शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 6

#Quote_of_the_day6

सारिकाच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्या निमित्ताने घरातच पूजा आणि छोटंसं गेट टुगेदर करावं असं तिने आणि तिच्या नवऱ्याने सचिन ने ठरवलं. त्यानुसार एक छान सोयीचा मुहूर्त निवडत तयारी सुरू झाली. हवापालट म्हणून गावी  गेलेल्या माई आणि आबांना आणण्यासाठी गाडीही दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे ठरले. माई आबा म्हणजे सचिनचे आईवडील. गावी सचिनचा भाऊ सुरेश त्याची पत्नी  सुनीता आणि मुलगा राहत होते. गावी राहणं हा त्या दोघांचा निर्णय होता कारण तिथे राहून काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यात सुनीतालाही तिथलं वातावरण आवडल्याने तिने तिथंच राहू अस ठरवलं. त्या हेतूने गावाकडच्या घरातही सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या गेल्या. सचिन आणि सुरेशला एक बहीण ही होती सपना तिचं लग्न जवळच्या गावातच झालं होतं पण ते नवराबायको नोकरीनिमित्त वेगळ्या शहरात होते आणि सासुसासरे गावी असायचे.  असा आपापल्या विश्वात रमलेल्या तरीही जिवलगांचा हा गोतावळा सुखी होता.  गेट टूगेदरच्या निमित्ताने सगळेच सचिन-सारिका कडे जमले होते.
 ह्या सगळ्यात अजून एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. ती म्हणजे सपनाची जाऊ रेश्मा. ती तिच्या मुलांसह आणि नवऱ्यासह आदल्या दिवशीच आली होती. सपना आपल्या माहेरच्या शिकवणुकी मुळे आणि आपल्या दोन्ही भाऊ वहिनीच्या तालमीत नाती जोडायला शिकली होती. ह्या सगळ्यामुळे ती लांब रहात असूनही सासुसासरे तिचं कौतुक करत असत. रेश्माही लांबच होती पण गावातच आणि भांडून वेगळी झालेली त्यामुळे थोडासा मनाने दुरावा होताच. सपनाच्या कौतुकाने रेश्माला खूप त्रास होऊ लागला आपण तसे वागू शकत नाही हे तिला चांगलं माहीत होतं. मग आता काय सतत संधी मिळाली की सपनाला टोचुन बोलणं , अपमान करणं सुरू झाले. सुरुवातीला सपनाने दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्रास देण्याचं प्रमाण वाढलं तसं कुणाशीच बोलत नसल्याने सपना आतूनच खंगु लागली. त्याचा तिच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. 
आज समोर आलेल्या सपनाला बघताच सारिका आणि सुनीता दोघींनाही काहीतरी गडबड आहे हे कळलं. पूजा वगैरे आटोपल्यावर सगळे निघाले तसे त्या दोघींनि आग्रह करून आराम करण्यासाठी म्हणून सपनाला ठेवून घेतले. वेळ मिळताच दोघीही सपनाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. आणि हळूहळू काय होतंय हे ही काढून घेतले. मुद्दा लक्षात येताच त्यांनी आधी सपनाला रडून मोकळे होऊ दिले. मग कुठल्याही परिस्थितीत माहेरचे सगळे तुझ्या बाजूने असतील हे सांगितलं. सपना थोडी स्थिर झाली. मग सारिका तिला म्हणाली की हे बघ सपना आपली चूक नसताना तू हे सगळं सहन केलं हे तुझं चुकलंच. मान्य आहे ती मोठी आहे पण तुझा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तू वेळीच गोष्टी सासुसासर्यांना , नवऱ्याला नाही तर आम्हाला तरी सांगायच्या होत्या. असो आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे जशास तसे उत्तर न घाबरता दे. आणि सगळ्यात आधी तिच्या आरशात स्वतःला बघणं बंद कर. ती जे करते वागते ते तिचं प्रतिबिंब आहे तुझं नाही. तू जशी आहेस तशीच सगळ्यांना आवडतेस अगदी तुला स्वतःलाही. नवीन नाती जोडून ठेवताना स्वतःलाही जपायला शिक.  आयुष्यात अशी खूप लोकं भेटतील जी तू कशी आहेस हे तुलाच सांगायचा प्रयत्न करतील. पण तुला स्वतःला माहीत आहे न तू कशी आहेस मग बास त्यावर विश्वास ठेव. आणि इतरांच्या वाईट वागण्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर नको करून घेऊ. नाहीतर येणाऱ्या बाळाचं काय होईल हळूच हसत सुनीता म्हणाली. सपनाने चमकून दोघींकडे बघितलं तशा त्या म्हणे लाडकी आहेस तू आमची आम्हाला तुला बघतानाच जाणवलं होतं म्हणून तर तुला ठेवून घेतलं. आता 7,8 दिवस मस्त लाड करून घे मग जा तुझ्या काळजीवाहू नवऱ्याकडे. तिघीही समाधानाने हसू लागल्या. 
आपल्या बद्दल जेंव्हा कुणी काही बोलत तेंव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देऊ लागतो. स्वतःवर बोट ठेवतो. पण अस करण्याआधी हा विचार करत नाही की अरे माझ्यासोबत माझ्याशिवाय जास्त वेळ कुणीही घालवलेला नाहीये. म्हणजे हे म्हणतात तशी मी नक्कीच नाहीये.  लोकं नकळतच आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आपण स्वतः कसे आहोत हे दाखवत असतात. त्याचं योग्य निरीक्षण करायचं आणि आपण कसे होऊ नये हे ठरवायचं😜  After all, 
The way people treat you is a statement about who they are as a human being. It is not a statement about you. #गौरीहर्षल

कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा ?? थॅंक्यु ❤️❤️

Quote of the day 5

#Quote_of_the_day5

रचना एक खूप चुणचुणीत चटकन कुणाच्याही नजरेत येईल अशी गोड मुलगी. धाकटी असल्याने सगळ्यांची आवडती. जितकी घरच्यासमोर साधी तितकीच बाहेर त्या उलट असे. पण स्वतःच्या मर्यादा तिने आखून घेतलेल्या असल्याने घरचे कधीही तिला कशासाठी अडवत नव्हते. नुकतंच तिने शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता नव्यानेच नोकरीही हातात आली होती. सुरुवातीचे दिवस असल्याने घरून एक दोन महिने पगार हवा तसा वापरायची तिला परवानगी होती. मग काय मस्त मज्जा करणं सुरू होतं. पण त्यातही ती घरच्यांना विसरली नव्हती पहिल्या पगारात सगळ्यांना आवडतील असे सरप्राईज दिले होते तिने ह्या कृतीमुळे आईबाबांना आपल्या मुलीबद्दल असलेली खात्री अजूनच पक्की झाली होती. मित्रही भरपूर होते तसे तिला पण घरचं वातावरण मोकळं असल्याने घरी सर्व माहिती असे. हल्लीच मात्र मित्रमंडळी मध्ये एक नवीन चेहरा सतत दिसू लागला होता. तो होता समीर रचनाचा कलीग समवयस्क असल्याने तो त्यांच्या ग्रुपमध्ये कधी मिसळला कुणाला कळलंच नाही. हळूहळू रचना आणि समीरची फक्त मैत्री नसून पुढे काहीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. तसे आडून आडून सगळे छेडतही असत. पण अजून त्या दोघांनी काही मान्य केलं नव्हतं. विशेष म्हणजे रचनाला काही गोष्टी आधीच स्पष्ट करायच्या असल्याने ती तटस्थपणे स्वतःच्या भावना बघत होती. समीरबद्दल फक्त जुजबी माहिती तिच्याकडे होती त्याच्या घरचे, मित्रमंडळी बाकी गोष्टी त्याने कधी स्वतःहून सांगितल्या नव्हत्या. आणि विचारलं तर तो टाळतो हे तिला समजलं होतं. मग ह्यावर उपाय म्हणून तिनेच तिच्या जवळच्या एक दोन मित्रांना आणि भावाला विश्वासात घेत सगळं सांगितलं पण पुढे जाण्याआधी मला समीरबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी मदत करा असंही ती म्हणाली. मग हळूहळू सगळे आपापल्या परीने कामाला लागले. समीरची फॅमिली कुठे असते , काय करते शोधू लागले. ह्या सगळ्या शोधमोहीमेत फार अविश्वसनीय माहिती मिळाली. इकडे समीरला ह्या सगळ्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो रचनाला कस प्रपोज करावं ह्या विचारात होता.  खरी माहिती मिळाल्यावर रचनाला खूप धक्का बसला पण वेळीच सगळं कळलं म्हणून तिला बरं वाटलं. समीरने आपल्या नावासह सगळी ओळख बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणतात न सत्य बाहेर येतंच. त्याच्या घरचं गुंडगिरी असणार वातावरण, ज्यात समीर ही सहभागी होता. तो नसता तर कदाचित वेगळा विचार करता आला असता. पण हळूहळू त्या गोष्टींची खोली लक्षात आल्याने रचनाला तिच्या भावाने सावध केले. पण तिचं आधीच ठरलेलं होतं  त्यामुळे समीर जेंव्हा तिला प्रपोज करेल अस वाटू लागलं. त्या आधीच बाबांनी आणलेल्या मुलाशीच आपण लग्न करणार अस म्हणत तिने स्वतःच्या भावना प्रॅक्टिकली हाताळल्या. जे प्रचंड गरजेचे होते. ह्या सगळ्यात तिलाही भरपूर त्रास झाला कारण ती तिच्या पातळीवर त्याच्यात गुंतली होती पण समजूतदार कुटुंब पाठीशी असल्याने तिला फायदा झाला. समीरला वेळीच हिंट मिळाल्याने तो मागे फिरला. अर्थात अपवाद ठरला.  
इथं ही कथा आहे पण प्रत्यक्षात अशी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येतात ज्यांच्या आपल्या आयुष्यात असल्याने आपण प्रचंड भावनिक उलथापालथ अनुभवत असतो. वेगवेगळ्या नात्यांच्या रूपाने भेटणाऱ्या अशा लोकांमुळे आपलं आयुष्य डिस्टर्ब होत असत. अशा लोकांना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळून एक अंतर ठेवून वागायला शिकावं लागतं. नाही तर त्रास होणारच. कधी कधी तर काही लोकांना दूरही करावं लागतं. कुणी आपला फायदा उचलत असतं, कुणी उगाच demotivate करत असत. पण आपण जर स्वतःला स्वतःची पहिली priority ठरवलं न तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधी करू लागतो. मग आपलं सुखदुःख, आनंद, यशापयश हे इतरांची नाही आपली जबाबदारी होतात. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदाही आपल्यालाच होतो. 
हा #Quote_of_the_day ही असच काही सांगतो, बघा पटतंय का ??     #गौरीहर्षल
Not everyone you loose is a loss. 

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

Quote of the day 4

#Quote_of_the_day4

मैथिली एका छोट्या सोसायटी मध्ये राहत होती. पंचकोनी कुटुंब सासुसासरे, मैथिली ,तिचा नवरा अमेय आणि मुलगी इरा. नणंद त्याच गावात पण तिच्या सासरी होती. ओव्हर ऑल बाहेरून बघताना एक छान हसतखेळत जगणार कुटुंब. ह्या जागी 2bhk फ्लॅट घेऊन नव्यानेच ते शिफ्ट झाले होते. हळूहळू तिथलं वातावरण , शेजार ह्यांच्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवराबायको दोघेही काळाची गरज असल्याने नोकरी करणारे त्यामुळे ओघाने मुलीची थोडीशी जबाबदारी आजीआजोबांवर यायची. घरोघरी मातीच्या चुली ह्या नियमाला हे घरही अपवाद नव्हतं पण अमेयच्या वडिलांची शिकवण होती जे काही वाद असतील ते घरातच मिटवायचे. बाहेरच्या कुणालाही त्याची पुसट कल्पना सुध्दा नको. त्यामुळे फारसे विकोपाला जाणारे वाद होत नसतं. आता हल्ली टीव्हीवर असणाऱ्या सासुसुनांची कृपा की लोकांना कुठेही आसपास हसून खेळून राहणारी जोडी दिसली की ते डोकावतात. हे सगळं इतकं छान कसं???असाच प्रकार ह्या कुटुंबाबाबतही होऊ लागला. शेजारच्या पाटील काकूंना जरा जास्तच कुतुहल होतं की सून घरी नसते तर सासू काहीच चिडचिड का करत नाही? मग आपल्या रिकाम्या डोक्याचा काय उपयोग असा विचार करत त्यांनी हळूहळू सासुशी मैत्री वाढवली. पण तरीही काही हाताला लागेना. कारण घरचा नियम सगळे मनापासून पाळत असत. मग पाटीलकाकूंनी दुसरं अस्त्र वापरले त्या आपल्या सुनेच्या कागळ्या करू लागल्या जेणेकरून तरी मैथिलीच्या सासूबाई काहीतरी बोलतील पण पुन्हा तेच. उलट त्या पाटील काकूंनाच थोडस जुळवून घेण्याचा सल्ला देऊ लागल्या. हेही फेल म्हटल्यावर आता पाटील काकू नेहमीच्या ग्रुपकडे वळल्या आणि मैथिलीच्या कुटुंबाबद्दल उलटसुलट बोलू लागल्या जे की सर्व  मनानेच तयार केले होते. हे सगळे मैथिलीच्या घरच्यांना तेव्हा कळले जेंव्हा पाटील काकूंच्या मुलाने त्याला विचारलं की घरात इतके प्रॉब्लेम सुरू आहेत तर तू वेगळा का नाही राहत?? अचानक आलेल्या या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे अमेयला सुचेना पण त्याने अरे इतकं तर सगळ्याच घरात होतं वेळ दिला की सुटेल गुंता अस म्हणत वेळ मारून नेली. 
घरी आल्यावर मात्र त्याने जेवल्यानंतर सगळ्यांशी बोलायचं आहे असं सांगितलं. जेवण झाल्यावर इराला झोपवून सगळे हॉलमध्ये जमले. अमेयने आपला अनुभव सांगितला तसाच अनुभव आपल्याला आल्याचे त्याच्या बाबानी पण सांगितले. 
आई आणि मैथिलीच्या मात्र लक्षात हा प्रकार आला. आणि मग सगळं काही त्यांनी त्या दोघांना सांगितलं. लोकांना हल्लीच्या बिझी आयुष्यात दुसऱ्यांच्या घरात काय वाईट घडत आहे ह्यात इतका रस का आहे हे त्यांना कळेचना. ह्या वर उपाय एकच होता सगळ्यांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवणे आणि आपल्या वागण्यातून घरात सगळं नीटच आहे हे लोकांना पटवणे. 
दुसऱ्याच दिवशी ठरवलेल्या पद्धतीने वागायला सर्वांनी सुरुवात केली. ऑफिसला जाताना मैथिलीला मुद्दाम थांबवत आई किंवा बाबा डबा आणून देत मग ती हसून त्यांचा निरोप घेई. अमेय आईबाबांसोबत जास्त वेळ घालवू लागला. ह्या कामात तिच्या नणंदेनेही मदत केली सुट्टीच्या दिवशी ती तिच्या नवरामुलांसह  येई दिवसभर गप्पाटप्पा , खाणे ह्याने घर नुसते भरून जाई. सलग दोन महिने अशा काही छोट्या छोट्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत आहेत अशा करत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला खरा पण ह्यावेळी एक नवीनच प्रश्न समोरून आला इतकं सगळं चांगलं कसं?😂😂 ह्या प्रश्नांनी सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागली. पण एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं नातं अजूनच घट्ट झालं. ते सगळे कुटुंब म्हणून अजून जवळ आले. आणि सगळ्यांना हेही लक्षात आलं की लोक बोलणारच आपण मात्र आपलं आयुष्य जगत राहायचं आनंदाने. 
तात्पर्य हेच की आपण कसेही असु समाज मात्र त्याने लावलेल्या चष्म्यातूनच आपल्याकडे बघत असतो. आपलं वाईट होत असेल तर फुकटचे सल्ले देतो आणि चांगलं होत असेल तर बोटं मोडतो. ह्या सगळ्यांवर एकच उपाय असतो तो म्हणजे आपल्या छोट्याशा  विश्वात एकमेकांना समजून घेणे, विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे आहे त्या क्षणांना भरभरून जगणे. आहे त्या परिस्थितीतही समोरचा आनंदी कसा काय हे लोकांना जास्त कोड्यात पाडते. कुणी आपलं घर तोडण्यासाठी, नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते वेळीच ओळखून आपलं नातं घट्ट व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावेत जे त्या व्यक्तीला जागेवर आणतील. आपण नेहमी रागाच्या भरात म्हणत असतो की हिने / ह्याने माझं वाईट केलं मी पण त्याच करणार पण हा #Quote_of_the_day काय सांगतो बघा तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. #गौरीहर्षल
The best revenge is happiness, because nothing drive's people more crazy than seeing someone actually living a good life. 

Quote of the day 3

#Quote_of_the_day3
हवीहवीशी_तुलना
शीर्षक जरा विचित्रच आहे न? गोष्टही अशीच आहे विचित्र पण सगळ्यांच्या ओळखीची. गोष्ट म्हणण्यापेक्षा किस्से म्हणूयात. किस्से आपले, आपल्या मनात लपलेले. आपण आपल्या दिसण्यापासून ते वागणं , बोलणं, खाणं पिणं सगळ्याच बाबतीत जास्त जागरूक असतो. कुठे एखादी आकर्षक व्यक्ती दिसली की नकळतपणे आपण स्वतःची तुलना तिच्याशी करू लागतो. कधी कधी ह्या तुलनेमुळे स्वतःला त्रासही होतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काही लोक तर अस कुणी भेटलं तर त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी नको तेवढे बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात करतात. ह्या सगळ्या धावपळीत आपण खरे कसे आहोत हेच विसरतात. 
फेसबुकमुळे एक गोष्ट चांगली होते ती म्हणजे आपल्याच जुन्या आठवणी बघून आपण किती घडलो आहोत हे कळतं. तसे आपण बदलतच असतो अगदी दररोज. पण अट्टहासाने दुसऱ्यासारखं होण्यासाठी केलेले बदल कुठेतरी मनाला पटत नसतात. जी खूप जवळची आणि जेन्युईन लोकं असतात ती आडून आडून आपल्याला हे सुचवतात सुद्धा पण डोळ्यावर पट्टी असते न. आरशात बघताना नकळतच हे आपल्याला जाणवतं सुद्धा की आपण हे नाही आहोत पण मान्य कोण करणार??? असो
तुलना करणं हा मानवी स्वभाव आहे. पण तुलना कुणाशी , कधी कुठे करावी ह्याचं भान बाळगणं प्रचंड गरजेचं असतं. Just because आपल्या आसपास कुणीतरी  वेगळ्या लाइफस्टाइलने जगणारी व्यक्ती आली आहे.आणि मग तिला दाखविण्यासाठी मी पण तसच करणार , तसच वागणार हा अट्टहास का? ती व्यक्ती, तिच्या जगण्याच्या पद्धती, त्या मागची खरी खोटी कारण आपल्याला माहीत असतात का नाही ना?? मग आपण जसे आहोत तेही त्या व्यक्तीलाही माहिती नसतं. 

एक छोटीशी गोष्ट आठवली इथे रमा आणि रीमा एकमेकींच्या शेजारणी झाल्या होत्या नव्यानेच. रमा अगदी सालस , सोज्वळ वगैरे टाइप तर रीमा मॉडर्न. पहिल्या भेटीनंतर रमा विचार करू लागली की मी किती गावंढळ दिसते रोज अगदी घरच्या कपड्यात असते. माझं राहणीमान पण आकर्षक नाही. त्यावरून एक दोन वेळा ती नवऱ्याला बोलली सुद्धा की तुम्हाला मी अशी राहते म्हणून आवडत नाही का?? नवरा दोन मिनिटे शांत झाला मग बोलला मी तुझ्या साध्या सरळ स्वभावाला आणि राहण्याला बघूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि कितीही वर्ष झाली तरी त्यात बदल होणार नाही. पण जर तुला स्वतःहून स्वतःसाठी काही करायचं असेल तर मी तुझ्यासोबत नेहमीच असेन. क्षणभरच रमाला बरं वाटलं पण लगेच मॉडर्न रीमा आणि तिच्याबद्दल सगळीकडे होणारी चर्चा आठवली. दुसरीकडे रीमा होती जिच्याबद्दल इतकी चर्चा सुरू असताना तिला मात्र तिच्या घर आणि नोकरी चक्रातून वेळच मिळत नसे. पण जेव्हा जेव्हा ती रमाला बघे तिला वाटायचं की किती छान आहे न ही, कधी काळी मीही अशीच होते. पण नोकरी करणं ही गरज झाल्याने स्वतःत बदल घडवले आणि स्वतःला हरवून बसले. 
अशा ह्या रमा आणि रिमा ची एका कार्यक्रमात भेट होते. हळूहळू अवघडलेपण जात मस्त गप्पा मारतात दोघीही. एकमेकींबद्दल काय वाटतं हे जेव्हा त्या ऐकतात तेंव्हा दोघींनाही पटत की आपल्याला जे हवंय ते आपल्याकडेच आहे. आपण जर स्वतःला स्वतःहून स्वीकारलं तरच आपण स्वतःला आवडू शकतो. मग एकमेकींच्या मदतीने स्वतःतल्या हरवलेल्या तिला शोधण्याचा प्रयत्न करायचा अस ठरवत त्या एकमेकिंचा निरोप घेतात. 
हे लिहिण्याचं प्रयोजन इतकंच की स्वतःमध्ये बदल घडवताना स्वतःला काय आवडत पटत,रुचतं आणि शोभत हे लक्षात घेऊन बदल घडवले तर व्यक्तिमत्व खुलून येतं आणि ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. 
तुलनाही करावी पण ती फक्त स्वतःशीच. आपल्या जुन्या आणि नव्या व्हर्जन मध्ये. मग आपल्याच लक्षात येईल नेमकं काय बदलल तर आपल्याला आपण सापडू? स्वतःला स्वतःचा शोध लागणं गरजेचं आहे. नाहीतर सोशल मीडियाच्या चकचकीत रूपाने आपण कधी हरवू कळणारही नाही. 
मॉडर्न होण्यापेक्षा क्लासी होणं जास्त योग्य. हो पण आपल्याकडे मॉडर्न किंवा क्लासि फक्त कपड्यांनीच होता येतं असा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात खऱ्या जगात मात्र आपले विचारच आपली परिपक्वता दाखवतात आणि कपडे कसेही असले तरी आपल खरं रूप समोर येतं.
So try to be unique not copy of someone else. 

Compare yourself only to who you were yesterday. Be your own competition.

हाच होता आजचा #Quote_of_the_day. #गौरीहर्षल

Quote of the day 2

#Quote_of_the_day2

प्रतिक्षा आणि तिच्या जिवलग मैत्रिणीचं दिक्षा च एकत्रच पण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. प्रतिक्षाला नव्याने मार्केटमध्ये आलेल्या एका ठिकाणी नोकरी मिळाली तर दिक्षाच मात्र एका मोठ्या कम्पनीत सिलेक्शन झालं. पगार दोघींना जवळपास सारखाच होता पण प्रतीक्षा मात्र नाराज झाली. अर्थातच कारण योग्य होत तिच्या दृष्टीने. हळूहळू दोघीही कामाच्या ठिकाणी रुळू लागल्या. दीक्षा जिथे होती तिथे कामाचे स्वरूप आणि नियम ठराविक होते आणि ते तसेच असावे असासुध्दा नियम होता. त्याउलट प्रतिक्षाच्या कंपनीत मात्र नवनवीन प्रयोग , कल्पना मांडणे , चर्चा करणे व्हायचे. कामाची पद्धत प्रतिक्षाला  सुरुवातीला कळतच नसे. कारण वर्षानुवर्षे आजूबाजूला सगळ्यांना एका साच्यातच काम करताना बघितलं होतं. पण जसजसा वेळ गेला तिलाही वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तो ठामपणे मांडणं जमू लागलं. खरं तर सिलेक्शन च्या वेळी ग्रुप डिस्कशन मध्ये  तिला हिरीरीने बोलताना बघूनच तिचं सिलेक्शन झालं होतं. इथे फक्त एकच केलं जातं होत की एखाद्या महिन्याचा वेळ प्रत्येक एम्प्लॉयीला न सांगता दिला जात असे. ह्या महिन्यात ती व्यक्ती काम कस करतेय, की फक्त सांगेल तेवढंच करतेय , आऊट ऑफ द बॉक्स आहे का हे निरीक्षण करून मगच लेटर हातात मिळे. अर्थात ही कल्पना आधी दिलेली असायची की आमच्या पद्धतीत, विचारसरणी मध्ये तुम्ही फिट असाल तर आम्ही तुम्हाला कंटीन्यु करू. 
प्रतीक्षा हळूहळू सगळं एन्जॉय करत काम करू लागली. एक दिवस तिची आणि दिक्षा ची भेट झाली. दिक्षा रुटीनला खूप वैतागली होती. तिचं सगळं ऐकून प्रतीक्षा घरी आली तेच विचारांच्या नादात. तिच्या बाबांनी तिला थांबवत विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिलाही आधी वाटलं होतं आपल्याला तिथे जॉब का नाही मिळाला. पण आता अस वाटतय की जे आहे ते खूप छान आहे. मी बरच काही शिकते आहे स्वतःला डेव्हलप करतेय. हे त्या ठिकाणी कदाचित शक्य झालं नसतं. मग तिचे बाबा हसून तिला म्हणाले की मी तुला हेच समजावून सांगत होतो की आत्ता जिथे आहेस तिथून पुढे जायचं आहे हे नक्की. पण त्यासाठी आत्ता जे समोर आले आहे ते नको नाकारू. 
Appreciate where you are in your journey even if it's not where you want to be.  Every season serves a purpose.
एक दिवस नक्की तू तुला हव्या असलेल्या ठिकाणी असशील पण त्यासाठी प्रवासातला प्रत्येक प्रसंग, ठिकाण काय शिकवत आहे त्याकडे लक्ष दे. त्या गोष्टींचा भविष्यात उपयोग नक्कीच होईल. 
आपण खऱ्या आयुष्यात पण असेच वागतो बऱ्याचदा आपल्याकडे जे असतं, आपण जिथे असतो त्या गोष्टीची किंमत नसते आपल्याला. उलट समोरच्या कडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे का नाही म्हणून आपण हळहळत बसतो.  Every season serves a purpose , फक्त तो हेतू ओळखून स्वतःला ग्रुम करणं जमायला हवं. आपली लेटेस्ट फेज कोणती का असेना मग विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी.  आताच्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल तर त्या परिस्थितीला स्वीकारून आवश्यक ते बदल करायला हवेत. हाच होता आजचा #Quote_of_the_day❤️❤️ #गौरीहर्षल

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

Quote of the day 1

#Quote_of_the_day 
     जराशी तणतणत अनुजा तिच्या डेस्कवर येऊन बसली. आज मीटिंगमध्ये पुन्हा बॉसशी वाजलं होतं. तसा अनुजाचा मुद्दा बरोबर होता पण बोलताना जीभ घसरली अन् पुढचं रामायण घडलं. थोडं पाणी पीत तिने तिच्यासमोर असणाऱ्या कम्प्युटर वर आवडतं ब्लॉग पेज ओपन केलं. कामाच्या ठिकाणी हे करणं खर तर योग्य नसतं पण ते ब्लॉग पेज त्यांच्याच कम्पनीने डिझाइन केलेलं होत आणि आता ते बऱ्यापैकी पॉप्युलर असल्याने नवीन प्रोजेक्ट वेळी त्याचा उल्लेख नक्कीच व्हायचा. 
असो. तर बघूया तरी आज काय नवीन आहे म्हणून अनुजाने ब्लॉग ओपन केला होता. 
तिच्या समोर नवीन quote म्हणजेच सुविचार आला आणि तिचं विचारचक्र सुरू झालं. 
“You can give a person knowledge but you can't make them think. "
 खरंय न नकळतच अनुजा पुटपुटली. काही लोकांना बदल करावा लागेल म्हणून सत्य नाकारणं किती सोयीचं वाटतं. पण त्याचा तोटा काय होईल हा विचार करत नसतील का अशी लोकं? स्वतःचे विचार थोडे बाजूला सारून ती पुढे वाचू लागली. 
पुढे लिहिलं होतं, असं अनेक लोक वागतात अगदी पावलोपावली आपली त्यांच्याशी गाठ पडते. ही लोकं  खोटया किंवा चुकीच्या बाजूने अगदी ठामपणे उभी असतात. खर तर त्यांना माहीत असत की कधी न कधी ह्यामुळे आपलं नुकसान होऊ शकत पण ते क्षणिक फायद्याचा विचार करून अस वागतात. त्याउलट जे लोक खरं किंवा योग्य काय आहे ह्याचा विचार करून वागतात त्यांना सुरुवातीला बऱ्यापैकी त्रास होतो पण त्या वागण्याचे लॉंग टर्म चांगले इफेक्ट त्यांना नक्कीच मिळतात. हे वाचल्यावर आपसूकच तिचा मूड बदलला. कारण आज न उद्या आपल्याला आपल्या कामाची योग्य ती पोचपावती मिळणार यावर तिचा ठाम विश्वास होता.  
        मनोमन लिहिणाऱ्याला धन्यवाद देत अनुजा प्रोजेक्ट मध्ये सांगितलेले बदल करण्यात गुंतली. बदल करून होताच तिने प्रेझेंटेशन ला एक फायनल टच देत सुटकेचा श्वास सोडला. दहा मिनिटातच क्लायंट समोर तिला सगळं एक्सप्लेन करायचं होतं. लॅपटॉप घेऊन तिने कॉन्फरन्स हॉल मध्ये प्रवेश केला. क्लायंट बऱ्यापैकी मोठी पार्टी असल्याने आज कंपनीमधले सिनियर मेम्बरही मिटींगला हजर होते. अनुजाने प्रेझेंटेशन सूरु केलं ते जसं जस पुढे जात होतं क्लायंट नाराज होत असल्याचं अनुजाच्या लक्षात आलं. शेवटी मधेच प्रेझेंटेशन थांबवून त्यांनी अनुजाला विचारलं की आपलं जे बोलणं झालं होतं त्यानुसार इथं काहीच दिसत नाही असं का? ती काही बोलणार इतक्यात तिचे बॉस बोलले की ते मी नको अस सांगितलं कारण मला ते बदल फारसे लक्ष वेधून घेतील असे वाटले नाहीत. मधेच बोलण्या मागे बॉसला वाटलं होतं की आता क्रेडिट आपल्याला मिळून हिचं प्रमोशन कॅन्सल होईल. पण झालं उलटंच अनुजाने ते प्रेझेंटेशन बंद करून आपण अजून एक प्रेझेंटेशन तयार केले आहे असं सांगितलं. आणि ते सादर करण्याची परवानगी मागितली. क्लायंट हातातून जाऊ नये म्हणून तिच्या बॉसच्या बॉसने तिला परवानगी दिली. जसजशी अनुजा एक एक मुद्दा मांडत होती तसतसा क्लायंट रस घेऊन ऐकत होता आणि प्रश्न ही विचारत होता. आधी आणि नंतरच्या प्रेझेंटेशन मध्ये मुख्य फरक होता तो टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी वापरण्याचा. बॉसच्या म्हणण्यानुसार नवीन गोष्टी एड केल्या तर खूप काही बदल करून काम करावे लागेल आणि त्यामुळे सगळ्यानाच जास्त वेळ काम करावे लागेल. पण अनुजाने ते आपल्या पध्दतीने मांडत काही उपाय सुचवले होते  ज्यामुळे काम मॅनेज करणं शक्य होते. सकाळी मीटिंगमध्ये ती हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं ऐकून न घेताच बॉसने सुनावलं आणि वाद झाला. आता मात्र हे क्लियर झाल्याने क्लायंट आणि सिनियर यांच्यासमोर अनुजाचं पारडं जड झालं होतं. 
तिचा बॉस मात्र आज ह्या पदावर इतरांचं क्रेडिट स्वतःच्या नावावर करतच आलेला होता त्याला बसलेली ही मोठी चपराक होती. कारण मिटिंग संपता संपता तो प्रोजेक्ट कंपनीला मिळाला आणि त्याच मीटिंगमध्ये उत्तम कामगिरी केली म्हणून लवकरच अनुजाला त्याचं फळ मिळणार अस सुचवत कंपनीचे सिनियर मेम्बर बाहेर पडले. 
©गौरीहर्षल ११.९.२०१९

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

शुद्ध बिजापोटी....

#शुद्ध_बिजापोटी...
नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली एका राजाची आणि चंदनाच्या व्यापाऱ्याची. व्यापारी त्याचा धंदा होत नसतो म्हणून राजाच्या मरणाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे होतं काय राजाच्या मनातही त्याला न बघता , न भेटता फाशीवर लटकवायचा विचार येऊ लागतो. गोष्टीचं तात्पर्य अस होतं की आपण मनात ज्या व्यक्तीबद्दल , जसे विचार करत असतो तशीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून नकळत आपल्याला दिली जाते. कारण आपल्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल विष किंवा साखर पेरण्याचं काम करत असतात. पेरलेले उगवतेच फक्त ते आपल्या फायद्याचे ठरते की नाही हे वेळ ठरवते.
सरिता ला सुद्धा अशीच सवय होती.कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं अस ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होतं. त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव, नवीन लोक म्हटलं की सरीताच सुरू झालं नेहमीप्रमाणे. नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस. पण ऐकेल ती सरिता कसली नवीन ठिकाणी आली की तिने नुसत्या हाय हॅलो वरून सगळ्या शेजारच्या लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली. पाटील असे,  पवार तसे वगैरे वगैरे. हळूहळू ज्या शेजारणी तिच्यासारख्या होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं. रोज मुलं, नवरा शाळा ऑफिसमध्ये गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या. बायको रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे. अशातच सोसायटी मध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलं. नवरा बायको दोघेचजण 2,3 दिवस घर लावण्यात गेले मग तीही ह्या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली. ह्या काळात सरिता नवरा आणि मुलासोबत गावी गेली होती त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती. गावाहून आल्यानंतर जेंव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेंव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला. कुणीतरी म्हणत होते किती छान राहते न ती, घरही टापटीप असतं. कौतुक सुरू होतं. तितक्यात सरीताची जिवलग मैत्रीण वनिता म्हटली त्यात काय मुलं होस्टेलवर आहेत म्हटल्यावर हे राजराणी मज्जाच करणार ना? 😏 तितक्यात ती नवीन शेजारीण म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्याजणी शांत बसल्या. तीही सगळ्यांशी बोलत होती. तस बघायला गेलं तर तिने अजून कुणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती पण म्हणतात न रिकाम डोकं सैतानाच घर त्या नुसार ह्या सगळ्यानी मिळून ऐकीव माहितीवर आपले अंदाजच खरे अस ठरवलं होतं. सरिता मॅडम तर त्यात सगळ्यात पुढे गेल्या अजून पुरेशी ओळख न होताच तिला म्हणाली तुमची मज्जा आहे न मुलं होस्टेलवर सासुसासरे पण लांब आमचा इथं काम करून करून जीव जातो. नीता शांतपणे हसली आणि म्हटली अस काही नाही हो उलट कुणीच नाही त्यामुळे घर खायला उठत पण नोकरीही महत्त्वाची आहे त्यामुळे काही करता येत नाही. नीता दुखावली पण तिने स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जाणच निवडलं. सरीताने ह्यावरून काहीतरी शिकायला हवं होतं पण जित्याची खोड मेल्याशिवाय कुठली जाणार ती अजून अजून कुरघोड्या करु लागली नीताला त्रास देण्यासाठी . नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत ह्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हते.
त्यातच सरीताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्याचे कुणीतरी बॉस त्यांच्या सोसायटीत राहण्यासाठी आले आहेत. तर त्यांच्या घरच्यांशी नीट वाग आणि मला अजून नाव कळले नाही त्यामुळे कुणीही नवीन असतील तर तोंड उघडून घाण करु नकोस माझं प्रमोशन जवळ आल आहे.पर्सनल गोष्टींमुळे  मला ऑफिसमध्ये कुणाशी शत्रुत्व नको आहे. आता तुम्ही म्हणाल की अस का बोलला तो तर सरीताने आधीच्या बॉसच्या आईसोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे ह्याला स्वतःच्या प्रमोशन वर पाणी सोडावे लागले होते. कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल अस होत नाही. आणि चूक सरीताची असल्याने त्याला काही बोलताही आलं नाही. बॉसच्या आईला सरीताच्या मुळेच खूप त्रास झाला होता. असो तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता पण सुधारेल ती सरिता कसली.
फायनली कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली सरीताच्या नवऱ्याचे ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने ह्या वर्षी प्रमोशन मिळणार अस त्याला वाटत होतं. त्याच पार्टीत कंपनीचा नवीन हेड कोण आहे कळणार होत. सरीतासोबत तो पार्टीत पोहोचला. सगळ्यांशी ओळख करून देत असतानाच अचानक सरीताला दोन ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हटली हे इथे काय करतात? तो काही बोलणार इतक्यात स्टेजवरून त्याच दोघांच्या नावाचा पुकारा झाला मि. अँड मिसेस जाधव प्लिज स्टेजवर या. आणि विवेकचे बॉस बोलू लागले मला तुम्हांला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की जाधव यांनी आपली xyz गावाची ब्रँच यशस्वीपणे हाताळल्यामुळे आता कंपनीने त्यांना आपली ब्रँच सांभाळण्यास इथे बोलावले आहे. गेले काही महिने ते अगदी सामान्य कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते. पण आता येणाऱ्या 1 तारखे पासून दोघेही आपापल्या डिपार्टमेंट ची जबाबदारी घेतील. हे सगळं ऐकत असताना सरीताला मात्र दरदरून घाम फुटला होता. आणि त्याचं कारणंही  तिला माहीत होत. कारण होतं मि अँड मिसेस जाधव दुसरं तिसरं कुणी नसून नीता आणि तिचा नवरा होते😂  आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती. विवेकला सरीताची अवस्था पाहून अंदाज आला होता पण त्याने फक्त इतकंच विचारलं हे आपल्या सोसायटीमध्ये राहतात? सरिताने होकारार्थी मान डोलावली. तसा तो म्हटला तुला मी घरी गेल्यावर बघतो. आता सरीताची अवस्था अजूनच अवघड झाली.
स्टेजवरून आभारप्रदर्शन झाल्यावर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली. ती विवेकसमोर आली आणि हात मिळवत म्हटली कसे आहात मि अँड मिसेस काळे? मिसेस काळे तर फार चांगलं ओळखतात आम्हाला हो ना? सरीताला काय बोलावे सुचत नव्हते ती कसनुस हसली. नीता पुढच्या कपलशी बोलू लागली. पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन कळणार होते. त्यानुसार एकेक नाव घेतले जात होते. नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते. सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नावं घेतली जाऊ लागली जसजशी लिस्ट पुढे सरकत होती तसतशी सरिता अस्वस्थ होत होती. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले पुन्हा एकदा विवेकचे नाव वगळले गेले. पार्टी पुढे सूरु राहील म्हणत सगळे जिकडेतिकडे गेले. नीता सरिता समोर आली आणि म्हटली तो वरचा असतो न सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजासह परतफेड करण्याची. आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची पण तू आमचं कुटुंब जे इथे नसत त्यांच्याबद्दलही वाईट बोललीस तेही तुला काही माहीत नसताना आणि आम्हा दोघांच्या चरित्र्यावरही नको नको ते आरोप केलेस तुझा काही संबंध नसताना, आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळलं ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर. शहाणी असशील तर सुधारशील नाहीतर जे हातात आहे ते ही गमावशील विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली.

ह्या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे आहे. अशा अनेक सरिता आपल्याला पावलोपावली भेटतात ज्या काहीही संबंध नसताना पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात. ही जी जमात असते ती असमाधानी असते स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखानी भरलेले असले तरी त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय, दुखावल्या शिवाय घास घशाखाली उतरत नाही. त्याबतीत आपण ऊँ इग्नोराय नमः हाच मंत्र वापरू शकतो. कारण अस वागून हे लोक स्वतःचं काय नुकसान करून घेत आहेत हे त्यांना कळत नाही. आणि सांगून सुधारण्या इतकी अक्कल त्यातल्या फार कमी लोकांकडे असते.
बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतो आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेडही करतो. बघण्याची दृष्टी हवी फक्त.#गौरीहर्षल #४.१०.१९