीला एक रंग द्यायचा आश्वासक असा नजरेतून, हसण्यातून ज्यामुळे तिचं नुकसान जरी भरून येणार नसलं तरी निदान तिला बळ मिळेल पुन्हा रंग भरण्याचं. बाकी सगळी चित्र आणि त्यातले रंग तो वर बसलेला आहे ना तो छान ठरवतच असतो. आपण फक्त आपला कुंचला घेऊन तयार राहायचं. योग्य वेळी योग्य रंग योग्य प्रमाणात उतरेल याची काळजी घेतली की झालं.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनासारखा रंगवायला मिळुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
३.७.२०१७
सोमवार, ३ जुलै, २०१७
रंग
रविवार, २ जुलै, २०१७
चांगलं वागण्याचं काम
कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं.
आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु.
#गौरी_हर्षल
२.७.२०१७
शनिवार, १ जुलै, २०१७
निवांत क्षण
रात्रीचा पडदा दूर सारत सूर्यदेव रोज नव्याने पृथ्वीवर येतात.
कधी कधी ढगांच्या आड लपत हळूच गायब होतात. आयुष्यही असंच असतं आशेच्या ढगांवर नकळत पडणारी निराशेची सावली. आशा निराशेचा खेळ रोजचाच अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर आपण निराश होतो चिडचिड करतो. मग त्या चिडचिडीने आपला आणि पर्यायाने आपल्या जवळच्या लोकांचा दिवस खराब होऊ शकतो. आता कुणी म्हणेल काम बिघडणं कुठे आपल्या हातात असतं? बरोबर आहे आपल्या हातात नसतंच काम बिघडणं पण बिघडलेल्या कामाला सुधारणं तर असतं. दोन सेकंद थांबून जरा श्वास घेऊन विचार केला तर उत्तरही सापडतच. गरज असते ती स्वतःला वेळ देण्याची आपण काही शर्यतीत नाही आहोत. आणि असलो तरी आयुष्याची शर्यत सगळ्यात मोठी असते. ती जिंकण्यासाठी आधी आपण तर टिकायला हवं. म्हणूनच चिडचिड होत असताना थोडंसं थांबून स्वतःला विचारायचं की इतकी धावपळ इतका त्रागा आत्ता या क्षणी करण्याची गरज आहे का? उत्तर स्वतःकडूनच मिळेल आणि योग्य मिळेल.
आयुष्य भरभरून जगण्यासाठी फक्त थोडं निवांत विचार करण्याची गरज आहे बास. हे जर जमलं तर आपलं आणि आपल्या जवळच्या सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलेल. अवघड असेल कदाचित पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करा.
प्रत्येकाला आज एक तरी निवांत असा विचारी क्षण लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
१.७.२०१७
शुक्रवार, ३० जून, २०१७
कातरवेळ
#कातरवेळ
कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी.
अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे.
#गौरी_हर्षल
३०.६.२०१७
सुगंधित हेतू
#सुगंधित_हेतू
'नीता' जोशींची धाकटी सून तिचं आणि वैभवचं म्हटलं तर लव्ह मॅरेज म्हटलं तर अरेंज. कारण दोघांची जात एकच आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांना ओळखत होते. पण तिच्या थोरल्या जावेला मात्र हे लग्न मान्य नव्हतं. तरीही हसत खेळत एकदाचा नीता आणि वैभवाचा संसार सुरू झाला. मनात कसलीच अढी बाळगण्याची सवय नीताला नव्हती त्यामुळे कुणी काही बोललं तरी ती ते विसरून हसतमुखाने वावरत असे. हळूहळू मात्र सासू, सासरे, दिर, जाऊ, नणंद , नणंदेचा नवरा यांच्यामधली छुपी भांडणं हेवेदावे सतत तिला समजू लागले. घरातल्या घरातच सगळ्यांना एकमेकांशी स्पर्धा करायची होती कुणाला कमवत असलेल्या पैशाच्या जोरावर तर कुणाला घरातील महत्वाचं स्थान हवं म्हणून. वैभव निताचा नवरा मात्र तिच्यासारखाच होता ४ क्षण एकत्र आहोत तर आनंदाने जगू असा विचार करणारा. त्यामुळे आधी कधीच त्याला हे जाणवलं नाही आणि जरी जाणवलं तरी वयाने लहान म्हणून तो मध्ये पडला नाही. नीताला मात्र इतकी चांगली लोकं नको त्या गोष्टीत आयुष्य का वाया घालवत आहेत हेच कळत नव्हतं. ही सतत चालणारी धुसफूस एकदाची संपवून टाकू म्हणून नीताने सगळ्यांना कुलदेवतेच्या दर्शनासोबतच छोटीशी ट्रिप करू असा प्लॅन सांगितला. अनायसे सगळ्यांना सुटी मिळत असल्याने सगळे तयार झाले. होकार मिळताच तिने प्रत्येकाने ठराविक शेअर वाटून घेऊ म्हणजे वाद नको असं म्हणत एक अंदाजपत्रक मांडले ज्यात सगळा खर्च समाविष्ट केला होता. तिची ही कल्पनाही मान्य झाली.
आणि आज माहूरला दर्शन आटोपून मंडळी शेगावला निघाली होती. नेहमीच्या पेक्षा रागरंग जरा वेगळेच दिसत होते जे नीताच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. आताशा तिला लक्षात आलं होतं की या भांडणाच मूळ कारण काय आहे. या पैकी कुणीच कधी दुसर्यासोबत छान असा वेळच नव्हता घालवला त्यामुळे सतत फक्त नात्यातील ताणच वाढत गेला.
रात्री मुलं झोपल्यावर सगळे मोठे एकत्र गप्पा मारत बसले. मग हळूच छोटासा गेम खेळू असं सांगत नीताने सगळ्यांना तयार केले. गेम होती बॉटल स्पिन करण्याची ज्याच्याकडे बाटलीचं तोंड येईल त्याने आपल्या सोबतच्या व्यक्तीबाबत ४ अशा आठवणी सांगायच्या ज्या कुणालाच माहीत नाहीत त्या दोघांशिवाय. टीम अर्थातच नीताने चिट्ठी टाकून केल्या ज्या अगदी तिला हव्या तशा झाल्या ती आणि सासरे, दिर आणि नणंदेचा नवरा, नणंद आणि जाऊ, वैभव आणि त्याची आई. निताचा हेतू लक्षात आल्याने तिचे सासू सासरे मनातून सुखावले होते. गेम जशीजशी पुढे सरकत होती तसतशी सगळ्यांनाच इतकी वर्षे धरून ठेवलेल्या गोष्टींमधून मोकळं करत होती. सुरुवात नणंद आणि जाऊ यांच्यापासून झाली आधी छोटे छोटे प्रसंग दोघीनीही सांगीतले पण नकळतच आपण एकमेकींबद्दल चांगलं कसं काय बोलू शकतो हे प्रश्नही त्यांना पडला होता. मग असच काही त्या दोघींच्या नवरयांबाबतही झालं. हळूहळू मनातल्या सगळ्या शंका फिटत गेल्या आणि एका क्षणी सगळ्यांना जाणवलं की आत्ता जो जगत आहोत ती सुद्धा तर एक महत्वाची आठवण होतेय भविष्यासाठी. समाधानाने नजरेतील पाणी टिपत सगळेच झोपले.
दुसऱ्या दिवशीची सकाळ सगळ्यांसाठीच एक नवीन सुरुवात करणारी ठरली. नेहमी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडणारे आज समोरच्याची काळजी घेण्यासाठी भांडताना बघून नीता आणि वैभव खुश झाले. शेगावला दर्शन,फिरणं सगळं आटोपून मंडळी गाडीत बसली. येताना वाटेवर सगळे फ्रेश होण्यासाठी उतरले नीता आणि तिच्या सासूबाई मात्र गाडीतच होत्या. नीता उतरू लागली तशा त्या तिला थांब म्हणाल्या. ती थांबली आणि त्यांना रडूच कोसळले. नीताला समजेना काय झालं ती काही बोलणार इतक्यात तिचे सासरे मागून म्हणाले, "तिलाही मोकळं होउदे पोरी, इतकी वर्ष तिने सगळ्यांना सांभाळून घेत खूप क्षण एकटीने साठवले. पण तू आलीस आणि इतक्या कमी वेळात ती ज्या गोष्टीसाठी तळमळत होती ती तिला मिळाली. खरं तर आम्ही दोघेही तुझे आभारी आहोत तुझ्यामुळे आमचं गोकुळ पुन्हा फुललं आहे." तेवढ्यात वैभव तिथे आला आणि परिस्थितीची कल्पना येताच तो म्हणाला, "मग बाबा आता तुम्हाला तयारी करावी लागेल या गोकुळात येणाऱ्या नव्या सदस्यासाठी" त्याचं मिस्कील हसू लक्षात येताच सगळे आनंदले. आणि जल्लोषात पुढचा प्रवास सुरु झाला.
मावळतीला जाणारा सूर्य आसमंतात रंगाची उधळण करत होता. पण एक नवाच रंग नीता आणि वैभवसकट सर्वांच्या चेहऱ्यावर होता रंग समाधानाचा. आणि त्या रंगाची उधळण सोबत विश्वास आणि प्रेमाचा सुगंधही घेऊन आली होती.
निताचा #सुगंधित_हेतू सफल होऊन तिला कधीही न संपणारे समाधान देऊन गेला होता.
#गौरी_हर्षल
#३०_६_२०१७
नातं....
ढगांवर घातलेलं चांदण्यांचं पांघरूण काढून घेत रात्र परतीच्या प्रवासाला निघाली. नाजूकपणे पृथ्वीवर उतरणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांना बघून खुदकन स्वतःशीच हसली. नकळतच तिच्या मनात आले की कसं आहे हे पहिला आला की दुसऱ्याला जावेच लागते नं.
तसंच काही नात्यांचंही होतं ना !! काही नाती रोजच्या जगण्यात खूपच सवयीची असतात, तर काही कधी हात सोडून निघून जातात कळतही नाही. एखादं नातं खूप गाजावाजा करत आयुष्यात येतं पण पुढे मात्र कुठल्याही वळणावर ते आपल्याला भेटतच नाही. एखादं नातं मात्र गुपचूप येतं आणि आपल्याला कळूही न देता आयुष्याचा महत्वाचा भाग होतं.
काही नाती स्पीडब्रेकर सारखी असतात आयुष्यात योग्य वेळी येऊन आपल्याला धोक्याची सूचना देणारी. तर काही अडखळणारी कधी नेमकं काय करायचं हेच न समजल्याने आपल्याला सोबत घेऊन धडपडणारी. नाती येताना सोबत खूप काही आणतात चांगलं ते ठेऊन घ्यावं नको ते सोडून द्यावं.
पण नाती कशीही असली तरी आपण ती आपली मानलेली असतात. त्यांच्यासोबत येणारे अनुभव, कडू गोड आठवणी आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. शिकतोच आपण प्रत्येक नात्याकडून काही न काही. फक्त ते शिकलेलं जतन करता आलं पाहिजे.
मनापासून सगळ्याच नात्यांना जमेल तेवढं जपलं पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही पण निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?? जमेल नक्कीच थोडेतरी.
प्रत्येकाला आज एक तरी हसरा, समंजस क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
३०.६ .२०१७
गुरुवार, २९ जून, २०१७
चांगुलपणा एक शाप?
चांगुलपणा एक शाप
टायटल फारच विचित्र आहे ना? पण कुठेतरी ही आजची वस्तुस्थिती आहे का? नुकताच मैत्रिणीसोबत घडलेला किस्सा.
एका बागेत शेजारी शेजारी राहणारी मुलं खेळत होती. तिथेच त्यांच्या भ्रमणध्वनीधारक व्यस्त माताही होत्या. मुलांचं वय असेल 4 ते 6 वर्षे वयोगट. कशावरून तरी मुलांचं भांडण झालं. एकजण रडत आईकडे सॉरी मम्मीकडे आला. भांडणाच कारण होत रडणाऱ्या मुलाकडे असलेलं नवीन खेळणं. बाकीच्यांपैकी कुणीतरी ते मागितलं ह्याने दिलं नाही. मारामारी केली मागणाऱ्याने. जो रडत आला त्याच्या मम्मीचं म्हणणं होतं की तू का मारलं नाहीस उलटून? या प्रसंगात ती जे म्हणाली ते कदाचित योग्य असेलही पण यातून पुढे खरा संवाद सुरू झाला. तो असा की हल्ली मुलांना चांगलं वागायला शिकवून काही उपयोग होत नाही . उलट इतरांवर चिडणे,मारणे , ओरडणे वगैरे शिकवावं लागत तिच्यामते आणि इतरही काही जणींच्या मते. चुकून माझ्या तोडून निघून गेलं की अगं न शिकवता तुमची मुलं चांगलं वागत आहेत तर तुम्हाला का त्रास होतोय??
त्यावर मला मिळालेलं उत्तर असं , तुला काय मिळतंय इथे चांगलं वागून?? तुझी तर सज्जनपणात phd आहेना. तुझ्यासारखा त्रास आमच्या मुलांनी पण सहन करायचा का?
यावरून मला वरचा प्रश्न पडला की हल्ली चांगला स्वभाव असणं, चांगलं वागणं हे शाप ठरतंय का ???
गौरी हर्षल
१२.४.२०१७
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
How to Deal with Negative People: नकारात्मक लोकांसोबत कसे वागावे? काही लोकांना नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणे आवडत ...
-
Clearing the Mental Clutter: How the Simple Act of a Brain Dump Can Boost Your Well-being? मनातील गर्दी दूर करणे: 'ब्रेन डं...
Contact form |
Tags |
