तुम्ही काय फॉलो करत आहात हल्ली?


#तुम्ही_काय_फॉलो_करत_आहात_हल्ली?©®गौरीहर्षल

आपण आपल्या मनाला, मेंदूला कुठली माहिती पुरवतो ह्यावर आपला दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. कसं ते वाचा ह्या ओळखीच्या गोष्टीत......

मानसी आज जास्तच गडबडीत होती. लॉकडाउन वगैरे मुळे आधीच कामाचा भार वाढला होता आणि त्यात आज तिचं एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. सकाळी लवकर उठून घरातील बाकीची कामं जमेल तेवढी आवरून घेत तिने स्वतःसाठी मस्त आलं घालून चहा केला. चहाचा वाफाळता मग घेऊन ती शांतपणे बाल्कनीत येऊन बसली. तिची बाल्कनी तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर होती. 

सासूबाईंनी कौतुकाने लावलेली चार रोपं, लेकीच्या बालहट्टामुळे टांगलेले बर्डफिडर, आणि तिची आवड म्हणून बसवलेला छोटासा झोपाळा ह्या सगळ्या गोष्टी बाल्कनीला एक जिवंतपणा देत असत. छोट्या छोट्या पक्ष्यांची नाजूक आवाजात सुरू असलेली बडबड मनावर कितीही ताण असला तरी सुखावून जात असे. त्यामुळेच महत्वाच्या कामाच्या दिवशी मानसी ठरवून थोडासा वेळ तरी का होईना बाल्कनीत  फक्त स्वतःसाठी राखून ठेवत होती. 

घरात अजून कुणाला जाग आली नव्हती सो तिला आज सगळं आवरल्या नंतर बराच निवांत वेळ मिळाला होता. तो मी टाईम ती स्वतःसोबत छानपैकी एन्जॉय करत होती. 
अजून काही क्षण असे घालवल्यावर तिने लॅपटॉप घेत प्रेझेंटेशनची सगळी तयारी चेक केली. आणि मग ऑल ओके 👍 असा मेसेज टीमच्या वॉट्सअप्प ग्रुपवर पाठवून दिला. 

तिने सहजच इतर वॉट्सअप्प मेसेज, स्टेटस चेक करायला सुरुवात केली. मेसेज बऱ्यापैकी फॉरवर्डच होते. मग तिने आपला मोर्चा कधी नव्हे ते स्टेटस बघण्याकडे वळवला. कुणी कसल्या शुभेच्छा दिल्या होत्या, कुणी श्रद्धांजली वाहत होत, कुणी प्राण्यांचे व्हिडीओ शेयर केले होते तर कुणी काय. सगळं बघता बघता तिची नजर रश्मीच्या स्टेट्सवर येऊन थांबली. 

रश्मी मानसीची शाळेपासूनची जिवलग मैत्रीण. स्वभावाने अतिशय चंचल पण मनाने खूप चांगली. लग्न झाल्यावरही  दोघींच्या मैत्रीत काही फरक पडला नव्हता ह्याचं कारण होती रश्मी. तिने तिच्या स्वभावाने मानसीच्या सासरीही स्वतःसाठी जागा तयार केली होती. तशा काही दोघी आता सतत भेटत नव्हत्या पण काही नात्यांना सतत भेटण्याची, बोलण्याची गरज नसते ना तसच त्यांचंही नातं होतं. 

पण आज रश्मीचं नकारात्मक आणि डिप्रेशन दाखवणारं स्टेटस बघून का कुणास ठाऊक मानसीला जाणवलं की आपण रश्मीशी बोलायला हवं.
दुपारी ऑफिसच्या कामातून फ्री होताच तिने रश्मीला फोन लावला. पहिल्यांदा तर फोन लागला नाही आणि मग चौथ्यांदा केल्यावर तो उचलला गेला. 

पलीकडून त्रासिक आवाजात रश्मी बोलत होती. 

"हॅलो, बोल ग मनु. ", तिचा असा आळसावलेला, चिडखोर आवाज ऐकून क्षणभर मानसीला वाटलं की आपण चुकून दुसऱ्या कुणाला तरी फोन लावला. पण रश्मीलाच फोन लावला होता. 


"अग काय हे? तू ह्यावेळी झोपली होतीस की काय?", मानसीने विचारलं. 

रश्मी - " नाही ग झोपतेय कसली, आधीच डबल काम करून पिट्टा पडला आहे. इथे पाच मिनिटं निवांत बसायला वेळ मिळत नाही आणि तू म्हण झोपली होतीस का? "

मानसी - " रशु काही बिनसलं आहे का? म्हणजे घरात, आईंसोबत, जिजूंसोबत किंवा कामावर? नाही म्हणजे तू इतकी फ्रस्ट्रेटेड का वाटत आहेस?"

रश्मी - " नाही ग , अस काही नाही. पण सध्या न माझी खूप चिडचिड होतेय. का ते कळत नाहीये. रुटीन तर सगळं तेच आहे पण असं का होतंय काय माहीत?"

मानसी -" हं, मला एक सांग ,हल्ली नवीन काय करते आहेस? म्हणजे लिहिते, वाचते की बघते आहेस?"

रश्मी - "नवीन अरे हो ,तुला सांगायचंच राहील की! ऑफिसमध्ये एका नवीन वेबसिरीजवर चर्चा सुरू होती त्या xyz अँपवर आहे बघ ती abc वेबसिरीज, मग मागचे दहा,बारा दिवस झाले तीच बघते आहे. त्यामुळे दुसरं काही सुचतच नाही ग." 

रश्मीच्या उत्तरावर मानसीला काही तरी सापडल्यासारखं वाटलं. 

मानसी आता रश्मीचं बोलणं ऐकत होती. रश्मी भरभरून त्या वेबसिरीजबद्दल, त्यातल्या गोष्टींबद्दल बोलत होती. रश्मीला पहिल्यापासूनच अशा गोष्टींमध्ये रस होता. पण ती त्या सगळ्यात कधी कधी इतकी गुंगून जात असे की त्या गोष्टींचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरही होतो हे तिच्या लक्षात येत नसे. 


"......तर असं आहे बघ. त्या वेबसिरीजमध्ये त्या माझ्या आवडत्या अभिनेत्रीने डिप्रेस व्यक्तीचा रोल इतका छान केला आहे की आपल्याला सुद्धा ते फील होतं.तू नक्की बघ." आता रश्मीचं बोलून झालं होतं.

"तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? नाही ते फील होणं वगैरे त्या व्यक्तीसाठी त्याच्या कामाची पावती असेलही पण तुझ्यावर त्याचा काय परिणाम होत आहे दिसत नाही का तुला? त्या सगळ्याला तू तुझ्या आयुष्यात का आमंत्रण देत आहेस? तुला आवडतं तू बघ पण आपण काय बघतोय , त्याने आपली मनस्थिती तर बिघडत नाही ना ह्याकडे पण जरा लक्ष दे. तुला आठवतंय मी प्रेग्नंट असताना मला खूप मूड स्विंग व्हायचे तेंव्हा मी डिप्रेस होऊन तुला फोन करायचे तर तू मला काय सांगायचीस? 

तू नेहमी मला फ्रेश वाटेल, आनंदी वाटेल अशा गोष्टी माझ्याशी बोलत होतीस. मला सगळी उत्तम पुस्तक, त्या काळात मनस्थिती छान राहील अशा वेबसिरीज, जुन्या सिरीयल, चित्रपट अगदी शोधून शोधून आणले होतेस. 

आपण त्यानंतरही कितीतरी वेळा उत्तम कलाकृतींचा आस्वाद घेतला. अगदी आपल्या कुटुंबासोबतही. पण इतकं फ्रस्ट्रेशन ,चिडचिड करताना मी तुला कधीच बघितल नव्हतं. 

एकदा नीट समजून घे कधी कधी काही गोष्टी खरोखरच निगेटिव्ह वाईब्ज देत असतात. एखादं पुस्तक, एखादा सिनेमा ,एखादं गाणं किंवा अगदी जाहिरातही आपल्या मनातल्या अशा दुखऱ्या नसेवर बोट ठेवते की आपण चिडचिड करू लागतो. अशा गोष्टींचा आहारी जायचं की आपल्या मनाला, मेंदूला आणि पर्यायाने शरीराला आनंदी, उत्साही , फ्रेश वाटेल अशा गोष्टी पुरवायच्या हे आपण ठरवायचं असतं. 

आपल्याला स्वयंपाक शिकवताना काकू म्हणायची बघ, एखादी स्त्री जेव्हा तिच्या कुटुंबासाठी मन लावून स्वयंपाक करते न तेव्हा ती तिच्या मनातलं प्रेम , माया त्यात ओतत असते. त्यामुळे ते अन्न तिच्या माणसांना समाधान देतं आणि त्यांचा आत्माही तृप्त होतो. म्हणून ....."

".....रागारागात कधीही स्वयंपाक करू नये आपले नकारात्मक विचार आपल्याच माणसांना त्रास देऊ शकतात." हसत हसत रश्मीने मानसीचं वाक्य पूर्ण केलं. 

"पाय कुठे आहेत तुमचे माते!" , असं पुढे म्हणताच मानसी म्हणाली," पाय जागेवरच आहेत , पण तू पाय लाव माझ्या घराला ह्या विकेंडला, मुलांना घेऊन ये आईबाबा आणि नवरा जाणार आहेत एका कामासाठी गावी, मला काही ह्यावेळी जाता येणार नाही. सो, तुम्ही तिघे मायलेकर या आम्हीही तिघे आहोत मस्तपैकी हॅरी पॉटर नाईट करूया. आपल्याला ही ब्रेक मिळेल." 

"डन बॉस, आणि थँक्स मला कळण्याआधीच माझा प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल." असं म्हणत रश्मीने फोन ठेवला. 


मित्रमैत्रिणींनो तुम्हालाही होतं असेलना असं? माध्यम कुठलंही असो जर ते आपल्या मनात निगेटिव्ह विचार निर्माण करून आपली मनस्थिती खराब करत असेल तर त्याचा एक्सेस आपल्यापरीने आपण कंट्रोल करायला हवा. 

बाकी ज्याचा त्याचा प्रश्न. 

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल

तळटीप - कथा कशी वाटतेय ह्यावर चर्चात्मक किंवा तुमच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
लेख वाचुन बरं वाटलं की हल्ली स्त्रियांना स्वतःचं मन मोकळं करायला जागा आहे.
मी स्वतः नुकतीच तरी 10 महिन्यापूर्वी रिटायर झाले. सेकंडरी स्कूलमध्ये टीचर होते. साहजिकच टीन एजर्स शी जास्त सलगी, त्यांचे आयुष्य बघण्यात, त्यांच्याशी गप्पा खूप छान वाटायचं, त्याच बरोबर माझा संसार, मुलं, नवरा, सासरचे ई. जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी केली.
रिटायर झाल्यावर सुरवातीला पेन्शन आणि इतर काही गोष्टीत वेळ गेला. साधारण 3-4 महिन्यात फ्री झाले आणि मग स्वतःचं टाईम टेबल ठरवलं, त्यात अर्थातच व्यायाम आणि मनोरंजन होतं. अर्थातच मोबाईल सगळ्यात जवळचा आणि कायम बरोबर असणारा.
काही नवीन रेसिपीज करुन बघणं, न्यूज बघणं, बागेचे फोटो स्टेटस वर अपलोड करणं ई. बऱ्याच गोष्टी आल्या. बऱ्याच न्यूज अक्षरशः बकवाज असतात, वाचल्यावर वाटतं वेळ वाया गेला.
प्रतीलीपी डाऊन लोड करुन गोष्टी वाचायचा प्रयत्न केला, तर त्यातही दम नाही, 90% गोष्टी गावठी भाषेच्या नावाखाली खंडीभर चुका असलेल्या, शेवटी वाचन बंद केलं.
आत्ताच हा ग्रुप आहे त्यात मजा येते आहे कारण विंडो शॉपिंग भरपूर नवीन गोष्टी बघायला, वाचायला मिळत आहेत.
त्यामुळे सध्या जे 3-4 ग्रुप फॉलो करत आहे त्यात पर्यावरण related गोष्टी आवडतात आणि आपला हा ग्रुप!😊
Swapnali C Jadhav म्हणाले…
Dole ughadnara lekh aahe.
Kadhi kadhi mahit asun suddha aapan asha kahi goshtinchya ahari jato aani swatache nuksan karun gheto
सुप्रिया मते म्हणाले…
खरे आहे. दिवसभर आपण त्याच गोष्टींचा विचार करून थकून जातो. तू दिलेल्या गुरू मंत्रा मुळे माझा दिवस कराग्रे वसते ने सुरू होतो.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी