कर्मसिद्धांत first draft 16 may 2023
#कर्मसिद्धांत first draft 16 may 2023
आज मुहुर्तच उत्तम होता. सगळे एकाच ठिकाणी उपस्थित होते. आणि समोर होता एक जन समुदाय ज्याने पृथ्वीवर देवांच नाव घेऊन श्रेष्ठत्व स्वतःकडे घेतलं होतं.
पृथ्वीवर त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे आता ते पुढच्या प्रवासात होते. पण इथे आज मात्र ते सगळे एका विशिष्ट हेतूने हजर असण्याच कारण होतं.
बऱ्याच गहन विषयांवर त्यांनी खाली असताना हिरीरीने जी मते मांडली होती आणि लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन समाजात रुजवली होती त्याचीच आज इथे चर्चा सुरू होती.
एकीकडे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपलं मत मांडत होते. तर तिथेच दुसरीकडे थोडसं बाजूला काही लहान मुलं खेळत होती. त्या मुलांना तिथे बघून तसं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं पण कुणाची काही बोलायची हिंमत नव्हती. अन् ती मुले ही त्यांच्या खेळात मग्न होती.
पण काही क्षणानंतर मात्र हळूहळू वातावरण तापू लागले. त्यांच्यापैकी एक गौरवर्णीय व्यक्तीसदृश आकृती तिच्या वागण्याचं समर्थन करीत तिने कसं सगळं योग्य केलं हे सांगू लागली. त्याच गर्दीत काही जण त्याचे पृथ्वीवरील समर्थक ही होते. चर्चा सुरू असल्याने बरोबर ठराविक मुद्द्याला त्यांनाही त्या गोष्टी पुन्हा आठवल्या आणि ते पुन्हा त्याचं समर्थन करू लागले.
समोरच्या उच्चासनावर बसलेल्या सगळ्यांच्या मागे बसून कुणीतरी ही चर्चा अजून तरी शांतपणे ऐकत होते.
पण जसजसं त्या सगळ्यांनी पुन्हा आपल्या खऱ्या वृत्तीत प्रवेश केला....
तसे मागे बसलेल्या त्यांनी आपले डोळे उघडले आणि हलकेच हसत त्या लहान मुलांकडे नजर टाकली. त्यांची तिथे नजर पडताच एक मोठा धुळीचा लोट उठला. सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. आता तिथे फक्त घोंघवणारे धुळीचं वादळ होतं. मघाशी खेळणारी ती लहान मुलं कुठेच नव्हती.
त्या तावातावाने बोलणाऱ्या गौरवर्णीय व्यक्तीवर मात्र या गोष्टीचा काही प्रभाव पडला नव्हता. ती अजूनच त्वेषाने तिचे मुद्दे मांडत होती. हळूहळू ते वादळ एका भोवऱ्यात बदललं आणि त्यातून क्षणभरासाठी एका छोट्याशा मुलीचा हसरा चेहरा डोकावला.
तो चेहरा बघताच गर्दीच्या लक्षात आलं की ती मुलगी इतका वेळ तिथे खेळत होती. वादळ आता गर्दीच्या दिशेने वेगाने सरकत होते. ते जसे गर्दीच्या समोर आले तशी गर्दी दुतर्फा उभी राहिली. गर्दीच्या एका टोकाला वादळ तर दुसऱ्या टोकाला ती व्यक्ती होती.
वादळ पुढे पुढे जात त्या व्यक्तिपासून काही अंतरावर थबकले पण थांबले नक्कीच नाही.
वादळाला जागं केलेल्या त्या व्यक्तीने गालातल्या गालात हसत डोळे मिटून हुंकार भरला. तसं वादळाच्या पायऱ्या करत एक तरुण मुलगी खाली उतरून आली. तिच्या चेहऱ्यावर रागीट भाव होते. तीन पायऱ्या वरच थांबून तिने त्या गौरवर्णीय व्यक्तीवर आपली नजर टाकली. तिची नजर पडताच तो नखशिखांत हादरला. त्याच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती बघताच तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
आणि ती फक्त एकच शब्द बोलली "कर्मसिद्धांत"...
ती पुढे काही बोलणार इतक्यात तिला बोलवणारे ते जागी उठून उभे राहिले.
त्याचं उठून उभे राहणं कुणालाही अपेक्षित नव्हतं त्यामुळे सगळेच उठले.
ज्यांना माहीत होतं ते कोण आहेत आणि ज्यांना त्यांना बघूनच लक्षात आलं होतं की हे कुणीतरी महत्वाचं व्यक्तिमत्व आहे... सगळेच उभे राहिले.
ती मात्र अजूनही रागात धुमसत होती. तिने त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी तिला स्वतःच्या दिशेने येण्याची खूण केली.
ती खूण बघताच क्षणार्धात वादळ हवेत विरले आणि त्या जागी एक तीन- साडेतीन वर्षे वयाची लहान मुलगी होती.
सगळ्यांकडे आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघत ती त्यांच्या दिशेने गेली. आणि त्यांनी पुढे केलेलं बोट हाताने धरून चालू लागली.
जणू काही सगळ्या गोष्टींचा तिच्याशी काही संबंधच नव्हता.
पण इथे त्या गौरवर्णीय व्यक्ती च्या डोळ्यासमोर मात्र काजवे चमकले. त्या मुलीच्या चेहऱ्यात त्याला त्या सगळ्या ओळखी अनोळखी स्त्रियांचे चेहरे दिसले ज्यांना त्याच्यामुळे त्रास झाला होता.
आणि सगळ्यात शेवटी त्याला ती म्हणाली तो शब्द आठवला आणि त्याचं ते अस्तित्वही थरथरले....कर्मसिद्धांत....
कर्मसिद्धांत त्याला कधी ना कधी गाठणार होताच पण इतक्या लवकर ती वेळ येईल याची कल्पना त्याला नक्कीच नव्हती.
#गौरीहर्षल #स्वतःला_शोधताना १६.५.२०२३
ह्याची कथा, दीर्घ कथा काही होईल की नाही माहीत नाही पण एक एपिसोड म्हणून वाचून घ्या. 🙈
टिप्पण्या