#कातरवेळ
कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी.
अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे.
#गौरी_हर्षल
३०.६.२०१७
शुक्रवार, ३० जून, २०१७
कातरवेळ
सुगंधित हेतू
#सुगंधित_हेतू
'नीता' जोशींची धाकटी सून तिचं आणि वैभवचं म्हटलं तर लव्ह मॅरेज म्हटलं तर अरेंज. कारण दोघांची जात एकच आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांना ओळखत होते. पण तिच्या थोरल्या जावेला मात्र हे लग्न मान्य नव्हतं. तरीही हसत खेळत एकदाचा नीता आणि वैभवाचा संसार सुरू झाला. मनात कसलीच अढी बाळगण्याची सवय नीताला नव्हती त्यामुळे कुणी काही बोललं तरी ती ते विसरून हसतमुखाने वावरत असे. हळूहळू मात्र सासू, सासरे, दिर, जाऊ, नणंद , नणंदेचा नवरा यांच्यामधली छुपी भांडणं हेवेदावे सतत तिला समजू लागले. घरातल्या घरातच सगळ्यांना एकमेकांशी स्पर्धा करायची होती कुणाला कमवत असलेल्या पैशाच्या जोरावर तर कुणाला घरातील महत्वाचं स्थान हवं म्हणून. वैभव निताचा नवरा मात्र तिच्यासारखाच होता ४ क्षण एकत्र आहोत तर आनंदाने जगू असा विचार करणारा. त्यामुळे आधी कधीच त्याला हे जाणवलं नाही आणि जरी जाणवलं तरी वयाने लहान म्हणून तो मध्ये पडला नाही. नीताला मात्र इतकी चांगली लोकं नको त्या गोष्टीत आयुष्य का वाया घालवत आहेत हेच कळत नव्हतं. ही सतत चालणारी धुसफूस एकदाची संपवून टाकू म्हणून नीताने सगळ्यांना कुलदेवतेच्या दर्शनासोबतच छोटीशी ट्रिप करू असा प्लॅन सांगितला. अनायसे सगळ्यांना सुटी मिळत असल्याने सगळे तयार झाले. होकार मिळताच तिने प्रत्येकाने ठराविक शेअर वाटून घेऊ म्हणजे वाद नको असं म्हणत एक अंदाजपत्रक मांडले ज्यात सगळा खर्च समाविष्ट केला होता. तिची ही कल्पनाही मान्य झाली.
आणि आज माहूरला दर्शन आटोपून मंडळी शेगावला निघाली होती. नेहमीच्या पेक्षा रागरंग जरा वेगळेच दिसत होते जे नीताच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. आताशा तिला लक्षात आलं होतं की या भांडणाच मूळ कारण काय आहे. या पैकी कुणीच कधी दुसर्यासोबत छान असा वेळच नव्हता घालवला त्यामुळे सतत फक्त नात्यातील ताणच वाढत गेला.
रात्री मुलं झोपल्यावर सगळे मोठे एकत्र गप्पा मारत बसले. मग हळूच छोटासा गेम खेळू असं सांगत नीताने सगळ्यांना तयार केले. गेम होती बॉटल स्पिन करण्याची ज्याच्याकडे बाटलीचं तोंड येईल त्याने आपल्या सोबतच्या व्यक्तीबाबत ४ अशा आठवणी सांगायच्या ज्या कुणालाच माहीत नाहीत त्या दोघांशिवाय. टीम अर्थातच नीताने चिट्ठी टाकून केल्या ज्या अगदी तिला हव्या तशा झाल्या ती आणि सासरे, दिर आणि नणंदेचा नवरा, नणंद आणि जाऊ, वैभव आणि त्याची आई. निताचा हेतू लक्षात आल्याने तिचे सासू सासरे मनातून सुखावले होते. गेम जशीजशी पुढे सरकत होती तसतशी सगळ्यांनाच इतकी वर्षे धरून ठेवलेल्या गोष्टींमधून मोकळं करत होती. सुरुवात नणंद आणि जाऊ यांच्यापासून झाली आधी छोटे छोटे प्रसंग दोघीनीही सांगीतले पण नकळतच आपण एकमेकींबद्दल चांगलं कसं काय बोलू शकतो हे प्रश्नही त्यांना पडला होता. मग असच काही त्या दोघींच्या नवरयांबाबतही झालं. हळूहळू मनातल्या सगळ्या शंका फिटत गेल्या आणि एका क्षणी सगळ्यांना जाणवलं की आत्ता जो जगत आहोत ती सुद्धा तर एक महत्वाची आठवण होतेय भविष्यासाठी. समाधानाने नजरेतील पाणी टिपत सगळेच झोपले.
दुसऱ्या दिवशीची सकाळ सगळ्यांसाठीच एक नवीन सुरुवात करणारी ठरली. नेहमी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडणारे आज समोरच्याची काळजी घेण्यासाठी भांडताना बघून नीता आणि वैभव खुश झाले. शेगावला दर्शन,फिरणं सगळं आटोपून मंडळी गाडीत बसली. येताना वाटेवर सगळे फ्रेश होण्यासाठी उतरले नीता आणि तिच्या सासूबाई मात्र गाडीतच होत्या. नीता उतरू लागली तशा त्या तिला थांब म्हणाल्या. ती थांबली आणि त्यांना रडूच कोसळले. नीताला समजेना काय झालं ती काही बोलणार इतक्यात तिचे सासरे मागून म्हणाले, "तिलाही मोकळं होउदे पोरी, इतकी वर्ष तिने सगळ्यांना सांभाळून घेत खूप क्षण एकटीने साठवले. पण तू आलीस आणि इतक्या कमी वेळात ती ज्या गोष्टीसाठी तळमळत होती ती तिला मिळाली. खरं तर आम्ही दोघेही तुझे आभारी आहोत तुझ्यामुळे आमचं गोकुळ पुन्हा फुललं आहे." तेवढ्यात वैभव तिथे आला आणि परिस्थितीची कल्पना येताच तो म्हणाला, "मग बाबा आता तुम्हाला तयारी करावी लागेल या गोकुळात येणाऱ्या नव्या सदस्यासाठी" त्याचं मिस्कील हसू लक्षात येताच सगळे आनंदले. आणि जल्लोषात पुढचा प्रवास सुरु झाला.
मावळतीला जाणारा सूर्य आसमंतात रंगाची उधळण करत होता. पण एक नवाच रंग नीता आणि वैभवसकट सर्वांच्या चेहऱ्यावर होता रंग समाधानाचा. आणि त्या रंगाची उधळण सोबत विश्वास आणि प्रेमाचा सुगंधही घेऊन आली होती.
निताचा #सुगंधित_हेतू सफल होऊन तिला कधीही न संपणारे समाधान देऊन गेला होता.
#गौरी_हर्षल
#३०_६_२०१७
नातं....
ढगांवर घातलेलं चांदण्यांचं पांघरूण काढून घेत रात्र परतीच्या प्रवासाला निघाली. नाजूकपणे पृथ्वीवर उतरणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांना बघून खुदकन स्वतःशीच हसली. नकळतच तिच्या मनात आले की कसं आहे हे पहिला आला की दुसऱ्याला जावेच लागते नं.
तसंच काही नात्यांचंही होतं ना !! काही नाती रोजच्या जगण्यात खूपच सवयीची असतात, तर काही कधी हात सोडून निघून जातात कळतही नाही. एखादं नातं खूप गाजावाजा करत आयुष्यात येतं पण पुढे मात्र कुठल्याही वळणावर ते आपल्याला भेटतच नाही. एखादं नातं मात्र गुपचूप येतं आणि आपल्याला कळूही न देता आयुष्याचा महत्वाचा भाग होतं.
काही नाती स्पीडब्रेकर सारखी असतात आयुष्यात योग्य वेळी येऊन आपल्याला धोक्याची सूचना देणारी. तर काही अडखळणारी कधी नेमकं काय करायचं हेच न समजल्याने आपल्याला सोबत घेऊन धडपडणारी. नाती येताना सोबत खूप काही आणतात चांगलं ते ठेऊन घ्यावं नको ते सोडून द्यावं.
पण नाती कशीही असली तरी आपण ती आपली मानलेली असतात. त्यांच्यासोबत येणारे अनुभव, कडू गोड आठवणी आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. शिकतोच आपण प्रत्येक नात्याकडून काही न काही. फक्त ते शिकलेलं जतन करता आलं पाहिजे.
मनापासून सगळ्याच नात्यांना जमेल तेवढं जपलं पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही पण निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?? जमेल नक्कीच थोडेतरी.
प्रत्येकाला आज एक तरी हसरा, समंजस क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
३०.६ .२०१७
गुरुवार, २९ जून, २०१७
चांगुलपणा एक शाप?
चांगुलपणा एक शाप
टायटल फारच विचित्र आहे ना? पण कुठेतरी ही आजची वस्तुस्थिती आहे का? नुकताच मैत्रिणीसोबत घडलेला किस्सा.
एका बागेत शेजारी शेजारी राहणारी मुलं खेळत होती. तिथेच त्यांच्या भ्रमणध्वनीधारक व्यस्त माताही होत्या. मुलांचं वय असेल 4 ते 6 वर्षे वयोगट. कशावरून तरी मुलांचं भांडण झालं. एकजण रडत आईकडे सॉरी मम्मीकडे आला. भांडणाच कारण होत रडणाऱ्या मुलाकडे असलेलं नवीन खेळणं. बाकीच्यांपैकी कुणीतरी ते मागितलं ह्याने दिलं नाही. मारामारी केली मागणाऱ्याने. जो रडत आला त्याच्या मम्मीचं म्हणणं होतं की तू का मारलं नाहीस उलटून? या प्रसंगात ती जे म्हणाली ते कदाचित योग्य असेलही पण यातून पुढे खरा संवाद सुरू झाला. तो असा की हल्ली मुलांना चांगलं वागायला शिकवून काही उपयोग होत नाही . उलट इतरांवर चिडणे,मारणे , ओरडणे वगैरे शिकवावं लागत तिच्यामते आणि इतरही काही जणींच्या मते. चुकून माझ्या तोडून निघून गेलं की अगं न शिकवता तुमची मुलं चांगलं वागत आहेत तर तुम्हाला का त्रास होतोय??
त्यावर मला मिळालेलं उत्तर असं , तुला काय मिळतंय इथे चांगलं वागून?? तुझी तर सज्जनपणात phd आहेना. तुझ्यासारखा त्रास आमच्या मुलांनी पण सहन करायचा का?
यावरून मला वरचा प्रश्न पडला की हल्ली चांगला स्वभाव असणं, चांगलं वागणं हे शाप ठरतंय का ???
गौरी हर्षल
१२.४.२०१७
मन...
माणसाचं मन किती गोष्टी करत असत ना? रोजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री स्वप्नातही असंख्य विचार धावत असतात. चांगले विचार तसेच वाईटही. हे विचारच आपल्या दिवसाची आणि पर्यायाने आयुष्याची दिशा ठरवत असतात.
आपण स्वतःसोबत इतरांनाही बरंच काही सांगत असतो कधी मनातल्या मनात तर कधी उघडपणे. खरं तर यात चांगल्या गोष्टींपेक्षा वाईटच जास्त असतात असं का? आपल्याला जर स्वतःबद्दल चांगलं घडावं असं वाटत असेल तर इतरांच्या बाबतीतही आपण चांगलाच विचार करायला हवा.
जमत नसेल उघडपणे तर निदान मनातल्या मनात तरी कुणाला दूषणे, शिव्याशाप देऊ नयेत. अवघड आहे पण स्वतःच्याच भविष्याचं नुकसान आपण करून घेत असतो.
तर मग स्वतःसाठी तरी सुरुवात करायलाच हवी ना???
करून बघा कुणालाच न सांगता मनातल्या मनात चांगली सुरुवात खूप काही छान छान घडेल.
एक चांगला विचार की "मी कुणाबद्दल वाईट विचार करणार नाही". फरक नक्कीच पडेल.
सुप्रभात, वाचणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आज एक छोटासा क्षण तरी नक्कीच येईल समाधानाचा,हसरा.
गौरी हर्षल
२९.६.२०१७
बुधवार, २१ जून, २०१७
घर हक्काचं भाग ३
घर हक्काचं
भाग ३
इकडे आदितीचीही गडबड चालू होती निशाला लवकर घरी आणण्यासाठी. पण त्याच बरोबर तिला अजून एका व्यक्तीचं स्वागत वाजतगाजत करण्याची उस्तुकता लागली होती.
अदितीच्या नवऱ्याचा एक जुळा भाऊ होता. अदितीचा नवरा आमोद इंजीनियर त्यामुळे त्याचं शिक्षण लवकर संपून तो सेटलही लवकर झाला होता. पण शिशिर,हो शिशिरच... तोच जो मयुराला कॉन्फरन्समध्ये भेटला. तर त्याला डॉक्टर व्हायचं होत त्यामुळे त्याने घरच्यांना लग्न हा विषय काढण्यासाठी सक्त मनाई केली होती. पण आदितीकडून बर्याचदा मयुराच नाव घेतलं जाऊ लागल मग त्याला कुतूहल वाटलं आणि तो कुणालाही न सांगता एकदा मयुराला तिच्या नकळत पाहून आला. तिचं काम तिचा स्वभाव यामुळे त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागलाच होता. त्यातच मयुरा त्याला कॉन्फरन्समध्ये भेटली मग दोघांची हळूहळू गट्टीही जमली. आपल्याला मयुरा आवडते आहे हे कळल्यावर त्याने हि गोष्ट अदितीच्या कानावर घातली. अदितीला तर काय करावे हेच सुचेना. पण शिशिरने तिला सांगितलं को जोपर्यंत मयुराकडून हवा तसा रिस्पोन्स मिळत नाही तोपर्यत घरात काही सांगायचं नाही.
मयुरा आणि शिशिर कॉन्फरन्सवरून परत आले. बऱ्याच वर्षांनी मयुराने कुणाशी तरी मैत्री केली होती. शिशिर एक माणूस म्हणून चांगला आहेच पण त्याला आपल्या दिसण्याने फरक पडत नाही हे शिशिरच्या तिला अटेन्शन देण्यावरून तिच्या लक्षात आलं होतं. तिने आयुष्यात कधीही हा अनुभव घेतलाच नसल्याने हे नक्की प्रेम आहे कि आणखी काही हे मात्र तिला कळत नव्हत. याच कन्फ्युजन मध्ये असताना तिला अदितीचा मेसेज आला भेटतेस का? म्हणून. मग हा विषय आदितीशिवाय कुणाजवळ बोलणार हे लक्षात येताच तिने हो असा रिप्लाय करत भेटण्याची वेळ आणि जागा ठरवली.
दोघीजणी भेटल्या आदितीलाही मयुराला शिशिरविषयी काय वाटत हे जाणून घ्यायचच होत. तर मयुरानेच विषय काढला आणि तिने भेटल्यादिवसापासूनची स्टोरी सांगितली जी अदितीला आधीपासून माहित होती. पूर्ण कथा ऐकल्यावर अदितीने तिला विचारल कि,“तुला नेमक काय वाटतय?” त्यावर मयुराने पुन्हा एकदातरी शिशिरला भेटून त्याला खरच असं काही वाटत का हे कळायला हवं असं सांगितलं. अदितीने नकळतच सुटकेचा श्वास सोडला.
शिशिर अनेक संस्थांमध्ये स्वतःहून मोफत सेवा करत होता. त्याने त्या अंतर्गतच मयुरा जात असलेल्या संस्थेत भेट दिली आणि तो निशालाही भेटला. निशाला तर काका खूपच आवडल्याने तिने तो निघाल्यावर रडून गोंधळ घातला. हे सगळं बघून मयुरा मनातून नकळतच सुखावली. पण अजूनही तिला अदिती आणि शिशिर एकमेकांना ओळखतात हे माहित नव्हते. एकीकडे निशाची दत्तक प्रोसेस पूर्ण होत आली होती तर दुसरीकडे मयुरा आणि शिशिर एकमेकांमध्ये गुंतले होते. निशा सोबत आता खूप थोडे दिवस राहता येणार म्हणून मयुराला खूप वाईट वाटत होत पण निशाला हक्काचं आणि विशेष म्हणजे खूप प्रेम करणारं घर मिळणार म्हणून आनंदही होत होता. १५ दिवसांनी निशा कायमची आदितीकडे जाणार होती. अदितीच्या घरी निशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली होती. त्यानिमित्ताने तिने मयुराला खूप आग्रह करून घरी नेलं. अदितीने शिशिर सोडून सगळ्यांना मयुरा आल्यावर घरीच असायला पाहिजे असं सांगितलं होतं. त्यावरून घरच्यांना थोडासा अंदाजही आला होताच पण कुणी काही बोललं नाही.
मयुराने दबकतच अदितीच्या भल्यामोठ्या बंगल्यात पाय ठेवला . तिला बघताच खूष झालेली अदिती नेहमीप्रमाणे धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. तिला आत नेऊन तिने उत्साहाने सगळ्यांशी तिची ओळख करून दिली. अर्धा पाउण तास मस्त सगळ्यांच्या गप्पा झाल्या. मयुरा जायला निघाली तेंव्हा अदितीने सगळ्यांच्या वतीने तिला निशासाठी होणाऱ्या घरगुती स्वागत समारंभासाठी आमंत्रण दिले. इतक्या छान लोकांकडे निशा येणार या आनंदात मयुरा घरी परतली.
मयुरा गेल्यानंतर अदितीने सगळ्यानाच शिशिरच्या मनात काय चालू आहे याची कल्पना दिली आणि मयुरा कशी वाटली हे विचारलं. घरात सगळेच रूपापेक्षा बुद्धिमत्तेला जास्त महत्त्व देणारे असल्याने शिशिरची निवड सगळ्यांनाच पटली. त्याच्या आईनेतर पुढे जाऊन निशा येणार त्या दिवशीच शिशिरने मयुराला लग्नाची मागणी घालावी अशी कल्पना मांडली. आणि मंडळी तयारीला लागली.
निशा ज्या दिवशी अदितीच्या घरी येणार होती त्या दिवसासाठी अदितीने आपल्याला का छान आवरून यायला सांगितले आहे हे मयुराला काही केल्या कळत नव्हते. पण मैत्रिणीचा हट्ट मानून ती छान आवरून अदिती सोबतच तिच्या गाडीत घरी पोचली. दाराजवळ जाताना सामान विसरल्याचा बहाणा करत ती गाडीकडे परत गेली. मयुरा चालत चालत दारासमोर असलेल्या सजवलेल्या पोर्चमध्ये पोचली. तोच तिच्यावर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. आणि ती काही बोलणार इतक्यात कुणीतरी येऊन तिचे डोळे अलगद झाकले. आणि तिच्या कानाजवळ एक सुरेल ओळ गुणगुणली, “तेरा मुझसे है पहलेका नाता कोई, युंही नहीं दिल लुभाता कोई.....” हात दूर झाले. अदितीने हळूच मयुराला गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेली पाउलवाट दाखवली. तिकडे बघताच मयुराला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझी काकू होशील का असं शिशिरच्या कुशीत बसलेली निशा तिला तोडक्यामोडक्या भाषेत विचारत होती. तिने धावत जाऊन निशाला हातात घेत शिशिरच्या हातात हात गुंफले आणि डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या दिवशी फक्त निशालाच नाही तर मयुरालाही तिचं हक्काचं घर आणि प्रेम करणारी माणसं मिळाली.
समाप्त #गौरीहर्षल
घर हक्काचं भाग २
घर हक्काचं
भाग २
काय होतं तिथं? गर्दीला दूर करत मयुरा पुढे गेली. तिथे ’शारदाश्रम’ संस्थेची एक कार्यकर्ती हातात कसलंतरी गाठोडं घेऊन उभी होती. मयुरा त्या भागात तिचं काम, स्वभाव यामुळे बरीच प्रसिध्द होती. तिला पाहताच त्या कार्यकर्तीने ते गाठोडं पुढे केलं आणि म्हणाली, “बघा नं मॅडम, किती सुंदर मुलगी आहे?” तिच्या शब्दांनी भानावर येत मयुराने बघितलं तर खाली जमिनीवर पैश्यानी भरलेली बॅग पडली होती. आणि तिच्या हातातल्या गाठोड्यात एक छानसं गुटगुटीत बाळ. न राहवून मयुराने त्या बाळाला जवळ घेतलं. बाळालाही तिच्या कुशीत सुरक्षित वाटलं असावं त्याने इवल्याश्या मुठीत तिचं बोट घट्ट पकडलं. थोड्याच वेळात पोलीस आले आणि सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आई किंवा वडिलांचा शोध लागेपर्यंत बाळाला संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं.
मयुरा घरी परतली पण बाळाच्या विचारांना सोबत घेऊनच. अंदाजे १५ दिवसांचा जीव, पण जन्म देणार्यांना त्याला टाकून देताना काहीच कसं वाटलं नाही? काय झालं असतं त्या जीवाचं जर ते सापडलं नसतं कुणालाच तर??? विचार करतच मयुराला रात्री खूप उशिरा झोप लागली. दुसरया दिवसापासून मयुराचा दिनक्रम बदलला. दुपारी लेक्चर संपली कि तिची पावलं आपसूक शारदाश्रम कडे वळू लागली. त्या बाळासोबतच इतर सर्व मुलंही तिच्या दिवसाचा आणि पर्यायाने आयुष्याचा भाग झाली. रात्रीच्या अंधारात सापडल्यामुळे बाळाचं नाव निशा असं संस्थेत लिहील गेलं. निशा आता ६ महिन्यांची होत आली होती पण अजूनही तिच्या घरच्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता. तिला आश्रमातल्या सगळ्यांबरोबरच किंबहुना जास्तच मयुराचीही सवय लागली होती. मयुरालाही तिचा लळा लागला होता.
अशातच एका कॉन्फेरेंस साठी मयुराला आठवडाभर बाहेर जावे लागणार होते. निशाला काय आणि कसं समजवायचं या विचारातच मयुरा आश्रमात आली. ती निशाला शोधतच होती तेवढ्यात तिला कुणीतरी सांगीतल कि दत्तक घेण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला निशा आवडली आहे. निशा त्यांच्यासोबतच ऑफिसमध्ये आहे. क्षणभर मयुराला धक्काच बसला पण कधीतरी हे होणारच होत याची अपेक्षा असल्याने ती लगेच सावरली आणि ऑफिसमध्ये पोहोचली. संस्थेकडून होणारं समुपदेशनाच काम मयुराच बघत असल्याने तिला प्रत्येक मुलाच्या प्रोसेसमध्ये रिपोर्ट द्यावा लागत असे. ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि समोरचं दृश्य बघितल्यावर तिचे पाय जागीच थबकले.....
तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना इतक्या मजेत निशा त्या कपलच्या सोबत हसत होती. कपलही बऱ्यापैकी सुशिक्षित आणि सधन घरातले वाटत होते. इतक्यात त्यांच्यामधल्या स्त्रीने मयुरा तू????? असे म्हणत मयुराला मिठी मारली. मयुराने तिला पुन्हा एकदा निरखून पाहिलं तर ती तिची मैत्रीण अदिती होती. लग्न लवकर झाल्यामुळे पुढे मयुराचा तिच्याशी संपर्कच नव्हता. अदितीला बरीच वर्षं मूल न झाल्याने तिने व तिच्या नवऱ्याने दत्तक मूल घेण्याचं ठरवलं होतं. आश्रमात येताच तिला निशा दिसली आणि निशाही खूप जुनी ओळख असल्यासारखी तिच्याकडे झेपावली. दत्तकविधान प्रोसेस खूप मोठी असल्याने आता सतत भेट होईलच असं प्रोमीस करत अदिती मयुराला हक्काने तिच्या घरी येण्याचं आमंत्रण देऊन गेली. काहीवेळापूर्वी उगाच आपल्याला किती वाईट वाटलं होत हा विचार आता मयुराला हसू आणत होता. अदितीला खूप चांगल ओळखत असल्याने निशा अतिशय आनंदात राहील यावर आता मयुराला खात्री होती.
त्या आनंदातच मयुरा कॉन्फरन्स साठी गेली. तिथे पोहोचून ती निशा साठी संस्थेत फोन करतच होती कि तिला एक व्यक्ती खूप गडबडीत येऊन धडकली. आणि स्वतःच्याचं नादात सॉरी म्हणत तो निघूनही गेला. पुढे कॉन्फरन्स साठी ती हॉलमध्ये पोचली तेवढ्यात तिला कुणीतरी आवाज देत आहे असं वाटलं. तितक्यात तो तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला,” मिस मयुरा आपणच का? मी डॉ. शिशिर,मघाशी चुकून माझा तुम्हाला धक्का लागला मी सॉरी म्हणण्यासाठी आलोच होतो पण तोपर्यंत तुम्ही इकडे निघून आलात.” “इट्स ओके, होतं असं गडबडीत”,असं म्हणत मयुराने विषय संपवला आणि ती तिच्या जागेवर बसण्यासाठी निघून गेली. तिला पाठमोरी जाताना बघून नकळतच डॉ. शिशिरच्या चेहऱ्यावर हसू उमटले. कॉन्फरन्समध्ये एकामागे एक होणाऱ्या चर्चांमधून दोघांनाही एकमेकांविषयी बरीच माहिती मिळाली आणि नकळतच एकमेकांविषयी आदरही वाटू लागला. डॉ. शिशिर लहान मुलांचेच डॉक्टर असल्याने मुलांशी निगडीत समस्यांबद्दल त्यांचाही अभ्यास होताच. त्यात त्यांना मानसशास्त्राबद्दल कुतूहल असल्याने त्याबाबतीतहि ते बरीच माहिती बाळगून होते. मयुरा आणि त्याचं काही मुद्द्यावर पटत असल्याने त्यांच्यात चर्चा होत होतीच. त्याशिवायही शिशिर मयुराच्या इतक्या लहान वयात मिळवलेल्या यशामुळे थक्क झाला होता. मनोमन त्याला मयुरा आवडली होती. फक्त आता मयुराला ते कधी कळतय याची तो वाट बघत होता. लवकरच तशी वेळही येणार होती ..........
क्रमशः #गौरीहर्षल
घर हक्काचं भाग १
घर हक्काचं
भाग १
‘ती’ दिसायला सामान्य . इतरांच्या दृष्टीकोनातून तर अगदी ugly वगैरे कॅटेगरीत मोडणारी. आपल्या वाट्याला फारसं कौतुक कधी येणार नाही याची जाणीव तिला खूप लवकर झाली. कारण इतरांचे टोमणे ऐकून जेंव्हा ती आईकडे आशेने बघायची तेंव्हा आई नकळत दुर्लक्षच करायची.
आईचं वागणं तिला कमी वयात बरंच काही शिकवून गेलं. ती आता स्वतःच स्वतःला समजवण्यात पटाईत झाली होती. चुकून कधी वेळ आलीच तर हळूच स्वतःलाच टपली मारत ती म्हणायची, तू नं वेडी आहेस ‘मयुरा’. आणि स्वतःच खुदकन हसत कामाला लागायची. तिचा प्लस पॉईंट होता तिचं दिलखुलास हसणं जे समोरच्याला एका क्षणात तिच्याशी बांधून टाकत असे एका समंजस नात्याने अपवाद फक्त तिच्या घरच्यांचा. प्रचंड मेहनतीने यश मिळवत आज मयुरा सेटल होती पण तिच्या घरच्यांना मात्र जसा तिच्या दिसण्याबद्दल प्रोब्लेम होता तसच तिच्या प्रगतीशीही त्यांना काही देणंघेणं नव्हतं.प्रत्येकवेळी तिची मित्रमंडळी मात्र तिचं यश दणक्यात साजरं करत.
अशाच एका छोटयाशा पार्टीत तो तिला दिसला. वयाच्या थोड्याफार इफेक्टमुळे तिला नकळतच त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं. पण आत्तापर्यंतच्या अनुभवांमधून शहाणी झालेली मयुरा शांत राहून त्याला पारखत होती. थोड्याच दिवसांत तिला दिसतं तसं नसतं हा अनुभव आलाच. त्याचं देखणेपण हे फक्त त्याच्या चेहऱ्यापुरतच मर्यादित आहे हे तिला कळलं. मग आपसूकच त्याच्याबद्दल जाणवणारी ती नाजूक भावनाही कोमेजली. मैत्रीच्या नात्याने त्याने पुढे केलेला हात तिने स्विकारला. मैत्रीच्याच कारण ती काही मॅरेज मटेरियल नव्हती, जिला चारचौघात ट्रॉफीसारखं मिरवता येईल. तिला या सगळ्याचा अंदाज असल्यानेच तिने त्याला फारसं महत्व दिलं नाही. त्याची एक खास मैत्रीण होती. तिला लग्नासाठी विचारण्याच्या खटपटीत तो होता. पण ती काही दाद देत नव्हती. मग हिलाच त्याची दया आली. तिने मोकळ्या मनाने त्याची मदत केली. त्या मैत्रिणीलाही ह्याची धडपड समजू लागली. अन् एक दिवस त्याच्या प्रस्तावाला तिने हिरवा कंदील दाखवला. तो खूष होऊन आनंद शेअर करण्यासाठी हिच्याकडे आला. ती मनापासून त्याच्या आनंदात सामील झाली.
हळूहळू तो तिच्या आयुष्यातून काहीसा गायब होऊ लागला. ती तर आधीपासूनच कुणाच्याच खिजगणतीतही नव्हती. घरच्या आघाडीवर तर ती आधीच हरली होती,आता मनाची आघाडीही विस्कटली पूर्णपणे. पण तरीही ती मात्र खंबीरपणे चालत होती तिची वेगळी वाट...
दोन वर्षं उलटून गेली ह्या सगळ्या घटना घडून.पहिलं प्रेम, त्याच्या कडू आठवणी घेऊन कुठेतरी हरवलं होतं. आज मयुरा फक्त विद्यार्थीप्रिय प्रोफेसरच नव्हे तर यशस्वी चाइल्ड सायकोलॉजीस्ट, समुपदेशक बनली होती. घरच्यांनी तिच्या कुठल्याच वैयक्तिक गोष्टीत रस न दाखवल्याने तिने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होताच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. अशातच एका रात्री कुठूनतरी परतताना तिला कोपरयावरच्या कचराकुंडीजवळ खूप गर्दी दिसली. कधीही अशा ठिकाणी न वळणारी तिची पावले आज मात्र थांबली तिथे जाऊन...
क्रमशः #गौरीहर्षल
सोमवार, १२ जून, २०१७
मन धागा धागा
#फर्माईश
#असे_कसे_बोलायचे_न_बोलता_आता
कालपासून वेड्यासारखं हे गाणं मी ऐकतेय. प्रत्येक कडवं मात्र मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे कथा वगैरे लिहिण्याऐवजी मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय.
१.
असे कसे बोलायचे न बोलता आता
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२.
एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
हातात नाही हात तरीही तू सोबती
मन बेभान बेभान होई
मग प्रीतीला उधाण येई
मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी.
३.
रोज बहाणे नवे शोधून मी थकते
तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
क्षण आतूर आतूर झाले
रोज काहूर काहूर नवे
मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
Hope so, मी ट्रॅक सोडून लिहिलं नाहीये. बाकी सगळ्यांच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय.
कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल 😝😝
गौरी हर्षल
१२.६.२०१७
बुधवार, ७ जून, २०१७
ती, तो आणि पाऊस २
ती, तो आणि पाऊस २
तो - किती आवडायचं तुला पावसात भिजायला, मला तुझ्या त्या वेडामुळेच तू आवडली होतीस खरंतर. पण रोजच्या धावपळीत सांगायचंच राहून गेलं बघ. आणि आज तो मनापासून बरसतोय तुझ्या माझ्या अंगणात तू लावलेल्या चाफ्यावर. पण आपण मात्र हरवलोय आयुष्याचा गाडा ओढताना. कधी नव्हे ते आज मी लवकर आलोय तू नसताना उगाच उदास झालेल्या घराकडे बघत होतो तोच पाऊस आला. आज ठरवलं की तुला तुझ्या पावसासोबतच सरप्राइज द्यायचं. लवकर ये गं मग तू , मी आणि पाऊस सेलिब्रेट करूया आपल्या नात्याच्या नव्याश्या या अर्थाला....Miss you
ती-- कसला छान कोसळतोय पाऊस आणि आज नेमकी मी ट्रॅफिक मध्ये अडकलेय. घरी असते तर मस्त चाफ्याखाली भिजले असते तुझ्यासोबत. तुला आवडत नाही माहीत आहे मला पण तू सोबत असलास की माझ्या असण्याला एक अर्थ येतो. एकत्र येऊन सेलिब्रेट केलेले पावसाळे कमीच ना रे आपले. तू तुझ्या कामात बिझी मी माझ्या. आयुष्य जगायचं जगायचं म्हणत असताना आयुष्यच नाही ना रे हरवत चाललं??
15 मिनिटानंतर दाराची बेल वाजते.
तो ओंजळीत चाफा घेऊन दार उघडतो आणि
ती हरवून जाऊन त्याला बघत बसते.....
नवीशी सुरुवात
पावसासोबत
नव्याने होते......
गौरी हर्षल
७.६.२०१७
गुरुवार, १ जून, २०१७
ती,तो आणि पाऊस
ती,तो आणि पाऊस
ती-: पहिला पाऊस पडला की हमखास आठवण येते तुझी. आयुष्यातला सगळ्यात धुंद पावसाळा तुझ्या सोबत तर अनुभवला मी. अगदी मनमुराद भिजत भटकणं असो किंवा चिंब भिजून आडोश्याला कुडकुडत उभं राहणं. तूच होतास ज्याने मला दोन्ही हात पसरून पावसाला कवेत घ्यायला शिकवलं. तू पहिल्यांदा भेटलास तेही पावसातच. तो पावसाळा मी जगले अक्षरशः आणि अजूनही जगते प्रत्येक वेळेस. आता तू कुठे आहेस माहित नाही. अजूनही तसाच पावसाला झेलतच असशील कदाचित मला आठवतही असशील.💖💖💖
तो -: आज पुन्हा आभाळ भरून आलं. कुठेस ग तू??? पहिला पाऊस, ते भटकणं, तुझं शहारणं प्रचंड मिस करतो मी. नकळतच खूप दूर गेलो ना आपण. पण हा पाऊस आहे ना परत परत येऊन त्या आठवणींत नेतोच. तू होतीस म्हणून मीही मनमुराद जगायला शिकलो. आजही तू असतेस चेहऱ्यावर येणाऱ्या टपोऱ्या थेंबात. हल्ली खूप कमी भिजतो गं मी. पण जेव्हा भिजतो तेंव्हा तू सोबत असतेस. तुलाही अजून आठवत का पावसात भिजणं💖💖💖
गौरी हर्षल
१.६.२०१७
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
How to Deal with Negative People: नकारात्मक लोकांसोबत कसे वागावे? काही लोकांना नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणे आवडत ...
-
Clearing the Mental Clutter: How the Simple Act of a Brain Dump Can Boost Your Well-being? मनातील गर्दी दूर करणे: 'ब्रेन डं...
Contact form |
Tags |