शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

यु टर्न (भाग 4) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part ४)
पूर्वार्ध – नेहा, प्रथितयश वेब डिझायनर पण त्यासोबतच अत्यंत हट्टी आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार. याच हट्टापायी सारंगने तिच्या प्रेमाला दिलेला नकार तिला काही पचवता आला नाही. आणि मग सुडाच्या भावनेने तिने सारंग आणि सानिका याचं ठरलेलं लग्न शक्य ते सगळे प्रयत्न करून मोडलं. पुढे जाऊन तिनेही प्रेमात पडून राघवशी लग्न केलं पण लग्नानंतर आयुष्यात येणारे चढउतार पार करताना मात्र तिला स्वतःची चूक कळली. तीच नेहा पुन्हा एकदा फिरून सानिका समोर येते आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तिचीच मदत घेते. सारंगही स्वतःची चूक मान्य करत नेहाला माफही करतो आणि मदतही करतो.
 आता पुढे

नेहा आणि राघवची तर गाडी मार्गावर आली होती. पण सानिका आणि सारंगच काय? ते दोघे तर अजूनही काहीच पुढाकार घ्यायला तयार नव्हते. सानिकाच्या आत्यानेही तिच्या लग्नासाठी आता स्थळांचा विचार करू म्हणून तगादा सुरु केला होता.ही गोष्ट अमेयच्या कानावर येताच त्याने स्वरुपामार्फत सारंग पर्यंत पोचवली. त्यात भरीस भर ही पडली की इतके दिवस या गोष्टीना नकार देणाऱ्या सानिकाला आत्या आणि बाकी लोकांनी इमोशनल ब्लॅकमेल करत तयार केलं. मनातून जरी सानिकालाही सारंगला पुन्हा भेटावं वाटत होतं. पण त्यावेळेस तिची चूक नसतानाही त्याने तिला दिलेली वागणूक ती विसरू शकत नव्हती. त्याचा आपल्यावर असलेला विश्वास इतका कमकुवत असेल तर आयुष्यभर कसं निभावणार हा प्रश्न तिला रोखत होता. पुढे दोन दिवसांनी तिला एका मुलाला भेटायचं आहे असं आत्याने सांगितलं.  थोड्याशा गोंधळलेल्या मनःस्थितीतच सानिका त्या मुलाला भेटली. दुसऱ्या दिवशी जेंव्हा अनिताने तिला त्या मुलाबद्दल विचारलं तिला साधं त्याच नावही लवकर आठवेना. हे बघितल्यावर अनिताने तिला पुन्हा एकदा सारंगबद्दल विचार कर असं सुचवलं. पण भारतात येऊन, नेहाच्या केसमध्ये मदत करूनही सारंगने स्वतः अजून सानिकाला एक मेसेजही केला नव्हता. त्यामुळे आधीच्या घटनांमुळे दुखावलेली सानिका अजूनच दुखावली गेली. तिने तस अनिताजवळ कबुलही केलं. 
          इकडे सानिकाशी काय बोलावे याचा विचार करत असतानाच सारंगला तिने लग्नासाठी स्थळांना भेटायला होकार दिल्याचं समजलं. आता मात्र आपण काहीतरी करायला हवं हे त्याला कळून चुकलं. त्यासाठी नेहा आणि अनिताच आपली मदत करू शकतात हे त्याला माहित होतं. त्याने पहिला फोन अनिताला लावला तस तिच्याकडून सानिकाशी झालेलं सगळं बोलणं त्याला समजलं. अजूनही सानिकाच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी आहे हे कळून त्याला जरासं हायस वाटलं. आता तो पुढच्या तयारीत गुंतला. कितिही झालं तरी सानिकाचा राग त्याला झेलावाच लागणार होता. त्याने फोनवर सानिकाचा नंबर डायल केला. पण तिने फोन उचललाही नाही अन् काहीच रिप्लाय केला नाही. दोन,तीन दिवस ह्यातच गेले. शेवटी आता वेगळं काहीतरी करावं लागणार हे सारंगला समजलं. 
तिकडे नेहालाही मनोमन या दोघांना परत एकत्र आणण्यासाठी काहीतरी करायचं होतं. नेमकं काय केलं म्हणजे निदान सानिका आणि सारंग समोरासमोर येतील ह्यावर तीही विचार करत होती. त्या विचारातच मनाशी काही ठरवत ती कामाला लागली. 
आकाशात मात्र लवकरच येणारी पौर्णिमा नव्याने चंद्राला भेटायचं म्हणून उगाच गालातल्या गालात हसत होती. 
#गौरीहर्षल

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

यु टर्न (भाग 3) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part 3)
      चार दिवसांच्या सुटीनंतर रिफ्रेश होऊन आज सानिका आज ऑफिसला निघाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावत असताना एक फोर व्हीलर तिच्याजवळून गेली. ती चालवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे पाहिलं आहे याचा विचार करत ती अनिताला येऊन धडकली. “ मला वाटलं नव्हतं साना सुट्टीमुळे तू इतकी रिफ्रेश होशील” हसत हसत अनिता तिला म्हणाली. “ बाय द वे नेहा भेटली का तुला?”.
 “ तरीच मला ती कार चालवणारी ओळखीची वाटली, बट किती चेंज झालीय ती? इतकी थकलेली हरलेली नेहा बघताना कसतरीच झालं?” सानिका म्हणाली. ती अनितासोबत तिच्या  केबिनमध्ये बसली. “ अनु तुला काही सांगायचं आहे का मला?” थोडसा विचार करत अनिता म्हणाली, “हो, साना नेहाला एका चांगल्या आणि समजून घेणाऱ्या मैत्रिणीची गरज आहे आणि सध्या तिची मनस्थिती पाहता तूच तिला योग्य पद्धतीने सांभाळू शकतेस. लहानपणापासून तिला हवं ते मिळत गेल त्यामुळे नकार पचवायची ताकदच नव्हती तिच्यात.त्याच भावनेतून तिने तुझं आणि स्वतःच आधीच खूप नुकसान केलय. आणि तिला याची जाणीव झालीय तीही अर्थातच खूप मोठी किंमत चुकवल्यानंतर. पण तू तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस. एक माणूस म्हणून विचार कर.” त्यानंतर सानिकाने स्वतःहून नेहाला फोन केला आणि भेटायला बोलावलं. हे सगळं सानिका फक्त नेहाला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठीच करत होती.कारण नेहा अजून कुठलच नुकसान होऊ नये असं तिला मनापासून वाटत होत. नेहाला भेटून तिने नेहा खरच बदलली आहे का याचा अंदाज घेतला. आणि तिला खात्री पटली कि आता नेहा पहिल्यासारखी नाहीये.
नेहाला भेटल्यानंतर सानिकाला तिच्या डिप्रेशनच कारण कळाल. नेहाने मुंबईला गेल्यानंतर तिच्याच एका कलीगच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल होतं. पण प्रेमाचा पहिला भर ओसरल्यावर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. या सगळ्या कारणांसोबतच सारंग आणि सानिकाला आपण विनाकारण वेगळं केल्याच्या गिल्टमुळेचं नेहाला डिप्रेशन येऊ लागलं. त्यात भर पडली ती तिच्या नवऱ्याने तिला पाठवलेल्या डिव्होर्स नोटीसची. नोटीस मिळाल्यामुळेच खचून नेहाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आणि अनपेक्षितरीत्या ती सानिकाला भेटली. सानिकाने सगळ्यात आधी नेहाला गिल्टमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासोबतच तिने नेहाच्या नवऱ्याला सुद्धा परिस्थितीची कल्पना दिली. सुदैवाने तो अजूनही नेहावर प्रेम करत असल्याने मदत करायला तयार झाला.आणि तो नेहाला पुन्हा घरी घेऊन गेला. या सगळ्या प्रोसेस मध्ये ६ महिने उलटून गेले. त्याचवेळेस स्वरूपाने सारंगच्या बहिणीने तो भारतात येणार असल्याची माहिती सानिकाला दिली. त्यामागे तिचा उद्देश नेहाची मदत हा तर होताच, पण त्यासोबतच सारंग आणि सानिकानेही सगळं विसरून परत एकत्र याव असा हेतूही होता.
सारंगच्या मदातीने नेहाला आपण लवकर नैराश्यातून बाहेर काढू असं सानिकाला वाटत होत. पण प्रश्न फक्त एकच होता त्याच्याशी बोलणार कोण आणि कसं? हा प्रश्न अनिताने सोडवला ती सारंगला भेटून सगळं एक्प्लैन करायला तयार झाली. त्यानुसार ती सारंगला  भेटली. नेहाबद्दल सगळी परिस्थिती तिने त्याच्या कानावर घातली. सारंग प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकत होता. नेहा जे काही वागली ते फक्त सूड घेण्यासाठी हे लक्षात आल्यानंतर त्याला तिचा राग आला. पण सध्याची तिची अवस्था काय आहे हे कळल्यानंतर त्याला तिची कीव करावी वाटली. अनिताने सांगितल्याप्रमाणे तो नेहाला भेटून तिला समजवण्यासाठी तयार झाला.
ठरल्याप्रमाणे सारंग नेहाला भेटला तेसुद्धा अगदी छान हसत हसत. त्याला आनंदात पाहिल्यावर नेहाला मनापासून खूप बर वाटलं. तिने त्याची आपण जे काही केल त्याबद्दल माफी मागितली तसं तो तिला म्हणाला, “नेहा तुच नाही मी सुद्धा चुकलो साना हि चुकली. आपण तेव्हा खूप वरवर विचार करत होतो. नात्यांची खरी किंमत आपल्याला ती गमावल्यानंतर कळली. पण आता तूसुद्धा हे गिल्ट मनातून काढून दे आणि नव्याने सुरुवात कर.” सारंगकडून हे ऐकल्यानंतर नेहाच्या मनावरच ओझ बऱ्याच प्रमाणात कमी झाल होत. एक मैत्रीण म्हणून सानिकाने जे काही तिच्यासाठी केल होत त्याची परतफेड कशी करायची याचा विचार करतंच नेहा झोपेच्या स्वाधीन झाली. उद्यापासून तिला खऱ्या अर्थाने एका आयुष्याची वेब डिझाईन करायची होती.
क्रमशः
गौरी हर्षल २९.१२.२०१६



बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

यु टर्न (भाग 2) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part 2)
“ आज तरी लवकर यायचंस न रे?” सानिका गाडी पार्क करत असलेल्या सारंगला थोडी रागातच म्हणाली, तसं तिच्याकडे टक लावून बघत तो हसला आणि गाडीतून उतरताना मागे लपवलेले गिफ्ट त्याने तिच्यासमोर धरत तिचा कान पकडला सॉरी म्हणण्यासाठी. एकमेकांना सॉरी म्हणण्यासाठी ते नेहमी असंच करायचे ज्यामुळे समोरचा कितीही रागात असला तरी ते विसरून मनापासून हसायचा. आत्ताही तसचं घडलं सारंगच्या त्या कृतीने सानिका खुदकन हसली. आणि मग दोघेही हातात हात घेऊन नेहमीच्या टेबलवर येऊन बसले.
आजच्याच दिवशी १ वर्षांपूर्वी ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. सारंग च्या बहिणीच्या स्वरूपाच्या  लग्नात. सानिका स्वरूपाचा नवरा अमेयची मावस आणि एकुलती एक लाडकी बहिण असल्यामुळे करवली म्हणून मिरवण्यात ती कुठेही कमी पडत नव्हती. ह्याच लग्नात थट्टामस्करी करता करता ती आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र झाले इतके चांगले कि बघणाऱ्याला वाटावं ते दोघ लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. सारंग देशमुख IIT मधून पास होऊन आता एका MNC मध्ये काम करत होता. तर सानिका पाटील नुकतीच कुठे देसाई मंडमची असिस्टंट म्हणून जॉइन झाली होती. दोघंही आपल्या कामामधून वेळ काढून आवर्जून एकमेकांना वेळ देऊ लागले होते. हळूहळू इतरासारखच त्यांच्याही लक्षात येत होत कि आपण एकमेकांना मित्रापेक्षाही जास्त काहीतरी मानतोय. आणि अशाच एका मस्त संध्याकाळी लॉंग  ड्राइवला गेल्यावर सारंगने तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत लग्नाची मागणी घातली. आज त्या सेलिब्रेशन साठीच ते दोघ भेटले होते. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार होता आणि मग २ महिन्यात लग्न. इतक्या घाईचं कारण होतं सारंगला मिळालेली ऑफर ५ महिन्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचं होत ३ वर्षांसाठी आणि सोबत अर्थातच सानिकाला घेऊन जायचं असल्याने त्या दोघांनी हा निर्णय घेतला होता. घरचे तर आधीपासूनंच त्यांच्या होकाराची वाट पाहत थांबले होते. त्यांच्या या निर्णयाने दोन्हीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले. कॅफे यु टर्न च्या त्या धुंद वातावरणात ते दोघे जगाला विसरून एकमेकातच गुंतले होते.
इकडे  नेहाला मात्र अजूनही सारंगने दिलेला नकार पचवता आला नव्हता. तिने मैत्रीच्या नात्याखातर त्याचे आणि सानिकाचे नाते मान्य केले होते पण ती अजूनही शांत झाली नव्हती. त्या नात्यातूनच बाहेर पडण्यासाठी तिने सानिकालाच मदत कर अशी गळ घातली. सानिकाच्या मनात काहीच नसल्याने ती नेहाला वेळ देऊ लागली पण नेहाने मात्र त्याचा फायदा घेत ते सारंगच्या कानावर घातले हे सांगत कि सानिका मला पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी असं करतीय. सुरवातीला सारंगला ते पटले नाही पण मग नेहा त्या दोघींचे बोलणे सानिकाच्या नकळत रेकोर्ड करून आणि त्यात बदल करून सारंग ऐकवले. त्या मध्ये सरळ सरळ सानिका नेहाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतेय अशी काही वाक्ये होती. जे ऐकल्यावर सारंगने सानिकाला जाब विचारला सानिका तो माझा आवाज नाही असं म्हणू शकत नव्हती कारण जुन्या एका नाटकाचे स्क्रिप्ट आहे असं सांगून नेहाने ते म्हणून घेतले होते. सारंग काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सानिकाला खडसावत नेहाची बाजू घेतली. आगीत तेल ओतत नेहाने तू अशा मुलीशी लग्न करशील का असं विचारलं तेंव्हा त्याने रागाच्या भरात नाही असं म्हणत सानिकाकडे पाठ फिरवली. विनवणी करत सानिका त्याला परत एकदा विचार कर हेच सांगत होती. पण तो मात्र तसाच उभा होता. नेहाने डोळे पुसत जाणाऱ्या सानिकाला थांबवले. आणि इतकेच बोलली कि सारंग कधीच तुझा होणार नाही. त्या वाक्यातून सानिका जे समजायचं होत ते समजली. नेहाच्या त्या प्रकरणानंतर सारंग आणि सानिकाने एकमेकांना भेटणे बोलणे पूर्णपणे टाळले मुलांच्या वागण्याचा अर्थ कळूनही दोन्हीकडच्या घरच्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारले होते. नेहाने त्यानंतर सारंगला आपल्या जाळ्यात ओढण्याचा खूप प्रयत्न केला पण सारंगने तिला नकार देत सरळ ऑस्ट्रेलिया गाठले. नेहाने हे सगळ फक्त तिचा इगो दुखवला म्हणून केल होत त्यामुळे तिला आता सारंग किंवा सानिकात काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना वेगळ करून तिने मी जिंकले अशी स्वताची समजूत करून घेतली. आणि ती मुंबईला शिफ्ट झाली.
 सारंग गेल्यानंतर दोनच दिवसांनी नेहा सानिकाला भेटायला आली होती आणि तिने स्वतःच्या तोंडाने आपण हे सगळं केल होत असं कबूल करत सारंगला कसा धडा शिकवला हे सांगितलं. सानिकाने सारंग आणि त्याच्या घरच्यांशी कायमचा संपर्क तोडला  आणि स्वतःला क्लिनिकच्या कामात बुडवून घेतलं.
आज त्या गोष्टीला ४ वर्ष झाली होती सानिका किंवा सारंग दोघांनीही एकमेकांशी कसलाच संपर्क ठेवला नव्हता. पण आज अचानक नेहाची फाईल समोर आल्यावर सानिकाला सगळ आठवल होत. उद्या नेहा तिच्या फर्स्ट सेशन साठी अनिताकडे येणार होती. आपल्याला समोर पाहिल्यावर ती काय करेल याची कल्पना असल्याने सानिकाने सुटी काढली होती.
क्रमशः

गौरी हर्षल २८.१२ २०१६

यु टर्न (भाग 1) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part 1)
समोर ठेवलेल्या पेशंटच्या फाईल कडे बघत सानिका भूतकाळात गेली. ४ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग झरकन तिच्या डोळ्या समोरून गेला . सारंगला एकदा तरी निर्णयावर पुन्हा विचार कर अशी विनवणी करणारी ती आणि  तिच्याकडे पाठ करून उभा असलेला तो. एका व्यक्तीने क्षुल्लक कारणाचा राग मनात ठेऊन त्यांच्या सुंदर अशा नात्याला एक वाईट वळण लावले . खरतर त्या व्यक्ती इतकंच ते दोघेही त्याला जबाबदार होते. पण ती वेळ अशी होती कि कुणीच शांतपणे विचार करायला तयार नव्हते . एका क्षणात जोडल्या जाणाऱ्या नात्याची आणि स्वप्नांची राखरांगोळी होऊन गेली. आज पुन्हा हे सगळं आठवल्यावर सानिका क्षणभर थबकली ह्या विचाराने कि हे सगळं थांबवता येत होत न ? सारंग आणि आपण काहीच का प्रयत्न केला नाही ? विचारांचा गुंता वाढू लागला आणि तश्यातच इंटरकॉम ची बेल वाजली. भानावर येत सानिकाने फोन उचलला. पलीकडून देसाई मॅडम तिला एका जुन्या केसच्या डिटेल्स विचारात होत्या. डिटेल्स देऊन तिने फोन कट केला आणि समोर पडलेली फाईल उघडली.
मिसेस नेहा, एका प्रथितयश कंपनी मध्ये वेब डिझायनर, प्रंचड तणावाखाली येऊन डिप्रेशनची शिकार आणि त्या भरात दोन वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न. याच कारणासाठी तिला तिच्या फॅमिली डॉक्टरनी शहरातल्या सर्वात नामवंत मानसोपचार तज्ञ देसाई च्या क्लिनिकला पाठवलं होतं. आणि आता तिची फाईल सानिका समोर होती,जी त्या क्लिनिक मधली सर्वात हुशार समुपदेशक आणि सायकोथेरपीस्ट होती.सानिका त्या नावामुळे क्षणभर जरी गोंधळली असली तरी स्वतःला सावरून तिने नेहमीप्रमाणे सर्व डिटेल्स वाचून नोटस काढायला सुरुवात केली. त्याचवेळी दारातून “ मे आय कम इन ?” असा आवाज आला. सानिकाने हातानेच बसण्याची खुण केली आणि तयार केलेल्या डिटेल नोट्स अनिता समोर ठेवल्या . त्या हातात घेत अनिता म्हणाली, साना जे झाल त्याला आता ४ वर्ष उलटून गेली आहेत. आणि असाही तुझा तिच्याशी किंवा तिच्या घरच्यांशी आता कसलाच संबंध उरला नाही. मग हि इतकी महत्वाची केस असताना  तू का नाही म्हणतेस? आपल्या दोघीनाही हे चांगलच माहित आहे कि सध्या तिला यातून कुणी बाहेर काढू शकेल तर ती तू आहेस मग तू का माघार घेतीयेस? “ I know अनु पण मला कसलीच रिस्क नकोय माझ्या एका शब्दाने तिचं आणि माझही न भरून येणार नुकसान होईल अशी भीती वाटतेय मला. कारण एक माणूस म्हणून मी तिला ओळखते. रागाच्या भरात ती काय पाउल उचलू शकते याची जितकी कल्पना मला आहे तितकी ती इतर कुणाला नसेल.म्हणूनच मी तुला हि केस देतेय जेणेकरून मला तिच्या प्रगतीबद्दल वारंवार कळत राहील आणि योग्य वेळी गरज पडल्यास तुला मदतही करता येईल.” जशी तुझी इच्छा असं म्हणत अनिता फाईल घेऊन निघून गेली आणि सानिका पुन्हा एकदा भूतकाळात हरवली.
क्रमशः
गौरी हर्षल २७.१२ २०१६