बोलनेसे सब होगा

#बोलनेसे_सब_होगा

मीनल आणि स्नेहल दोघी नणंद भावजय होत्या. स्नेहल मिनलच्या भावाची बायको. सतत हसतमुख,प्रसन्न चेहरा, वेळ कशीही येवो खंबीरपणे सगळं निभावून नेणारी. त्याउलट मीनल सतत चिडचिड, रागराग करणारी, अवघड प्रसंगी इतरांकडून अपेक्षा ठेवणारी. 

पण आपसात मात्र दोघींचं मस्त पटत होतं. शेवटी दोघी एकाच वयाच्या होत्या न. स्नेहल च्या लग्नाला आता वर्ष होत आल होतं. वर्षभरात मीनल स्नेहलच वागणं बघत होती. मिनलच्या आईबाबांनी, दादाने आवाज चढवला तर मीनल मध्ये पडत असे पण स्नेहल मात्र शांतपणे तिला काय म्हणायचं आहे हे नंतर स्पष्ट शब्दांत सांगत असे. परिणामी हळूहळू सतत चिडखोर असलेलं घर आता शांतपणे एकत्र बसून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागलं होतं. 

मिनलवरही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट झाला होताच. काही दिवसातच तिचंही लग्न झालं. ती सासरी आली. तिच्या कुटुंबाप्रमाणेच कुटुंब होतं. 5 माणसं फक्त. मिनलच्या नणंदेच शिक्षण सुरू होतं. 

चिडखोर मिनलच्या वागण्यात लग्नानंतर बराच फरक पडला होता. कारण सासरी आधीपासूनच वातावरण शांत होतं. सगळेजण मिळून मिसळून वागणारे, चेष्टा मस्करी करणारे असे होते. 

सासुसासरे तर मिनलला मुलगी असल्यासारखेच वागवत होते. मिनलला कुठलीही बंधनं नव्हती. ना साडी नेसायचं टेन्शन आणि ना घरातील कामांची पूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. ती , सासू आणि नणंद तिघी मिळून सगळं करत होत्या. आणि सुटीच्या दिवशी तर चक्क तिचे सासरे आणि नवरा निखिल स्वयंपाकघर सांभाळत होते. 

हे सगळं जवळून बघायला मिळत असल्याने आता फक्त मिनलच्याच नाही तर तिच्या माहेरच्या लोकांच्याही स्वभावात फरक पडू लागला होता. ते सुद्धा मिनलच्या वहिनीला स्नेहलला आता जास्त प्रेमाने वागवू लागले होते. 

सासरीच भरभरून माहेरचं सुख अनुभवणारी मीनल आता माहेरच्या बदलांमुळे पण खुश झाली होती. 

पण म्हणजे सासरी सगळंच गोडगोड होतं असं नाही फक्त वादविवाद होणार अशी परिस्थिती हाताळण्याची पद्धत वेगळी होती. 

पण एके दिवशी मात्र ह्या वातावरणात एक वादळ येऊन धडकलं. मिनलच्या आतेसासूबाई मंदा … 

त्या सगळ्याच बाबतीत जरा जास्तच कडक होत्या. मिनलच्या सासूबाई तर सोडा सासरे सुद्धा बहिणीला घाबरत होते. 

पण त्या कशाही वागल्या तरी ते दोघे मात्र आनंदाने सगळं करत होते. आठ पंधरा दिवस त्यांच्या छत्रछायेखाली काढल्यानंतर मिनलची अवस्था तुरुंगातल्या कैद्याला सुटका झाल्यावर कशी होईल तशी झाली होती. 

नवरा ऑफिसमुळे आणि नणंद अभ्यासामुळे ह्या सगळ्या गोष्टीतुन निसटले होते. ही नवी नवरी आणि तिचे सासुसासरे तेवढे अडकले. 

आत्या त्यांच्या घरी परत गेल्या तेंव्हा सुटकेचा निश्वास सोडणाऱ्या मिनलला बघून सासुसासरे हसू लागले. 

तशी फुरंगटून मीनल म्हणाली ," काय हो आई , तुम्ही दोघेही मला हसत आहात?", 

"अग हसू नाही तर काय करू ? आम्ही दोघेही हेच झेलत आहोत कित्येक वर्ष तुझी अवस्था पाहून आम्हाला आमचे सुरुवातीचे दिवस आठवले म्हणून हसू आलं.", सासूबाई म्हणाल्या. 

"अग मिनल तुला सांगतो तुझ्या ह्या आईला माझ्या ताईने पहिल्यांदा आल्यावर इतकं पळवले होतं की ती गेल्यावर ही चक्क भांडून माहेरी निघून गेली होती. पण त्या नंतर मात्र हळूहळू आमचा सहवास वाढला, आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. मग आम्ही दोघांसाठी आणि स्वतःसाठी एक नियम केला की इतर कुणाच्या वागण्याचा परिणाम स्वतःच्या मनस्थितीवर , नात्यावर होऊ द्यायचा नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला आनंद देतेय तर तो भरभरून घ्यायचा. आणि त्या वेळी इतर कोण काय म्हणतंय हे अक्षरशः एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. ", सासरे म्हणाले. 

" आता तूच आठव , तुझं आणि निखीलच (मिनलचा नवरा) आत्या आल्यापासून किती वेळा वाजलं. भलेही तुम्ही इतरांसमोर काही दाखवलं नाही बाळा पण आम्हाला ते जाणवलं. त्याच्याशी बाबा बोलणारच आहेत पण तू सुद्धा लक्षात घे. सगळ्यात आधी तुम्ही दोघे एकमेकांशी बांधील आहात. तू खुश असशील तर तो आपोआपच होईल आणि तो असेल तर तू होशील. म्हणून आपल्या आनंदाची जबाबदारी आपल्यावर घ्या. नातं जास्त खुलेल. बाकी भांडणं हवीच ती नसतील तर नवराबायकोचं नातं फक्त फॉर्मलिटी होऊन राहतं. ", सासूबाई बोलत होत्या पण त्यांना थांबवत सासरे मधेच बोलू लागले. 

"आत्या आपल्याकडे का येतात माहीत आहे? कारण त्यांच्या कडे सगळेच असे फॉर्मल वागतात एकमेकांशी. पण तो त्यांचा प्रश्न आहे. तिथे जे त्यांना अनुभवायला मिळत नाही ते त्या इथून घेऊन जातात. आमच्यावर चिडतानाही त्यांच्या मनात मिळणाऱ्या प्रतिक्रियांची ओढ असते. संवाद कसाही झाला तर तो त्यांना हवा असतो. म्हणून आम्ही दोघेही लहान होऊन त्यांचा हा हट्ट पूर्ण करतो. "

"तरीच त्या दिवशी निखिल चिडून गेला तर त्या मला म्हणाल्या की आता गप्प बसून राहू नको त्याची समजूत काढ. बोल त्याच्याशी. ", मीनल विचार करत म्हणाली. 

" हो त्या अशा म्हणाल्या कारण निखिल त्या बाबतीत त्यांची कार्बन कॉपी आहे त्यालासुद्धा रुसला की लाड करून घ्यायला आवडतात. आणि बरका दुसरं कुणी रुसलं तरी निखिल त्यांचे तेवढेच लाड करतो. म्हणजे तुला भरपूर स्कोप आहे वसुली करायचा. चल आता मस्तपैकी आपल्या तिघांसाठी कॉफी करून आणते. तोपर्यंत तू आणि बाबा एवढी भाजी निवडून ठेवा. ", असं म्हणून सासूबाई हसत हसत उठून गेल्या. 

आणि तिच्या डोळ्यांसमोरून त्या दिवशीचा प्रसंग सरकू लागला. 

निखिलच्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटाच्या एका विशिष्ट कप्प्यात ठेवलेल्या असायच्या. अशीच कुठली तरी फाईल त्याला त्या दिवशी सापडत नव्हती. आणि त्यावरून त्याची चिडचिड सुरू होती. 

मिनलला हाक मारली तर ती कामात असल्याने लगेच येऊ शकली नाही. त्यावरून त्याने बडबड सुरू केली. झालं शब्दाने शब्द वाढला आणि मिनल चिडून जिव्हारी लागेल असं काही तरी म्हणाली. 

निखिल दुखावला. आणि मग तो तसाच ऑफिसमध्ये निघून गेला. तिथे गेल्यावर त्याच्याही लक्षात आलं की तो जी फाईल शोधत होता ती त्याने ऑफिसमध्येच ठेवली आहे. झालं साहेबांच्या लक्षात आलं की आपण ग्रँड माती खाल्ली आहे. पण मग काय करायचं? मग त्याने ठरवलं की ह्या बाबत बाबांशी बोलून मिनलला काही तरी सरप्राईज द्यायचं. 

दोघानाही आपापली चूक कळली, त्यांनी ती मान्यही केली. आणि शेवटी सगळं नीट झालं पण त्या साठी प्रयत्न सगळ्या घराने केले. घरं अशीच तर उभी राहत असतात एकमेकांना समजून घेत, चुकता चुकता शिकत हो की नाही? 

मंडळी, कुठल्याही नात्यात सगळ्यात जास्त काही महत्वाचं असेल तर तो असतो संवाद. 
 
आणि हा संवाद जर हेल्दी असेल न तर बरेच गैरसमज चुटकीसरशी दूर होतात. 

एखादी व्यक्ती आपल्याला जर आपल्या आयुष्यात हवीहवीशी आहे तर त्या व्यक्तीसोबत संवाद होत राहणं गरजेचं आहे. ती व्यक्ती रुसली तर तिचा रुसवा नक्की काढा. होईल त्याचा तो नीट असं म्हणून सोडून देऊ नका. 

माणूस दुखावलेला असताना त्याला एकटं सोडलं न की तो अजून जास्त दुखावतो. नकळतच त्याच्या मनात माझी कुणाला गरज नाही, मी कुणासाठी महत्वाचा नाही असे विचार घर करू लागतात. 

ज्या व्यक्ती हळव्या मनाच्या असतात त्या बऱ्याचदा अशा घटना मनाला लावून घेतात. आणि स्वतःला त्रास करून घेतात. परिणामी त्यांची मनस्थिती तर खराब होतेच पण आजूबाजूचं वातावरण सुद्धा खराब होतं. 

आणि हो , स्त्री असो किंवा पुरुष कुणालाही देवाने दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे ओळखण्याची शक्ती दिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटत, तुम्ही कशामुळे हर्ट झाला आहात हे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट शब्दात सांगा. अस केल्याने गैरसमज टळतात आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा हळूहळू तुम्हाला काय आवडतंय, काय म्हणायचं आहे हे लक्षात येऊ लागतं. 

आरोप- प्रत्यारोप, हेवेदावे , अबोला ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन व्यक्तींच्या नात्यावर आणि इतरांवरही होत असतो तेव्हा हे टाळण्यासाठी संवाद साधत राहा. 

मीच करायचं का? हा इगो , अहंकार नाती आणि आनंद सगळंच संपवू शकतो. सो , त्याचा हात धरून स्वतःचं नुकसान करून घेण्याआधी एकदा तरी तुमच्या नात्यातले आनंदी क्षण आठवा इतके दिवस आपण हे नातं का धरून ठेवलं आहे ह्यांचं उत्तर सापडेल. 

शेवटी गुगलची एड आठवा बोलनेसे सब होगा 😂 
११.५.२०२२
#स्वतःला शोधणारी मी 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

टिप्पण्या

प्रज्ञा म्हणाले…
अगदी बरोबर आहे. डोळ्यात अंजन घातलं ताई तुम्ही.
Varsha Gaikwad म्हणाले…
खर आहे, संवाद महत्वाचा,किती तरी प्रॉब्लेम्स बोलल्याने सॉल्व होतात पण आजकाल हाच संवाद हरवत चालला आहे.
Swapnali C Jadhav म्हणाले…
Natyamadhe sanvad kiti mahatvacha aahe he khup chan samjavalet Tai
Smita Prashant म्हणाले…
खुप छान. पटलयं अगदी
स्वप्नाली म्हणाले…
खूपच छान ताई,छान पद्धतीने समजून सांगितल आहे.
🙏
सुचेता सुळे म्हणाले…
खुप छान, छोट्या गोष्टी चा बाऊ न कर
ता शांतपणे हाताळायला हव्यात

अनामित म्हणाले…
खूप छान 🥰

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...