एकटेपणा की गोल्डन पिरियड?
एकटेपणा की गोल्डन पिरियड
खूप जण तक्रार करत असतात की तुम्हाला काय कळणार आहे?आम्ही आयुष्यात काय भोगलं आहे?आम्ही किती एकटे आहोत? आमच्या सोबत कसं कोणीच नाही आहे.
अशा सगळ्यांना मला एक सांगावसं वाटतं एकटेपणा....मग तो तुम्ही स्वीकारलेला असू दे किंवा तुमच्यावर लादलेला असू दे. जेव्हा तुम्हाला त्या एकटेपणाचा सदुपयोग कसा करायचा हे कळतं ना तेव्हा तुम्हाला तो एकटेपणा किंवा आपलं कोणीच नाहीये ही भावना कधीच छळत नाही.
आता कुणी म्हणेल की हे कसं काय करायचं आहे?
तुमचा आनंद, तुम्हाला कशात आहे हे माहित असतं ती गोष्ट करण्यासाठी सुरुवात करायची.
सुरुवातीला मन विरोधच करतं. मग टंगळमंगळ करायला सुरुवात करतं. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ती गोष्ट करायला सुरुवात करतात. तेव्हा हळूहळू मनाला सवय लागते ते इकडे तिकडे भटकत नाही. व्यवस्थित लक्ष देऊन काही गोष्टी करायला सुरुवात करत.
आणि मग अशा वेळेला आपल्या लक्षात येतं की अरे इतके दिवस आपण इतरांच्या सहवासासाठी जे गळे काढून रडत होतो, आता त्या गोष्टीवरून आपली जरा सुद्धा चिडचिड होत नाहीये.
माझ्या आयुष्यातही अशा गोष्टी झालेल्या आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात जिथे तुम्हाला कधी ना कधीतरी एकटं राहावं लागतं, एकटं राहण्याची वेळ येते.
अशा वेळेला स्वतःला एकटं फील करून घ्यायचं की त्या मिळालेल्या एकटेपणाचा फायदा करून घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं.
काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की तू ह्या गोष्टीला कसं डिस्क्राइब करतेस?म्हणजे तू सातत्याने सांगत असतेस की मला दत्तगुरूंचा सहवास मिळतो, ते माझ्याशी बोलतात किंवा त्यांच्याकडून मला संकेत मिळतात. तेव्हा मी एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नच बर का ... कारण काय होतं माहितीये का? जी गोष्ट तुम्ही ऑक्सिजन सारखी अनुभवत असता ती गोष्ट शब्दात नाही मांडता येत.
मी दिलेलं उत्तर असं होतं,जसं मी एखाद्या व्यक्तीशी समोर बसून बोलते, एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलते, अगदी त्याच पद्धतीने मी त्यांच अस्तित्व माझ्या आयुष्यात मान्य केलेल आहे. त्यासाठी ते मला दिसलेच पाहिजेत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला त्यांचं अस्तित्व जाणवलंच पाहिजे हा माझा अट्टाहास अजिबात नसतो. दिवसातले 24 तास, आठवड्याचे सातही दिवस, महिन्याचे तीस दिवस ते सातत्याने माझ्या आजूबाजूला आहेत एवढा विश्वास मला त्यांच्याशी नॉन स्टॉप बडबड करण्यासाठी पुरेसा असतो.
पण म्हणून मी सतत बोलत असते का? तर नाही बऱ्याच वेळेला हा संवाद मनातल्या मनात सुरू असतो. काही गोष्टी असतात ज्यांची उत्तरं सातत्याने विचारली जातात. प्रश्न मी विचारत असते, कधी मला उत्तर मिळतं,कधी कधी मिळत नाही.
कधी कधी एक शांतता असते. जी मला कुठेतरी सुरुवातीला खूप जास्त इरिटेट करून जायची. पण हळूहळू लक्षात आलं जेव्हा शांतता असते तेव्हा आपल्याला वेळ दिली जाते आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी की आधी तू अभ्यास कर, तू कष्ट घे, अगदीच तुला उत्तर नाही सापडलं तर मी देतो,मी कुठे पळून चाललोय?
आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक बाबतीत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची सवय नकळत माझ्या मनाला लागली. आज मला जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा नकळत माझ्या तोंडून काही गोष्टी बाहेर पडतात, उत्तर बाहेर पडतात, हे सगळं काही त्यांचं क्रेडिट आहे.
त्यांनी माझ्याकडून माझ्या एकटेपणाला अक्षरशः गोल्डन पिरीयड करत जो काही अभ्यास करून घेतलेला आहे त्याचा मला फायदा होतो.
आता तुम्हीच ठरवा तुम्हाला मिळालेल्या एकट्या वेळेचा तुम्ही गोल्डन पिरियड बनवणार की अजून काही?
5.1.2023
#गुरूवार #संकल्पदिन
बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
टिप्पण्या
माझ्या बाबतीत असंच घडतं होते पण मी स्तोत्र पठण किंवा नामस्मरण नाहीतर पुस्तक वाचन करतो.