#याद पिया की आए
संयोगीता जितक्या आर्ततेने सुरांना आळवत होती तेवढ्याच तीव्रतेने अश्रू तिच्या पापण्यांच्या कडांना ओलांडत होते. आज कित्येक दिवसानंतर ती रियाज करत होती. सूर मनासारखा लागलंय हे ओसंडून वाहणारे तिचे डोळेच सांगत होते. शेवटच्या आलाप संपवून तिने डोळे उघडले. नेहमीप्रमाणे गुरूंना मनोमन अभिवादन करत तिने रोजच्या कामांना सुरुवात केली.
संयोगीता वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत होती. तशी तिच्या आईवडिलांची इच्छाच होती. पुढे तिलाही त्यात गोडी वाटू लागल्याने संगीतच तिचा श्वास बनले होते. तिच्या गुरू वंदनाताई सुद्धा तिच्यासारखी शिष्या मिळाल्यामुळे तृप्त झाल्या होत्या. आपल्याकडे असेल नसेल तितकं ज्ञान त्यांनी संयोगीताच्या ओंजळीत टाकलं होतं.
वंदनाताईंच्या घरच्यांनाही संयोगीता आता घरातील एक वाटत होती. ताईंचा मुलगा मार्दव आणि संयोगीता एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पुढे दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला. साखरपुडा झाला आणि मार्दवला कंपनीच्या कामानिमित्त काही महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागलं. रोज तसंही फेसबुक , वॉट्सअप्प होतंच बोलण्यासाठी त्यामुळे फारसा दुरावा जाणवत नव्हता. तो परत येताच लग्नाची तारीख काढायची असं ठरलं. हळूहळू मार्दवच्या येण्याची तारीख जवळ आली. त्याने निघतानाच फेसबुकला स्टेटस अपडेट केलं कमिंग बॅक टू इंडिया. फ्लाईट कनेक्टेड असल्याने त्याला येईपर्यंत सकाळ होणार होती. संयोगीताच्या मनात मात्र उगाच शंकेची पाल चुकचुकली. पहाटेच उठून ती अस्वस्थ मनाने रियाजाला बसली पण आज तिचे सूर का कुणास ठाऊक रुसले होते. इतक्यात तिचा फोन वाजला वंदनाताई बोलत होत्या परतून येत असताना मार्दवचा अपघात झाला होता. क्षणभर संयोगीताच्या नजरेसमोर अंधार पसरला. जेंव्हा ती जागी झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. मार्दव अपघातातून वाचला तर होता पण कोममध्ये गेला होता. आता खरी कसोटी होती. पण वंदनाताईनी संयोगीताला पूर्ण स्वातंत्र्य दिले त्या नात्यातून बाहेर पडण्याचं. संयोगीताने मात्र मार्दवची वाट बघायची असं आधीच ठरवलं होतं. आज ६ महिने झाले होते मार्दवच्या तब्येतीत फरक नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला घरीच लाइफ सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्याला साद घालण्यासाठी म्हणून संयोगीता रोज न चुकता त्याच्या खोलीतच रियाज करत होती. "जौबन बिता जाए रे हाय राम याद पिया की आए......" आज खूप दिवसांनी तिचे सूर मनासारखे लागले होते. तृप्त मनाने ती मार्दवच्या जवळ येऊन बोलत बसणार तोच तिला मार्दवच्या डोळ्यांत हालचाल जाणवली. आणि पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले होते. खऱ्या अर्थाने तिच्या पियाने तिची ती आर्त साद ऐकली होती.
गौरी हर्षल
२३.५.२०१७
मंगळवार, २३ मे, २०१७
याद पिया की आए.......
#गेले द्यायचे राहून........
#गेले द्यायचे राहून
स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
स्वराचा आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता,"गेले द्यायचे राहुनी , तुझे नक्षत्रांचे देणे". खूप छान गायची ती आणि तितकीच छान माणूसही होती. हो , होतीच कारण आता ती या जगात नव्हती. तिचं जाणं अकाली होतं पण ते तिने मात्र हसत हसत स्वीकारलं होतं.
अनय तिचा खूप जवळचा मित्र, जिवापाड प्रेम होतं तिचं त्याच्यावर. पण त्याला मात्र खूप यशस्वी व्हायचं होतं आणि त्या धुंदीत त्याने तिचं प्रेम आणि मैत्री दोन्ही धुडकावली.
आज जेंव्हा ती गेली असं त्याला समजलं तेंव्हा त्याला आपल्या यशातला फोलपणा जाणवला. तिच्या सगळ्या आठवणी फेर धरून त्याच्याभोवती नाचू लागल्या. कारण हे प्रोजेक्ट संपताच तिची माफी मागून तिला लग्नासाठी मागणी घालण्याचा त्याचा विचार होता. पण तिने मात्र त्याला तशी संधीच शिल्लक ठेवली नव्हती.
हरवलेल्या अनयची पावलं नकळत सावलीकडे वळली. सावली अनाथाश्रम इथेच तो आणि स्वरा लहानाचे मोठे झाले आणि इथेच पहिल्यांदा भेटलेही. त्यामुळेच स्वराचं जाणं अनय ला पुन्हा आश्रमात घेऊन आलं. तिथे गेल्यावर त्याच्या कानावर तेच सूर पडले तसा तो धावत धावत त्या दिशेने निघाला. बंद दारामागून येणारे ते सूर आणि तो आवाज ऐकून त्याला वाटलं की स्वराच्या जाण्याची बातमी खोटी आहे. पण दार ढकलताच त्याला जे दिसलं त्यामुळे त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या खोलीत ५ वर्षांची इटूकली नीरा गात होती. नीरा सावली आश्रमात आली तेंव्हा १५ दिवसांची होती तेंव्हाच स्वराने तिची जबाबदारी उचलली होती. अनय मात्र विसरून गेला होता हे सगळं. आत्ता हे सगळं काही सेकंदात त्याच्या डोळ्यासमोरून गेलं , आणि निरु ला कवटाळून त्याने ठरवलं काहीतरी मनाशी.
सावली अनाथाश्रमच्या ऑफिसमध्ये त्याने देशमुख सरांना निरु ला दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि सोबतच कायमस्वरूपी आश्रमाचा जास्तीत जास्त खर्च उचलण्याचं ठरवलं. लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण झाले. आज स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी जे तिला द्यायचं राहून गेलं होतं ते सर्व निरु सोबतच इतर गरजू मुलांनाही देण्याचा निश्चय करत अनयने निरुचं बोट धरून आयुष्याची एक नवी सुरुवात केली.
गौरी हर्षल
२३.५.२०१७
सोमवार, १७ एप्रिल, २०१७
असं जमलं आमचं
#असं जमलं आमचं
पुणे- नाशिक- पुणे
ती आपली टॉमबॉय भरपूर मित्रमैत्रिणी जमवून गोंधळ करणारी, तो मात्र मुलींशी कसं बोलू यात अडकलेला. त्याचे जेंव्हा कांद्यापोह्याचे कार्यक्रम सुरू होते तेव्हा ती मात्र मस्तपैकी कॉलेजमध्ये धिंगाणा करण्यात बिझी होती. अशातच तिच्या चुलत बहिणीला बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि तो मुलीला बघण्यासाठी हिच्या घरी आला. हीच दोघांची पहिली भेट.
त्याला बघितल्यावर तिची रिएक्शन की काय ध्यान आहे आणि त्याची तिच्याबद्दल प्रतिक्रिया किती गबाळी आहे ही😝ही पृथ्वीवर शेवटची मुलगी असेल तरी मी हिच्याशी लग्न नाही करणार( खरतर तो तिच्या बहिणीला बघायला आला होता आणि मनात हे 😝😝). पुढे ते लग्न जमलं नाही पण या दोघांची मात्र मस्त मैत्री झाली. तिचा स्वभाव बडबडा असल्याने तिने त्याला ही बोलण्यास भाग पाडलंच. आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर दोघेही प्रचंड हसत सुटले. एकीकडे तो त्याचं MBA आणि नोकरी ह्यात बिझी होता आणि दुसरीकडे त्याचे कांदेपोहे पण चालूच होते . तिचं तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं आणि सोबत तो मुली बघून आला की त्यावरून त्याला चिडवणे.
तिचं कॉलेज संपलं आणि आता ती नोकरी शोधण्यात बिझी झाली. तसं तिच्या आईबाबांना तो आधीच आवडला होता पण हिला काहीच वाटतं नसल्याने त्यांनी विषय काढला नाही. आणि त्यालाही अजून तशी काही जाणीव झाली नव्हती. बाकी दोघेही सतत फोनवर संपर्कात होतेच हो फक्त फोनवरच कारण तो नाशिकला ती पुण्यात त्यामुळे त्या बहिणीच्या प्रोग्रॅम नंतर भेट अशी होणं शक्यच नव्हतं.
अशाच गप्पा मारण्यात 2 वर्षं कधी निघून गेली दोघांनाही कळालं नाही. त्यात तिचा वाढदिवस आला. आणि तो दुसऱ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी हिलाच टिप्स विचारत होता त्या नादात विसरला. झालं दुसऱ्या दिवशी ती जाम भडकली मग पहिलं वहिलं भांडण झालं.
त्या नंतर त्याला जाणीव झाली की आपण जगभर जिला शोधतोय ती हीच😝😝.
तरीही त्याने मध्ये काही दिवस जाऊ दिले आणि मग शेवटी तिला विचारलं. मॅडम अजूनही लग्न ह्या बाबतीत मंदच होत्या, त्यामुळे त्याला होकार द्यायच्या ऐवजी तू माझ्या आईबाबांना विचार असं सांगून मोकळी झाली. त्याने ही तेच केलं तिला भेटण्यासाठी आणि मागणी घालण्यासाठी तो पुण्यात पोहोचला. आणि मग ३ डिसेंम्बर २०१० ला तिच्या घरच्यांच्या परवानगीने साखरपुडा ठरला. २३ जानेवारी २०११ ला साखरपुडा होता तोपर्यंत त्याच्यासोबत फिरून भेटून तिला आता जाणीव झाली होती की येस he is the right guy. आता मात्र मॅडमला स्वर्ग दोन बोटं उरला होता.
अशी ही टेढी मेढी लव स्टोरी २९ मे २०११ ला नव्या बंधनात अडकली. तिला मात्र त्याला चिडवण्यासाठी आयुष्यभर पुरेल असं कारण मिळालं . हो जी पृथ्वीवर शेवटी उरली तरी तो लग्न करणार नव्हता तीच आता त्याची आयुष्यभराची सोबतीण झाली होती.
अशा या आमच्या खोडकर नात्याला आता ६ वर्ष पूर्ण होतील. पण तो गोडवा ती ओढ आजही कायम आहे आणि राहील. थँक्यू हर्षल for the wonderful relationship of togetherness and love💖💖 And also thanks आपण निवडलेल्या वेगळ्या वाटेवर खंबीर साथ देण्यासाठी.
गौरी हर्षल
२९.५.२०१७
गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७
असाही दोस्ताना
शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६
यु टर्न (भाग 4) ©®गौरीहर्षल (31/12/2016)
शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६
यु टर्न (भाग 3) ©®गौरीहर्षल (31/12/2016)
बुधवार, २८ डिसेंबर, २०१६
यु टर्न (भाग 2) ©®गौरीहर्षल (31/12/2016)
-
गंडांतर वर्ष २०१८ चा जानेवारी महिना, उत्तरायण सुरू झालेले होते. १२ जानेवारी २०१८ ला माझ्या सासूबाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक नि...
-
🎬 थेरपीमध्ये शॉर्टकट नसतो त्या दिवशी रात्री उशिरा मला मेसेज आला की उद्या अर्जंट ऑनलाइनच कौन्सिलिंग सेशन साठी वेळ हवी आहे. वेळ ...
-
How to Deal with Negative People: नकारात्मक लोकांसोबत कसे वागावे? काही लोकांना नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणे आवडत ...
Contact form |
Tags |