बुधवार, २१ जून, २०१७

घर हक्काचं भाग १

घर हक्काचं
भाग १
‘ती’ दिसायला सामान्य . इतरांच्या दृष्टीकोनातून तर अगदी ugly वगैरे कॅटेगरीत मोडणारी. आपल्या वाट्याला फारसं कौतुक कधी येणार नाही याची जाणीव तिला खूप लवकर झाली. कारण इतरांचे टोमणे ऐकून जेंव्हा ती आईकडे आशेने बघायची तेंव्हा आई नकळत दुर्लक्षच करायची.
आईचं वागणं तिला कमी वयात बरंच काही शिकवून गेलं. ती आता स्वतःच स्वतःला समजवण्यात पटाईत झाली होती. चुकून कधी वेळ आलीच तर हळूच स्वतःलाच टपली मारत ती म्हणायची, तू नं वेडी आहेस ‘मयुरा’. आणि स्वतःच खुदकन हसत कामाला लागायची. तिचा प्लस पॉईंट  होता तिचं दिलखुलास हसणं जे समोरच्याला एका क्षणात तिच्याशी बांधून टाकत असे एका समंजस नात्याने अपवाद फक्त तिच्या घरच्यांचा. प्रचंड मेहनतीने यश मिळवत आज मयुरा सेटल होती पण तिच्या घरच्यांना मात्र जसा तिच्या दिसण्याबद्दल प्रोब्लेम होता तसच तिच्या प्रगतीशीही त्यांना काही देणंघेणं नव्हतं.प्रत्येकवेळी तिची मित्रमंडळी मात्र तिचं यश दणक्यात साजरं करत.
अशाच एका छोटयाशा पार्टीत तो तिला दिसला. वयाच्या थोड्याफार इफेक्टमुळे तिला नकळतच त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं. पण आत्तापर्यंतच्या अनुभवांमधून शहाणी झालेली मयुरा शांत राहून त्याला पारखत होती. थोड्याच दिवसांत तिला दिसतं तसं नसतं हा अनुभव आलाच. त्याचं देखणेपण हे फक्त त्याच्या चेहऱ्यापुरतच मर्यादित आहे हे तिला कळलं. मग आपसूकच त्याच्याबद्दल जाणवणारी ती नाजूक भावनाही कोमेजली. मैत्रीच्या नात्याने त्याने पुढे केलेला हात तिने स्विकारला. मैत्रीच्याच कारण ती काही मॅरेज मटेरियल नव्हती, जिला चारचौघात ट्रॉफीसारखं मिरवता येईल. तिला या सगळ्याचा अंदाज असल्यानेच तिने त्याला फारसं महत्व दिलं नाही. त्याची एक खास मैत्रीण होती. तिला लग्नासाठी विचारण्याच्या खटपटीत तो होता. पण ती काही दाद देत नव्हती. मग हिलाच त्याची दया आली. तिने मोकळ्या मनाने त्याची मदत केली. त्या मैत्रिणीलाही ह्याची धडपड समजू लागली. अन् एक दिवस त्याच्या प्रस्तावाला तिने हिरवा कंदील दाखवला. तो खूष होऊन आनंद शेअर करण्यासाठी हिच्याकडे आला. ती मनापासून त्याच्या आनंदात सामील झाली.
हळूहळू तो तिच्या आयुष्यातून  काहीसा गायब होऊ लागला. ती तर आधीपासूनच कुणाच्याच खिजगणतीतही नव्हती. घरच्या आघाडीवर तर ती आधीच हरली होती,आता मनाची आघाडीही विस्कटली पूर्णपणे. पण तरीही ती मात्र खंबीरपणे चालत होती तिची वेगळी वाट...
दोन वर्षं उलटून गेली ह्या सगळ्या घटना घडून.पहिलं प्रेम, त्याच्या कडू आठवणी घेऊन कुठेतरी हरवलं होतं. आज मयुरा फक्त विद्यार्थीप्रिय प्रोफेसरच नव्हे तर यशस्वी चाइल्ड सायकोलॉजीस्ट, समुपदेशक बनली होती. घरच्यांनी तिच्या कुठल्याच वैयक्तिक गोष्टीत रस न दाखवल्याने तिने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होताच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. अशातच एका रात्री कुठूनतरी परतताना तिला कोपरयावरच्या कचराकुंडीजवळ खूप गर्दी दिसली. कधीही अशा ठिकाणी न वळणारी तिची पावले आज मात्र थांबली तिथे जाऊन...
क्रमशः #गौरीहर्षल


सोमवार, १२ जून, २०१७

मन धागा धागा

#फर्माईश
#असे_कसे_बोलायचे_न_बोलता_आता
      कालपासून वेड्यासारखं हे गाणं मी ऐकतेय. प्रत्येक कडवं मात्र मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे कथा वगैरे लिहिण्याऐवजी मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय.
१.
       असे कसे बोलायचे न बोलता आता
       तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
       डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
       सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
         मन धागा धागा जोडते नवा
          मन धागा धागा रेशमी दुवा
  तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२.
             एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
               हातात नाही हात तरीही तू सोबती
                     मन बेभान बेभान होई
                     मग प्रीतीला उधाण येई
                    मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी.

३.
                रोज बहाणे नवे शोधून मी थकते
                 तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
                    क्षण आतूर आतूर झाले
                       रोज काहूर काहूर नवे
                  मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
      Hope so, मी ट्रॅक सोडून लिहिलं नाहीये. बाकी सगळ्यांच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय.
       कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल 😝😝
गौरी हर्षल
१२.६.२०१७

बुधवार, ७ जून, २०१७

ती, तो आणि पाऊस २

ती, तो आणि पाऊस २
तो - किती आवडायचं तुला पावसात भिजायला, मला तुझ्या त्या वेडामुळेच तू आवडली होतीस खरंतर. पण रोजच्या धावपळीत सांगायचंच राहून गेलं बघ. आणि आज तो मनापासून बरसतोय तुझ्या माझ्या अंगणात तू लावलेल्या चाफ्यावर. पण आपण मात्र हरवलोय आयुष्याचा गाडा ओढताना. कधी नव्हे ते आज मी लवकर आलोय तू नसताना उगाच उदास झालेल्या घराकडे बघत होतो तोच पाऊस आला. आज ठरवलं की तुला तुझ्या पावसासोबतच सरप्राइज द्यायचं. लवकर ये गं मग तू , मी आणि पाऊस सेलिब्रेट करूया आपल्या नात्याच्या नव्याश्या या अर्थाला....Miss you

ती--  कसला छान कोसळतोय पाऊस आणि आज नेमकी मी ट्रॅफिक मध्ये अडकलेय. घरी असते तर मस्त चाफ्याखाली भिजले असते तुझ्यासोबत. तुला आवडत नाही माहीत आहे मला पण तू सोबत असलास की माझ्या असण्याला एक अर्थ येतो. एकत्र येऊन सेलिब्रेट केलेले पावसाळे कमीच ना रे आपले. तू तुझ्या कामात बिझी मी माझ्या. आयुष्य जगायचं जगायचं म्हणत असताना आयुष्यच नाही ना रे हरवत चाललं??

15 मिनिटानंतर दाराची बेल वाजते.
तो ओंजळीत चाफा घेऊन दार उघडतो आणि
ती हरवून जाऊन त्याला बघत बसते.....

नवीशी सुरुवात
पावसासोबत
नव्याने होते......
गौरी हर्षल
७.६.२०१७

गुरुवार, १ जून, २०१७

ती,तो आणि पाऊस

ती,तो आणि पाऊस
        ती-:  पहिला पाऊस पडला की हमखास आठवण येते तुझी. आयुष्यातला सगळ्यात धुंद पावसाळा तुझ्या सोबत तर अनुभवला मी. अगदी मनमुराद भिजत भटकणं असो किंवा चिंब भिजून आडोश्याला कुडकुडत उभं राहणं. तूच होतास ज्याने मला दोन्ही हात पसरून पावसाला कवेत घ्यायला शिकवलं. तू पहिल्यांदा भेटलास तेही पावसातच. तो पावसाळा मी जगले अक्षरशः आणि अजूनही जगते प्रत्येक वेळेस. आता तू कुठे आहेस माहित नाही. अजूनही तसाच पावसाला झेलतच असशील कदाचित मला आठवतही असशील.💖💖💖

तो -:     आज पुन्हा आभाळ भरून आलं. कुठेस ग तू??? पहिला पाऊस, ते भटकणं, तुझं शहारणं प्रचंड मिस करतो मी. नकळतच खूप दूर गेलो ना आपण. पण हा पाऊस आहे ना परत परत येऊन त्या आठवणींत नेतोच. तू होतीस म्हणून मीही मनमुराद जगायला शिकलो. आजही तू असतेस चेहऱ्यावर येणाऱ्या टपोऱ्या थेंबात. हल्ली खूप कमी भिजतो गं मी. पण जेव्हा भिजतो तेंव्हा तू सोबत असतेस. तुलाही अजून आठवत का पावसात भिजणं💖💖💖
गौरी हर्षल
१.६.२०१७
          

मंगळवार, २३ मे, २०१७

याद पिया की आए.......

#याद पिया की आए
              संयोगीता जितक्या आर्ततेने सुरांना आळवत होती तेवढ्याच तीव्रतेने अश्रू  तिच्या पापण्यांच्या कडांना ओलांडत होते. आज कित्येक दिवसानंतर ती रियाज करत होती. सूर मनासारखा लागलंय हे  ओसंडून वाहणारे तिचे डोळेच सांगत होते. शेवटच्या आलाप संपवून तिने डोळे उघडले. नेहमीप्रमाणे गुरूंना मनोमन अभिवादन करत तिने रोजच्या कामांना सुरुवात केली.
         संयोगीता वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत होती. तशी तिच्या आईवडिलांची इच्छाच होती. पुढे तिलाही त्यात गोडी वाटू लागल्याने संगीतच तिचा श्वास बनले होते. तिच्या गुरू वंदनाताई सुद्धा तिच्यासारखी शिष्या मिळाल्यामुळे तृप्त झाल्या होत्या. आपल्याकडे असेल नसेल तितकं ज्ञान त्यांनी संयोगीताच्या ओंजळीत टाकलं होतं.
                 वंदनाताईंच्या घरच्यांनाही संयोगीता आता घरातील एक वाटत होती. ताईंचा मुलगा मार्दव आणि संयोगीता एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पुढे दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला. साखरपुडा झाला आणि मार्दवला कंपनीच्या कामानिमित्त काही महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागलं. रोज तसंही फेसबुक , वॉट्सअप्प होतंच बोलण्यासाठी त्यामुळे फारसा दुरावा जाणवत नव्हता. तो परत येताच लग्नाची तारीख काढायची असं ठरलं.  हळूहळू मार्दवच्या येण्याची तारीख जवळ आली. त्याने निघतानाच फेसबुकला स्टेटस अपडेट केलं कमिंग बॅक टू इंडिया. फ्लाईट कनेक्टेड असल्याने त्याला येईपर्यंत सकाळ होणार होती. संयोगीताच्या मनात मात्र उगाच शंकेची पाल चुकचुकली. पहाटेच उठून ती अस्वस्थ मनाने रियाजाला बसली पण आज तिचे सूर का कुणास ठाऊक रुसले होते. इतक्यात तिचा फोन वाजला वंदनाताई बोलत होत्या परतून येत असताना मार्दवचा अपघात झाला होता. क्षणभर संयोगीताच्या नजरेसमोर अंधार पसरला. जेंव्हा ती जागी झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. मार्दव अपघातातून वाचला तर होता पण कोममध्ये गेला होता. आता खरी कसोटी होती. पण वंदनाताईनी संयोगीताला पूर्ण स्वातंत्र्य दिले त्या नात्यातून बाहेर पडण्याचं. संयोगीताने मात्र मार्दवची वाट बघायची असं आधीच ठरवलं होतं. आज ६ महिने झाले होते मार्दवच्या तब्येतीत फरक नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला घरीच लाइफ सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्याला साद घालण्यासाठी म्हणून संयोगीता रोज न चुकता त्याच्या खोलीतच रियाज करत होती. "जौबन बिता जाए रे हाय राम याद पिया की आए......" आज खूप दिवसांनी तिचे सूर मनासारखे लागले होते. तृप्त मनाने ती मार्दवच्या जवळ येऊन बोलत बसणार तोच तिला मार्दवच्या डोळ्यांत हालचाल जाणवली. आणि पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले होते. खऱ्या अर्थाने तिच्या पियाने तिची ती आर्त साद ऐकली होती.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

#गेले द्यायचे राहून........

#गेले द्यायचे राहून
          स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
            स्वराचा आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता,"गेले द्यायचे राहुनी , तुझे नक्षत्रांचे देणे". खूप छान गायची ती आणि तितकीच छान माणूसही होती. हो , होतीच कारण आता ती या जगात नव्हती. तिचं जाणं अकाली होतं पण ते तिने मात्र हसत हसत स्वीकारलं होतं.
         अनय तिचा खूप जवळचा मित्र, जिवापाड प्रेम होतं तिचं त्याच्यावर. पण त्याला मात्र खूप यशस्वी व्हायचं होतं आणि त्या धुंदीत त्याने तिचं प्रेम आणि मैत्री दोन्ही धुडकावली.
आज जेंव्हा ती गेली असं त्याला समजलं तेंव्हा त्याला आपल्या यशातला फोलपणा जाणवला. तिच्या सगळ्या आठवणी फेर धरून त्याच्याभोवती नाचू लागल्या. कारण हे प्रोजेक्ट संपताच तिची माफी मागून तिला लग्नासाठी मागणी घालण्याचा त्याचा विचार होता. पण तिने मात्र त्याला तशी संधीच शिल्लक ठेवली नव्हती. 
                  हरवलेल्या अनयची पावलं नकळत सावलीकडे वळली. सावली अनाथाश्रम इथेच तो आणि स्वरा लहानाचे मोठे झाले आणि इथेच पहिल्यांदा भेटलेही. त्यामुळेच स्वराचं जाणं अनय ला पुन्हा आश्रमात घेऊन आलं. तिथे गेल्यावर त्याच्या कानावर तेच सूर पडले तसा तो धावत धावत त्या दिशेने निघाला. बंद दारामागून येणारे ते सूर आणि तो आवाज ऐकून त्याला वाटलं की स्वराच्या जाण्याची बातमी खोटी आहे. पण दार ढकलताच त्याला जे दिसलं त्यामुळे त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या खोलीत ५ वर्षांची इटूकली नीरा गात होती. नीरा सावली आश्रमात आली तेंव्हा १५ दिवसांची होती तेंव्हाच स्वराने तिची जबाबदारी उचलली होती. अनय मात्र विसरून गेला होता हे सगळं. आत्ता हे सगळं काही सेकंदात त्याच्या डोळ्यासमोरून गेलं , आणि निरु ला कवटाळून त्याने ठरवलं काहीतरी मनाशी. 
           सावली अनाथाश्रमच्या ऑफिसमध्ये त्याने देशमुख सरांना निरु ला दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि सोबतच कायमस्वरूपी आश्रमाचा जास्तीत जास्त खर्च उचलण्याचं ठरवलं. लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण झाले. आज स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी जे तिला द्यायचं राहून गेलं होतं ते सर्व निरु सोबतच इतर गरजू मुलांनाही देण्याचा निश्चय करत अनयने  निरुचं बोट धरून आयुष्याची एक नवी सुरुवात  केली.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

असं जमलं आमचं

#असं जमलं आमचं
      पुणे- नाशिक- पुणे
   ती आपली टॉमबॉय भरपूर मित्रमैत्रिणी जमवून गोंधळ करणारी, तो मात्र मुलींशी कसं बोलू यात अडकलेला. त्याचे जेंव्हा कांद्यापोह्याचे कार्यक्रम सुरू होते तेव्हा ती मात्र मस्तपैकी कॉलेजमध्ये धिंगाणा करण्यात बिझी होती. अशातच तिच्या चुलत बहिणीला बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि तो मुलीला बघण्यासाठी हिच्या घरी आला. हीच दोघांची पहिली भेट.
           त्याला बघितल्यावर तिची रिएक्शन की काय ध्यान आहे आणि त्याची तिच्याबद्दल प्रतिक्रिया किती गबाळी आहे ही😝ही पृथ्वीवर शेवटची मुलगी असेल तरी मी हिच्याशी लग्न नाही करणार( खरतर तो तिच्या बहिणीला बघायला आला होता आणि मनात हे 😝😝). पुढे ते लग्न जमलं नाही पण या दोघांची मात्र मस्त मैत्री झाली. तिचा स्वभाव बडबडा असल्याने तिने त्याला ही बोलण्यास भाग पाडलंच. आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर दोघेही प्रचंड हसत सुटले. एकीकडे तो त्याचं MBA  आणि नोकरी ह्यात बिझी होता आणि दुसरीकडे त्याचे कांदेपोहे पण चालूच होते . तिचं तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं आणि सोबत तो मुली बघून आला की त्यावरून त्याला चिडवणे.
            तिचं कॉलेज संपलं आणि आता ती नोकरी शोधण्यात बिझी झाली. तसं तिच्या आईबाबांना तो आधीच आवडला होता पण हिला काहीच वाटतं नसल्याने त्यांनी विषय काढला नाही. आणि त्यालाही अजून तशी काही जाणीव झाली नव्हती. बाकी दोघेही सतत फोनवर संपर्कात होतेच हो फक्त फोनवरच कारण तो नाशिकला ती पुण्यात त्यामुळे त्या बहिणीच्या प्रोग्रॅम नंतर भेट अशी होणं शक्यच नव्हतं.
         अशाच गप्पा मारण्यात 2 वर्षं कधी निघून गेली दोघांनाही कळालं नाही. त्यात तिचा वाढदिवस आला. आणि तो दुसऱ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी हिलाच टिप्स विचारत होता त्या नादात विसरला. झालं दुसऱ्या दिवशी ती जाम भडकली मग पहिलं वहिलं भांडण झालं.
त्या नंतर त्याला जाणीव झाली की आपण जगभर जिला शोधतोय ती हीच😝😝.
तरीही त्याने मध्ये काही दिवस जाऊ दिले आणि मग शेवटी तिला विचारलं. मॅडम अजूनही लग्न ह्या बाबतीत मंदच होत्या, त्यामुळे त्याला होकार द्यायच्या ऐवजी तू माझ्या आईबाबांना विचार असं सांगून मोकळी झाली. त्याने ही तेच केलं तिला भेटण्यासाठी आणि मागणी घालण्यासाठी तो पुण्यात पोहोचला. आणि मग ३ डिसेंम्बर २०१० ला तिच्या घरच्यांच्या परवानगीने साखरपुडा ठरला.  २३ जानेवारी २०११ ला साखरपुडा होता तोपर्यंत त्याच्यासोबत फिरून भेटून तिला आता जाणीव झाली होती की येस he is the right guy.   आता मात्र मॅडमला स्वर्ग दोन बोटं उरला होता.
         अशी ही टेढी मेढी लव स्टोरी २९ मे २०११ ला नव्या बंधनात अडकली. तिला मात्र त्याला चिडवण्यासाठी आयुष्यभर पुरेल असं कारण मिळालं . हो जी पृथ्वीवर शेवटी उरली तरी तो लग्न करणार नव्हता तीच आता त्याची आयुष्यभराची सोबतीण झाली होती.
       अशा या आमच्या खोडकर नात्याला आता ६ वर्ष पूर्ण होतील. पण तो गोडवा ती ओढ आजही कायम आहे आणि राहील. थँक्यू हर्षल  for the wonderful relationship of togetherness and love💖💖 And also thanks आपण निवडलेल्या वेगळ्या वाटेवर खंबीर साथ देण्यासाठी.
गौरी हर्षल
२९.५.२०१७