Twisted थॉट्स लेख ४ सर्च फॉर द सोल्युशन

#Twisted_थॉट्स लेख ४
सर्च फॉर द सोल्युशन

माणूस हा समाजशील प्राणी आहे हे १००% मान्य आहे मला. पण माझा एक प्रश्न आहे की माणसाला प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी इतरांच्या स्विकृतीची गरज का पडते? 
म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असू तर अशा गोष्टींबद्दल एकवेळ समजू शकेल पण जिथे तुम्हाला स्वतःचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तिथे इतरांच्या होकार नकाराची वाट का बघत बसायची??? 
उदाहरण द्यायचे झाले तर, समजा मला खूप डिप्रेस वाटतंय, घरात कटकट सुरू आहे त्यामुळे मूड खराब झाला आहे किंवा काही करावंसं वाटत नाहीये... मग ह्यातून बाहेर मलाच पडायला हवं ना? 

माझे आईवडील ,भाऊ बहीण ,बायको/ नवरा, प्रियकर/ प्रेयसी, सासुसासरे, मित्रमैत्रिणी काहीतरी करतील मग माझं आयुष्य बदलेल असा विचार का??? 

त्रास कुणाला होतोय तुम्हाला मग इतरांनी काही का करायचं? हा प्रश्न एकदा स्वतःला खडसावून विचारा. 

असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी प्रयत्न करतात. 

उपाय शोधला की नक्की सापडतो. कारण विश्वाचा एक महत्वाचा नियम आहे जिथे प्रश्न आहे तिथेच त्या प्रश्नाचं उत्तर सुध्दा आहे. पण उत्तर सहजपणे मिळालं तर आयुष्य कसं काय पुढे सरकेल? सो उठा , आपल्या वागण्याचं चिंतन करा, वही पेन घ्या, प्रॉब्लेम लिहून काढा, त्यांची वर्गवारी करा, सहजपणे सुटणारे , थोडेसे अवघड , जास्त अवघड अशी किंवा तुम्हाला जशी सुचेल तशी. इथे कसलीही बंधनं नाहीत. 

मग सगळ्यात आधी सोप्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करा. एकावेळी एकच प्रॉब्लेम समोर घ्या. तो सोडवण्यासाठी काय करता येईल हे सुद्धा लिहून काढा. 

कुणाची मदत हवी असेल तर ती न लाजता मागा. मदत मिळाली तर उत्तमच पण जर नाही मिळाली तर इतर मार्ग शोधा. 

लगेचच काही चमत्कार घडणार नाही ह्या गोष्टी हळूहळू घडणार हे स्वतःला स्पष्टपणे सांगा. 

बरं आता हे एवढंच करायचं का? तर नाही ह्या सोबतच स्वतःला सतत चांगल्या मनस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी एखादं आवडीचं काम सुरू करा. काही गोष्टी निसटून गेल्या असतील त्या करायला सुरुवात करा. 

निसर्ग , पशुपक्षी आणि लहान मुले हे निगेटिव्ह गोष्टींपासून दूर जाण्यासाठी खूप प्रभावीपणे मदत करतात आणि ती नकळत अन् निरपेक्षपणे. ह्या तिन्ही घटकांना फक्त निस्वार्थीपणे देणं माहीत असतं. 

ह्यापैकी तुम्हाला ज्याच्यासोबत वेळ घालवायला आवडेल आणि शक्य असेल त्यासोबत आवर्जून वेळ घालवा. 

बऱ्याचदा ह्यांच्यासोबत केले जाणारे निरर्थक वाटणारे संवाद खूप मोठया प्रॉब्लेमची उत्तरं चुटकीसरशी सापडून देतात. ट्राय करा. 


समस्या कधीच मोठी नसते आपण तिला मोठं करत असतो. 

आपल्याच समस्येकडे जर आपल्याला एका परक्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या नजरेने बघता आलं ना तर फार लवकर बदल घडू शकतात. 

लक्षात घ्या इथे आपल्याला इतरांवर नाही स्वतःवर काम करावं लागणार आहे. आणि तुमचं मन, मेंदू इव्हन शरीरसुध्दा ह्या सगळ्या गोष्टींचा कडाडून विरोध करणार आहे. कारण वर्षानुवर्षे त्याला स्पून फिडिंगची सवय लागली आहे. 

कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. कष्टाला पर्याय नसतो. 

वाटेत अनेक अडचणी येतात, प्रलोभने येतात पण जर त्या वेळी तुम्ही स्वतःला समजावू शकलात न की आत्ता हे कष्ट कर, हा त्रास सहन कर तर तुम्हाला हवं ते नक्की मिळतं. 

शेवटी स्वतःच्या पायावर उभे राहून आपण जे काही मिळवतो त्याचा आनंद वेगळाच असतो. तो कुणी आयत्या वाढून आणलेल्या ताटात जेवल्यावर मिळत नाही. 

इथे एक छोटीशी गोष्ट सांगते, माझ्याकडे एक नुकतच लग्न ठरलेली मोठ्या कंपनीत काम करणारी तरुण इंजिनिअर सहज म्हणून आली होती. तिला काही छोट्या छोट्या गोष्टींबद्दल प्रश्न होते आणि त्यावर तिला उत्तरं सापडत नव्हती. सो आमचं सेशन ठरलं होतं. 

ती आल्यावर सगळ्यात आधी मी तिला अभिनंदन म्हणत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावर ती म्हणाली, "मॅम फक्त लग्नच नाही नोकरीच्या आयुष्यासाठीही द्या , येत्या काही महिन्यात प्रमोशन होणार आहे माझं सहा आकडी पगार होईल.रात्र रात्र जागून केलेल्या मेहनतीचं, आणि इच्छा असूनही न करू शकलेल्या कितीतरी गोष्टींचं फळ मिळतंय फायनली. " 

मी - "इंडिड , हे सर्वस्वी तुझं यश आहे आणि यु डिझर्व इट. पण आता नेमकी काय समस्या आहे? " 

ती - "समस्या अशी नाही खरंतर, तुम्हाला हसू येईल सांगितलं तर पण सांगते. लग्न ठरलं आहे , मला जस हवं होतं तस स्थळ आहे . लग्नही आमच्या दोघांच्या भेटीगाठी आणि सगळं चेक केल्यावर होत आहे. तस म्हटलं तर सगळंच जुळून आलंय पण मला न जसजशी पुढचा विचार करते तसतशी एक काळजी वाटते." 

मी -" काय?"

ती - " मॅम आम्हाला न करण्यासारखं काहीच नाहीये लग्नानंतर. म्हणजे त्याच्या आईबाबांकडे गावी त्यांचं मोठं घर आहे. बँकबॅलन्स भरपूर आहे, सो त्यांनी पुण्यात पण दोन सेपरेट घरं घेतली आहेत. एक त्यांच्यासाठी आणि एक आमच्यासाठी. माझ्याकडेही सेम परिस्थिती आहे. गाड्याही सेपरेट आहेत सगळ्यांच्या टूव्हीलर, फोर व्हीलर. आणि आमचे वाढते पगार बघता आम्ही कॅशमध्ये काहीही आणू शकतो." असं म्हणून ती जराशी थांबली 

मी विचारात पडले की हिला नेमका काय प्रॉब्लेम आहे? 

तीच पुढे बोलू लागली. 

ती - " तर सगळंच आहे आमच्याकडे असं म्हणायला हरकत नाही. पण मी जेव्हा माझ्या बरोबर असलेल्या मित्रमैत्रिणीचे संसार बघते न मला त्यांचा हेवा वाटतो. ते कसं पैसे साठवून , खूप ठिकाणी फिरून एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सगळं करतात. आम्हाला करायला असलं काहीच नाही. म्हणजे आम्ही दोघांनी लहानपणापासून हेच बघितलं आहे की आईबाबांकडे सुद्धा सगळं अचानक नाही आलं त्यांनीही असाच कडूगोड आठवणींसोबत संसार केला आहे. पण आम्हाला मात्र सगळं आयतं मिळतंय आणि असं वाटतंय की बस एवढंच होत का आयुष्य? इतकं कमावतो आहोत पण त्याचं काय करायचं? रुटीन लाईफमध्ये जगत जगत मरून जायचं का? " 

मी काही क्षण विचार करत तिला विचारलं, " तू हे त्याच्याशी बोललीस? तो काय म्हणतोय? " 

ती- "तो म्हणाला की त्यानेही ह्यावर विचार केला आहे पण निदान एक दोन वर्षे हे सगळं जगून घेऊ आणि आपल्याला काय करता येईल ते शोधू. मलाही पटलं त्याचं म्हणणं पण आता तुमच्याजवळ बोलून दाखवल तर जास्त मोकळं वाटतंय. " 

पुढेही असच काही बोलणं झालं आणि मग ती निघून गेली. 

त्यानंतर मात्र डायरेक्ट 4 वर्षांनी तिचा मेल आला विथ सम attachment. गावाकडे जमीन घेत त्यांनी काही गोष्टी करायला सुरुवात केली होती. शिवाय त्याने तिला ट्रेकिंगला नेलं होतं. ह्या गोष्टी तिने आधी अनुभवल्याच नव्हत्या. हळूहळू ती सगळ्यात रमत होती. आणि आता तिने शहरातलं आयुष्य सोडून गावी सेटल व्हायचं ठरवलं होतं. कमावलेल्या पैशातून स्वतःसाठी आणि इतरांसाठीही काय काय करता येईल हे ती शोधत होती. 

लवकरच नवीन पाहुणाही येणार होता. नोकरीच्या रॅट रेसमध्ये धावून जे जगणं हरवलं होतं ते तिने शोधलं होतं. 

तिच्या प्रश्नांची उत्तरं तिनेच शोधली होती. आणि फक्त शोधली नव्हती तर ती उत्तर मान्य करून त्यांच्या परिणामाची जबाबदारी घेत नवीन आयुष्याला सुरुवात पण केली होती. 

आता कुणी म्हणेल की हिला सुख टोचत होतं का? तर नाही तिच्यामध्ये काही तरी करण्याची उर्मी होती आणि ती तिला स्वस्थ जग असं सांगत नव्हती. साहजिकच आहे प्रत्येकाला सगळे जगतात तसच जगायला आवडेलच अस नाही. 

अगदी वरच्या उदाहरणापेक्षा उलट प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला झोकून देत कष्ट करून काही तरी बनून दाखवलेली लोकसुद्धा खूप आहेत जगात. 

इथे दोन्ही गोष्टी एकच कॉमन धागा दाखवतात तो म्हणजे स्वतःच्या समस्येवर स्वतः उपाय शोधला पाहिजे. 

नुसतं बघत बसण्यापेक्षा काही तरी करायला सुरुवात करा.आपल्या क्षमतेचा अंदाज घ्या. मार्ग नक्की सापडतो. 

प्रश्नांची उत्तरं, उपाय, मार्ग , संधी हे सगळं तुम्हाला शोधत येतील जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखलं असेल तर....

आता ह्या गोष्टींवर तुम्हीही थोडाफार विचार करा तोपर्यंत मी घेऊन येते पुढचा twisted थॉट् 

19.4.2022
स्वतःला शोधताना
गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...