गुरुवार, २३ मार्च, २०२३

स्वामींचा प्रगट दिन आणि शेरुचा स्मृतिदिन

#स्वामींचा_प्रगटदिन_आणि_शेरूचा_स्मृतीदिन
लॉकडाऊन लागलं आणि दोन दिवसात आमच्या शेरूची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्याच्याबद्दल मी हनुमान जयंती आणि हार्ट बीट या लेखामध्ये लिहिलेल आहे. शेरुला रामरक्षा आणि हनुमान चालीसाच प्रचंड वेड होत.  कोणी म्हणेल की कसं काय? पण ही खरंतर खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याला घरात अखंड रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकायला हवी असायची. 
 आणि त्यासाठी एक सेपरेट मोबाईल, त्याच्यामध्ये ते दोन्ही स्तोत्र सतत चालू ठेवावे लागायचे. 
 कधी जर चुकून बॅटरी संपून मोबाईल स्विच ऑफ झाला तर त्याच्यावर पंजा आपटून फोन माझ्यापर्यंत आणून  सांगणं की चार्ज कर आणि लाव माझे गाणे. 
याचा अर्थ  फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा एवढे दोनच गोष्टींशी संबंध होता.  बाकी शक्यतो फारसा काही त्याला लागायचं नाही. 
जेव्हा मी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा काही वाचायला बसायचे की शेरू महाराज समोर येऊन मस्तपैकी ऐटीत बसणार अन् ऐकणार. अजिबात हलणार नाही, तास दोन तास त्याची समाधी लागलेली असायची.  ते म्हणतात ना, की प्राण्यांना त्यांच्या जाण्याचा दिवस कळतो किंवा ते खूप संयतपणे स्वतःचा मृत्यू स्वीकारतात असंच काहीसं माझ्या शेरुनी केलं.  जेव्हा त्याला लक्षात आलं की आता आपण बरे होणार नाही आहोत. 
 डॉक्टरकडे जाणं सलाईन लावून घेणे हे तीन, चार दिवस झाल्यानंतर मात्र त्याने अन्न पाणी सोडून दिलं. जवळपास 15 दिवस तो थोडाफार काहीतरी बळजबरीने खाऊन त्यावरती असायचा.  पण शेवटी मात्र त्याने एक दिवशी माझ्याकडे बघितलं डोळ्यात पाणी होतं.  मी म्हटलं ठीक आहे बाबा तुला जे योग्य वाटतं ते तू कर. 
दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाला काय वाटलं माहित नाही. त्याने मला सांगितलं की मला शेरू साठी संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी वाचायची.  एक दीड तासाचे पारायण असतं ते मी करणार आहे.  त्याप्रमाणे पहाटे उठून शेरुला मांडीवर घेऊन त्याने ती गोष्ट केली.  त्यानंतर तो ऑफिसला निघून गेला.  आणि साधारणतः दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान शेरू शांतपणे गेलेला होता.  त्याला कुठलाही त्रास झाला नाही असे भाव चेहऱ्यावर होते. 
 कुठेतरी असं आम्हालाही वाटलं की शेरूने  एक गोष्ट जाता जाता सांगितली.  माणसं सगळ्याचा मोह बाळगतात. 
 पण हे पिल्लं मात्र जीव लावतात, आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त प्रेम आपल्याला देतात आणि जायची वेळ आली की एक एक गोष्ट सोडत, सगळं काही इथेच त्यागून पुढच्या प्रवासाला निघून जातात  
स्वामींच्या प्रकटदिनी शेरू ने संक्षिप्त गुरुचरित्राचा पारायण करून घेऊन त्यानंतर स्वतः या सगळ्या गोष्टी स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट किंवा हा एक खूप वेगळा योगायोग होता. 
शेरु मुळे रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणण्याची, ऐकण्याची सवय इतकी सहज लागली की रोज ते आपोआपच होतं. 
त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असली तरीही त्याचं असणं जाणवतं ते  पद्माक्ष च्या कडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा साठी केल्या जाणाऱ्या हट्टामुळे. 
कुणी कितीही नाकारलं तरी माझ्या मनीमाऊनी नेहमीच त्या स्पेशल आहेत हे सिद्ध केलं. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, २० मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना 15

#स्वतःसाठी_बदलताना 15
 कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते ना की प्रचंड उलथापालथ सुरू असते. काहीही नीट घडत नसते, मन अस्थिर असतं, आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो, असं वाटत असतं की कुठून तरी एखादा तरी आशेचा किरण दिसावा.
आणि ॲट द सेम टाइम या सगळ्यांमध्ये आपण स्वतः सुद्धा स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करत असतो. 
माझ एक प्रामाणिक मत आहे की अगदी आत्महत्या करणारे व्यक्ती असू दे किंवा डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती... पहिल्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेजला पोहोचेपर्यंत व्यक्ती हात पाय मारत असते, प्रयत्न करते डायरेक्ट असं कोणीच या सगळ्या चक्रात जाऊन अडकत नाही. 
पण  जेव्हा ती व्यक्ती हातपाय मारायचा प्रयत्न करत असते, बाहेर पडायचा प्रयत्न करत असते, तेव्हा जर तिच्या जवळच्या लोकांनी तिला शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर??? कित्येक जीव तिथेच सावरले जाऊ शकतात. 
पण दुर्दैवाने आपल्याकडे याबाबतीत अवेअरनेसही कमी आहे आणि शक्यतो जर कोणी असं बोलायला लागलं तर त्याला टोचून टोचून बोलण्याचा प्रमाण खूप जास्त आहे. 
 उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जिच्या आयुष्यात नुकतंच काहीतरी घडून गेलेल आहे. घटस्फोट झालेला आहे किंवा तिचा आयुष्यात कोणीतरी मृत्यू पावलेल आहे त्या परिस्थितीतून सावरताना ती व्यक्ती बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला जाते. 
कुठलेही प्रयत्न... स्वतःला जिवंत असण्याची खूण पटवून देण्यासाठी... ती व्यक्ती चांगले कपडे घालून बघते तर तिला ऐकायला मिळतं, "अरे लगेच सावरलात? Xyz या गोष्टी झाल्या त्याला अजून फार वेळ नाही झाला एवढं कसं कोणी पटकन गोष्टी बदलू शकतो? तुम्हाला दुःख नाही होत?".
 अशाच काही गोष्टी अगदी नोकरी किंवा व्यवसायात फटका पडलेल्या माणसांच्या बाबतीतही होतात. चुकून ती व्यक्ती कुठे बाहेर गेलेली दिसली,  काही गोष्टी केलेल्या दिसल्या. रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलीये, काहीतरी वस्तू विकत घेताना दिसते.
" अरे आत्ता एवढा सगळा खर्च झालाय. तुम्ही कर्जात बुडलेले आहात तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता???"
 हे त्या व्यक्तीला ऐकवलं जातं. ऐकवणाऱ्या व्यक्तीला जनरली गोष्टींच बॅकग्राऊंड माहीत नसतं. तिला फक्त तिच्या मनात जे आले ते फडकन बोलून मोकळं व्हायचं असतं.
समोरच्या व्यक्तीसोबत जे काही घडलं आहे त्याबद्दल सगळंच आपल्याला माहित असतं का? 
 जी व्यक्ती वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतीये की त्यासाठी पहिली स्टेपच ही घेत असते की मी माझ्या वातावरणातून बाहेर येऊन काही क्षण जगून बघावं मला पुन्हा तो आत्मविश्वास मिळतोय का? दुर्दैवाने हे केलं जात नाही की अशा गोष्टी ऐकायला मिळतात आणि लोक आतल्या आत घुसमटत राहतात. 
 सो इथे एक सांगणं आहे की समोरच्यावर वाईट वेळ आली आहे, तो त्या परिस्थितीतून जातो आहे, ती परिस्थिती किती बिकट आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर कुठलेही जजमेंट पास करू नये. 
 आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नये. 
आणि जे अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांनी मात्र एक गोष्ट नक्की करावी जर आपलं बाहेर निघायचं ठरलेल आहे तर आजूबाजूचा वातावरण,त्यामध्ये असणारी माणसं यांचा आपल्या मनस्थितीवर कितपत परिणाम होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं. आपल्याला एकट्याच्या जीवावरती गोष्टी करता येत नसतील तर शक्य तिथे न लाजता "योग्य लोकांकडे" मदत मागायची. इथे मी योग्य लोकांकडे म्हणत आहे सरसकट सगळ्यांसमोर आपली परिस्थिती सांगून स्वतःच हसू करून घ्यायचं नाही.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
20.3.2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

सोमवार, १३ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना हा कोर्स का करावा?

#स्वतःसाठी_बदलताना
स्वतःसाठी बदलताना हा कोर्स मी का करावा असा प्रश्न जर पडत असेल तर हे नक्की वाचा. 
1. भूतकाळातील वाईट गोष्टींचे वर्तमान काळावर अजूनही पडसाद उमटतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भूतकाळात घडून गेलेल्या चुका किंवा मिळालेली वाईट वागणूक यामधून मला अजूनही बाहेर पडता येत नाहीये. असं काही जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करा.

2. कितीही चांगले बदल करायचे म्हटले त्यासाठी कितीही संकल्प केले तरीही माझ्याकडून सातत्याने गोष्टी घडत नाही. म्हणून तर हा जो कोर्स आहे तो 21 दिवसांचा आहे.  21 दिवसांमध्ये सातत्याने स्वतःसाठी काम केल्याने मनाला, मेंदूला आणि पर्यायाने शरीराला त्या गोष्टींची सवय लागते. 

3. विनाकारण चिडचिड, नीट झोप न लागणे, सातत्याने विचार करणे, कुठल्याही गोष्टीकडे बघताना नकारात्मक बाजूला जास्त झुकणे हे जर आपल्या बाबतीत होत असेल....तर आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीवर काम करायची गरज आहे आणि म्हणून हा कोर्स महत्त्वाचा आहे. 

4. कुठलंही नवीन काम करणं, नवीन गोष्टीची सुरुवात करणं याची भीती वाटते किंवा एखादी गोष्ट कितीही करण्यासाठी गरजेची असली तरीही ती सुरू करण्याची इच्छा न होणे हे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर हा कोर्स नक्कीच करा. 
 कारण इथे तुम्हाला आपली गाडी नेमकी कुठे अडते आहे हे लक्षात येईल.  बऱ्याचदा काय होतं माहितीये का की आपल्यामध्ये ते पोटेन्शिअल असतं, ती ताकद असते पण कुठेतरी मोटिवेशन कमी पडत असतं आणि ते मोटिवेशन आपण आपल्या आजूबाजूला शोधत असतो.  त्या ऐवजी ते मोटिवेशन तुम्हाला स्वतःकडून मिळालं तर?  स्वतःच स्वतःचे मोटिवेटर होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. 

5. आयुष्यात आपल्याला नेहमी वाटतं की माझ्या बाबतीत काही वाईट घडलं तर माझी कोणीतरी मदत करावी पण असं नेहमीच होतं का?  प्रत्येक वेळी कोणी आपल्या मदतीला धावून येतं का? तर नाही...  बऱ्याच जणांचं उत्तर हेच असेल.  मग अशा वेळेला आपण प्रयत्न करायचे सोडून देतो का?नाही ना?

 मग आधीपासूनच आपण आपल्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली तर? आपण स्वतःला बदलून स्वतःचा सगळ्यात जवळचा मित्र तत्त्वज्ञ आणि वाटाड्या बनवलं तर? अवघड आहे पण अशक्य नाहीये.  

आणि म्हणूनच आपण 21 दिवसांचा वेळ निवडला आहे.  जिथे एका क्षणात गोष्टी बदलतात तिथे 21 दिवसांमध्ये किती चांगले बदल घडून येऊ शकतात याचा विचार केला तर तुम्हाला ही संकल्पना नक्कीच पटेल.

*** कॉमन प्रश्न
टास्क करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? 
--- तर कोर्स चे जे मेंटोर आहेत जे मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला जे टास्क देतील ते तुम्ही ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करायचे. आता हा ठराविक कालावधी तुमच्या ऑफिस टाइमिंग ना, डेली रुटीनला डिस्टर्ब करणार असेल का? तर अजिबात नाही तुमचं डेली रुटीन अजिबात डिस्टर्ब होणार नाहीये.

तुम्हाला कोर्स बद्दल अजून काही शंका असतील तर दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधा. 
कोर्स सुरू होतो आहे 16 मार्च 2023 पासून
फी 800रू फक्त
नंबर 9730961014
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

गुरुवार, ९ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना बॅच 1

#स्वतःसाठी_बदलताना 
#संकल्पदिन #गुरूवार
#21dayschallenge

गेले महिनाभर सातत्याने #संकल्प2023 #संकल्पदिन ह्या नावाने 31 संकल्प मी शेयर करत आहे. आधीही असेच काही संकल्प दिले होते. 
ह्या संकल्पना माणसाच्या रोजच्या आयुष्यात जे बदल घडवून आणत आहेत त्या मागे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा कार्यरत आहे. आणि तिच्याच परवानगीने आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. 
"स्वतःला घडवण्यासाठी" ह्या 21 दिवसांच्या कोर्सच्या चार बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. आणि त्यातून नवीन संकल्पनेचा जन्म झाला ती म्हणजे "स्वतःसाठी बदलताना".हा कोर्स हा आधीच्या कोर्सच्या पुढचा टप्पा जरी असला तरी तो कुणीही करू शकते. 

 तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या गोष्टी स्वतःभोवती फिरतात. का??? कारण जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात बदल जाणवत नाहीत. 

आणि काम करायचं म्हणजे स्वतःला तडजोड करण्यासाठी तयार करायचं असा त्याचा अर्थ होत नाही तर गोष्टींबरोबर जुळवून घेताना स्वतःचा आयुष्य जगण्याचा आणि त्याचा भरभरून आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. 

चढउतार हे आयुष्यात सातत्याने येतच असतात. पण म्हणून आपण जगणं सोडत नाही किंवा कष्ट करणे सोडत नाही.
 म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम है.  मग तीच थोडीशी उम्मीद स्वतःच्या आयुष्यात चांगलं काही घडण्यासाठी वापरली तर???

कॉमन विचारले जाणारे प्रश्न - 
स्वतःला घडवण्यासाठी हा कोर्स केला नाही तर मी स्वतःसाठी बदलताना करू शकतो का? 
---- हो आधीच्या गोष्टींची सांगड घालूनच हा कोर्स तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स नक्कीच करू शकता. 

स्वतःसाठी बदलताना हा कोर्स कोण करू शकतो? 
 ------- वय वर्ष 20 ते 55 ज्याला आपल्या आयुष्यात चांगले बदल हवे आहेत असं कोणीही हा कोर्स करू शकता. 
 वेळेचं बंधन अजिबात नाहीये. पण कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तो कोर्स व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करणे हे मात्र गरजेचे आहे . 

स्वतःला घडवण्यासाठी आणि स्वतःसाठी बदलताना यामध्ये नेमका फरक काय आहे? 
---------- स्वतःला घडवण्यासाठी इथे सहभागींनी स्वतःच्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टींवर काम केलं होतं.
तर स्वतःसाठी बदलताना ह्या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना स्वतःसाठी प्रत्यक्षात ठामपणे काही गोष्टी करायच्या आहेत. 

कोर्सचे स्वरूप काय असेल? 
-------- 10 टास्क लिहिण्याचे आणि 10 टास्क कृती करण्याचे असतील. 
टास्क नेमके काय असतील ते मात्र कोर्स जॉईन केल्यानंतर कळेल. 

कोर्स कालावधी - 16 मार्च ते 5 एप्रिल 2023 
कोर्स फी - 800रुपये 
गुगल पे/फोन पे - 9730961014 

(कोर्स बद्दल कुठलीही माहिती हवी असल्यास 9730961014 ह्या wa नंबर वर संपर्क साधा. फी पेमेंट केलं आहे त्यांनी ह्या नंबर वर रिसिट पाठवा म्हणजे ग्रुप मध्ये एड केलं जाईल. ) 

बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!!! शुभं भवतु !!!

#दत्तात्रेयार्पणमस्तू
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 

बदलाल तर बदलाल

बदलाल तर बदलाल

बदल ही एकमेव अशी गोष्टआहे जी सातत्याने बदलत असते. 
किती गोंधळात टाकणारं वाक्य आहे न? पण तेच मर्म आहे आयुष्याचं... 
Change is only constant thing.

त्यावरून एक गोष्ट आठवली स्वातीला घरातील फर्निचरच्या जागांमध्ये बदल करण्याची सवय होती. 
दर ठराविक दिवसांनी ती घरातील फर्निचरची ठेवण बदलत असे. हे बदल करण्यामागे तिच्या मनात दोनच विचार असत - 
पहिला म्हणजे फार कमी वेळा घरातून बाहेर पडणाऱ्या स्वातीला असे बदल केल्याने मूड फ्रेश झाल्यासारखे वाटत असे. 
आणि 
दुसरा म्हणजे अस करत असल्याने घरात जनरली फारशी स्वच्छता करावी लागत नसे कारण ह्या निमित्ताने सगळ्या गोष्टींवरून आपसूकच हात फिरत असे. 

तिच्या या वागण्याचं घरात सगळ्यांना आधी आश्चर्य वाटत होतं. पण हळूहळू सगळ्यांना ते ही अंगवळणी पडलं. 
तशी ती काही कुणाला मदत करायला सांगत नसे. पण ते काम केल्यावर घरात जाणवणाऱ्या गोष्टी सगळ्यांनाच लक्षात आल्याने आता सगळेच आवडीने ह्या वेळी नवीन काय करायचं ? हे ठरवण्यात पुढे येऊ लागले होते. 

एकदा अचानक काही पाहुणे त्यांच्याकडे आले. एक दोन दिवस राहून गेले. घर अर्थातच नेहमीप्रमाणेछान आवरलेलं होतं. आलेल्या पाहुण्यांना ते बघूनच खूप प्रसन्न वाटलं. ते कौतुक करून आपल्या घरी गेले. 

पुन्हा काही दिवसांनी त्याच पाहुण्यांच येणं झालं ह्यावेळेस त्यांना घर बदललेलं वाटलं पण प्रसन्नता, कलात्मकता आणि सकारात्मक ऊर्जा मात्र तशीच होती. 

"हे कसं काय?", त्यांनी न राहवून विचारलं. 

स्वातीने तिचा फंडा सांगितला. आणि त्यांना सांगितलं की ती तिच्या मनस्वास्थ्यासाठी ही गोष्ट करत होती. फार काही करायचं नव्हतंच फक्त वस्तू रिअरेंज करायच्या. काही गोष्टी नंतर वापरू म्हणून ठेवल्या असतील तर त्या आलटून पालटून वापरायला सुरुवात करायची. 
स्वतःच्या आनंदासाठी विकत घेतलेल्या गोष्टी जर आत्ता वापरल्या नाहीत तर कधी वापरणार? 

तिची ही पध्दत घरात सगळ्यांना आवडली त्यामुळे सगळ्यांनीच अवलंबून बघितली होती. 

अशीच पद्धत स्वतःच्या मनाच्या आणि मेंदूच्या बाबतीतही वापरायला हरकत नाही हो न? 

घरातील वस्तुंची जागा बदलून जर मनस्थितीत फरक पडत असेल तर मनातील, मेंदूतील विचारांची जागा बदलल्यावर, पद्धत बदलल्यावर किती फरक पडेल? 

बदल जर आपल्याला स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यात हवे आहेत तर त्यासाठी प्रयत्नही आपणच करायला हवेत ना? 

बघूया बदल आपल्याला बदलतो की आपण बदलाला बदलतो 😂😂 

बाकी 

बाकी बरच आहे शोधुया हळूहळू ... 



रविवार, ५ मार्च, २०२३

बी थॉटफुल

बी थॉटफुल
𝐍𝐨 𝐦𝐨𝐫𝐞 𝐝𝐞𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐢𝐧𝐠 𝐮𝐧𝐰𝐚𝐧𝐭𝐞𝐝 𝐭𝐡𝐢𝐧𝐠𝐬 𝐭𝐨 𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐩𝐞𝐨𝐩𝐥𝐞.
𝐝𝐢𝐬𝐚𝐩𝐩𝐨𝐢𝐧𝐭𝐦𝐞𝐧𝐭 𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐞𝐬 𝐚𝐫𝐞 𝐧𝐨𝐭 𝐭𝐡𝐞 𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐞𝐬 𝐲𝐨𝐮 𝐰𝐚𝐧𝐭 𝐭𝐨 𝐭𝐞𝐥𝐥. 

मीच का? माझ्यासोबतच का? हे विचारताना आपण विसरतो की आपल्याबाबतीत घडणाऱ्या 99.99 टक्के वाईट गोष्टींना आपण स्वतः आमंत्रण दिलेले असते. 

वाईट विचार, डिप्रेसिंग स्टेटस, गॉसिप्स, इतरांना कमी  लेखणे ह्या गोष्टी आपण करत असतो. पण त्या करताना आपल्याला वाटतं की हे फक्त मला माहित आहे. प्रत्यक्षात मात्र त्या गोष्टी तुमचं भविष्य ठरवत असतात. 
सो लोक्स , चुकीच्या गोष्टी, बातम्या, नकारात्मक विचार इतरांकडे पास करताना 100 वेळा विचार करा. 

अँड फॉर अ चेंज म्हणून एखाद्या दिवशी कुठल्याही वाईट गोष्टीला एंटरटेन करू नका. आणि फरक बघा. 

११.६.२०२२ वेळ रात्रीचे १०:२६

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल

शनिवार, ४ मार्च, २०२३

गारूड

गारुड

विकेंडच काम नाही म्हटलं तरी बरंच लांबल होतं. 
शेवटच्या बसमध्ये कसाबसा घुसत तो गावाकडे निघाला होता. ती बससुद्धा आज काही बिघाड झाल्यामुळे त्याला मिळाली होती. नाही तर रात्री ८ नंतर गावाकडे जाण्यासाठी एकही बस नसायची.

बायको आधी बाळंतपण म्हणून आणि मग बाळाच्या   दोन्ही आजीआजोबांचा हट्ट म्हणून हल्ली गावीच राहत होती. त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण सुरुवातीला  बाळाला आणल्यानंतर  काही दिवस दोघांची प्रचंड तारांबळ उडत होती. त्यात त्याच्या घरी येण्याची वेळ निश्चित नव्हती. मग शेवटी अजून काही महिने तरी बाळ गावीच राहील अस ठरलं होतं आणि त्याला सांगण्यात आलं होतं. 

गावी काय हाकेच्या अंतरावर सासर माहेर असल्याने बायकोही निवांत झाली होती. पण त्याची काळजी मात्र तिला असायची. ती होती तोपर्यंत त्याचं सगळं वेळच्या वेळी होत होतं पण नसताना सुद्धा अडणार नाही हे तिने बघितलं होतं. 

विकेंडला आला की कोरड्या फराळाचे डबे सोबत जात होते. आणि इतर वेळेसाठी तिने जवळच्या एका मावशींकडे डब्याची सोय केली होती. इनशॉर्ट स्वतःच्या बाळाला जरी आई आणि सासूच्या हातात सोपवलं असलं तरी सासूच्या बाळाची काळजीही ती घेत होती. 

गाडीत बसायला जागा मिळाली, तस त्याने सीटवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून घेतले. थकल्यामुळे त्याचा डोळा लागला. जाग आली तेंव्हा गाडी सेकंड लास्ट स्टॉपवर होती. त्याचा शेवटचा स्टॉप होता. गाडीत आता बोटावर मोजण्याएव्हढी माणसं उरली होती. 

इकडे तिकडे नजर फिरवताना त्याचे डोळे एका ठिकाणी स्थिर झाले. ड्रायव्हरच्या मागची सीट होती. तिथे कुणीतरी बसलं होतं. कोण आहे हे पाठ असल्याने लक्षात येत नव्हतं. ती स्त्री आहे हे त्याला तिचा पदर हलला तेव्हा लक्षात आलं. आता ती मागे वळणार तेवड्यात कुणीतरी मागून भराभर चालत उतरण्यासाठी पुढे गेला. आता त्या सीटवर कुणीच दिसत नव्हतं. 

आपल्याला भास झाला अस समजून त्याने खिडकीबाहेर नजर टाकली तर गाडी स्लो झाली तिथे कुणीतरी त्याच्याकडे बघून हात हलवत होतं. त्याला काही समजलं नाही. तो काही रिएक्शन देणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. 

फोनच्या रिंगटोन मुळे तोच काय सगळी बस भानावर आली. आणि चकव्या कडे  जाणारी बस गावाच्या दिशेने वळली. 

त्याने फोन उचलून बायकोला जवळच आलो आहे असं सांगितलं आणि तो आजूबाजूला बघू लागला. 

ड्रायव्हर जवळ जाऊन कंडक्टर काहीतरी विचारत होता. आणि ते दोघे पुन्हा पुन्हा वळून त्याच्याकडे बघत होते. त्याला जरा विचित्रच भासलं सगळं पण  तेवढ्यात कंडक्टर त्याच्या दिशेने आला आणि त्याने त्याला विचारलं , "ओ भाऊ जरा तुमचा नंबर देता का? किंवा मग ही रिंगटोन द्या " 

"कशासाठी?", त्याने विचारलं. 

" सांगतो उतरल्यावर पण इथं फोनच नेट नाही चालणार एखाद्या वेळी निदान रिंगटोन तरी वाजवता येईल. "कंडक्टर अजिजीने म्हणाला. 

त्याने रिंगटोन दिली. आणि नंबरसुद्धा. 

गावाच्या अगदी अलीकडे बस स्लो झाली आणि बसमधलं वातावरण अचानक बदललं. 
अचानकच खूप सारे हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबतच बांगड्या, पैंजण ह्यांची किणकिण सुरू झाली. दिसत कुणीच नव्हतं पण आवाज ऐकू येत होते. 

ड्रायव्हर कसाबसा बस चालवण्याकडे लक्ष देत होता. 

तर कंडक्टर बसच्या दाराकडे डोळे मोठे करून बघत होता. 

उरलेले प्रवासीही काही तरी विचित्रच वागत होते जस काही ते गाडीत नाही बारमध्ये बसले आहेत. 

हा सगळा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता. त्याने कंडक्टर कडे बघितलं आणि तो ज्या दिशेने बघत होता तिकडे बघितलं एक स्त्री चालत्या बसमध्ये चढत होती. अगदी निवांतपणे. जणूकाही ती हवेवर तरंगत आहे. 

अंगात आहे नाही तेवढं त्राण गोळा करून कंडक्टर पुढे झुकत त्याला म्हणाला ," चुकुन सुद्धा तिच्या डोळ्यात बघू नका. जमलं तर ती रिंगटोन लावा. ", कारण गडबडीत त्याचा फोन सीटखाली पडला होता आणि तो फोन उचलायला वाकला तसा कुणीतरी त्याचा हात धरला होता. 

पण कंडक्टर च्या सांगण्याआधीच त्याने तिच्या डोळ्यात बघितलं होतं. आणि तो  सीटवरून उठून तिच्यामागे चालू लागला. 

इकडे त्याच्याशी बोलल्यापासून त्याच्या बायकोचा जीव वरखाली होत होता. तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला पण तो लागला नाही. शेवटी तिला काय वाटलं माहीत नाही पण देवासमोर जाऊन बसत तिने फोन लावायला सुरुवात केली. 

जवळपास दहा मिनिटांनी फोन लागला आणि .....

फोनची रिंगटोन वाजू लागली. त्याला एक जोरदार झटका बसला आणि तो भानावर आला. 

तो चालत्या गाडीतून बाहेर पाय टाकणार होता. 

ड्रायव्हर आणि कंडक्टर च्या तोंडातून भितिने शब्द फुटत नव्हते. 

त्याची रिंगटोन बंद झाल्याने त्याच्या पुढे असलेली ती रागाने मागे वळत होती. 

पण अचानकच पुन्हा एकदा वातावरण बदलले होते. तेवढ्यात सावरत कंडक्टर ने खाली पडलेला फोन उचलून ती रिंगटोन वाजवायला सुरूवात केली. 

ड्रायव्हरने जीव खाऊन बस गावाच्या हद्दीत घुसवली. 

सगळ्यानी मागे वळून बघितलं तर अर्धवट जळलेल्या कलामंदिराच्या आवारात  विचित्र अवतारात असलेल्या त्या सगळ्या जणी त्यांच्याकडे जळजळीत नजरेने दातओठ खात बघत होत्या. 

आज बऱ्याच दिवसांनी १३ जण त्यांच्या हाती येता येता निसटले होते. 

पहिल्यांदा गावाच्या वेशीबाहेर असलेल्या कलामंदिराच्या गारुडातुन कुणीतरी निसटले होते. 

कंडक्टरचा फोन अजूनही तीच रिंगटोन वाजवत होता. 

त्या रिंगटोन च्या आवाजात घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गायब झाला होता.

काय होती रिंगटोन? तुम्हीच सांगा बघू तुम्हाला लक्षात येतेय का? 

नाहीतर बघा हं आज नेमकं विकेंड आहे तिच्या नजरेच्या गारुडात अडकला तर कुणीही वाचवायला येणार नाही. 

#गौरीहर्षल