माझ्या मना बन दगड...

माझ्या मना बन दगड... 
शीर्षक विचित्र आहे ना??? पण या ओळीत तथ्य मात्र आहे. समुपदेशन करत असताना किंवा वेगवेगळे वर्कशॉप घेत असताना बऱ्याच जणांकडून विचारला जातो की 
- मॅडम समोरचा हेतूपुरस्सर आपल्याला त्रास देत असेल तेव्हा काय करायचं?? 
- किंवा एखादी व्यक्ती जी प्रचंड टॉक्सिक आहे पण आपण तिला टाळू शकत नाही कारण दुर्दैवाने ती आपल्या फार जवळच्या नात्यातील आहे. अशावेळी त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवत असताना स्वतःच मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी कशी घ्यायची?? 
- दुर्लक्ष करणं हा उपाय उत्तम आहे. पण प्रत्येक वेळी दुर्लक्ष करताच येतं असं नाही. 
- आणि कित्येकदा तर दुर्लक्षच करता येत नाही. इन्स्टंट रिस्पॉन्स जातो. मग हे नियंत्रण मिळवणं कसं शिकायचं?? 

तर आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपण टाळू शकत नाही. आपल्याला त्यांच्याबरोबर राहणं भाग असतं. मग त्यांच्याबरोबर राहात असताना स्वतःचे रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया कशा नियंत्रित करायच्या?? 

याच्यावर एक उपाय आहे... तोच जो वरती लिहिला आहे... हो तोच....... "माझ्या मनात बन दगड" ....
अर्थात ही एक मेथड आहे जिला ग्रे रॉक मेथड ( grey Rock method) असं म्हणतात. 

ग्रे रॉक मेथड म्हणजे काय???

ग्रे रॉक मेथड म्हणजे एखाद्या व्यक्तीला समोर असताना सुद्धा रिस्पॉन्स कमी देणे किंवा तिच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट न दाखवणं. पण इथे फरक हा असतो की त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे आपल्याला बऱ्याचदा ट्रिगर करत असतं. म्हणजे तिच्या वागण्या, बोलण्यामुळे, तिच्या संपर्कात येण्यामुळे आपल्या मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याकडून नकळत त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याला रिस्पॉन्स दिला जातो. हे रिस्पॉन्स देणं कमी करणे किंवा अजिबातच रिस्पॉन्स न देणे म्हणजे ग्रे रॉक मेथड. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक वागण्याला प्रतिक्रिया देतो. तेव्हा नकळतच तो संवाद वाढत जातो. कधी कधी त्याचे वादात रूपांतर होते. कधी कधी वादात रूपांतर जरी झाले नाही, तरी नंतर आपली मनस्थिती मात्र पूर्णपणे खराब झालेली असते. 
कुठलाही संवाद चालू तेव्हाच राहतो. जेव्हा आपण आपल्या परीने त्याच्यात भर घालत असतो. ते म्हणतात ना की जेव्हा तुम्ही नकारात्मक संवादांना रिस्पॉन्स देणं थांबवता. तेव्हा तुम्ही त्याच्यातली हवा काढून घेत असता.... 
हे अशा प्रकारे एखाद्या गोष्टीला महत्त्व देणं कमी करता यायला हवं.

आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो की अरे दगडासारखा काय बसला आहेस??? काहीतरी बोल.... पण इथे मात्र आपल्याला दगडासारखं बसायला शिकायचं असतं 😆😆😆

ग्रे रॉक मेथड कशी वापरायची??
1. तटस्थ राहणे.... 
टॉक्सिक व्यक्तीच्या संवादाला कमीत कमी शब्दात, भावनिक न होता, वास्तवदर्शी उत्तर देणे शिकल्यानंतर तटस्थ राहणे जमू लागते. 
2. नजरेला नजर न मिळवता संवाद साधणे. असं केल्याने समोरच्या व्यक्तीला आपण त्या संवादामध्ये सहभागी नाही हे लक्षात येते. 
3. अशा संवादांमध्ये आपली वैयक्तिक माहिती न देणे हे जास्त फायद्याचे असते. 
4. तुम्ही वर्तमान आयुष्यात काय करत आहात?? शिवाय तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुरू असणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडी न सांगणे हा महत्त्वाचा नियम असतो. 
5. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याला अतिशय शांतपणे आणि संयत स्वरूपात प्रतिक्रिया देणे. 
6. समोरच्या व्यक्तीमुळे आपण कधी ट्रिगर होत आहोत हे ओळखणे गरजेचे असते. 
7. जिथे आवश्यकता असेल तिथे टाळण्यासाठी योग्य प्रकारची कारणे वापरणे. 
8. गरज पडल्यास आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्र नातेवाईक किंवा व्यावसायिक पातळीवर थेरपीस्ट ची मदत घेणे आवश्यक असते.

ग्रे रॉक मेथड चे फायदे.... 
1. यामुळे आपण मानसिक दृष्ट्या दुखावले जात नाही. 
2. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो. 
3. संवादांमधील ताण आणि त्यामुळे होणारा वाद कमी होतो. 
4. हळूहळू आपल्याला आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे जमू लागते. 
या पद्धतीचे अजूनही काही फायदे आहेत. जे प्रत्यक्षात वापरल्यानंतर आपल्या लक्षात येतील.  
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की एखाद्या व्यक्तीचे वागणे जर आपल्याला वारंवार दुखावत असेल. तर त्या व्यक्तीला नेहमी त्याच पद्धतीने प्रतिक्रिया न देता आपली प्रतिक्रिया देण्याची पद्धत आपल्याला बदलता यायला हवी. 
बरेच जण असं वागल्यानंतर पुन्हा पुढे जाऊन स्वतःच्या मनात स्वतःच्या वागण्याबद्दल अपराधीपणाची भावना जोपासत राहतात. तर इथे सुद्धा हे लक्षात ठेवायला हवे की आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी करत असलेले हे उपाय आहेत. 
समोरची व्यक्ती जर आपल्याला दुखावताना पुढचा मागचा विचार करत नाही तर आपण स्वतःचा विचार करून स्वतःसाठी काही पावलं नक्कीच टाकू शकतो. 
यामध्ये आपण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे दुखावत नाही. आपण आपल्या परीने तो संवाद कंटाळवाणा ,निरस करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो संवाद थांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो. 

बाकी जाता जाता एकच सांगते शक्य असेल तिथे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला प्रायोरिटी वर ठेवणे. प्रत्येक वेळी इतरांना काय वाटेल याचा विचार करणे कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी घातक ठरत असते. 

Being less responsive or no response is also response... हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. 

आपल्या प्रतिक्रियेतून कोणी काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो बर का... त्यामुळे पुन्हा असं म्हणू नका की मी असं वागलो/वागले म्हणून समोरची व्यक्ती माझ्याशी भांडायला आली.... काही व्यक्तींना प्रतिक्रिया मिळाल्याशिवाय समाधान मिळत नाही म्हणून ते बऱ्याचदा टोकाला जाऊन समोरच्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. त्या डिवचून घेण्यालाच आपण ट्रिगर असे म्हणतो. 
हे ट्रीगर ओळखता यायला हवेत आणि वेळीच त्यांच्यावर उपाय सुद्धा करता यायला हवेत. 

गरज असेल तिथे कौन्सिलर किंवा सायकॉलॉजिस्टची मदत घ्या.‌ 
मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे शारीरिक स्वास्थ्य.... 

बाकी??? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन ) 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

टिप्पण्या

RAJESH SHREEKRISHNA TEMKAR म्हणाले…
गौरी ताई
माझा नोकरीतला सहकारी असेच वागतो पण आज मी तटस्थ राहून त्याला जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही आणि नोकरीवरून घरी आलो आणि तुमची पोस्ट वाचायला मिळाली. ही पोस्ट मी सेव्ह करून ठेवली आहे आणि आता रोज वाचून अंमलात आणल्याचे प्रयत्न करील
ऋताली म्हणाले…
वा अगदी खरं सांगितलंत....
पहिल्या पहिल्यांदा मी सुद्धा प्रत्युतर द्यायचे त्यामुळे समोरचा अधिकच बोलायचा... पण आता मी लक्षच देत नाही त्यामुळे त्यांना काही फायदा झाला किंवा काय माहित नाही पण मला बरं वाटत आता.... माझ्या मनालाच त्रास कमी होतो...
दगड केला मनाचा 👍🏼
अनामित म्हणाले…
ताई, किती छान लिहिलंय. उपयुक्त सल्ला आहे हा. आजच्या परिस्थितीत फक्त नोकरीत नाही, तर नातेसंबंधातही हे गरजेचे आहे. नक्की प्रयत्न करेन.
नीता म्हणाले…
तु खरंच निःस्वार्थपणे सल्ला देतेस.
अनामित म्हणाले…
छान उपाय सांगितला आहे गौरी ताई तुम्ही. बर्‍याच अनुभवानंतर आता आता असेच वागायला शिकले आहे मी. आणि माझे वागणे बरोबर आहे हे तुमच्या ह्या माहितीमुळे समजले. धन्यवाद.
Gauri म्हणाले…
अगदी योग्य सल्ला आहे ताई,अस वागल तरच काही व्यक्तिंपुढे आपला निभाव लागतो.
प्रज्ञा म्हणाले…
अगदी योग्य सल्ला आहे ताई आणि खूप गरजेचा सुध्दा.
असं वागायचा प्रयत्न केल्याने मनाला शांती तरी लाभेल.
Swapnali C Jadhav म्हणाले…
Khup chan upay daily life madhe yacha khup upyog hoil asa.khup chan
मानसी बोरकर म्हणाले…
ताई खरेच या मेथड चा उपयोग करून डोकं खूप शांत झाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आज कुछ अच्छा पढते हैं

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव