प्लेलिस्ट भाग 1 - गौरी हर्षल

प्लेलिस्ट भाग 1 


छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से

सारी वादी भर गयी

ना जाने क्यों, दिल भर गया

ना जाने क्यों, आँख भर गयी


कानात हेडफोन आणि बसच्या खिडकीमधून बाहेर

दूर कुठेतरी नभापलीकडे रेंगाळलेली नजर...

ती तिच्याच विश्वात दंग...


काय विचार करत असेल ती? 

ह्या विचारात संपणारा बाकीच्या प्रवाशांचा रोजचा प्रवास...


मुळात ती अशीच होती आपल्यात रमलेली. 

जगाचं भान राखाव अस काही नव्हतच जगाकडे ...


स्वतःशीच संवाद साधत ती तो प्रवास 

भरभरून एन्जॉय करत राहायची. 

इतर कुणी आपल्याला बघत आहे, 

हे तिच्या खिजगणतीतही नसायचं. 


ती आपली तिच्या वेगाने तिचं घर ते क्लिनिक,

अन् क्लिनिक ते घर हा प्रवास तिच्या प्लेलिस्ट सोबत करायची. 


रोज वेगळी प्लेलिस्ट रोजच्या मुडशी जोडलेली. 


आज तर प्लेलिस्ट मधले आवडते सोबती बरोबर होते म्हणजे कारण ही खास होतं. 

छोटी सी कहानी से... पासून सुरू झालेली प्लेलिस्ट विचारांच्या सोबत वाऱ्याशी गप्पा मारत होती. 


नकळतच ओल्या होणाऱ्या डोळ्यांच्या कडांवर एखादा चुकार थेंब रेंगाळत होता. त्याला ही तसच स्वीकारत ती ओठांवर मात्र हसू खेळवत होती. 


मनात हळूहळू भूतकाळाच्या तुकड्यातून पझल पूर्ण होत होते. एकेक पीस अलगद आपापल्या जागी येत होता. 


आणि एका क्षणी पझल पूर्ण झालं... तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली जणू काही लहान मुलाला खूप हट्ट केल्यानंतर हवी असलेली गोष्ट मिळालेली आहे. 


तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतका की आसपासच्या लोकांना त्याची जाणीव झाली. 

आणि तोच आनंद वाटत ती आपलं सामान सावरत उठली.  समोरच्या दरवाजाच्या दिशेने निघाली. 

 

गुणगुणत बसमधून उत्साहाने उतरलेल्या तिला बघताना प्रत्येकालाच काहीतरी गवसले. 


छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से

सारी वादी भर गयी

ना जाने क्यों, दिल भर गया

ना जाने क्यों, आँख भर गयी...

तिचे ओठ अजुनही गुणगुणत होते. 


नेहमीची पायवाट सुद्धा आज नकळतच तिला आपली वाटली. 


रोज समोरून येणाऱ्या काकूंना चिडून उत्तर देणारी ती आज स्वतःहून हसतच म्हणाली, "आज मी लवकर आले बर का काकू …", आणि काकुंचे डोळे अजून मोठे होण्याआधी जिन्याने वर सटकली. 


घरासमोर येऊन तिने खिशातून चावी काढली. आणि हसऱ्या चेहऱ्याने घरात पाय टाकला. 


आज किती दिवसांनी असं येणाऱ्या तिला बघून घरानेही हसऱ्या पसाऱ्याने तिचं स्वागत केल. 


फोनवरची प्लेलिस्ट अलेक्साला लावायला सांगत तिने हळूच एकेक गोष्ट जागेवर ठेवायला सुरुवात केली. 


पुढच्या काही मिनिटात घर अगदी व्यवस्थित झालं. हसरा पसारा आता पसारा नव्हता. तर हॅप्पी प्लेस झाला होता. 


कॉफी मग हातात घेऊन तिने तिच्या हॅप्पी प्लेसकडे अभिमानाने बघितलं. 


मघाशी छोटीसी कहानी म्हणणारी प्लेलिस्ट आता… कित्येकदा लूप वर वाजून शेवटाकडे आली होती. 


पण त्या गाण्याने तिला तिच्या मनात सुरू झालेल्या वादळाला शांत करायला मदत केली होती. 



क्रमशः 

गौरी हर्षल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी