प्रीप्लॅन प्रवास

#प्रीप्लॅन_प्रवास 

एका उंच टेकडीच्या टोकावर नेहमीप्रमाणे निसर्गाची कृपा होती. आजूबाजूचा सगळा परिसर सदैव हिरवाईने नटलेला  असायचा. 

ती तिथून जात असताना एकदा तिला तिथे थांबण्याचा योग आला. As I always say , ह्या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट ही pre planned असते. तुमची इच्छा असो किंवा नसो घडणाऱ्या गोष्टी घडतातच. 
तिचंही असंच झालं. मनाविरुद्धच का होईना पण ती गाडीमधून बाहेर पडून एका मोठ्या दगडावर जाऊन बसली. 

काही क्षणातच तिला जाणीव झाली की इथं काही तरी आहे आपल्यासाठी थांबलेलं. तिने पायातील सँडल काढून टाकले आणि पाय वर घेऊन  बिनधास्त मांडी घातली. डोळे आपसूकच मिटले गेले. 

हळुवारपणे एका वेगळ्या विश्वात प्रवेश झाला. प्रचंड प्रसन्न वातावरण, हवेत ऊबदार थंडावा जो सगळ्या गात्रांना हळूहळू रिलॅक्स (शिथिल) करत होता. भान हरपून ती ते अनुभवत होती. 

संवादाची वेळ जवळ आली होती, तसे आपोआपच मनपटलावर शब्द उमटले. 

"हुशार झालीस की तू , हळूहळू का होईना कधी कुठे काय तुझ्यासाठी योजले आहे कळतंय तुला. आता हेच बघ ना, इथून तू कित्येक वेळा ये जा केली आहेस. पण स्वतःहून कधी थांबलीस का? नाही मग शेवटी आज तुला कारण काढून थांबवावं लागलं कारण ही जागा तुझी केव्हाची वाट बघत होती." 

"माझी वाट? का?" ,तिने विचारलं. 

"तुला देण्यासारखं काही तरी आहे न तिच्याकडे, मग ते तुला द्यायला नको? तू काही स्वतःहून कुठली गोष्ट मागत नाहीस ना माणसाला, ना देवाला, ना इतर कुणाला. तुला फक्त देणं ठाऊक. स्वतःचे हात सदैव देण्यासाठी खुले ठेवून इतरांच्या ओंजळी भरण्यात तुला काय मिळतं ते तुलाच माहीत न? " 

"बरोबर आहे, देताना नाही लक्षात येत माझ्या की घेणाऱ्याला पारखून घ्यावं. पण मुळात जी गोष्ट देण्यासाठीच माझ्याकडे आली आहे ती मी ठेऊन घेऊन काय करणार? असही एकदा हातातून जे निसटले ते निसटले, मग तो क्षण असो, प्रसंग असो, माणूस असो किंवा अजून काही. पुन्हा माघारी फिरून बघण्यापेक्षा समोरच्या मोकळ्या झालेल्या वाटेकडे माझं लक्ष जास्त असतं. शेवटी मला जायचं तर तिथेच आहे न जिथे माझं मन घुटमळत आहे ह्या जन्मी आणि आधीच्या कित्येक जन्मांपासून कुणास ठाऊक? "तिने पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. 

"हं, पण तू एक गोष्ट विसरतेस? आपण एक प्रयोग केला होता आठवतोय? तो संपर्क कायमचा तुटला असं सांगितलं होतं? ",त्यांनी आठवण करून दिली. 

"हो, चांगलंच आठवतंय , ते कसं विसरेन मी? जवळची व्यक्ती म्हणून किती आणि काय काय शेयर केलं होतं मी. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझा तुम्हा सर्वांशी संपर्क तुटला आहे, क्षणार्धात त्या व्यक्तीने पलटी मारली. 
किती आणि काय पातळी गाठली होती माझा पाणउतारा करताना. थोडं जरी कळत असतं तिला तर हे पण कळलं असतं ना की मी तुम्हाला सोडू शकते पण तुम्ही कधीच मला सोडणार नाही. 
तेव्हा पासून तर माझ्या व्यक्त होण्यावर फिल्टर लावले आहेत. माझे अनुभव, संवाद, संकेत, आदेश सगळे आता योग्य वेळी व्यक्त होण्याची वाट बघत आपल्या जागी आहेत. त्यात रोज नव्याने भर पडतेय पण काय उपयोग? मी नाही सांगू शकत कुणाला...."तिने तिचा त्रागा व्यक्त केलाच. 

"तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर, माणसाची जात आहे ही खाल्ल्या मिठाला जागत नाही. जो वाचवायला येतो त्याच्यावरच उलटते. बरोबर? म्हणूनच आम्हाला ही असं वाटतं की सध्या तरी आपलं काम जसं आहे तसेच राहूदे. वेळ आली की बघू. तोपर्यंत तू अभ्यास कर माणूस नावाच्या क्लिष्ट विषयाचा....बरं ह्या जागेला तुला जे द्यायचे आहे ते घेऊन जा जाताना आठवणीने.....",असं म्हणत त्या आवाजाने तिला बंद डोळ्यासमोर एक वाट दाखवली आणि ती त्या वाटेवरून चालत निघाली. 

वाटेवरून पुढे आल्यावर तिला जाणवलं की ती  त्याच टेकडीवर आहे पण आता तिथे तिच्या निसटलेल्या आठवणी मूर्त रुपात आहेत. ती आणि तिचं आनंदी जग , जिथे कुठल्या ही वाईट भावनेला थारा नाही. आहे ते फक्त प्रेम फक्त तिच्यासाठी .... असही निसर्ग आणि पशुपक्षी म्हटलं की तिचं जग पूर्णच होत होतं.

 माणसांच्या जगाशी आपलं नातं फक्त कर्तव्यभावनेपुरत ही गोष्ट तिला जेव्हापासून समजली होती तेंव्हापासून तिचं मन फक्त एकच गाणं म्हणायचं,

"जब यार करे परवाह मेरी
मुझे क्या परवाह इस दुनिया की
तू जीत मेरी जग हार मेरी 
मैं हूं ही नहीं इस दुनिया की....
तुम ही दिन चढे 
तुम ही  दिन ढले 
तुम ही हो बंधू 
सखा तुम ही ..."

नकळतच डोळे पाझरत राहिले. उघडले तेव्हा अस्ताला जाणारे भास्करराव तृप्त झालेल्या तिच्या डोक्यावरून आपले हात फिरवत जणू काही सांगत होते. 
"सगळं होईल तुझ्या मनासारखं.... तुझ्या संयमाचा साक्षीदार माझ्याशिवाय दुसरा कोण आहे?"

शेवटी त्यांच्याकडूनच तर शिकली होती ती देत राहूनही काही न मागणं..... 
(२८ जानेवारी २०२२ नवीन वर्षातला पहिला अनुभव )

#स्वतःला_शोधताना
#अनुभवाच्या_पोतडीतून
#मी_आणि_माझे_अध्यात्मिक_अनुभव
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी