गीतसप्तक भाग १

#गीतसप्तक
"हमको मन की शक्ति देना"
आजचं पहिलं गीत आहे "हमको मन की शक्ति देना" . 
शाळेची प्रार्थना होती आमच्या. सुरुवातीला फारसा अर्थही कळत नव्हता. पण आज वळून पाहताना समजतंय की प्रार्थनेतूनही खूप काही शिकवायचं होतं शाळेला.  
"हमको मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें "
दुसऱ्यांच्या आधी स्वतःला एक माणूस म्हणून स्विकारतानाच स्वतःच स्वतःला आदर देणं. जे खूप जास्त गरजेचं आहे पण नकळतच विसरतो आपण . समाजातल्या सो कॉल्ड चौकटीत बसण्यासाठी आपल्यालाच इतकी घाई झालेली असते की स्वतःच्या कितीतरी चांगल्या गोष्टी आपण नाकारत राहतो. मग ते दिसणं असुदे किंवा वागणं. नंतर हळूहळू आपल्या लक्षातही येतं पण कितीजण पुन्हा स्वतःला मनापासून साद घालतात? 
"भेदभाव अपने दिल से, साफ़ कर सकें 
दोस्तों से भूल हो तो, माफ़ कर सकें 
झूठ से बचे रहें, सच का दम भरें "
हल्ली तर ह्या ओळींची ओळख पदोपदी पटते. सगळ्याच क्षेत्रात कळत- नकळत होत असणारे भेदभाव. आपल्या ही वागण्यातून उमटतच असतात. सुशिक्षित असूनही काही चुकीच्या जुन्या आणि नविनही गोष्टी आपण करतो.  जिवलग मित्र, आप्त, नातेवाईक ह्यांच्या चुका तर कुणीच सहजासहजी विसरू शकत नाही त्यावर समर्थनही केलं जातं. हे खरं तर जमायला हवं. जुन्या आठवणी उगाळत बसण्याने जितका त्रास आपल्याला होतो तो दुसऱ्या कुणालाही होत नसतो. म्हणजे ते सगळं विसरून जाऊन एका परीने आपण स्वतःलाच सुखी करणार असतो हो की नाही? 
ह्या कडव्यातली शेवटची ओळ "झूठ से बचे ऱहे, सच का दम भरे" हे तर सगळ्यात अवघड काम झाले आहे हल्ली. त्यात फेसबुक, वॉट्सअप्प तर मदतच करत असतात आपलं खोटं बोललेलं अजून छान पध्दतीने खऱ्या रुपात मांडण्यात. खरं बोलणं, वागणं खरंच इतकं अशक्य झाले आहे का? थोडासा प्रयत्न तर करून बघायलाच हवा. 
"मुश्किलें पड़ें तो हम पे, इतना कर्म कर 
साथ दें तो धर्म का, चलें तो धर्म पर 
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें"
कुठल्याही परिस्थितीत योग्य मार्गावरच चालण्याची आम्हाला ताकद दे आणि स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नको असंच ह्या ओळी सांगतात. पण बऱ्याचदा असं होतं अडचणी आल्या की
आपला सगळ्यात आधी स्वतःवरचा विश्वास उडतो. वस्तुस्थिती ही असते की आपल्याशिवाय आपली 100% मदत करणारं ह्या जगात कुणीही नसतं. आपण जर स्वतःची मदत करण्यासाठी सज्ज झालो तर जगात कुठेही जा कसलाही प्रॉब्लेम येऊदे आपण त्याला खंबीरपणे तोंड देऊ शकतो. 
तात्पर्य काय तर आत्मविश्वास असणारा , इतरांच्याही आधी स्वतःला आदर देणारा असा एक खरा माणूस होण्यासाठी मनाला तयार केले पाहिजे.  एक साधीशी प्रार्थना योग्य वयात कानावर पडत राहिली तर नक्कीच बदल घडवू शकते. 
#गौरीहर्षल   ||शुभं भवतु||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी