चांगलं वागण्याची किंमत काय?
(कृपया लेख नावासहितच शेयर करा. )
#चांगलं_वागण्याची_किंमत_काय?
चांगलं वागण्याचे पैसे पडत नाहीत,पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी चांगलं वागण्याची किंमत मात्र आपल्याला चुकवावी लागू शकते. कशी काय? तर त्यासाठी वाचूया ही गोष्ट.
"मंजिरी, काय गरज असते? प्रत्येक वेळेला तुला समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागण्याची?",मंजिरीची मैत्रीण तिला तावातवाने जाब विचारत होती.
मंजिरी मात्र शांतपणे शून्यात नजर लावून बसली होती. त्याला कारणही तसेच होतं.
मंजिरीचा पहिल्यापासून एक ग्रह होता की, मी जर चांगल वागत आहे तर समोरची व्यक्ती ही कधीतरी चांगली वागेलच. आणि पुढे जाऊन तिला असंही वाटायचं की चांगलं वागण्याने कुठे माझं नुकसान होतंय? किंवा मला पैसे खर्च करावे लागतात?
पण दर वेळेला ती ही गोष्ट मात्र विसरून जायची की तिच्या याच स्वभावाचा फायदा उचलून लोक स्वतःची काम साधून घेतात आणि मंजिरीच्या वाट्याला मात्र मनस्ताप येतो.
आता मंजिरीचा स्वभाव मुळातच फारसा बोलका नसल्याने वाट्याला आलेला मनस्ताप ती जवळच्या ठराविक लोकांकडेच व्यक्त करत होती.
अन् त्या सगळ्यांकडून तिला नेहमी हेच वाक्य ऐकायला मिळायचं की, "इतक्या वेळा अनुभव घेऊन सुद्धा तुला समोरच्या व्यक्तीशी चांगलं का वागायचं असतं? तुला का लक्षात येत नाही की प्रत्येक वेळेला घडणारा प्रसंग घटना ही तुला अनुभवाने शहाणं होण्याचा सल्ला देत आहे. तू चांगली आहेस याचा अर्थ असा नाही की समोरची व्यक्ती ही चांगलंच वागेल तुझ्याशी किंवा इतर कोणाशी कसं वागायचं हे त्या व्यक्तीचं आधीच ठरलेला असतं. आणि तो त्या व्यक्तीचा स्वभाव धर्म झाला. कोणीतरी झोकून देऊन त्याची मदत केली म्हणून तो झोकून देऊन दुसऱ्या कोणाची तरी मदत करेल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. उलट अशा लोकांशी चांगलं वागून आपण नकळतच त्यांना समोरच्या व्यक्तीशी चुकीचं वागण्यासाठी समर्थन देत असतो. आपल्या विरोध न करता चांगलं वागण्याने त्यांची आपल्याशी आणि आपल्यासारख्या इतरांशी फायद्यापुरतं जवळीक साधण्याची हिंमत वाढत जाते. म्हणून अशा लोकांना जशास तसे या पद्धतीने वागवून बघावं बऱ्याच गोष्टी लक्षात येतात."
मंजिरीला स्वतःला सुद्धा या गोष्टीची जाणीव बऱ्याचदा झाली होती की तिने सरसकट सगळ्यांशी चांगलं नाही वागलं पाहिजे आणि विशेषतः त्या लोकांसोबत तर अजिबात नाही जे फक्त फायद्या पुरते तिच्याजवळ येतात आणि काम झाल्यानंतर निर्लज्जपणे तिलाच दोषी ठरवून मोकळे होतात. आत्ताही तिची जवळची मैत्रीण याच विषयावरून तिचं बौद्धिक घेत होती.
मंजिरीची एक जवळच्या नात्यातली बहीण होती आणि त्या बहिणीचा स्वभाव प्रचंड स्वार्थी होता. ती पहिल्यापासूनच आपल्या प्रत्येक कामासाठी मंजिरीला वापरत आली होती. चुकून कधी मंजिरीने काम करण्यासाठी नकार दिला तर ती एकतर मंजिरीला इमोशनल ब्लॅकमेल करून काम करून घ्यायची नाहीतर सगळ्या ओळखीच्या नात्यातल्या लोकांजवळ मंजिरी कशी माझ्याशी वाईट वागली हे तिखट मीठ लावून सांगायची.
आता याचा परिणाम काय व्हायचा?कधी कधी स्वतःच्या डोक्यावर ,स्वतःच्या कामाचा डोंगर असताना सुद्धा मंजिरी तिचं काम करून द्यायची. पर्यायी मंजिरीची स्वतःची काम मागे पडायची आणि तिचं कुठल्या ना कुठल्या रूपात नुकसान व्हायचं. जर मंजिरीने काम केलं नाही तर अर्थातच इतर वेळेला न विचारणारी बऱ्यापैकी सो कॉल्ड ओळखीची लोक त्या बहिणीचा फोन गेल्यानंतर मात्र मंजिरीला हक्काने जाब विचारण्यासाठी संपर्क करायची. ह्या गोष्टीमुळे मंजिरीच्या मनस्तापात अजूनच भर पडायची आणि हे सगळं टाळण्यासाठी मंजिरी पुन्हा पुन्हा ती बहीण कितीही वाईट वागली तरी तिची मदत करत राहायची. यावेळेसही असंच काहीसं घडलं होतं.
नुकताच मंजिरीला एका सो कॉल्ड सजग मावशीचा जाब विचारण्यासाठी फोन आला होता. मावशीच्या वयाचा मान ठेवत मंजिरीने नेहमीप्रमाणे सगळं ऐकून घेतलं. पण त्यानंतर मात्र तिला मानसिक पातळीवर गोष्टी हँडल करणे असह्य झालं. आणि तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीकडे स्वतःच मन मोकळं केलं.
त्या मैत्रिणीने तिला आधी पोटभर रडू दिल आणि तिचा रडण्याचा भर ओसरला. तसं तिने मंजिरीशी त्या विषयावर बोलायला सुरुवात केली.
" हे बघ मंजिरी हे तुझ्यासोबत आज पहिल्यांदा घडत नाहीये. तू जितक्या वेळा या लोकांना संधी देत राहशील तितक्या वेळा हे सर्वजण असेच वागत राहणार आहेत. तुझ्या त्या बहिणीला तू एकदाच खडसावून का सांगत नाहीस की हे सगळं करणं बंद कर. तू तिच्याकडून कर्ज घेतलं आहेस का?की तिला दिलं आहेस? एखाद्या व्यक्तीशी नातं आहे म्हणून स्वतःला स्वतःच्या शारीरिक मानसिक मर्यादेच्या बाहेर जाऊन त्रास देत ते नातं निभावण्यात कुठला शहाणपणा आहे ? मी गेले कित्येक वर्ष बघतीये अगदी शाळेपासून. आता तर तुम्हा दोघींची लग्नही झाली आहेत. तुम्हाला तुमचे संसार आहेत मग तरीही तूच तिची मदत करावी असं का?"
"आणि जेव्हा तुला मदतीची गरज असते तेव्हा ती तोंडावर तुला नकार कळवते हेही मी अनुभवलं आहे. मान्य आहे की आता इतक्या वर्षात तिने सर्व लोकांच्या समोर तुझी जी इमेज उभी केली आहे ती सहजासहजी पुसली जाणार नाही."
"पण तुला एक सांगू,जी लोक दुसऱ्यांच्या सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवतात ना ती आपली जवळची लोकं नसतात. जी लोक प्रत्यक्ष आपल्याशी बोलतात, आपल्या संपर्कात असतात, आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगी स्वतःहून आपल्या सोबत संवाद साधतात ती आपली जवळची माणसं असतात आणि त्यांना अशा कुठल्याही गोष्टीने फरक पडत नाही."
" तुझ्या सुदैवाने तुझ्या आयुष्यात अशी लोक आहेत आणि ही लोक तुला कधीही एकटं सोडून जाणार नाहीत. त्यामुळे मला आता असं वाटतं की तुला तुझ्या आयुष्यातल्या चांगल्या लोकांवर लक्ष केंद्रित करायची गरज आहे. आणि तुझ्या बहिणी सारख्या लोकांना एका सेफ डिस्टन्स वर ठेवून जगायला शिकण्याची ही गरज आहे.
"तू नातं तोड, संपर्क बंद कर असं मी अजिबात म्हणणार नाही. पण ज्या गोष्टी केल्याने तुला त्रास होतो त्या गोष्टी मर्यादेच्या पलीकडे जाऊन करू नकोस. चांगलं वागण्याचे जरी पैसे पडत नसले तरी प्रत्येक व्यक्तीशी चांगलं वागण्याची गरज नसते आणि ज्या व्यक्ती स्वार्थी, अप्पलपोटी स्वभावाच्या असतात त्यांच्याशी गरज नसताना चांगलं वागलं की आपल्याला पैशांपेक्षाही जास्त मोठी किंमत मोजावी लागू शकते.
आणि हाच धडा तुला तुझे अनुभव शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत एक गोष्ट लक्षात घे अनुभव चांगला असो किंवा वाईट तो नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतो. आपल्याला ते शिकण्याची खरच गरज असते नाहीतर अनुभव सातत्याने रिपीट होत राहतात. "
"आणि हे वाईट अनुभवांच्या बाबतीत प्रकर्षाने घडतं. ते घडल्यानंतर आपण मात्र मीच का? हा प्रश्न विचारत बसतो. त्यापेक्षा ह्यावेळी मला काय शिकणं गरजेचं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारावा बरेच प्रॉब्लेम्स चुटकीसरशी सुटतात. समजतंय ना मी काय म्हणते ते?" मंजिरीच्या मैत्रिणीने तिच्या डोक्यात टपली मारत विचारलं.
"समजलं, सगळं समजलं आणि आजपासून हे सगळं करण्याचा प्रयत्नही करणार आहे. माहित आहे मला सुरुवातीला थोडा त्रास होईल, जड जाईल, मी सातत्याने लोकांना काय वाटेल?लोक काय म्हणतील? याचा विचार करून चिडचिड करेन. पण हळूहळू मला लक्षात येईल की मी आयुष्यातली बरीच वर्ष नको त्या लोकांचा विचार करून, त्यांना मदत करून स्वतःला त्रास करून घेतला आहे."
" चांगलं वागणं हा माझा स्वभाव धर्म आहे आणि तो मला सोडायचा नाहीच. पण कोणाशी आणि किती चांगलं वागायचं हे मात्र आता माझ्या हातात असेल. आणि त्यावरचा होल्ड मी सुटू देणार नाही.", मंजिरीचं बोलणं ऐकून तिची मैत्रीण गालातल्या गालात हसत म्हणाली, "चला मुलगी शिकली प्रगती झाली." आणि दोघीजणी खळखळून हसू लागल्या.
तर मंडळी मंजिरीला तर लक्षात आलं की तिला काय करायचे आहे. तुम्हालाही कळलं ना? मग आता त्यानुसार आपल्या वागण्यात काय बदल करायचे यावर विचार करायला सुरुवात करा. नाहीतर चांगलं वागण्याच्या बदल्यात बरंच काही गमवावे लागतं हे तुम्हाला माहित आहेच.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वत:ला_शोधताना
#गौरीहर्षल
टिप्पण्या
नकळत बोध मिळाला
धन्यवाद 🙏
😊