माणसाला बदलाची भीती कायम वाटत असते. कारण कुठलाही बदल घडताना काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात तर काही गोष्टी नव्याने अंगिकाराव्या लागतात. आणि या प्रवासात आपण हमखास मागे सुटलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. बऱ्याचदा त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना आपण काय कमावलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.
Read that again.
दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागल्या आहेत किंवा ज्या आपल्या आयुष्यातून आपोआप वजा झाले आहेत आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. पण तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष आपण आयुष्यात काय मिळवू शकतो किंवा आपल्याला काय मिळायला हवे याकडे नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण काय डिझर्व्ह करतो हेच आपल्याला माहीत नसते.
कधी कधी आपल्या हातात असलेली छोटीशी गोष्ट आपण घट्ट धरून ठेवलेली असते. ती घट्ट धरून ठेवण्यामागे अर्थातच आपल्या मनात गमावण्याची भीती असते. पण त्या भीतीच्या दुसऱ्या टोकाला बऱ्याचदा काहीतरी खूप मोठं आणि आपल्याला अनपेक्षित असणार सुखद सरप्राईज असतं. अर्थात जोपर्यंत ती गोष्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपला तिच्यावर विश्वास बसत नाही हे मात्र नक्की.
पण एक गंमत सांगू का? ही मनात असलेली भीती नकळतच आपल्या मनाचे, हृदयाचे नवीन काहीही स्वीकारण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकते. मग या बंद दरवाजांपर्यंत दुर्दैवाने काहीच पोहोचू शकत नाही.
मग अशा वेळेला काय करायचं? तर काही साध्या सोप्या गोष्टी असतात त्या प्रामाणिकपणे स्वतःला विचारायच्या आणि त्यांची मनाशी संवाद साधल्यानंतर मिळणारी उत्तर स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा.
मी स्वतः वापरते अशा काही छोट्याशा टिप्स -
👉🏼 माझ्यासोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या स्वीकारण्याची संधी मी स्वतःला देते आहे का?
How much am I ALLOWING myself to receive at this moment?
हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर स्वतःचे नीट निरीक्षण करा. आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये काय बदल घडत आहेत ते बारकाईने तपासा.
👉🏼तुम्ही आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात तिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही याचा विचार करा.
👉🏼 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना आपण पुरेसा ऑक्सिजन आत मध्ये घेत आहोत की नाही याकडे लक्ष द्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा.
👉🏼 या अतिशय आपसूक घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपण आवर्जून कधीही यांच्यावर लक्ष केंद्रित करत नाही.
👉🏼हीच गोष्ट आपल्याकडून आपल्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा होते. आपण बऱ्याचदा चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती ह्यांना गृहीत धरत असतो. आणि त्यामुळे आपल्या विचारांचा फोकस हा आपल्याला काय मिळालेलं नाही यावर जास्त असतो.
गोष्टी हातातून निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या हातात असताना कृतज्ञता व्यक्त करणे कधीही चांगलंच असतं. त्यामुळे नकळतच आपण आपल्याकडे येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी वाट करून देत असतो. "आपण जे देतो ते दाम दुपटीने आपल्याकडे परत येतं" हे नेहमी आपण दुसऱ्याच्या बाबतीतच का म्हणतो?? स्वतःसाठी का नाही?? जर आपण आपल्यासाठी चांगले विचार केले, आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर नकळतच आपल्या दिशेने येणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या अनुभवांमध्ये भर पडू शकते.
गरज असते ती फक्त आपल्या दृष्टिकोनाला पुन्हा पुन्हा रिसेट करण्याची... हे काही फार अवघड नसतं. पण ते करण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं हे मात्र नक्की.
शेवटी म्हणतात ना, आपण जर कधी गोष्टी संपवण्याचा विचार करत असो तर एकदा आपण एवढा टप्पा पूर्ण करून इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत याचा सुद्धा विचार करावा. कारण आपण आज जिथे उभे आहोत तिथे येण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागले आहेत. आणि त्या कष्टांचे चीज तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतःसाठी निवडलेल्या मार्गावर सातत्याने चालत राहू.
सो, आजचा हा रिमाइंडर ज्याला तुम्ही affirmation सुद्धा म्हणू शकता, नक्कीच लक्षात ठेवा,
I am always a work in progress. I am never done. I am constantly improving, upgrading, expanding, growing, experimenting, exploring and discovering a better version of myself.
बाकी? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
लेखन - गौरी हर्षल कुलकर्णी
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन )