रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 4

#स्वतःसाठी_बदलताना_भाग४ (गौरीहर्षल)

कुठलेही नवीन काम सुरू करण्यासाठी आधी रिस्क घ्यावी लागते तरच आयुष्यात हवे ते बदल घडू शकतात. 
रिस्क घ्यायची तयारी नसेल तर जे जसे सुरू आहे ते तसेच स्विकारण्याची तयारी ठेवावी. 
यश मिळण्याआधी कित्येकदा अपयशाची चव चाखावी लागते. 
कोणतीही चांगली गोष्ट सहजपणे घडत नाही. 
TᗩKIᑎᘜ ᑎO ᖇIՏK, IՏ Tᕼᗴ ᗷIᘜᘜᗴՏT ᖇIՏK Iᑎ ᒪIᖴᗴ. 
𝐓𝐡𝐞 𝐜𝐡𝐨𝐢𝐜𝐞 𝐢𝐬 𝐲𝐨𝐮𝐫𝐬! 
𝐍𝐨𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐠𝐨𝐨𝐝 𝐞𝐯𝐞𝐫 𝐜𝐨𝐦𝐞𝐬 𝐰𝐢𝐭𝐡𝐨𝐮𝐭 𝐚 𝐥𝐢𝐭𝐭𝐥𝐞 𝐫𝐢𝐬𝐤!

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 3

#स्वतःसाठी_बदलताना_भाग३ (गौरीहर्षल)

आपण बोलताना नेहमी म्हणतो की, त्यांनी असं करायला हवं होतं, त्यांनी असं बोलायला हवं होतं. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच असते आपण कोणत्या परिस्थितीत काय वागत, बोलत आहोत ह्याचे पूर्ण भान प्रत्येकाला असते. जर एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलत नाही किंवा करत नाही म्हणजेच तिला ती गोष्ट करण्याची इच्छा नाही. 
अशा वेळी आपण आपल्याला हवे ते करावे अन् लोकांना काय हवे ते करू दयावे. कारण कितीही प्रयत्न केला तरी आपण लोकांचं वागणं नाही बदलू शकत. 
𝑺𝒕𝒐𝒑 𝒘𝒂𝒊𝒕𝒊𝒏𝒈 𝒂𝒏𝒅 𝒇𝒊𝒈𝒉𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒐𝒓 𝒑𝒆𝒐𝒑𝒍𝒆 𝒘𝒉𝒐 𝒘𝒐𝒖𝒍𝒅 𝒏𝒐𝒕 𝒄𝒓𝒐𝒔𝒔 𝒂 𝒑𝒖𝒅𝒅𝒍𝒆 𝒇𝒐𝒓 𝒚𝒐𝒖. 
𝑳𝒆𝒕 𝒕𝒉𝒆𝒎 𝒈𝒐. 𝑴𝒐𝒗𝒆 𝒐𝒏. 𝑫𝒐 𝒃𝒆𝒕𝒕𝒆𝒓. 
𝖨𝖿 𝗍𝗁𝖾𝗒 𝗋𝖾𝖺𝗅𝗅𝗒 𝗐𝖺𝗇𝗍𝖾𝖽 𝗍𝗈, 𝗍𝗁𝖾𝗒 𝗐𝗈𝗎𝗅𝖽.



बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 2

#स्वतःसाठी_बदलताना_भाग२ (गौरीहर्षल)

एखादे ध्येय गाठण्यासाठी १००वेळा मार्ग बदलावा लागत असेल तर तो नक्कीच बदलावा. 
पण जर ते ध्येय गाठताना घ्यावे लागणारे श्रम तुम्हाला आनंद देत नसतील तर त्यामागे धावण्यात काही अर्थ नाही. 
लोकांना वाटेल की तुम्ही हरलात, पण जी गोष्ट करताना आपल्याला शरीरासोबतच मनाचेही स्वास्थ्य पणाला लावावे लागत असेल अशी गोष्ट न केलेली कधीही योग्यच. 
म्हणून तर,
𝙳𝚘𝚗'𝚝 𝚚𝚞𝚒𝚝 𝚋𝚎𝚌𝚊𝚞𝚜𝚎 𝚒𝚝 𝚒𝚜 𝚑𝚊𝚛𝚍. 
𝚀𝚞𝚒𝚝 𝚘𝚗𝚕𝚢 𝚠𝚑𝚎𝚗 𝚒𝚝 𝚒𝚜𝚗'𝚝 
𝚠𝚘𝚛𝚔𝚒𝚗𝚐 𝚏𝚘𝚛 𝚢𝚘𝚞.

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 1

#स्वतःसाठी_बदलताना_भाग१   (गौरीहर्षल)

 

आपण नेहमी आपल्या सुखी, आनंदी असण्याचा संबंध एखाद्या गोष्टीशी किंवा व्यक्तीशी जोडतो. अन् ते मिळवण्यासाठी जीव तोडून आटापिटा करत राहतो. 

जोपर्यंत आपलं सुख आपला आनंद हा फक्त आपल्या हातात आहे हे आपल्याला समजणार नाही तोपर्यंत समोर असलेलं सुखही दिसणार नाही. 

म्हणून तर,

H͎a͎p͎p͎i͎n͎e͎s͎s͎ i͎s͎ r͎i͎g͎h͎t͎ h͎e͎r͎e͎, r͎i͎g͎h͎t͎ n͎o͎w͎! 


बुधवार, ५ जुलै, २०२३

do something for yourself - 4/365 days of self care

नुकत्याच जॉईन केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नोटिफिकेशन येऊन पडली होती. नोटिफिकेशन होती उद्यापासून चालू होणाऱ्या एका ऑनलाईन क्लासची. मुग्धाने नोटिफिकेशन बघताच एक सुस्कारा सोडला. 
क्लास काही फार अवघड अशा विषयांचा नव्हता.पण गेले काही दिवस मुग्धाच्या मनात बऱ्याच गोष्टी घोळत होत्या. त्या गोष्टींवर विचार करत असताना अचानक तिला इंस्टाग्राम वरती या क्लासची जाहिरात दिसली होती. 
आणि सहज करून बघू म्हणून तिने नवऱ्याच्या कानावर ती गोष्ट घातली. 
कोरोना नंतर पहिल्यांदा मुग्धाने नवीन काहीतरी शिकण्याचा विषय काढला होता. त्यामुळे नवरा अर्थातच मनापासून तयार झाला. कारण कोरोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर मुग्धाचं कारणाशिवाय घराबाहेर पडणं टाळणं सुरू झालं होतं.
 मुलं आणि नवरा या तिघांनाही तिच्या खूप मागे लागावं लागत होतं तेव्हा कुठेही तयार व्हायची.
निदान मागच्या महिन्यापासून नवऱ्याने स्वतःहून जवळच्या लायब्ररीत नाव नोंदवत तिला पुस्तक आणून द्यायला सुरुवात केली होती. पुस्तकांमुळे ती पुन्हा थोडी थोडी माणसात येऊ लागली होती.
आता तर काय रोज दोन तास ऑनलाइन क्लास म्हणजे त्यानिमित्ताने तिला नवीन कोणीतरी भेटेल. आणि ती आपसूकच पहिल्यासारखी घराबाहेर पडायला आनंदाने तयार होईल. मुग्धाच्या नवऱ्याचा केलेला हा विचार किती योग्य  ठरणार होता हे लवकरच कळणार होते. 
दुसऱ्या दिवशी क्लासची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मुग्धाच्या मनात धडधड वाढली. दुसरीकडे मुलांनी मात्र बाबाच्या मदतीने आईसाठी बेडरूमच्याच कोपऱ्यात टेबल सेट केलं होतं. 
हेडफोन, पेन, डायरी सगळी तयारी झाली होती. 
मुग्धाने आजचा पहिला दिवस कसाबसा पूर्ण केला. पण उद्यासाठी मात्र क्लासच्या मॅडमनी अभ्यास सांगितला होता. आणि तो होता स्वतःची ओळख करून देण्याचा. 
स्वतःची ओळख... दिवसभर मुग्धा विचार करत होती. काय आहे माझी ओळख... मुग्धा काळे की स्नेहा नाईक (लग्नानंतरचे नाव) ? 
पण हे फक्त नाव आहे जे मला आईवडील आणि नंतर सासरच्या लोकांनी दिले आहे. 
मग नावा शिवाय माझी ओळख काय आहे? अर्पित, अंकुश ची आई की रजत ची बायको? की कुणाची सून ? मुलगी ? बहिण ? 
ही तर नाती आहेत. आणि ह्या प्रत्येक नात्यामध्ये माझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मला ते आवडतं. 
पण हे सुध्दा खरं आहे की गेले कित्येक दिवस कुणी मला नावाने हाक मारली नाहीये. की कुठलही संबोधन वापरून हाक मारली आहे. कारण कुणाशीच माझा संपर्कच राहिला नाही. 
किती गृहीत धरलं आहे मी स्वतःलाच? 
ह्या आणि अशाच विचारत मुग्धाचा दिवस संपला. 

संध्याकाळी क्लासची वेळ झाली. आज मुग्धा स्वतःहून सगळी तयारी करून लिंक वरून जॉईन झाली. 
सुरुवातीलाच मॅडम नी सगळ्यांना कंफर्टेबल करत सांगितलं की प्रत्येक जण जमेल तशी स्वतःची ओळख करून देणार आहे. सो अजिबात दडपण घेऊ नका. 
हळूहळू एकेक जण बोलू लागले. 

आणि आता मुग्धाचा नंबर आला. 
"येस मुग्धा, आता तू तुझी ओळख करून दे.", मॅडमनी स्क्रीन वर दिसणारे नाव उच्चारत तिला विचारले.

ते वाक्य ऐकताच मुग्धाच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने बोलायला सुरुवात केली. 
" मी कोण आहे हे मी सांगते पण सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की आत्ता मी खूप खुश आहे. बऱ्याच महिन्यांनी मी एका सामूहिक उपक्रमात सहभागी झाले आहे, बऱ्याच महिन्यांनी मी माझं नाव ऐकलं आहे. आणि सगळ्यांना बघून मला खूप छान वाटत आहे. आपली तशी काही ओळख नाही पण ही फिलिंग की आपण नव्याने नवीन सोबतीसह काही शिकणार आहोत ही भारी आहे. ....." 
आणि मग मुग्धा भरभरून बोलत गेली. 

स्वतःहून स्वतःसाठी उचललेलं एक पाऊल मुग्धाला एक छान कारण देऊन गेलं होतं. आता पुढचा क्लास उत्साहाने पूर्ण करण्यासाठी कुणीही मागे लागण्याची गरज पडणार नव्हती. 

Caring for your body, mind, and spirit is your greatest and grandest responsibility. It's about listening to the needs of your soul and then honoring them.
~Kristi Ling

स्वतःच्या मनाच्या आणि शरीराच्या गरजा ओळखून त्या मान्य करणे ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असते. कधी कधी एक छोटीशी गोष्ट सुद्धा खूप काही छान घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरते. 
बरोबर ना? 
#do_something_for_yourself
#4/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

शनिवार, १ जुलै, २०२३

नकारात्मक विचार दूर करण्याचे काही उपाय

नकारात्मक विचार दूर करण्याचे काही उपाय 


"मनस्वास्थ्य" हा सध्याच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच महत्वाचा असणारा विषय आहे. 


आपण सगळेच हल्ली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. कारण ती काळाची गरज आहे. पण सोशल मीडियावर समोर येणाऱ्या कितीतरी गोष्टींचा प्रभाव आपल्या मनःस्वास्थ्यावर होत असतो. 


त्यातही सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टींचा होत असेल तर वेगवेगळ्या पोस्ट वाचून मनात सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांचा. 


हे नकारात्मक विचार आपल्या मनावर त्यांचा ठसा खूप खोलवर उमटवत असतात. ज्यामुळे कुठे ना कुठे आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचे पडसाद उमटत राहतात. 


ह्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर नक्कीच करता येते फक्त त्यासाठी काही साध्या सोप्या टीप्स फॉलो कराव्या लागतात. 

कोणत्या ? त्यावर आपण चर्चा करू. 


1. स्टॉप अँड पॉज मेथड


ज्या ज्या वेळी आपल्याला अस वाटतं की आपण नको त्या विचारांवर जास्त रेंगाळत आहोत. त्या वेळी स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात स्टॉप असं सांगावं. 

यामुळे काय होतं? 

विचारांची जी मालिका सुरू असते तिच्यात खंड पडतो. 

आणि पुढे लगेच पॉज ही सूचना आपल्याला आपल्या विचारांना दुसऱ्या दिशेने वळवण्यासाठी उपयोगी पडते. 


2. डिलीट बटण दाबा आणि नकारात्मक विचार दूर करा. 


अंधार असलेल्या खोलीत जसे आपण बटण दाबले की दिवा उजळून प्रकाश पसरतो. तसच एक डिलीट बटण आपल्याला आपल्या मनात तयार करायचे आहे. 

ज्या क्षणी नकारात्मक विचार मनात डोकं वर काढत आहे असं आपल्याला जाणवतं. त्या क्षणी डोळे मिटून त्या विचाराला डिलीट करणारे बटण आपल्या मनात आहे अशी कल्पना करायची. 

आणि ठामपणे ते बटण दाबून त्या विचाराला आपल्या मनातून डिलीट करून टाकायचं. 

आणि त्या रिकाम्या झालेल्या जागेला एका नवीन चांगल्या विचाराने भरून टाका. 


3. लिहून मोकळे व्हा. 


जेंव्हा जेंव्हा नकारात्मक भावना अनावर होतात, अशा वेळी त्या कागदावर लिहून काढा. 

ते लिहीत असताना रडू येत असेल तर रडून मोकळं व्हा. 

पण एकदा लिहून झाल्यानंतर काय करायचं माहीत आहे? 

तो कागद फाडून कचरापेटी मध्ये टाका किंवा टॉयलेट मध्ये फ्लश करून टाका. 

मनावरचं ओझं काही प्रमाणात उतरल्याची जाणीव नक्की होईल. 


4. अनफॉलो अँड स्नुज


ही शेवटची पण सगळ्यात महत्वाची टीप…

सोशल मीडियावर वावरताना जी अकाउंट्स त्यावरच्या पोस्ट बघून तुम्हाला तुमची चिडचिड होते आहे अस वाटत. अशी अकाउंट्स तुम्ही अनफॉलो किंवा स्नूज करू शकता. 


शेवटी अजून एक गोष्ट म्हटली जाते की सोशल मीडियाच्या जगात कुणीही आपलं अपयश शेयर करत नाही. 


त्यामुळे जे चकाकत ते सगळं सोनं नसतं हे लक्षात घेत आपण आपल्या मनाचा तोल जाऊ नये म्हणून काळजी घ्यायची. 


वाचक मित्रमैत्रिणींनो ह्या आहेत अगदी बेसिक लेव्हलच्या टिप्स. पण तुमच्याकडे ह्यापेक्षा वेगळ्या काही टिप्स आहेत तर नक्की शेअर करा. 


स्वतःला शोधताना

गौरी हर्षल 

तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 




गुरुवार, २९ जून, २०२३

नास्तिक

नास्तिक 

"गाडी का थांबवलीस रतन?" लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याच जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं. 

पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे. 

त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत.  आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत. 

स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं. 

वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. 
पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते. 

काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्स मधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्ट्रेचरवर घेत एम्ब्युलन्स मध्ये ठेवलं. शरीर एम्ब्युलन्स मध्ये ठेवताच कोरडेही तिकडे ओढले गेले, कदाचित अजून काही बंधन शिल्लक असावे. 

त्या दोघांकडे त्यांचा जीव वाचावा ह्या आशेने बघणाऱ्या वारकऱ्यांच्याकडे जाता जाता कोरडेंच लक्ष गेलं. आणि त्यांना तो प्रसंग आठवला. 

भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,
वाट हि विरळा दिसे मजला,
लाखो राउळाशी टेकवीला माथा,
देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

गाण्याचे बोल आणि तो आवाज कोरडेंच्या मनात फेर धरून नाचू लागला. अन् ते सगळे चेहरे त्यांना आठवले. 

डॉक्टर कोरडे प्रचंड सुदैवी होते. त्यांच्या घरात एकाच वेळी चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. 

डॉक्टर सोडले तर सगळेजण रूढार्थाने देवभोळे असे होते. 
डॉक्टरांना मात्र ते सगळे  अजिबात आवडत नव्हते. आताही त्यांना तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना गाण्याच्या बोलावर हातात टाळ घेऊन वारकरी वेशात नाचणाऱ्या नातवाकडे कौतुकाने बघताना बघितले होते. 

कोरडें चे आईवडील, बायको आणि  डॉक्टर मुलगा सूनही नातवाला कौतुकाने बघत होते. हे बघून त्यांचं डोकं फिरलं होतं. 

सगळ्यांवर चिडत त्यांनी नातवाच्या हातात असलेली टाळ फेकून दिली होती. कुठल्याही देवावर त्यांना इतका राग का आहे हे खुद्द त्यांनाही कळत नव्हतं. 

डॉक्टर रूढार्थाने जरी स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असले तरी त्यांची त्यांच्या कामावर प्रचंड निष्ठा होती. अडल्या नडल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना वेळ काळ कशाचेही भान उरत नसे. 

आणि त्यांच्या ह्याच गुणाबद्दल घरात आणि आसपासही सगळ्यांना आदर होता. अन् त्यामुळेच त्यांचे आईवडीलही त्यांचा देवावरचा राग सहन करत असत. कारण त्यांना त्या रागाचं मूळ कळलं होतं. 

एखाद्या पेशंटला इच्छा असूनही वाचवता आलं नाही की डॉक्टर हतबल होऊन चिडत असत. प्रॅक्टीसला इतकी वर्ष होऊनही अजूनही त्या गोष्टींचा त्यांच्या मनाला त्रास होत असे. 

सगळ्यात आधी उपचारासाठी दवाखान्यात आणण्याऐवजी देवळात, मशिदीत किंवा इतर कुठेतरी खेटे घालत बसलेल्या नातेवाईकांमुळे पेशंटला योग्य वेळी उपचार न मिळून तो दगावला की डॉक्टरांचा राग देवावर निघत असे. ते म्हणत असत की तुमचा देव ह्या लोकांना दवाखान्यात जा अशी बुद्धी का नाही देत?  मग लोक पेशंटला काही झालं की डॉक्टर वर का चिडतात? देवावर का नाही चिडत? 

आताही हा प्रसंग आठवताना त्यांना राग येत होता. मनातून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. 

पण अचानकच त्यांना आपल्या जवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. त्यांनी मान वळवून बघितलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे प्रेमळ हसत बघत होती. 

आतापर्यंत कोरडेंना आपल्या अवस्थेची जाणीव झाली होती. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला कशी काय बघू शकतेय ह्याच त्यांना आश्चर्य वाटलं. 

त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या व्यक्तीकडे बघितलं. 
त्या व्यक्तीने हसून अगदी मित्रत्वाने बोलायला सुरुवात केली. 

" काय मग डॉक्टर कस वाटतंय? खूप सगळे प्रश्न आहेत न मनात? कळत नाहीये हे सगळं अस अचानक कसं घडलं? मी कोण आहे? तुम्हाला कसा काय बघू शकतो? वगैरे वगैरे...अहं .... असं अजिबात समजू नका की मी तुमची खिल्ली उडवतोय. मी तर तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे. तसा मी सगळ्यांनाच मदत करण्यासाठी येतो पण तुम्ही जरा जास्तच स्पेशल आहात. " 

"कस काय? अहो तुम्ही प्रत्यक्ष देव आहात कित्येक लोकांसाठी. तुम्हाला कितीही चीड आली तरी तुम्ही स्वतः आमचं प्रतिरूप आहात पृथ्वीवर. हो बरोबर ऐकलत... मीच तो ज्याचा तुम्हाला खूप राग येतो. पण मला तुमचा राग त्यामागची भावना कळते , जशी ती तुमच्या आईवडिलांना पण कळली आहे. पण कसं आहे न डॉक्टर प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो. ते कसं घडवायचं हे त्यांचा हातात असतं. आमच्यासारखे तुम्हीही फक्त निमित्तमात्र ठरता. " 

डॉक्टर मन लावून ऐकत होते. 

" आता त्या दिवशीचच उदाहरण घ्या. त्या दिवशी तुमचे दोन पेशंट दगावले. पहिला पेशंट बऱ्याच उंचावरून पडून गेला आणि दुसरा सुद्धा एक्सिडेंट होता. पण त्या मागची गोष्ट तुम्हाला माहित नव्हती डॉक्टर. पहिल्या पेशंट ने आईवडिलांना, बायकोला जीव नकोसा केला होता. तो गेल्यावर तुम्हाला जे वाटलं न की ह्याचं घर उघड्यावर पडेल तस काही होणार नव्हतं. कारण त्याच्यामागे उरलेले ते तिघे आणि अजून दोन निष्पाप जीव रोज अक्षरशः जीव मुठीत धरून जगत होते. त्या जीवांनी भलेही कधीच त्याच्या मृत्यूची कामना केली नसेल पण त्या जीवांना होणारा त्रास नियतीला दिसत होता. त्यामुळेच त्या दिवशी तो दारू पिऊन इकडे तिकडे भरकटत असताना ही गोष्ट घडली आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला. पाच जीवांच्या पुढे त्याला मिळालेली शिक्षा तशी कमीच आहे. पटलं न? " 

डॉक्टरांनी होकारार्थी मान डोलावली. 

"आणि दुसरा? त्याने स्वतःच्या आनंदासाठी बऱ्याच मुलींना फसवले होते. त्यापैकी दोघींनी ट्रकसमोर येऊन जीव दिला होता. त्या बिचाऱ्या अकाली गेल्या. आणि तुम्हाला वाटलं की त्याला नुकतंच नोकरी लागली होती, लग्न ठरलं होतं. पण डॉक्टर त्या मुलीचाही जीव वाचलाच. कारण ह्या मुलाच्या आईवडिलांना फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायची सवयच लागली होती. त्यांनाही शिक्षा होणं गरजेचं होतं. असे कित्येक आईवडील आहेत जे आपल्या अपत्याची मग तो मुलगा असो वा मुलगी चूक लपवतात ,त्यांना पाठीशी घालतात. पण त्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होतो आहे हे त्यांना समजूनही ते दुर्लक्ष करतात. एखाद्या जीवाला हेतुपुरस्सर त्रास देणे मग तो मानसिक असो किंवा शारीरिक हे सगळ्यात मोठं पापच आहे न डॉक्टर? " 

इतका वेळ शांतपणे ऐकणारे डॉक्टर बोलू लागले, " बरोबर आहे तुमचं... मला फक्त नाण्याची एकच बाजू माहीत असायची त्यामुळे मी कित्येकदा तुमच्यावर आगपाखड केली. पण आज कळतंय की जाणारा जाण्यामागे बरीच कारणं असू शकतात. मी चुकलो , रागाच्या भरात खूपच चुकीचा वागलो. आईवडिलांना देवाचं करताना त्रास दिला. तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता. " कोरडेंचे डोळे पाणावले होते. 

" हं शिक्षा तर होणार आहेच तुम्हाला. ",  ते हसत हसत म्हणाले. तस कोरडेना आश्चर्य वाटलं. 

" तुम्हाला परत पृथ्वीवर जायचं आहे, अजून बरच काम शिल्लक आहे. आमची एक छोटी मैत्रीण तुम्ही वाचावं म्हणून आम्हाला साकडं घालत आहे. ", अस म्हणत त्यांनी कोरडेना एक दृश्य दाखवलं. 

त्या दृश्यातले चेहरे ओळखू येताच कोरडेना आठवलं की त्या मुलीच्या आईला त्यांच्याकडे आणलं होतं. आणि तिचं दोन महिन्यांनी ऑपरेशन ठरलं होतं. ती मुलगी देवांना पाण्यात ठेवून डॉक्टर वाचूदे म्हणजे ते माझ्या आईला वाचवतील अस सांगत होती. ते बघून कोरडेना जाणीव झाली की घरातील लोकांपेक्षा जास्त बाहेर लोकांना त्यांची किती गरज आहे. 

आणि ते आठवताच कोरडेना घरच्यांची आठवण झाली. 

"आहेत आहेत ते सगळे इथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत. पण एक वाईट बातमी आहे बुवा तुमच्यासाठी... तुम्हाला बरं वाटलं की बरेच नवस फेडावे लागणार आहेत." अस म्हणत ते हसू लागले. 

"आता तर माझी कुठलेही नवस फेडायची तयारी आहे देवा, तुम्ही फक्त माझं काम माझ्याकडून नीट करून घ्या एवढं एकच मागणं. आणि माझे पाय जमिनीवर राहूदे. " डॉक्टर म्हणाले. 

" तथास्तु" अस कानावर पडत असतानाच कोरडेना वेगाने खेचलं गेल्याची जाणीव झाली. 

मोठयाने श्वास घेत त्यांनी डोळे उघडले तसे आजूबाजूला असलेल्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बघून त्याना आपण परत आपल्या शरीरात आलो आहोत ह्याची जाणीव झाली. 

नर्सने बाहेर जाऊन सांगितलं तसं त्यांच्या कानावर आवाज आला, " देवा, पांडुरंगा वाचवलंस रे बाबा. ", ते ऐकून डॉक्टर कोपऱ्यात उभं राहून त्यांच्याकडे बघत डोळे मिचकवणाऱ्या त्या व्यक्तीला बघून हसले. 

सगळे जण त्या दिशेने बघू लागले तर तिथे भिंतीवर असलेल्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. 

पण तो तिथेच होता सदैव. मनापासून आस्तिक असलेल्या नास्तिकासाठी. 

मंडळी पूजा , कर्मकांड करणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून ते करत असतेच असे नाही तसेच आयुष्यभर मंदिराची पायरीही न चढलेली व्यक्ती नास्तिक असते अस ही नाही. 

माणसाचं कर्म आणि त्यांचे परिणाम , माणसाचं भविष्य घडवत असतात. 

मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. मनाने, विचाराने आणि कर्माने तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असतं. आणि त्यालाही . 

बाकी कर्मसिद्धांत स्पष्ट करतोच. Always and forever. 

#स्वतःला शोधताना 
#गौरीहर्षल