कालाय तस्मै नमः (भाग १ - ३)
मनोगत कालाय तस्मै नमः ही माझी पहिलीच दीर्घ कथा. ह्या कथेला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाला. कालाय तस्मै नमः लिहिताना एका कुटुंबाची प्रत्यक्ष कथा डोळ्यासमोर होती. पण कथास्वरुपात मांडत असताना मला अंधश्रध्देला खतपाणी घालणारी कथा नको होती. रहस्य कथा, भयकथा म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर जनरली जी दृश्य येतात तस काही तुम्हाला या कथेत सापडणार नाही. मग काय सापडेल? माणसाच्याच आत दडलेली एक वृत्ती... कधी ती चांगली असेल तर कधी वाईट किंवा अगदी दुसऱ्याचा जीव घेण्याइतकी क्रूर. जिथे ह्या जगात वाईट गोष्टी आहेत तिथेच चांगल्या गोष्टी ही अस्तित्वात आहेत हे मला ह्या कथेच्या माध्यमातून मांडायच होतं आणि कुठेतरी त्यामध्ये मी सफल झाले आहे अस मला वाटतं. कालाय तस्मै नमः ह्या कथेचा विषयच मुळात वेगळा होता. अध्यात्मिक रहस्यकथा... खरे तर अध्यात्म या विषयात इतकी रहस्य दडलेली आहेत की माणसाला एक आयुष्य पुरणार नाही. ह्याच वळणाने जाणाऱ्या अजूनही काही कथा लवकरच तुमच्या भेटीला आणत आहे. आजपर्यंत माझ्या लेखनावर तुम्ही वाचक मित्रमैत्रिणींनी जो विश्वास दाखवला तो असाच पुढेही असुदे...