घर हक्काचं भाग ३

घर हक्काचं
भाग
इकडे आदितीचीही गडबड चालू होती निशाला लवकर घरी आणण्यासाठी. पण त्याच बरोबर तिला अजून एका व्यक्तीचं स्वागत वाजतगाजत करण्याची उस्तुकता लागली होती.
अदितीच्या नवऱ्याचा एक जुळा भाऊ होता. अदितीचा नवरा आमोद  इंजीनियर त्यामुळे त्याचं शिक्षण लवकर संपून तो सेटलही लवकर झाला होता. पण शिशिर,हो शिशिरच... तोच जो मयुराला कॉन्फरन्समध्ये भेटला. तर त्याला डॉक्टर व्हायचं होत त्यामुळे त्याने घरच्यांना लग्न हा विषय काढण्यासाठी सक्त मनाई केली होती. पण आदितीकडून बर्याचदा मयुराच नाव घेतलं जाऊ लागल मग त्याला कुतूहल वाटलं आणि तो कुणालाही न सांगता एकदा मयुराला तिच्या नकळत पाहून आला. तिचं काम तिचा स्वभाव यामुळे त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागलाच होता. त्यातच मयुरा त्याला कॉन्फरन्समध्ये भेटली मग दोघांची हळूहळू गट्टीही जमली. आपल्याला मयुरा आवडते आहे हे कळल्यावर त्याने हि गोष्ट अदितीच्या कानावर घातली. अदितीला तर काय करावे हेच सुचेना. पण शिशिरने तिला सांगितलं को जोपर्यंत मयुराकडून हवा तसा रिस्पोन्स मिळत नाही तोपर्यत घरात काही सांगायचं नाही.
मयुरा आणि शिशिर कॉन्फरन्सवरून परत आले. बऱ्याच वर्षांनी मयुराने कुणाशी तरी मैत्री केली होती. शिशिर एक माणूस म्हणून चांगला आहेच पण त्याला आपल्या दिसण्याने फरक पडत नाही हे शिशिरच्या तिला अटेन्शन देण्यावरून तिच्या लक्षात आलं होतं. तिने आयुष्यात कधीही हा अनुभव घेतलाच नसल्याने हे नक्की प्रेम आहे कि आणखी काही हे मात्र तिला कळत नव्हत. याच कन्फ्युजन मध्ये असताना तिला अदितीचा मेसेज आला भेटतेस का? म्हणून. मग हा विषय आदितीशिवाय कुणाजवळ बोलणार हे लक्षात येताच तिने हो असा रिप्लाय करत भेटण्याची वेळ आणि जागा ठरवली.
दोघीजणी भेटल्या आदितीलाही मयुराला शिशिरविषयी काय वाटत हे जाणून घ्यायचच होत. तर मयुरानेच विषय काढला आणि तिने  भेटल्यादिवसापासूनची स्टोरी सांगितली जी अदितीला आधीपासून माहित होती. पूर्ण कथा ऐकल्यावर अदितीने तिला विचारल कि,“तुला नेमक काय वाटतय?” त्यावर मयुराने पुन्हा एकदातरी शिशिरला भेटून त्याला खरच असं काही वाटत का हे कळायला हवं असं सांगितलं. अदितीने नकळतच सुटकेचा श्वास सोडला.
शिशिर अनेक संस्थांमध्ये स्वतःहून मोफत सेवा करत होता. त्याने त्या अंतर्गतच मयुरा जात असलेल्या संस्थेत भेट दिली आणि तो निशालाही भेटला. निशाला तर काका खूपच आवडल्याने तिने तो निघाल्यावर रडून गोंधळ घातला. हे सगळं बघून मयुरा मनातून नकळतच सुखावली. पण अजूनही तिला अदिती आणि शिशिर एकमेकांना ओळखतात हे माहित नव्हते. एकीकडे निशाची दत्तक प्रोसेस पूर्ण होत आली होती तर दुसरीकडे मयुरा आणि शिशिर एकमेकांमध्ये गुंतले होते. निशा सोबत आता खूप थोडे दिवस राहता येणार म्हणून मयुराला खूप वाईट वाटत होत पण निशाला हक्काचं आणि विशेष म्हणजे खूप प्रेम करणारं घर मिळणार म्हणून आनंदही होत होता. १५ दिवसांनी निशा कायमची आदितीकडे जाणार होती. अदितीच्या घरी निशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली होती. त्यानिमित्ताने तिने मयुराला खूप आग्रह करून घरी नेलं. अदितीने शिशिर सोडून सगळ्यांना मयुरा आल्यावर घरीच असायला पाहिजे असं सांगितलं होतं. त्यावरून घरच्यांना थोडासा अंदाजही आला होताच पण कुणी काही बोललं नाही.
मयुराने दबकतच अदितीच्या भल्यामोठ्या बंगल्यात पाय ठेवला . तिला बघताच खूष झालेली अदिती नेहमीप्रमाणे धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. तिला आत नेऊन तिने उत्साहाने सगळ्यांशी तिची ओळख करून दिली. अर्धा पाउण तास मस्त सगळ्यांच्या गप्पा झाल्या. मयुरा जायला निघाली तेंव्हा अदितीने सगळ्यांच्या वतीने तिला निशासाठी होणाऱ्या घरगुती स्वागत समारंभासाठी आमंत्रण दिले. इतक्या छान लोकांकडे निशा येणार या आनंदात मयुरा घरी परतली.
मयुरा गेल्यानंतर अदितीने सगळ्यानाच शिशिरच्या मनात काय चालू आहे याची कल्पना दिली आणि मयुरा कशी वाटली हे विचारलं. घरात सगळेच रूपापेक्षा बुद्धिमत्तेला जास्त महत्त्व देणारे असल्याने शिशिरची निवड सगळ्यांनाच पटली. त्याच्या आईनेतर पुढे जाऊन निशा येणार त्या दिवशीच शिशिरने मयुराला लग्नाची मागणी घालावी अशी कल्पना मांडली. आणि मंडळी तयारीला लागली.
निशा ज्या दिवशी अदितीच्या घरी येणार होती त्या दिवसासाठी अदितीने आपल्याला का छान आवरून यायला सांगितले आहे हे मयुराला  काही केल्या कळत नव्हते. पण मैत्रिणीचा हट्ट मानून ती छान आवरून अदिती सोबतच तिच्या गाडीत घरी पोचली. दाराजवळ जाताना सामान विसरल्याचा बहाणा करत ती गाडीकडे परत गेली. मयुरा चालत चालत दारासमोर असलेल्या सजवलेल्या पोर्चमध्ये पोचली. तोच तिच्यावर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. आणि ती काही बोलणार इतक्यात कुणीतरी येऊन तिचे डोळे अलगद झाकले. आणि तिच्या कानाजवळ एक सुरेल ओळ गुणगुणली, “तेरा मुझसे है पहलेका नाता कोई, युंही नहीं दिल लुभाता कोई.....” हात दूर झाले. अदितीने हळूच मयुराला गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेली पाउलवाट दाखवली. तिकडे बघताच मयुराला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझी काकू होशील का असं शिशिरच्या कुशीत बसलेली निशा तिला तोडक्यामोडक्या भाषेत विचारत होती. तिने धावत जाऊन निशाला हातात घेत शिशिरच्या हातात हात गुंफले आणि डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या दिवशी फक्त निशालाच नाही तर मयुरालाही तिचं हक्काचं घर आणि प्रेम करणारी माणसं मिळाली.
समाप्त #गौरीहर्षल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी