शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

blind perception 4/8

Blind perception 

या लेखमालेतल्या आधीच्या एका लेखावरती एक कमेंट आली होती. ती म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो, तेव्हा त्यातली काही लोक मात्र आपल्याला खिजवण्यासाठी आपला अपमान करतात किंवा आपल्याला तुच्छ लेखतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही यश मिळवलं आहे. त्याच्यामुळे आता समोरच्याला स्वतःच्या लायकीची जाणीव झाली असेल. 
तर इथे पुन्हा एकदा तुलनेचा मुद्दा येतो. काही लोकांना दुसरे यशस्वी झाले तर पोटात दुखत तर काही लोकांना ते स्वतः यशस्वी झाले की दुसऱ्यांना त्रास द्यावासा वाटतो. पण या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांना इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करण्याची सवय असते. आता इथे लोकांनी असं करावं की करू नये हा मुळात वादाचा मुद्दा नाही. 
मुद्दा हा आहे की जेव्हा लोक असे वागतात तेव्हा आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी घ्यायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे, हा पूर्णपणे तिचा दृष्टिकोन आहे. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा नकळतच तिने आपल्याबद्दल केलेल्या कल्पना मग त्या खऱ्या असो किंवा नसो त्या आपण स्वीकारत असतो. तर आपण हे पर्सनली घेणं थांबवायला हवं. 
आपल्याबद्दल इतरांचा दृष्टिकोन आपण कसे आहोत हे ठरवत नाही. तर आपण स्वतः स्वतः बद्दल काय विचार करतो त्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरते. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना की माणसाने घातलेले कपडे, त्याने केलेला मेकअप यापेक्षा सुद्धा तो आत मधून स्वतःबद्दल काय फील करतो त्याने त्याचं व्यक्तिमत्व जास्त ठळक होतं. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या यशाच्या फुटपट्टीतून आपल्या आयुष्याचा मोजमाप काढत असेल तेव्हा ते न स्वीकारणं हाच योग्य मार्ग असतो. 

बाकी स्वभावाला औषध नसतच.‌ आणि जी लोक यशस्वी झाल्यानंतर इतरांशी नीट वागत नाहीत त्या लोकांचे पुढे जाऊन काय होतं ते मी सांगायची गरज नाही. 
बाकी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे या प्रत्येक गोष्टी फिरून फिरून पुन्हा बाउंड्रीज सेट करण्यावर जाऊन थांबतात. नातं जवळच असो किंवा लांबच त्यामध्ये मर्यादा पाळणं हे खूप जास्त गरजेचे असतं. कारण त्या मर्यादा कटू गोष्टी टाळण्यासाठी मदत करतात. 

 जाता जाता एक सांगते, आपण कितीही म्हणालो की पुराणातली वांगी पुराणात.... तरी कुठल्याही प्रकारचे यश मिळाल्यानंतर उतू मातू नये आणि घेतलेला वसा सुद्धा टाकू नये. 
याचा साधा सरळ अर्थ म्हणजे आपण यश मिळवण्यासाठी जे कष्ट केले आहेत त्याच मार्गावर सातत्याने चालत राहावं पुढे यशस्वी होण्यासाठी... 
#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
४/८

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

Turning point = upgrade yourself 3/8

Turning point = upgrade yourself 
कधी कधी आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात. एखादं आव्हान समोर उभे ठाकते, अचानक स्मूद चाललेल्या आयुष्याच्या गाडीला ब्रेक लागतो, काहीतरी अनपेक्षित वळण आयुष्य 360 डिग्रीच्या कोनातून बदलून टाकते.... त्यावेळेला आपण आधी असं म्हणतो की मीच का?? माझ्यासोबतच का?? 
आणि खरं सांगायचं तर त्यावेळी आपल्याला त्या फेजमध्ये होणाऱ्या त्रासाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. या गोष्टीला कालांतराने काही वेळ, दिवस, महिने, वर्षं उलटून जातात आणि मग जेव्हा आपण मागे वळून पाहतो.
 तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो त्रास यातना ते दुःख वेदना हे आपल्याला घडवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे होते. 
आयुष्यात जोपर्यंत अडथळे येत नाहीत, आव्हान समोर उभं ठाकत नाही, एखादा धक्का बसत नाही. तोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायला तयार नसतो. कदाचित त्यामुळेच नियतीची किंवा देवाची अशी इच्छा असते की आपल्याला बसलेल्या झटक्याने तरी आपण जागे व्हावे. 
सो अशा धक्के खात.... टक्के टोणपे सहन करत.... आयुष्याच्या रोलर कोस्टल राइडवर अजूनही टिकून असणाऱ्या सगळ्यांसाठीच आजचा रिमाइंडर... 
एकदा निवांत वेळ काढून आपल्या पूर्वायुष्यातल्या प्रत्येक अनुभवावर चिंतन करा. 
त्या अनुभवातून आपण कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो हे एका ठिकाणी नमूद करून ठेवा. 
शिवाय त्या अनुभवामुळे आपण माणूस म्हणून किती घडलो आहोत याचा आढावा घ्या. 
अनुभव हे धडे देण्यासाठी असतात. पण हे धडे शाळेतल्या धड्यांसारखे शिकून विसरून जायचे नसतात तर ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असतात. आणि त्या धड्यांना गिरवत आयुष्याचा एक एक टप्पा पुढे जायचं असतं. 
गोष्टी घडून गेल्यानंतर कधीतरी आपल्या प्रत्येकाच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं जे काही होतं ते चांगल्यासाठीच...
मग योग्य वेळी या चांगल्यासाठी घडणाऱ्या गोष्टी स्वीकारून आपण स्वतःला घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकूया...
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
३/८



 

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

comparison 2/8

आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात, ज्यांना दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टीत यश मिळालं तरी पोटात दुखतं. मग अगदी त्या स्वतः रनिंग रेस मध्ये पहिल्या आल्या असल्या आणि दुसरी व्यक्तीची लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिली आली असली, तरी त्यांना दुसऱ्याच्या लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिलं येण्याने त्रास होत असतो. आणि तो त्रास त्या व्यक्त सुद्धा करत असतात. पण आपल्या असं करण्याने इतर लोक दुखावली जात आहेत हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं. कधी कधी चुकून आपण सुद्धा असं वागतो बर का...

यामध्ये जी दुखावलेली लोक असतात ना? ती मात्र बऱ्याचदा स्वतःला एक प्रश्न विचारत असतात, की माझ्या यशाने या समोरच्या व्यक्तीच्या यशात किंवा आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. मग हिला एवढा त्रास का होतोय?? तर त्याचं मुख्य कारण फक्त एवढंच असतं की त्या व्यक्ती स्वतःचा आयुष्य दुसऱ्यांबरोबर सातत्याने कम्पेअर करत असतात. 
त्यांना दुसऱ्याच्या आनंदात, यशात सहभागी व्हावेसे वाटत नाही. अर्थात यामुळे कोणाचाही यश किंवा आनंद कमी होत नाही. पण जनरली जर आसपासच्या लोकांना गोष्टी पर्सनली घ्यायची सवय असेल तर त्यांना मात्र फार त्रास होतो. जिला आपण जवळची व्यक्ती समजत आहोत. ती आपल्या आनंदात, यशात सहभागी होत नाहीत याचं दुःख होतं.  

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट काय असते माहित आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी घडण्याची वेळ ठरलेली असते. शिवाय थोड्याफार फरकाने जे काही घडत असतं ते सारखंच असतं. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधल्या वेळात प्रत्येक माणूस सारख्याच स्थित्यंतरातून जात असतो. काही जण पूर्व संचितामुळे हे टप्पे लवकर पार करतात तर काहीजणांना वेळ लागतो इतकंच. 

शिक्षण, नोकरी, लग्नं, मुलं, संसार या इतरांशी तुलना करण्याच्या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून इतरांसोबत आपल्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा आपण काल काय होतो आणि आपण आज काय आहोत याची तुलना केलेलं जास्त चांगलं राहिलं. 

तसही या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असल्याने त्यामध्ये नावीन्य असं काहीच नाही. ही गोष्ट तुम्ही आज करत आहात, ती तुमच्या आधी कोणीतरी केलेली आहे आणि तुमच्या नंतर सुद्धा कोणीतरी करणार आहे. मग यात कसलं आलं वेगळेपण?? 

ते वेगळेपण आपल्याला आणावं लागतं... कसं?? स्वतःमध्ये योग्य पद्धतीने बदल घडवून... स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य घडवण्यासाठी कष्ट घेऊन... 
इतरांशी तुलना करून रडत बसण्यापेक्षा आपण आत्ता ज्या टप्प्यावर आहोत तो टप्पा एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं. ती फेज महत्त्वाची...
तुम्ही जर शिकत आहात, तर नुसतं शिकायचं म्हणून न शिकता ते अंगी बाणवण्याचा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 
तुमचं जर शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपलं भविष्य घडवण्यासाठी काय करता येईल त्यावर विचार करून कृती करायला घ्या. 
तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातली आपली कौशल्य तपासून पहा आणि नवीन काही शिकण्याची गरज असेल तर ते शिका. 
तुम्ही जर सिंगल असाल तर एकटे असताना सुद्धा भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 
जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या रिलेशनशिप मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवणीत राहाव्यात म्हणून प्रयत्न करा. 
थोडक्यात काय तर स्वतःवरती कठोर परिश्रम घेण्याची फक्त तयारी ठेवू नका तर ते परिश्रम घ्यायला सुरुवात करा. इतरांच्या टाईमलाईन, कव्हर पेज, प्रोफाइल पिक्चर, स्टोरी, आणि whatsapp स्टेटस कडे बघून स्वतःच्या आयुष्याला कमी लेखू नका. 

कारण इथे प्रत्येकाची टाईमलाईन आणि डेडलाईन सुद्धा वेगवेगळी आहे...
लक्षात घ्या आपल्या आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवायची आहे. 
जाता जाता एकच सांगते, कोणी आपल्यापुढे गेलं आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि कोणी मागे राहिले आहे म्हणून वाईट सुद्धा वाटून घेऊ नका. आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
२/८





Distance 1/8

Distance 


आपल्या बाजूला असे कित्येक लोक असतात की ज्यांची ओंजळ ओसंडून वाहत असते....
पण एखाद्या व्यक्तीकडे सगळं असलं तरी सुद्धा 
त्याला दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टींची भुरळ पडतेच...
आणि मग त्या गोष्टी स्वतःकडे नाहीत म्हणून ती व्यक्ती आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या लोकांवर सुद्धा जळत राहते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करते. 
तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेलच ना??
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहीलच असे नसते.
सो जेव्हा काही लोकांमुळे आपल्याला अनादर, अपमान, त्रास या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तेव्हा त्या लोकांना दूर करणेच योग्य असते. तुम्ही दुरूनही त्या लोकांचं चांगलं व्हावं असा विचार करूच शकता. त्यासाठी सातत्याने तो त्रास सहन करत त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे नसते. 
आणि जर काही नाती अशी असतील जी आपण पूर्णपणे तोडून टाकू शकत नाही. त्या नात्यांमध्ये आपला वेळ आणि एनर्जी किती द्यायची हे मात्र आपल्याला ठरवून घ्यावे लागते. 
सोप्या भाषेत सांगायचं तर बाऊंड्री सेट कराव्या लागतात. 
आपण सुद्धा आदराला पात्र आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. 
तुम्ही आणि तुमचा आयुष्य या दोन्ही गोष्टी मौल्यवान आहेत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
१/८
 


मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

cup of tea... आणि आपण... १३.८.२०२४

This is not my cup of tea... असं आपण बऱ्याचदा बोलताना म्हणत असतो. पण हीच गोष्ट उलट सुद्धा असते म्हणजे you can't be everyone's cup of tea... याचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडाल किंवा तुमची बाजू समजेल किंवा हे तसा प्रयत्न करतील असं नाही. आणि असं झालं नाही तरीसुद्धा तुम्ही आणि तुमची सिच्युएशन अतिशय नॉर्मल आहात. 
तुम्ही सांगितलेला एखादा विनोद प्रत्येकाला हसवू शकेल असं नसतं...
तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांना असेलच असंही नसतं...
एखाद्या गोष्टीबद्दल तुमची प्रतिक्रिया समोरच्याला पटेलच असंही नसतं... आणि तरीही सगळं व्यवस्थित असतं. कारण यामध्ये चुकीचं काहीच नाही. 
आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतरांना खुश करण्याची सवय असते किंवा इतरांनी आपली मर्जी राखावी अशी अपेक्षा असते. पण हे सगळं करताना आपण विसरतो की आपण प्रत्येक जण एक वेगळी व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकासाठी सौंदर्य आणि नॉर्मल असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.  

मग एखाद्याला आपण नाही आवडलो तर काय फरक पडतो?? त्यांना दुसरं कोणीतरी आवडत असतं. 
जर एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडली तर काय फरक पडतो?? आपल्याला दुसरं कोणीतरी आवडतं. 

आपल्या आजूबाजूच्या किती लोकांना आपण आवडतो यावर बऱ्याचदा आपण स्वतःची किंमत आणि त्या माणसाची आपल्या आयुष्यातील जागा ठरवत असतो. जे की चुकीचं आहे. 

हल्ली बऱ्याचदा एक गोष्ट खूप सातत्याने आढळून येते ती म्हणजे सोशल मीडियावर जर आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत तरच आपलं नातं चांगलं आहे. मग तो मला सोशल मीडियावर लाईक फॉलो करतो म्हणून मी पण प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्याशी नीट वागणार. आणि एखादा असं करत नाही म्हणून मग मी त्याच्याशी चांगलं वागणार नाही. 

पूर्वपार जी गोष्ट आपण ऐकत आलो आहोत तीच इथेही महत्त्वाची ठरते ती म्हणजे गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र.... 
बाकी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याबद्दल किंवा आपल्याविषयी काहीना काहीतरी खटकत असतंच. सेम गोष्ट आपल्यालाही इतरांबद्दल वाटत असते. कधी आपण ती बोलून दाखवतो कधी ती आपल्याला इतरांच्या कृती मधून आपल्याबद्दल दिसून येते. 
पण कुणी कसंही वागलं किंवा तसा अविर्भाव जरी आणला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इतरांच्या वागण्याने बोलण्याने आपली किंमत ठरत नाही. 

आपली किंमत आपण स्वतः ठरवायची आणि ती जपायची सुद्धा... यासाठी सुद्धा बरेच उपाय आहेत बरं का...

बाकी?? बाकी भेटू लवकरच..... असंच काहीसं सोबत घेऊन....

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
१३ ऑगस्ट २०२४