कितीदा नव्याने
"कितीदा नव्याने तुला आठवावे,
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे"
गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही.
नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.
ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली.
अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला.
आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.
शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती निघून गेली.
तिच्या वागण्याने गोंधळून गेलेला तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. दोन दिवसानंतर तिच्या मैत्रिणीने एक पत्र आणून त्याला दिले. ती त्या दिवशी भेटली ती परत आलीच नाही.
तिच्या न येण्याने तो पुरता कोलमडून गेला होता. पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त निराशेत, उदास गाणी ऐकण्यात गेले. ते पत्र अजून उघडून बघितलेही नव्हते त्याने.
शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करत त्याने ते पत्र उघडले. त्यात लिहिलेलं वाचल्यावर जे काही घडलं ते कुणालाही अनपेक्षित अस होतं. त्या दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला.
एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस.
आयुष्यात ठरवलेल्या सर्व गोष्टी त्याने प्रचंड कष्ट करून मिळवल्या होत्या. आज जेव्हा त्याला त्यासाठी पुरस्कार मिळत होता तेव्हा तो मात्र त्याच श्रेय तिला देत होता.
ते पत्र त्याने एक क्षणभरही स्वतःपासून दूर केले नव्हते.
त्यांचं एकत्र येणं कधीच शक्य होणार नव्हते पण ते तिने इतक्या छान पद्धतीने सांगितले की त्याला तिला गमावूनही मिळवल्याची जाणीव झाली.
त्या समजूतदार पत्राने त्याला प्रेमाचा नवा मार्ग दाखवत सोबतीची उणीव भरून काढली होती. ती आज नसूनही त्याच्यासोबतच होती.
गौरी हर्षल कुलकर्णी
२७ जुलै २०२०
टिप्पण्या