शनिवार, १५ जुलै, २०१७

भविष्यातलं सरप्राइज

#शुभं_भवतु
#भविष्यातलं_सरप्राइज
एखादं नातं खूप जवळचं असतं पण अचानक काही न सांगता, विचारता निघून जात आयुष्यातून. आपण खूप प्रयत्न करतो थांबवण्यासाठी, परत आणण्यासाठी. पण त्या नात्याची वीण इतकी उसवलेली असते की कितीही टाके घातले तरी शिवलं जात नाही. अशावेळी आपली मात्र कसोटी असते रोजची सवय असलेलं ते नातं विसरून जगण्याची. सुरुवातीला खूप सैरभैर होत मन पण हळूहळू कुठेतरी त्याला वास्तवाची जाणीव होते. काही दिवस असेच निघून जातात मग मनाला आतून जाणवणारा सल कमी होतो. आठवणींमुळे डोळ्यात येणारं पाणीही ओसरत जातं.
नात्यांना कितीही जपलं तरी आज न उद्या कुठल्या ना कुठल्या कारणाने कुणीतरी सोडून जाणारच असतं. गरज असते ती आपण झालेल्या बदलाला लवकरात लवकर स्वीकारण्याची.
कारण ह्या सगळ्या गोंधळात आपल्याकडे डोळे लावून बसणारंही कुणीतरी असतं ज्याचा आपल्याला आपल्या दुःखात विसर पडतो. ह्या बाबतीत एक वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं ते म्हणजे, "God puts people in your life for a reason and removes them from your life for a better reason." याचाच अर्थ उद्या येणाऱ्या भविष्याच्या पोटात नक्कीच काही चांगली नाती, चांगली माणसं लपलेली असतील जी योग्य वेळी योग्य वळणावर आपल्याला भेटतील. म्हणूनच आत्ता आपण आटापिटा करून काही साध्य करण्यापेक्षा पुढे निघालेलं काय वाईट??
प्रयत्न करणं तर आपल्याच हातात आहे ना? करून बघू कदाचित आपण ज्या गोष्टीची मनोमन वाट बघत होतो तीच समोर येऊन उभी राहील. Thats why keep smiling you never know who is watching you 😍😍
शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल 
१५.७.२०१७

शुक्रवार, १४ जुलै, २०१७

क्वालिटी टाइम

#क्वालिटी_टाइम
आज सकाळी कधी नव्हे ते चिमण्यांची चिव चिव ऐकून जाग आली. कितीतरी दिवसांनी हा अनुभव घेतला नाहीतर सकाळी उठल्यापासून मागे लागलेली 'घाई' नावाची गोष्ट काही ऐकूच देत नाही. घाईघाईने घर, बाहेरची काम , ऑफिस करण्याच्या ह्या धबडग्यात आपलं मन, मेंदू, शरीर काही सांगत असतात पण आपल्याला ते ऐकायला वेळच नसतो. घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण सोमवार ते शुक्रवार मनात कुठेतरी ठरवत असतो की विकेंडला स्वतःला, घरच्यांना क्वालिटी टाइम दयायचा पण खरंच जमतं का हो?? की आपला क्वालिटी टाइम मॉल, पिकनिक ह्या सगळ्यांमध्ये हरवतो??
क्वालिटी टाइमवर सगळेच लेक्चर झाडत असतात पण प्रत्यक्षात किती जण तो खरंच जगण्याचा प्रयत्न करतात? म्हणजे नेमकं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. टीव्ही, फोन , लॅपटॉप याना सुट्टी देऊन जरा मस्त वेळ घालवायचा. एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा मारणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे त्यामुळे रोज जे जमत नाही ते करून बघायचं. सगळ्यांनी मिळून काही गोष्टी करायच्या. थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला कारण हल्ली आपल्याला माणसांपेक्षा फेसबुक आणि वॉट्सअप्प ची जास्त सवय झाली आहे. पण जमेल, जी आपली जिवाभावाची माणसं आहेत ती आयुष्यभर सोबत हवीत ना मग इतकं करायलाच हवं. सगळ्यांना एकमेकांना समजून घेत  मदत करायची हा एकच रुल क्वालिटी टाइमसाठी.
प्रत्येकाला आज खूप सारा क्वालिटी टाइम आपल्या माणसासोबत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१५.७.२०१७

गुरुवार, १३ जुलै, २०१७

व्यक्त होऊया

#व्यक्त होऊया
     व्यक्त होणं सगळ्यांत अवघड आहे आपल्याकडे.  मग ते बोलून,हसून,रडून, लिहून कसं का होईना पण मनातलं व्यक्त झालं पाहिजे. आपण कुठलीही भावना व्यक्त करण्याआधी नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी काय म्हणतील असा विचार करतो.आणि मग या सगळया पायऱ्या पार करून जेंव्हा ती भावना व्यक्त होते तोपर्यंत तिच्यातला जिवंतपणा निघून गेलेला असतो बऱ्याचदा.त्यामानाने पुढची पिढी दोन पावले पुढे आहे मनात असेल ते सांगून मोकळे होतात ते. पण आपण त्यांना दटावतो.
      खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला. कधी काहीतरी आवडलेलं असतं मग ते कुणाला सांगायचं , कसं सांगायचं हा मोठ्ठा प्रश्न आपण घेऊन बसतो स्वतःशीच. खरंतर त्याची गरज नसते आणि तो प्रश्न आपल्याव्यतिरिक्त कुणालाच पडलेलाही नसतो. मग अशावेळी उगाच का स्वतःला थांबवायचं?? कुणीच नाही सापडलं सांगायला तर लिहून ठेवायचा तो अनुभव. पण आपल्याला भावलेली, आवडलेली प्रत्येक चांगली गोष्ट करून बघण्याचा नक्की प्रयत्न करायचा.
           ज्यांना खूप मोकळेपणाने व्यक्त होता येतं किंवा जमतं त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. ते म्हणतात ना आयुष्यात शेवटी काही करायचं राहिलं आहे असं नको वाटायला. म्हणून तर व्यक्त व्हा, बोला, लिहा , वाचा, गा,जगा मनापासून, मोकळे व्हा. मस्त अनुभव येतो एकदा घेऊन तर पहा.
आज प्रत्येकाला एक तरी क्षण मनापासून व्यक्त होण्याचा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१४.७.२०१७

ब्रेक

#ब्रेक
ब्रेक सगळ्यांनाच हवा असतो आणि खरं तर गरजेचा असतो. निसर्गसुद्धा ब्रेक घेतच असतो की, सूर्य पावसाळ्यात अधूनमधून ब्रेक घेतो, चंद्राला तर दर १५ दिवसांनी सुट्टी मिळते. आपण मात्र कधी कधी नोकरी आणि बाकीचे व्याप यांमध्ये इतके गुंतून जातो की ब्रेक घ्यायचंच विसरतो.
मनाच्या बॅकग्राउंडला मेंदू सतत विचार करत असतो, त्याला तर ब्रेक हा शब्दच सापडत नाही.
ब्रेक तर घ्यायलाच हवा पण तो कसा घ्यायचा??? काम करत असताना, विचारात असताना कधी असं वाटलं की आपण खूप दमलो आहोत, तर हळूच काही क्षण स्वतःसोबत घालवायचे. त्या वेळेत स्वतःला जे आवडतं ते करायचं. गाणं ऐकायचं, काहीतरी वाचन करायचं , किंवा नुसतं डोळे मिटून शांत बसायचं पण चुकूनही फोन हातात नाही घ्यायचा. दिवसातला तो काही मिनिटांचा वेळ फक्त आणि फक्त मन , मेंदू आणि शरीराला ब्रेक देण्यासाठी वापरायचा. या वेळेत स्वतःला जाणीव करून द्यायची स्वतःसाठी स्पेशल असण्याची. थोडासा वेळ स्वतःला दिला तर जगात काही बिघडणार नाही फक्त ही वेळ प्रत्येकाला ठरवता आणि पाळता आली पाहिजे. मीही करणार आहे ट्राय तुमचं काय??
प्रत्येकाला आज हवाहवासा ब्रेक काही मिनिटं तरी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१३.७.२०१७

सोमवार, १० जुलै, २०१७

नात्यांचा रिचार्ज

नात्याचं_रिचार्ज
माणूस जन्माला येणार अशी चाहूल लागली की नाती त्याला चिकटतात. काही नाती रक्ताची, काही मनाची, काही स्वतः स्वीकारलेली तर काही आपसूकच येऊन गळ्यात पडलेली. या सगळ्या नात्यांच्या गुंत्यात काही नाती तरी नक्कीच असतात जी खूप महत्त्वाची असतात, स्पेशल असतात. अशा नात्यांना जपणं खूप गरजेचं असतं. व्यक्तिसापेक्ष ही नातीही वेगवेगळी असतात.
माणूस नात्यांकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभवांमधून खूप काही शिकत असतो. शिकता शिकता घडत असतो. बरेवाईट अनुभव तर येतातच . पण आपण स्वतः कधी लक्ष देतो का की त्या त्या नात्याची नेमकी गरज काय आहे? उदाहरणार्थ एखाद्या नात्यात आधी खूप सामंजस्य होते पण जसजसे सहवास वाढला त्याची जागा गृहीत धरण्याने घेतली. एखादं नातं आधी खूप खोडकर होतं पण वयानुसार त्यात फक्त गंभीर गोष्टीच उगळल्या जात असतील.
खूप छोट्याश्या गरजा असतात नात्यांच्याही आणि माणसांच्याही.  त्या पूर्ण करण्यासाठी पैश्यांपेक्षा काळजीपूर्वक एकमेकांना नात्याला ओब्जार्व करण्याची गरज असते. हळूहळू राग व्यक्त करण्याऐवजी प्रेम व्यक्त करावे. आवर्जून ते नातं, ती व्यक्ती किती गरजेची आणि मुख्य म्हणजे हवीहवीशी आहे हे सांगावे. हा नियम आईमुलांपासून ते मित्रमैत्रिणी मध्येही लागू पडतो. आपण फक्त कुणाला हवेसे आहोत ही भावनाच व्यक्तीला आत्मविश्वास देते. हल्ली सतत जाणवणारे ताणतणाव माणसाला कुठेतरी आतून एकटं करत असतात. अशावेळी गरज असते ती एकमेकांना ओळखून नात्यांना एक नवा रिचार्ज देण्याची. हे रिचार्ज आपला एक आश्वासक स्पर्श, प्रेमळ नजर, दोन गोड शब्द आणि सोबत असण्याची खात्री देऊ शकतात. फक्त आपण वेळोवेळी आपल्या जवळच्या नात्यांना ते दिलं पाहिजे. 
नात्याचं रिचार्ज नात्यात बांधल्या गेलेल्या सगळ्यांनाच एक रिफ्रेशमेंट देतं. त्याचा खूप चांगला आणि लॉंग टर्म प्रभाव आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात टिकून राहतो.
प्रत्येकाला असंच एक रिफ्रेशिंग रिचार्ज आज मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
#११.७.२०१७

रविवार, ९ जुलै, २०१७

मुड्स

#सुप्रभात_स.न.वि.वि.
#मूड
सकाळी सकाळी मस्त सूर्यप्रकाश आहे आभाळही मोकळं आहे असं वातावरण असलं की किती छान वाटत राहतं न दिवसभर??? मूड बन जाता है अगदीच!!! आणि मग पुढचा सगळा दिवस एकदम झकास जाणार याची मनाला खात्री वाटते.
       या मुड्स वर आपलं आयुष्य किती अवलंबून असत ना? कुणाच्या तरी छानशा बोलण्यानेही आपला मूड एक लय पकडतो. ती लय मग पुढे हातात येणाऱ्या सगळ्या कामांवर आपला चांगला प्रभाव पाडत राहते.
     नकळतच होणाऱ्या कृतीने जर इतकं चांगलं होत असेल, तर जाणूनबुजून मूड का नाही सांभाळत आपण ?  खूप लांब जायची काही गरज नाही स्वतःपासूनच सुरुवात करायची. सकाळी उठल्यावर इतर कुणाला गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा स्वतःच स्वतःला म्हणायचं तेही एकदम प्रेमाने. हो आपण इतरांचे मूड सांभाळताना कसे प्रेमाने वागतो मग स्वतःशीही तसच वागायला हवं की नई? स्वतःच स्वतःला आवडतील रुचतील आणि विशेष म्हणजे ज्यामुळे आपलं शरीर, मन प्रसन्न राहील अशा गोष्टींचा आनंद घ्यायचा. अगदी मनापासून जर आपल्याला छानसे बदल घडवून आणायचे असतील तर एवढं तर करायलाच हवं ना?  मुड्स मुळे आपण नाही नाचायचं तर मुड्स ना नाचवायचं. यासाठी फक्त स्वतःवर प्रेम करत असतानाच स्वतःला थोडासा आदर देण्याची गरज असते. आयुष्यात चढउतार तर येतच असतात पण त्यामुळे आपण बऱ्याचदा स्वतःला हरवत असतो. आपले धावपळ करणारे मुड्स तेच तर आपल्याला सुचवत असतात, की बाबा रे तू आम्हाला सांभाळ नाहीतर आम्ही तुम्हाला सळो की पळो करू 😉😙
मग मी तर प्रयत्न करतेय स्वतः मुड्स बदलण्याचा तुम्ही???
#गौरीहर्षल
१०.७.२०१७

शनिवार, ८ जुलै, २०१७

गुरुपौर्णिमा

#गुरुपौर्णिमा
आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपोर्णिमा. आपण आईच्या गर्भात असल्यापासूनच शिकत असतो असे म्हटले जाते. त्या अर्थाने आई ही आपली पहिली गुरू. पुढे आयुष्यात शिक्षण, नोकरी, आवडीनिवडीचं क्षेत्र अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुरू भेटतच असतात. ते आपलं आयुष्य घडवताना खूप मोलाची जबाबदारीही उचलतात. आपल्यापैकी बरेच जण आजच्या दिवशी ह्या आपल्या सगळ्या गुरूंची कदाचित आठवणही काढत असतील कदाचित कृतज्ञता ही व्यक्त करत असतील. पण आपण गुरुपौर्णिमा फक्त एक सण म्हणून साजरी तर करत नाही न हेही बघायला हवं. आपले आईवडील, गुरू हे जसे सदैव आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात तसंच आपणही इतरांच्या बाबतीत करतो का?
    गुरुपौर्णिमा त्या दिवशी खऱ्या अर्थाने सफल होईल ज्या दिवशी आपण आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून चांगला गुण घेऊनही अहंकार बाळगणार नाही. आणि आपल्याकडे आधीपासूनच असणारं ज्ञान ज्यांना खूप गरज असते अशांपर्यंत कुठलाही गवगवा न करता पोचवू. तरच आपल्या गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्याला समजले असं म्हणता येईल.
तर या गुरुपौर्णिमेला एक छोटासा संकल्प करू.......प्रत्येकाला स्वतःहून मदत करण्याचा आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्या गुरूंना वंदन करण्याचा. ही कृती प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते बर का!! मीही प्रयत्न करणारच आहे तुम्हीही बघा जमतंय का.....
       आजच्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला एक तरी क्षण चांगली कृती करण्याची संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु 🙏🙏 शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
९.७.२०१७

थँक यु

#थँक यु
सकाळी सकाळी येणाऱ्या सूर्याच्या किरणाने सगळी पृथ्वी नुसती न्हाऊन निघत नाही तर जणू काही प्रभावित होते. सूर्याचं आगमन सगळ्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह भरतं.  आपल्या आयुष्यात अशीच अनेक माणसं येत असतात. त्यांचा प्रभाव आपलं आयुष्य घडवत असतो. आपले आईवडील, गुरू, मित्र , नातेवाईक, शेजारी सगळेच त्यांच्या परीने आणि पद्धतीने आपल्या जडणघडणीत सहभागी असतात. यापैकी कुणाचा प्रभाव आनंददायक असतो कुणाचा नसतो. पण दोनहीं प्रसंगात आपल्याला काही न काही शिकायला मिळतच. नकळतच आपण कुणाकडून एखादी गोष्ट कशी करावी हे शिकतो तर कुणी जाणूनबुजून कसं वागू नये हे स्वतःच्या कृतीतून शिकवत असतं. आपल्याला गरज असते ती सजग आणि स्वच्छ नजरेने सगळं बघण्याची.  फक्त माणसाचं नाही तर निसर्गही आपल्याला शिकवत असतो. निरपेक्ष वृत्तीने देत राहावं हे आपल्याला तो शिकवतो. प्राणीही न बोलता खूप काही शिकवत असतात. जमतं का पण आपल्याला सगळ्यांकडून सगळं घेणं??? नाहीच जमत सगळं घेणं पण त्यातलं थोडं जरी घेता आलं तरी पुरतं आयुष्यभर.
मग आता या विकएंड ला जरा आळस झटकून खऱ्याखुऱ्या प्रभावी गुरूंना शोधू ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुकर आणि सोप्प झालं आहे. शोधून काय करायचं तर फक्त छानसं स्माइल आणि २ शब्द थँक यु / धन्यवाद म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करू. एक अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे त्या व्यक्तीचा एक चांगला गुण टिपून तो नक्की वापरण्याचा प्रयत्न करायचा. मी पण प्रयत्न करणार आहेच तुम्हीही बघा जमतंय का ??
प्रत्येकाला आज एक तरी क्षण प्रयत्नांना यश देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
८.७.२०१७

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

जाणीव

#जाणीव
सकाळी सकाळी लगबगीने सूर्य किरणांना पसरवत जाणीव करून देत असतो नवा दिवस उगवल्याची. नव्या दिवसासोबत नवी पहाट, नवी स्वप्न घेऊन जगा असंच तर सांगत नसतो ना? पण आपल्याला होते का खरंच जाणीव? आपलं आयुष्य रसरशीत आहे अशी. बऱ्याचदा उगाच आपण नको त्या दुःखांना कवटाळून समोर आलेले सुरेख क्षण वाया घालवतो.
जाणीव असायला हवी स्वतःच्या जिवंत असण्याची, चांगलं वागण्याची. फक्त रुटीन फॉलो करण्यापेक्षा त्यात एक उत्स्फूर्तता भरण्याची जाणीव . ती कशी समोर येणार काम, व्यक्ती आपल्या आवडीची असो व नसो आपल्याला आपलं काम इमानेइतबारे करायचं आहे. कुठलं काम ? छानसा प्रतिसाद देत संवाद सुरू करण्याचं. मनात कितीही कटुता असली तरी आपल्या आवडत्या / नावडत्या ठिकाणी ती येऊ न देण्याची जाणीव सतत ठेवावी.ही जाणीव खूप काही सोप्प करेल. तुमचा सदैव हसरा चेहरा लोकांना कोड्यात पाडत चांगलं वागायला भाग पाडेल. लगेच नाहीच होणार कुणाकडूनच ना आपल्याकडून ना समोरच्याकडून पण सुरुवात तर करून  बघावी. आपण सदैव ह्या जाणिवेत असलो की त्याचं सुरेख रिफ्लेक्शन आपल्या नजरेत येईल. आणि तुम्हाला माहित आहेच डोळे न बोलता ही खूप काही बोलतात. मग ठेवायची न जाणीव छान प्रतिसाद देत राहण्याची???
प्रत्येकाला आज एक तरी क्षण सुरेख साद प्रतिसाद असलेला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
७.७.२०१७

गुरुवार, ६ जुलै, २०१७

प्रॉब्लेम

#प्रॉब्लेम
खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. पण बऱ्याचदा योग्य व्यक्तीच सापडत नसते. किंवा आपण जिला योग्य समजतो ती खरं तर फक्त गॉसिप करण्याचा विषय म्हणून आपल्याकडे बघत असते. अशावेळेस एक तर आपण अलिप्त होऊन जातो त्या गोष्टीपासून किंवा त्या व्यक्तीपासून. मनातल्या भावना मात्र तशाच राहतात. हळूहळू अशा भावनांचा ढिगारा साचतच राहतो. त्यांचा योग्य पद्धतीने निचरा करणं खूप गरजेचं असतं. ते करण्यासाठी खुप काही करावं लागतं नाही फक्त एकदा तटस्थ दृष्टीने स्वतःकडे आणि त्या त्रास देणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघायचं. त्याची तीव्रता काय आहे, तो कशामुळे प्रॉब्लेम वाटतोय , खूप सारी एनर्जी खर्च करावी असा आहे का? लगेच नाही पण हळूहळू काही उत्तरं आपोआप सापडतील, काही शोधावी लागतील. सुरुवातीला मन दुःखाला कवटाळून बसण्याचा प्रयत्न करेल पण आपणच त्याला समजावून लाडिगोडी लावून दुसरीकडे वळवायचं. प्रॉब्लेम तर येतातच मुळी आपल्याला तावून सुलाखून तयार करण्यासाठी. गरज असते ती फक्त त्यांना ओळीने उभं करून स्वतःशी सावकाश वागत सोडवण्याची.
मीही प्रयत्नच करतेय तुम्हीही बघा ट्राय करून. बेस्ट लक
शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
६.७.२०१७

देण्यातला आनंद

#देण्यातला_आनंद
#सुप्रभात
मस्त चाललंय ना सगळं? चालूच असणार पावसामुळे सगळं कसं छान टवटवीत दिसतंय. निसर्ग किती भरभरून देतो न आपल्याला. कधी कधी कमी जास्त होतं पण ती माणसाची चूक निसर्गाची नाही. तो त्याच देण्याचं काम अगदी आनंदाने सढळ हाताने करत राहतो.
देण्यातला आनंदच काही वेगळा असतो त्यातही निरपेक्ष, काही देतो आहोत ही भावना मनात न ठेवता दिलं तर त्यातुन एक वेगळंच बक्षीस मिळतं. हे बक्षीस आपल्या मनात रेंगाळत राहतं खूप वेळ आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्याला एक वेगळीच लकाकी देऊन जातं.
आता कुणी म्हणेल की मग सारख देतच रहावं का? पण मुळात देतच असतो की आपण सारख काहीतरी फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी नकळत आपण हसतो अनोळखी माणसाकडे पाहून तेंव्हा आपण त्याला एक छान क्षण देतो. कधी सहजच कुणाला मदतीचा हात देतो अगदी बस, लोकल मध्ये चढताना जरी दिला तरी ती व्यक्ती मनोमन सुखावतेच की.
हल्लीच एक गोष्ट वाचली फेसबुक आणि वॉट्सअप्प वर त्यात लेखिका(माझ्या माहितीनुसार) सांगते की ती  मैत्रिणीला पिकअप करण्यासाठी जात असताना तिला रस्त्यावर राहणार कुटुंबातलं लहान मूल रस्त्यावर खेळताना रोज दिसत असतं. मनात असूनही त्यांना मदत काही तिच्याकडून होत नाही. पण तिच्यासमोर एक भंगार गोळा करणारी व्यक्ती मात्र स्वतः कफल्लक असूनही हातात असलेलं सफरचंद सहज त्या मुलाला देऊन हसत हसत निघून जाते. देण्याचा आनंद मिळवून.
तात्पर्य काय मंडळी, माणसाने आयुष्य जगण्यासाठी धडपड करत असताना असा छोटासा "देण्यातला आनंद" मिळवायला काय हरकत आहे. फार काही लागत नाही हो फक्त सुरुवात करायला हवी. ती सुरुवात आपण कुठूनही करु शकतो अगदी बायकोला सरप्राइज सकाळचा चहा देऊनही😝😝 . पटलं तर करून बघा खूप छान छान रिटर्न गिफ्ट्स मिळतील ज्यांची सर पैशाने विकत घेतलेल्या वस्तुंना कधीच येणार नाही.
प्रत्येकाला आज या सुरेख देवाण घेवणीतला आनंदाचा एक तरी क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु !!
#गौरीहर्षल
६.७.२०१७

मंगळवार, ४ जुलै, २०१७

मनाचे व्रत

#मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.  ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास.
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट  विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं. 
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची.
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही.  पटलं तर ट्राय करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
४.७.२०१७

सोमवार, ३ जुलै, २०१७

रंग

पहाटे उठून कधी आकाश बघितलं ? हळूहळू आगमन करणारा सूर्य आणि त्याच्यासाठी असंख्य रंगांच्या पायघड्या घालणारे ढग. मुक्तहस्ताने निसर्ग रंगांची उधळण करत असतो. नकळत जरी लक्ष वेधलं तरी मन प्रसन्न होतं.
        आपला दिवसच काय पूर्ण आयुष्यच असं रंगीबेरंगी असतं. रंग मनाचे, रंग माणसांचे, रंग स्वभावांचे रंगच रंग सगळीकडे. काही रंग आवडते तर काही नावडते. पण रंग हवेतच रंगांमुळे एक जिवंतपणा रसरशीतपणा असतो जगण्यात.
            आपणही भरू शकतो ना रंग?  भरतोच खरंतर कळत नकळत. स्वतःच्या आयुष्यातले रंग टिकवण्यासाठी आपली सतत धडपड सुरू असते. या सगळया गडबडीत कधी ना कधी दुसऱ्यांच्या रंगांना आपला धक्का लागतो लागणारच. पण मग काय करायचं ?थोडंसं थांबून मागे वळून पाहत त्या व्यक्तीला एक रंग द्यायचा आश्वासक असा नजरेतून, हसण्यातून ज्यामुळे तिचं नुकसान जरी भरून येणार नसलं तरी निदान तिला बळ मिळेल पुन्हा रंग भरण्याचं. बाकी सगळी चित्र आणि त्यातले रंग तो वर बसलेला आहे ना तो छान ठरवतच असतो. आपण फक्त आपला कुंचला घेऊन तयार राहायचं. योग्य वेळी योग्य रंग योग्य प्रमाणात उतरेल याची काळजी घेतली की झालं.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनासारखा रंगवायला मिळुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
३.७.२०१७

रविवार, २ जुलै, २०१७

चांगलं वागण्याचं काम

#चांगलं_वागण्याचं_काम
कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं.
आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु.
#गौरी_हर्षल
२.७.२०१७

शनिवार, १ जुलै, २०१७

निवांत क्षण

रात्रीचा पडदा दूर सारत सूर्यदेव रोज नव्याने पृथ्वीवर येतात.
कधी कधी ढगांच्या आड लपत हळूच गायब होतात.  आयुष्यही असंच असतं आशेच्या ढगांवर नकळत पडणारी निराशेची सावली. आशा निराशेचा खेळ रोजचाच अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर आपण निराश होतो चिडचिड करतो.  मग त्या चिडचिडीने आपला आणि पर्यायाने आपल्या जवळच्या लोकांचा दिवस खराब होऊ शकतो. आता कुणी म्हणेल काम बिघडणं कुठे आपल्या हातात असतं? बरोबर आहे आपल्या हातात नसतंच काम बिघडणं पण बिघडलेल्या कामाला सुधारणं तर असतं. दोन सेकंद थांबून जरा श्वास घेऊन विचार केला तर उत्तरही सापडतच. गरज असते ती स्वतःला वेळ देण्याची आपण काही शर्यतीत नाही आहोत. आणि असलो तरी आयुष्याची शर्यत सगळ्यात मोठी असते. ती जिंकण्यासाठी आधी आपण तर टिकायला हवं. म्हणूनच चिडचिड होत असताना थोडंसं थांबून स्वतःला विचारायचं की इतकी धावपळ इतका त्रागा आत्ता या क्षणी करण्याची गरज आहे का? उत्तर स्वतःकडूनच मिळेल आणि योग्य मिळेल.
      आयुष्य भरभरून जगण्यासाठी फक्त थोडं निवांत विचार करण्याची गरज आहे बास. हे जर जमलं तर आपलं आणि आपल्या जवळच्या सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलेल. अवघड असेल कदाचित पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करा.
प्रत्येकाला आज एक तरी निवांत असा विचारी क्षण लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
१.७.२०१७