नातं....

ढगांवर घातलेलं चांदण्यांचं पांघरूण काढून घेत रात्र परतीच्या प्रवासाला निघाली. नाजूकपणे पृथ्वीवर उतरणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांना बघून खुदकन स्वतःशीच हसली.  नकळतच तिच्या मनात आले की कसं आहे हे पहिला आला की दुसऱ्याला जावेच लागते नं.
तसंच काही नात्यांचंही होतं ना !! काही नाती रोजच्या जगण्यात खूपच सवयीची असतात, तर काही कधी हात सोडून निघून जातात कळतही नाही. एखादं नातं खूप गाजावाजा करत आयुष्यात येतं पण पुढे मात्र कुठल्याही वळणावर ते आपल्याला भेटतच नाही. एखादं नातं मात्र गुपचूप येतं आणि आपल्याला कळूही न देता आयुष्याचा महत्वाचा भाग होतं.
काही नाती स्पीडब्रेकर सारखी असतात आयुष्यात योग्य वेळी येऊन आपल्याला धोक्याची सूचना देणारी. तर काही अडखळणारी कधी नेमकं काय करायचं हेच न समजल्याने आपल्याला सोबत घेऊन धडपडणारी. नाती येताना सोबत खूप काही आणतात चांगलं ते ठेऊन घ्यावं नको ते सोडून द्यावं.
पण नाती कशीही असली तरी आपण ती आपली मानलेली असतात. त्यांच्यासोबत येणारे अनुभव, कडू गोड आठवणी आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. शिकतोच आपण प्रत्येक नात्याकडून काही न काही. फक्त ते शिकलेलं जतन करता आलं पाहिजे.
मनापासून सगळ्याच नात्यांना जमेल तेवढं जपलं पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही पण निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?? जमेल नक्कीच थोडेतरी.
प्रत्येकाला आज एक तरी हसरा, समंजस क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
३०.६ .२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी