नकार देण्याची कला भाग 2

#नकार_देण्याची_कला_भाग 2
मागच्या लेखात आपण बघितलं की कोणाला नकार देताना 
 -  आपल्या मनात गिल्ट फिलिंग येते
 - सोबतच आपल्याला बरेच प्रश्न पडलेले असतात
 - आपण स्वतःला बऱ्याचदा या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेतरी मागे टाकत असतो 
- स्वतःला प्रायोरिटी वरती ठेवणं आपल्याला जमत नाही.  
आणि त्याच सोबत काही टर्म्स आणि कंडिशन सुद्धा आपण बघितल्या. 
 तसंच मी एक छोटासा टास्क सुद्धा दिला आहे जो तुम्हाला सात दिवसांमध्ये करायचा आहे.  तुम्ही कधीही करू शकता त्याचं काही आपल्याला बंधन नाहीये.

 तर आता पुढे आपण बघूया की आपण इतरांची मने राखताना स्वतःला कशा पद्धतीने त्रास करून घेत असतो? 
 बऱ्याच जणांना सवय असते ना की स्वतःच्या महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाची काम कुठेतरी बाजूला ठेवायची आणि समोरून कोणी काही काम सांगितलं की आधी त्या व्यक्तीचं काम करून द्यायचं.
 मग भलेही आपल्याला आपल्या कामांमध्ये आपल्या गोष्टींमध्ये उशीर झाला नुकसान झालं तरी चालेल आणि हे कुठेतरी एका भीतीपोटी सुद्धा होतं मनात एक भीती असते की लोक काय म्हणतील मी नकार दिला तर? त्यांना वाईट वाटेल आणि मग ते दुखावले जातील, मग आमचं नातं बिघडेल. 

 असं करताना मग आपण कुठेतरी स्वतःला प्रचंड ताण देत राहतो.  आणि  इतरांची मन राखायच्या प्रोसेस मध्ये कुठेतरी ही गोष्ट लोकांना ही कळून चुकते की ही व्यक्ती स्वतःला त्रास करून घेईल पण आपलं काम अडकू देणार नाही. 
 कदाचित अशा संदर्भातली स्वतःबद्दलची काही मतही तुम्ही ऐकली असतील आणि तुम्हाला त्याबद्दल प्रचंड अभिमानही वाटला असेल. पण त्या अभिमानाची किंमतही तुम्ही तेवढी चुकवलेली असणार बरोबर ना???

हा सगळा अट्टाहास आपण कशासाठी करतो? तर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं,चारचौघांमध्ये आपलं कौतुक व्हावं आणि कुठेतरी आपली जी इमेज आहे ती खूप चांगली व्यक्ती अशी व्हावी पण खरंच असं होतं का? तर याचे उत्तर "नाही" असच आहे. 
कारण एक युनिव्हर्सल नियम आहे तुम्ही कोणासाठी कितीही करा कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार असतेच. 
मग अचानक कधीतरी आपल्याला जाणवत की सगळेजण आपल्याला गृहीत धरत आहेत.  जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपली मनस्थिती, परिस्थिती यांचा जरा सुद्धा विचार न करता स्वतःच्या गरजा आपल्यासमोर मांडतात आणि आपल्याकडून मदतीची अपेक्षा सुद्धा ठेवतात. कोणालाही नकार अपेक्षित नसतो .कित्येकदा तर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच माझी मदत करू शकणार नाही असं म्हणून ते काम करण्यासाठी गळ घातली जाते. मग इथे आपण सुद्धा आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन  समोरच्याच मन राखण्यासाठी ते काम करतो. परिणामी आपण पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन मध्ये असतो. 
या सगळ्या प्रोसेस मध्ये आपलं नुकसान तर होतच असतं पण स्वतःची काम स्वतःच्या गोष्टी वेळेवर न करता आल्यामुळे कुठेतरी आपण स्वतःला दोष देऊ लागतो. कारण आपली परिस्थिती कळतंय पण वळत नाही अशी असते.

 कधी कधी काही नाती खूप जवळची असतात आणि मग त्यांच्यासाठी मी हे केलंच पाहिजे अन् मीच हे केलं पाहिजे अशी भावना आपल्या मनात असते. किंवा भावना म्हणण्यापेक्षा असा पगडा आपल्या मनावरती असतो.आणि त्याच्या ओझ्याखाली आपण सातत्याने त्या गोष्टी करत जातो. मग इथे कोणी म्हणेल की सरसकट सगळ्यांना नकार द्यायचा का? तर मुळात आपण इथे सगळ्यांना नकारच द्यायचा किंवा वाटेलाच लावायचं असं नाही म्हणत आहोत.

 इथे आपल्याला आपल्या गरजा ओळखणे, त्या योग्य शब्दात मांडणं, त्यांची प्राथमिकता स्वीकारणं ह्या गोष्टी शिकायच्या आहेत .

तुम्ही इतरांना मदत करू नका असा त्याचा अर्थ होत नाही इतरांना मदत करण्याच्या आधी तुम्ही स्वतःच्या गोष्टी पूर्ण करा, स्वतःच्या गोष्टींना अग्रक्रम द्या जेणेकरून तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटणार नाही.  आपल्याला कुठल्या क्षणी कशाची गरज आहे हे ओळखून ते योग्य शब्दात ठामपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असतं. 

 उदाहरण द्यायचं झालं तर, आपली बाजू ठामपणे आत्मविश्वासाने मांडू न शकणाऱ्या व्यक्तीला बऱ्याचदा अचानक बोलल्यानंतर ही गोष्ट ऐकायला मिळते. 

एक छोटसं उदाहरण देते समजा मीना नावाची एक स्त्री आहे तिने तिच्या सासू-सासर्‍यांना किंवा आई-वडिलांना एका विशिष्ट कामासाठी नकार देताना सांगितलं की,"या वेळेस मला तुमची मदत करणे शक्य नाहीये तर तुम्ही मिताची मदत घ्या." 
 इथे मीनाला समोरून जे उत्तर मिळालं ते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल,"मीता कशी काय आमची मदत करेल? तुला माहित आहे ना तिला काहीही सांगायला गेलं की ती प्रचंड चिडचिड करते, राग राग करते, भांडण करते. आमचं तिच्यासमोर काहीही चालत नाही. तू समजून घे ना. तू समजूतदार आहेस ना!!!"
आणि मग हे उत्तर ऐकल्या नंतर अर्थातच मीना मनाविरुद्ध ते काम करते. पण कुठेतरी तिच्या मनात आपण स्वतःसाठी उभे राहू शकलो नाही,ठामपणे स्वतःला होणारा त्रास मांडू शकलो नाही याबद्दल विचार चालू होतात. सोबतच बऱ्याचदा समोरची व्यक्ती तिच्या स्वभावातील आक्रमकता दाखवून सगळ्या गोष्टींमधून अंग काढून घेते हे लक्षात आल्यामुळे चिडचिड होऊ लागते. कारण इथे या उदाहरणात मीनाला माहीत असतं की तिने कितीही प्रामाणिकपणे ते काम केलं तरीही त्याच्यात चुका काढल्या जाणार आहेतच. 
त्यामुळे तिला ते काम केल्याच समाधानही मिळणार नसतं. त्याउलट समोरची व्यक्ती मात्र काहीही न करता आपल्या निवडीच आयुष्य जगत असते. 

"इथे आपण दोन गोष्टी बघत आहोत एक ठामपणे आत्मविश्वासाने स्वतःची बाजू मांडणे आणि दुसरी आक्रमकतेने स्वतःची बाजू समोरच्याच्या गळी उतरवणे."

दुसऱ्या बाबतीमध्ये अर्थातच वरवर जरी कितीही चांगल्या गोष्टी दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशा नसतात.त्यामुळे आपल्याला नकार देणं शिकताना सगळ्यात आधी आपली बाजू मांडायला शिकायचं आहे. 

मग जर इथे कोणाला वाटत असेल की प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण द्यायचं का? तर नाही जिथे ज्या ठिकाणी गरज आहे (हे तुम्ही स्वनिरीक्षणाने ओळखायचं) तिथे आणि फक्त तिथेच आपली बाजू मांडायची------ स्पष्टीकरण द्यायचं असं मी म्हणत नाही. 

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण स्वतःसाठी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींकडूनच सगळ्यात जास्त विरोध होतो. 
आपल्याकडून तर विरोध होतोच त्याबद्दल आपण आधीच्या लेखात बोललो आहोत. पण जेव्हा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींकडून विरोध होतो. तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास व्हायला सुरुवात होते. 

कधीकधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या वाट्याचा वाईटपणा स्वतःकडे घेतो. पण असं करताना आपण हे विसरतो की आपण जरी त्यांच्यावरच्या प्रेमापोटी त्या गोष्टी करत असलो तरीही इतर लोकांसाठी आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळे आपली केली जाणारी कृती हे आपल्याशी जोडली जाणार आहे. आपण कुणासाठी केली आहे त्याच्याशी नाही.

उदाहरणार्थ , मीना आणि तिच्या नवऱ्याचं कुठेतरी जायचं ठरलेल आहे. कुठलं तरी फॅमिली फंक्शन आहे. आणि अचानक जाणं कॅन्सल होतं. समोरच्या व्यक्तीला हे कसं कळवायचं ही जबाबदारी नवरा मीनावरती टाकतो कारण त्याला माहीत असतं आपण समोरून जर नकार दिला तर अर्थातच समोरची व्यक्ती दुखावली जाणार आणि त्याचा परिणाम नात्यावरती होणार. मीनाला सुद्धा हे काम करण्याची इच्छा नसते पण दोघांपैकी कोणीतरी तर सांगणं गरजेचं आहे आणि जर नवरा त्या गोष्टीसाठी तयार होत नाहीये तर अर्थातच तिला ती गोष्ट करणे भाग आहे मग अशा वेळेला तिने काय करावे?
एक म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अजिबात खोटं बोलायला जाऊ नये. आपल्याला जरी समोरच्या व्यक्तीला पूर्ण परिस्थिती आहे तशी सांगता येत नसेल, तरीही सौम्य भाषेत ती गोष्ट सांगणं शक्य असतं. 
 उदाहरणार्थ मीना म्हणू शकते की येण्याची खूप इच्छा होती पण अचानक काही महत्त्वाचं काम आल्यामुळे आम्हाला येणं शक्य नाहीये. पण मी लवकरच प्रत्यक्ष येऊन भेटेन किंवा आपण त्यावर बोलू. 
इथे जेव्हा आपण खोटं बोलत नाही तेव्हा आपल्याला नंतरच्या गोष्टींचा विचार करण्याची गरज पडत नाही. 

वाचक मित्र-मैत्रिणींनो नकार मिळणं ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला स्वतःलाही लवकर पचवता येत नाही मग समोरच्याकडून सुद्धा तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे न? 
 
नकार मिळाल्यानंतर सौम्य किंवा तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण त्या प्रतिक्रियांचा आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे आणि असतं. 
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या सगळ्या वागण्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करते. तेव्हा तिला काही गोष्टी स्वीकारायची सुद्धा तयारी ठेवावी लागते . आणि तसं जर जमत नसेल, ते करताना जर अडचणी येत असेल तर अशा ठिकाणी तज्ञांची मदत नक्की घ्यावी. 

तुम्हालाही जर मीनाच्या दोन्ही सिच्युएशनच्या संदर्भात स्वतःची काही मत मांडायची असतील तर नक्की मांडू शकता. 
आत्ता साठी इथेच थांबते लवकरच पुढचा भाग घेऊन येईन. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
क्रमशः 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

टिप्पण्या

सुप्रिया मते म्हणाले…
अगदी मोजक्या शब्दात मांडले आहे की मनाची अवघड परीक्षा कशी पास करता येईल. थँक्स

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी