स्वतःसाठी बदलताना लेख 18
#स्वतःसाठी_बदलताना लेख 18
आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न )
लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची.
समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?"
आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा
त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात.
चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं. पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं.
हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या वस्तू, व्यक्ती, घटना त्यांच्या रूपात त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात.
आणि मग माणसं विचारतात हे सगळं परत परत का घडतंय? यावर एक साधं सोप्प उत्तर असतं....कारण पहिल्यांदा जेव्हा ती गोष्ट तुमच्याबरोबर घडली तेव्हा तिच्यामधून जे शिकायचं होतं ते तुम्ही शिकलाच नाहीत.
म्हणून परिस्थिती तुमच्याबरोबर त्याच त्याच गोष्टी कोणामार्फत तरी घडवून आणत राहते.
आणि त्याला बऱ्याच अंशी तुमचं स्वतःचं वागणं हे कारणीभूत असतं. त्याच त्याच चुका रिपीट होतात म्हणून त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहतात.
यावर उपाय काय? आपण शांतपणे आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचं निरीक्षण करायचं, त्यामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची विभागणी करायची.
चांगल्या घटना म्हणजे त्या की ज्या घटनेमध्ये तुम्ही तावून सुलखून बाहेर पडलात.
तुम्हाला तुमची आपली जवळची माणसं लक्षात आली, ओळखू आली. आणि त्यातून तुम्ही योग्य तो धडा शिकून पुन्हा त्या गोष्टी करणं टाळलं.
अन् वाईट गोष्टी अशा की ज्या पुन्हा पुन्हा तुमच्याबरोबर घडत राहिल्या.
तुमच्या एक लक्षात येईल की ह्या गोष्टींमध्ये प्रसंग कॉमन असतील. प्रसंगांमध्ये जसं साम्य आहे तसंच त्या घटना घडत असताना तुमच्या संपर्कात आलेली माणसेही आधीच्या माणसांशी साधर्म्य दाखवणारे असतात. किंवा बऱ्याचदा आधीचीच माणसे परत आलेली असतात.
***मग यामधून आपल्याला काय शिकायचं असतं?
तर अशा घटनांमधून आपल्याला हे शिकायचं आहे की हा पॅटर्न जर सतत रिपीट होत आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यात काही योग्य आणि ठोस बदल करण्याची गरज आहे.
हे बदल कसे आणि कुठल्या प्रकारचे असतात , हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की घ्या. पण ती व्यक्ती तज्ञ असावी.
आणि आधी वर सांगितल्याप्रमाणे ते प्रसंग त्यावेळेस घडलेल्या घटना डिटेल्स मध्ये आठवा.
त्या वेळेला तुमच्या आजूबाजूला नव्याने , पहिल्यांदा तुम्हाला मदत करणारी माणसं कोण होती? आणि मदत करतोय असं दाखवणारी माणसं कोण होती? ते बघा आणि त्यानुसार गोष्टी ठरवा.
3 एप्रिल 2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
टिप्पण्या