do something for yourself - 4/365 days of self care

नुकत्याच जॉईन केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नोटिफिकेशन येऊन पडली होती. नोटिफिकेशन होती उद्यापासून चालू होणाऱ्या एका ऑनलाईन क्लासची. मुग्धाने नोटिफिकेशन बघताच एक सुस्कारा सोडला. 
क्लास काही फार अवघड अशा विषयांचा नव्हता.पण गेले काही दिवस मुग्धाच्या मनात बऱ्याच गोष्टी घोळत होत्या. त्या गोष्टींवर विचार करत असताना अचानक तिला इंस्टाग्राम वरती या क्लासची जाहिरात दिसली होती. 
आणि सहज करून बघू म्हणून तिने नवऱ्याच्या कानावर ती गोष्ट घातली. 
कोरोना नंतर पहिल्यांदा मुग्धाने नवीन काहीतरी शिकण्याचा विषय काढला होता. त्यामुळे नवरा अर्थातच मनापासून तयार झाला. कारण कोरोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर मुग्धाचं कारणाशिवाय घराबाहेर पडणं टाळणं सुरू झालं होतं.
 मुलं आणि नवरा या तिघांनाही तिच्या खूप मागे लागावं लागत होतं तेव्हा कुठेही तयार व्हायची.
निदान मागच्या महिन्यापासून नवऱ्याने स्वतःहून जवळच्या लायब्ररीत नाव नोंदवत तिला पुस्तक आणून द्यायला सुरुवात केली होती. पुस्तकांमुळे ती पुन्हा थोडी थोडी माणसात येऊ लागली होती.
आता तर काय रोज दोन तास ऑनलाइन क्लास म्हणजे त्यानिमित्ताने तिला नवीन कोणीतरी भेटेल. आणि ती आपसूकच पहिल्यासारखी घराबाहेर पडायला आनंदाने तयार होईल. मुग्धाच्या नवऱ्याचा केलेला हा विचार किती योग्य  ठरणार होता हे लवकरच कळणार होते. 
दुसऱ्या दिवशी क्लासची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मुग्धाच्या मनात धडधड वाढली. दुसरीकडे मुलांनी मात्र बाबाच्या मदतीने आईसाठी बेडरूमच्याच कोपऱ्यात टेबल सेट केलं होतं. 
हेडफोन, पेन, डायरी सगळी तयारी झाली होती. 
मुग्धाने आजचा पहिला दिवस कसाबसा पूर्ण केला. पण उद्यासाठी मात्र क्लासच्या मॅडमनी अभ्यास सांगितला होता. आणि तो होता स्वतःची ओळख करून देण्याचा. 
स्वतःची ओळख... दिवसभर मुग्धा विचार करत होती. काय आहे माझी ओळख... मुग्धा काळे की स्नेहा नाईक (लग्नानंतरचे नाव) ? 
पण हे फक्त नाव आहे जे मला आईवडील आणि नंतर सासरच्या लोकांनी दिले आहे. 
मग नावा शिवाय माझी ओळख काय आहे? अर्पित, अंकुश ची आई की रजत ची बायको? की कुणाची सून ? मुलगी ? बहिण ? 
ही तर नाती आहेत. आणि ह्या प्रत्येक नात्यामध्ये माझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मला ते आवडतं. 
पण हे सुध्दा खरं आहे की गेले कित्येक दिवस कुणी मला नावाने हाक मारली नाहीये. की कुठलही संबोधन वापरून हाक मारली आहे. कारण कुणाशीच माझा संपर्कच राहिला नाही. 
किती गृहीत धरलं आहे मी स्वतःलाच? 
ह्या आणि अशाच विचारत मुग्धाचा दिवस संपला. 

संध्याकाळी क्लासची वेळ झाली. आज मुग्धा स्वतःहून सगळी तयारी करून लिंक वरून जॉईन झाली. 
सुरुवातीलाच मॅडम नी सगळ्यांना कंफर्टेबल करत सांगितलं की प्रत्येक जण जमेल तशी स्वतःची ओळख करून देणार आहे. सो अजिबात दडपण घेऊ नका. 
हळूहळू एकेक जण बोलू लागले. 

आणि आता मुग्धाचा नंबर आला. 
"येस मुग्धा, आता तू तुझी ओळख करून दे.", मॅडमनी स्क्रीन वर दिसणारे नाव उच्चारत तिला विचारले.

ते वाक्य ऐकताच मुग्धाच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने बोलायला सुरुवात केली. 
" मी कोण आहे हे मी सांगते पण सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की आत्ता मी खूप खुश आहे. बऱ्याच महिन्यांनी मी एका सामूहिक उपक्रमात सहभागी झाले आहे, बऱ्याच महिन्यांनी मी माझं नाव ऐकलं आहे. आणि सगळ्यांना बघून मला खूप छान वाटत आहे. आपली तशी काही ओळख नाही पण ही फिलिंग की आपण नव्याने नवीन सोबतीसह काही शिकणार आहोत ही भारी आहे. ....." 
आणि मग मुग्धा भरभरून बोलत गेली. 

स्वतःहून स्वतःसाठी उचललेलं एक पाऊल मुग्धाला एक छान कारण देऊन गेलं होतं. आता पुढचा क्लास उत्साहाने पूर्ण करण्यासाठी कुणीही मागे लागण्याची गरज पडणार नव्हती. 

Caring for your body, mind, and spirit is your greatest and grandest responsibility. It's about listening to the needs of your soul and then honoring them.
~Kristi Ling

स्वतःच्या मनाच्या आणि शरीराच्या गरजा ओळखून त्या मान्य करणे ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असते. कधी कधी एक छोटीशी गोष्ट सुद्धा खूप काही छान घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरते. 
बरोबर ना? 
#do_something_for_yourself
#4/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

टिप्पण्या

खूप छान लेखन. वाचताना स्वतःलाच प्रश्न पडला की कोहं? मी नक्की कोण आहे? जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण आपले अस्तित्वच कित्येकदा विसरून जातो आणि स्वतःच स्वतःला प्रश्न विचारतो कोहं?

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी