#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

(सत्य अनुभवावर आधारित ही छोटीशी कथा)

"हुश्श ,आले बाई एकदाची सगळं निस्तारून.", असं म्हणत समिता घरी येऊन सोफ्यावर बसली. 

तिचं हे वाक्य ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि वडिलांच्या कपाळावर एक सूक्ष्म त्रासिक आठी उमटली. 

त्याला कारणही तसंच होतं, समिता वय वर्षे 30 च्या आसपास, लग्न झाल्यावर नको त्या टोकाला जाऊन सासरी भांडण करून कायमची माहेरी आलेली अत्यंत उद्धट, उर्मट मुलगी. कोर्टातली केस अजून मार्गीही लागली नव्हती तोवरच समिताचं उच्शृंखल आणि व्यभिचारी वागणं आईवडिलांच्या समोर आलं. 

त्यांनी तिला समजावण्यासाठी साम, दाम ,दंड ,भेद सगळे मार्ग वापरून बघितले पण परिणाम शून्य. शिक्षण यथातथाच असल्याने अक्कल आणि बाहेरचं जग समजण्याची कुवत जवळपास नव्हतीच. पण आपल्या अशा वागण्याने आपलंच नाव सगळीकडे खराब होणार हेही तिला कळत नव्हतं. असो

तर आत्ता जे निस्तारून आले असं ती म्हणत होती ती गोष्ट होती तिच्या उदरात वाढणारा गर्भ, जो तिच्या नको त्या संबंधांची खूण होता. ही गोष्ट आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांना ब्रह्मांड आठवले होते. बातमी बाहेर पडली तर समिताच्या सासरचे लोक अर्थातच त्या गोष्टीचा फायदा घेणार होते. त्यामुळे शेवटी पुन्हा एकदा आपल्या रागाला आवर घालत वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले. कॉम्प्लिकेशन असल्याने डॉक्टरांनी आधी नकारच दिला पण शेवटी मात्र समिताच्या वडिलांवर दया येऊन त्यांनी प्रोसिजर पूर्ण केली. ओळखीचे डॉक्टर असल्याने गोष्टी गुप्तपणे उरकल्या गेल्या. 

पण ज्या गोष्टींमुळे आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती ती गोष्ट समिताच्या दृष्टीने अतिशय फालतू होती. ना तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होती आणि ना ही इतरांना होणाऱ्या त्रासाची काळजी. इथे एक गोष्ट हीसुद्धा होती ती म्हणजे समिताच्या पोटातील मूल ज्या व्यक्तीचे होते तो त्याच्या संसारात अगदी आनंदात होता आणि ते समिताला माहिती  असूनही तिने नाते इतके पुढे नेले होते. हे सगळं कळल्यानंतर तर आपलंच नाणं खोटं आहे दुसऱ्याला काय बोलणार असं तिच्या आईला तिचे वडील म्हणाले. त्या दोघांची अवस्था खरंच अवघड झाली होती. 

त्यामुळेच घरी आल्यावर जेव्हा ती म्हणाली, आले निस्तारून ,तेव्हा आईवडिलांच्या मनात कु:संतानापेक्षा नि:संतान बरे हा विचार आल्याशिवाय राहिला नाही. 

अशा कितीतरी समिता हल्ली आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात ज्यांना स्वतःच्या चुकीच्या वागण्याची लाज वाटणं तर दूर त्या चुका पुन्हा पुन्हा करायला काही वाटत नाही. 

हल्ली समाजात ही अप्पलपोटी,स्वार्थी प्रवृत्ती वाढण्याची काय कारणे असू शकतात ? तुम्हाला काय वाटतं?

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी