बुधवार, २५ जानेवारी, २०२३

Twisted थॉट्स लेख ४ सर्च फॉर द सोल्युशन

#Twisted_थॉट्स लेख ४
सर्च फॉर द सोल्युशन

माणूस हा समाजशील प्राणी आहे हे १००% मान्य आहे मला. पण माझा एक प्रश्न आहे की माणसाला प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी इतरांच्या स्विकृतीची गरज का पडते? 
म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असू तर अशा गोष्टींबद्दल एकवेळ समजू शकेल पण जिथे तुम्हाला स्वतःचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तिथे इतरांच्या होकार नकाराची वाट का बघत बसायची??? 
उदाहरण द्यायचे झाले तर, समजा मला खूप डिप्रेस वाटतंय, घरात कटकट सुरू आहे त्यामुळे मूड खराब झाला आहे किंवा काही करावंसं वाटत नाहीये... मग ह्यातून बाहेर मलाच पडायला हवं ना? 

माझे आईवडील ,भाऊ बहीण ,बायको/ नवरा, प्रियकर/ प्रेयसी, सासुसासरे, मित्रमैत्रिणी काहीतरी करतील मग माझं आयुष्य बदलेल असा विचार का??? 

त्रास कुणाला होतोय तुम्हाला मग इतरांनी काही का करायचं? हा प्रश्न एकदा स्वतःला खडसावून विचारा. 

असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी प्रयत्न करतात. 

उपाय शोधला की नक्की सापडतो. कारण विश्वाचा एक महत्वाचा नियम आहे जिथे प्रश्न आहे तिथेच त्या प्रश्नाचं उत्तर सुध्दा आहे. पण उत्तर सहजपणे मिळालं तर आयुष्य कसं काय पुढे सरकेल? सो उठा , आपल्या वागण्याचं चिंतन करा, वही पेन घ्या, प्रॉब्लेम लिहून काढा, त्यांची वर्गवारी करा, सहजपणे सुटणारे , थोडेसे अवघड , जास्त अवघड अशी किंवा तुम्हाला जशी सुचेल तशी. इथे कसलीही बंधनं नाहीत. 

मग सगळ्यात आधी सोप्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करा. एकावेळी एकच प्रॉब्लेम समोर घ्या. तो सोडवण्यासाठी काय करता येईल हे सुद्धा लिहून काढा. 

कुणाची मदत हवी असेल तर ती न लाजता मागा. मदत मिळाली तर उत्तमच पण जर नाही मिळाली तर इतर मार्ग शोधा. 

लगेचच काही चमत्कार घडणार नाही ह्या गोष्टी हळूहळू घडणार हे स्वतःला स्पष्टपणे सांगा. 

बरं आता हे एवढंच करायचं का? तर नाही ह्या सोबतच स्वतःला सतत चांगल्या मनस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी एखादं आवडीचं काम सुरू करा. काही गोष्टी निसटून गेल्या असतील त्या करायला सुरुवात करा. 

निसर्ग , पशुपक्षी आणि लहान मुले हे निगेटिव्ह गोष्टींपासून दूर जाण्यासाठी खूप प्रभावीपणे मदत करतात आणि ती नकळत अन् निरपेक्षपणे. ह्या तिन्ही घटकांना फक्त निस्वार्थीपणे देणं माहीत असतं. 

ह्यापैकी तुम्हाला ज्याच्यासोबत वेळ घालवायला आवडेल आणि शक्य असेल त्यासोबत आवर्जून वेळ घालवा. 

बऱ्याचदा ह्यांच्यासोबत केले जाणारे निरर्थक वाटणारे संवाद खूप मोठया प्रॉब्लेमची उत्तरं चुटकीसरशी सापडून देतात. ट्राय करा. 


समस्या कधीच मोठी नसते आपण तिला मोठं करत असतो. 

आपल्याच समस्येकडे जर आपल्याला एका परक्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या नजरेने बघता आलं ना तर फार लवकर बदल घडू शकतात. 

लक्षात घ्या इथे आपल्याला इतरांवर नाही स्वतःवर काम करावं लागणार आहे. आणि तुमचं मन, मेंदू इव्हन शरीरसुध्दा ह्या सगळ्या गोष्टींचा कडाडून विरोध करणार आहे. कारण वर्षानुवर्षे त्याला स्पून फिडिंगची सवय लागली आहे. 

कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. कष्टाला पर्याय नसतो. 

वाटेत अनेक अडचणी येतात, प्रलोभने येतात पण जर त्या वेळी तुम्ही स्वतःला समजावू शकलात न की आत्ता हे कष्ट कर, हा त्रास सहन कर तर तुम्हाला हवं ते नक्की मिळतं. 

शेवटी स्वतःच्या पायावर उभे राहून आपण जे काही मिळवतो त्याचा आनंद वेगळाच असतो. तो कुणी आयत्या वाढून आणलेल्या ताटात जेवल्यावर मिळत नाही. 

इथे एक छोटीशी गोष्ट सांगते, माझ्याकडे एक नुकतच लग्न ठरलेली मोठ्या कंपनीत काम करणारी तरुण इंजिनिअर सहज म्हणून आली होती. तिला काही छोट्या छोट्या गोष्टींबद्दल प्रश्न होते आणि त्यावर तिला उत्तरं सापडत नव्हती. सो आमचं सेशन ठरलं होतं. 

ती आल्यावर सगळ्यात आधी मी तिला अभिनंदन म्हणत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावर ती म्हणाली, "मॅम फक्त लग्नच नाही नोकरीच्या आयुष्यासाठीही द्या , येत्या काही महिन्यात प्रमोशन होणार आहे माझं सहा आकडी पगार होईल.रात्र रात्र जागून केलेल्या मेहनतीचं, आणि इच्छा असूनही न करू शकलेल्या कितीतरी गोष्टींचं फळ मिळतंय फायनली. " 

मी - "इंडिड , हे सर्वस्वी तुझं यश आहे आणि यु डिझर्व इट. पण आता नेमकी काय समस्या आहे? " 

ती - "समस्या अशी नाही खरंतर, तुम्हाला हसू येईल सांगितलं तर पण सांगते. लग्न ठरलं आहे , मला जस हवं होतं तस स्थळ आहे . लग्नही आमच्या दोघांच्या भेटीगाठी आणि सगळं चेक केल्यावर होत आहे. तस म्हटलं तर सगळंच जुळून आलंय पण मला न जसजशी पुढचा विचार करते तसतशी एक काळजी वाटते." 

मी -" काय?"

ती - " मॅम आम्हाला न करण्यासारखं काहीच नाहीये लग्नानंतर. म्हणजे त्याच्या आईबाबांकडे गावी त्यांचं मोठं घर आहे. बँकबॅलन्स भरपूर आहे, सो त्यांनी पुण्यात पण दोन सेपरेट घरं घेतली आहेत. एक त्यांच्यासाठी आणि एक आमच्यासाठी. माझ्याकडेही सेम परिस्थिती आहे. गाड्याही सेपरेट आहेत सगळ्यांच्या टूव्हीलर, फोर व्हीलर. आणि आमचे वाढते पगार बघता आम्ही कॅशमध्ये काहीही आणू शकतो." असं म्हणून ती जराशी थांबली 

मी विचारात पडले की हिला नेमका काय प्रॉब्लेम आहे? 

तीच पुढे बोलू लागली. 

ती - " तर सगळंच आहे आमच्याकडे असं म्हणायला हरकत नाही. पण मी जेव्हा माझ्या बरोबर असलेल्या मित्रमैत्रिणीचे संसार बघते न मला त्यांचा हेवा वाटतो. ते कसं पैसे साठवून , खूप ठिकाणी फिरून एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सगळं करतात. आम्हाला करायला असलं काहीच नाही. म्हणजे आम्ही दोघांनी लहानपणापासून हेच बघितलं आहे की आईबाबांकडे सुद्धा सगळं अचानक नाही आलं त्यांनीही असाच कडूगोड आठवणींसोबत संसार केला आहे. पण आम्हाला मात्र सगळं आयतं मिळतंय आणि असं वाटतंय की बस एवढंच होत का आयुष्य? इतकं कमावतो आहोत पण त्याचं काय करायचं? रुटीन लाईफमध्ये जगत जगत मरून जायचं का? " 

मी काही क्षण विचार करत तिला विचारलं, " तू हे त्याच्याशी बोललीस? तो काय म्हणतोय? " 

ती- "तो म्हणाला की त्यानेही ह्यावर विचार केला आहे पण निदान एक दोन वर्षे हे सगळं जगून घेऊ आणि आपल्याला काय करता येईल ते शोधू. मलाही पटलं त्याचं म्हणणं पण आता तुमच्याजवळ बोलून दाखवल तर जास्त मोकळं वाटतंय. " 

पुढेही असच काही बोलणं झालं आणि मग ती निघून गेली. 

त्यानंतर मात्र डायरेक्ट 4 वर्षांनी तिचा मेल आला विथ सम attachment. गावाकडे जमीन घेत त्यांनी काही गोष्टी करायला सुरुवात केली होती. शिवाय त्याने तिला ट्रेकिंगला नेलं होतं. ह्या गोष्टी तिने आधी अनुभवल्याच नव्हत्या. हळूहळू ती सगळ्यात रमत होती. आणि आता तिने शहरातलं आयुष्य सोडून गावी सेटल व्हायचं ठरवलं होतं. कमावलेल्या पैशातून स्वतःसाठी आणि इतरांसाठीही काय काय करता येईल हे ती शोधत होती. 

लवकरच नवीन पाहुणाही येणार होता. नोकरीच्या रॅट रेसमध्ये धावून जे जगणं हरवलं होतं ते तिने शोधलं होतं. 

तिच्या प्रश्नांची उत्तरं तिनेच शोधली होती. आणि फक्त शोधली नव्हती तर ती उत्तर मान्य करून त्यांच्या परिणामाची जबाबदारी घेत नवीन आयुष्याला सुरुवात पण केली होती. 

आता कुणी म्हणेल की हिला सुख टोचत होतं का? तर नाही तिच्यामध्ये काही तरी करण्याची उर्मी होती आणि ती तिला स्वस्थ जग असं सांगत नव्हती. साहजिकच आहे प्रत्येकाला सगळे जगतात तसच जगायला आवडेलच अस नाही. 

अगदी वरच्या उदाहरणापेक्षा उलट प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला झोकून देत कष्ट करून काही तरी बनून दाखवलेली लोकसुद्धा खूप आहेत जगात. 

इथे दोन्ही गोष्टी एकच कॉमन धागा दाखवतात तो म्हणजे स्वतःच्या समस्येवर स्वतः उपाय शोधला पाहिजे. 

नुसतं बघत बसण्यापेक्षा काही तरी करायला सुरुवात करा.आपल्या क्षमतेचा अंदाज घ्या. मार्ग नक्की सापडतो. 

प्रश्नांची उत्तरं, उपाय, मार्ग , संधी हे सगळं तुम्हाला शोधत येतील जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखलं असेल तर....

आता ह्या गोष्टींवर तुम्हीही थोडाफार विचार करा तोपर्यंत मी घेऊन येते पुढचा twisted थॉट् 

19.4.2022
स्वतःला शोधताना
गौरीहर्षल

#Twisted थॉट्स लेख ३ ऑस्कर, चपराक, गालबोट , आणि मी

#Twisted_थॉट्स लेख ३
ऑस्कर, चपराक, गालबोट , आणि मी

सगळीकडे ऑस्करच्या सोहळ्यात विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉक च्या कानाखाली वाजवली ह्याची चर्चा सुरू आहे. 

पण मला स्वतःला असं वाटलं की ह्याचा इतका उहापोह का होतोय? स्मिथही माणूसच आहे. त्यातून तो जे काही वागला ते जनरली आपल्या माणसांवर प्रेम करणारी माणसे करतातच. 

इथे नवराबायको ह्या नात्यापेक्षा सुद्धा एका शारीरिक आजारामुळे आधीच मानसिक आणि शारीरिक त्रासात असलेल्या व्यक्तीचा त्रास जवळून अनुभवणारी व्यक्ती म्हणून कदाचित कुणीही असंच रिऍक्ट केलं असतं. 

विल स्मिथचा एक इंटरव्ह्यू मी खूप आधी बघितला होता आणि त्यातलं त्याचं म्हणणं मला प्रचंड आवडलं होत. 

तो म्हणाला होता की, जेडा माझी बायको आहे म्हणून तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी नाही. तिच्या आनंदासाठी तिने प्रयत्न करावेत , तिचा आनंद कशात आहे हे तिला माहीत असेल तर आनंदी रहाण्यासाठी तिला माझी गरज कधीच पडणार नाही. 

असं म्हणणारा व्यक्ती आपल्या जोडीदाराला एक माणूस म्हणून घडण्यासाठी किती छान पद्धतीने सपोर्ट करत असेल ह्यात शंकाच नाही. 

बऱ्याच जणांना त्याचं वागणं भारी वाटलं , ते भारी आहे सुध्दा. पण प्रत्येक वेळी आपली चेष्टा करणाऱ्या, खिल्ली उडवणाऱ्या माणसाला जाब विचारण्यासाठी दुसरं कुणी असेलच अस नाही. 

त्यामुळे ज्यांचा अपमान होतो त्यांनी ही गोष्ट नीट लक्षात घ्यावी की जर अपमानास्पद वागण्याचा विरोध करता येत नसेल तर गप्प बसावे. 

नाही तर स्वतःच्या अपमानाचा जाब स्वतः विचारावा. 

सेल्फ रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे जी आधी आपण स्वतःला द्यावी लागते. 

समोर कुणीही ,अगदी कुणीही असो जर ते तुमचा अपमान करत असतील तर स्पष्ट भाषेत मला हे वागणं आवडलं नाही हे सांगण्याची तसदी घ्यावी. तुम्हीच जर अपमान गिळून गप्प बसून राहिलात तर लोकं तुम्हाला गृहीत धरून पुढची पातळी गाठण्यासाठी वाट्टेल तशे वागतात. 


आता महत्वाची गोष्ट विल स्मिथला ह्याच सोहळ्यात अवॉर्ड मिळालं त्याने त्याच वेळी आणि नंतरपण ख्रिस ची जाहीर माफी मागितली. 

पण कुणी हा  विचार केला का? की ख्रिस च्या एका शेऱ्यामुळे त्याचा स्वतःचा अपमान झाला, समोरच्या व्यक्तीचा झाला , एका मोठ्या सोहळ्यात तमाशा झाला आणि विशेष म्हणजे त्या दिवशी ज्या ज्या लोकांना त्यांच्या कामासाठी पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांच्या आनंदाला गालबोट लागलं. 

आपण कितीही म्हणालो न तरी वाईट गोष्टी प्रकर्षाने लक्षात राहतात त्या सहजासहजी विसरल्या जात नाहीत. 

अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा जर त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या दिवशी  काही चुकीचं घडलं तर नंतर कायम त्रास होतो. कितीही प्रयत्न केला तरी आठवण फारतर पुसट होते पण पूर्णपणे मिटत नाही. 

सो लोक्स एक गोष्ट न प्रकर्षाने सांगावी वाटतेय की दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता येत नसेल न किंवा इच्छा नसेल तर निदान त्यात मिठाचा खडा तरी टाकत जाऊ नका. 

हे त्या सगळ्यांना उद्देशून आहेत जे मुद्दाम , हटकून समोरच्याची मनस्थिती आनंदी दिसली की त्याला सायलेंट ट्रीटमेंट देत त्याचा छळ करतात. 

असं करत जाऊ नका यार माणूस (आणि नियती सुद्धा) आनंदात त्रास देणाऱ्यांनाही तेवढंच लक्षात ठेवतो जेवढं  दुःखात त्रास देणाऱ्यांना . 


आणि नेहमीप्रमाणे सांगते मनापासून जे द्याल ते दामदुप्पट होऊन तुमच्याकडे परत येणार हे नक्की. 

ह्या twisted थॉट्स वर विचार करा भेटू लवकरच 

२९.३.२०२२

#गौरीहर्षल 
#स्वतःला शोधताना

Twisted थॉट्स लेख २ प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन

#Twisted_थॉट्स

प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन 

माझी विचार करण्याची पद्धत थोडीशी विचित्र आणि वेगळी आहे. 

कदाचित आयुष्यात कधीच कुठलीही गोष्ट सहजपणे न मिळाल्याने असेल. पण आता जे काही आहे ते असंच आहे. 

सगळ्यांना ही पद्धत पटेलच असं नाही आणि खरं तर दुसऱ्या कुणाच्या तरी विचारसरणीवर आपण आपल्या आयुष्यात काही ही करू नये असं माझं वैयक्तिक आणि परखड मत आहे. 

मी कुठल्याही कामात हात घालण्याआधी पूर्वतयारी करते. 

पूर्वतयारी म्हणजे काय करते? 
तर, 
----- स्वतःला आणि स्वतःच्या मनाला त्या कामाच्या स्वरूपाची कल्पना देते.

-----त्यानंतर कामाला किती वेळ लागू शकतो आणि त्यासाठी काय काय एडजस्ट करावं लागेल हे लक्षात घेते. 

----- एकदा का वरच्या गोष्टींचा अंदाज आला की मग स्वतःला पुन्हा एकदा विचारते की सुरू करायच का? कारण एकदा एखादी गोष्ट हातात घेतली की मग काहीही झालं तरी आणि कितीही अडथळे आले तरीही ते काम पूर्ण करायचंच हे माझं तत्व आहे. आणि at any cost मी ते पाळतेच. 

----- मनाकडून एकदा कन्फर्म झालं की माझा मेंदू वेगाने कामाला लागतो. प्राथमिक जुळवाजुळव करतो. पहिल्यांदा काय करायचं, कुठून सुरुवात करायची , म्हणजे किती लवकर अपेक्षित परिणाम दिसेल ह्यावर त्याचं एक अंदाजपत्रक रेडी असतं. जमतील तेवढ्या शक्यता पडताळून तो पाऊल उचलण्यासाठी सज्ज होतो. 

----- ह्या सगळ्यात तो एक मुद्दा प्रकर्षाने मांडतो आणि तो असतो बॅकअप प्लॅन.... समजा सगळं नीट करूनही काम फिस्कटलं तर??? अशा वेळी मन निराश होणं साहजिक असतं मग काय करायचं? मग दुसरा प्लॅन लगेच अमलात आणायचा. आणि तो सुद्धा फसला तर? 

-----तर मात्र माझ्या मेंदूकडे रामबाण उपाय असतो... तो म्हणजे फार फार तर काय होणार आहे? हा प्रश्न तो स्वतःला विचारतो? 

आणि मग सगळ्या नकारात्मक शक्यता पडताळल्या जातात. असं घडलं तर काय होईल?तसं घडलं तर काय होईल? आपल्याला काय करावे लागेल? हे सगळं तो नीट समजून सांगतो. 

आता कुणी म्हणेल आधीच नकारात्मक विचार केल्यावर कस होणार? 

इथे मला एक सांगावं वाटतंय, इथे नकारात्मक विचार केला जात नाही तर नकारात्मक सिच्युएशन निर्माण झालीच तर डगमगून न जाता त्यावर उपाय काय करता येईल हे आधीच ढोबळमानाने ठरवलं जातं. 

उदाहरण द्यायचे झाले तर, आपली एक महत्वाची मिटिंग आहे , प्रेझेंटेशन तयार आहे, बाकीही तयारी झाली आहे पण मनात थोडी का होईना धाकधूक आहेच खरतर असतेच तर तिचं काय करायचं? 
मी सगळं नीट करेन आणि होईलच हा आत्मविश्वास आहेच पण समोरच्या व्यक्तीला जे अपेक्षित आहे तेच ते असणार आहे असं मी ठामपणे नाही सांगू शकत, कारण ती व्यक्ती तिच्या मनस्थिती, परिस्थिती नुसार विचार करणार आणि त्याच्यावर माझा काही कंट्रोल नाही. 
सो सगळ्या सुरळीत चालू गोष्टींमध्ये अनपेक्षित ट्विस्ट येण्याची शक्यता आहेच, असतेच. 

मग मी काय करायचं ? मी मला वर्स्ट सिच्युएशन साठी तयार ठेवायचं? होऊन होऊन काय होणार आहे? किंवा होऊ शकतं? काम होणार नाही बर मग मी हीच गोष्ट अजून कुठे प्रेझेंट करू शकतो का? उत्तर हो असेल म्हणजे चला काही तरी आहे हातात. 

आपण जर आपल्या हातातलं काम १००% प्रामाणिकपणे करत असू तर जनरली १००% ते ९९.९९% च्या मध्ये काही न काही तरी मिळतच मिळतं. 

मनाला तयार करण्यामागे मुख्य हेतू हा असतो की त्याला १% अपयशाबद्दलही विचार करायला वेळच मिळत नाही. कारण त्याच्यासमोर इतके सगळे पर्याय मेंदूने उपलब्ध करून ठेवलेले असतात की तो त्यांच्याबद्दल विचार करण्यात बिझी होतो.

जशी एखादी कुशल गृहिणी ऐनवेळी एखादा पदार्थ कमी पडला तर काही तरी डोकं लावून वेळ मारून नेतेच. कारण तिचा मेंदू अशा सिच्युएशन बाबत आधीच अलर्ट असतो. घरात आलेले पाहुणे आणि शिजवलेलं अन्न ह्यांच्या प्रमाणाचा क्षणार्धात अंदाज लावून तिचा मेंदू पुढे काय करायचं ह्याचे निर्णय घेऊ लागतो.  तसच हे ही असतं. 

आपण चुकलो तर काय होईल ही भीतीच मनातून निघून जाते. आणि त्यामुळे मेंदू जास्त सजगपणे /एफिशियंटली समोरच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. 

दरवेळी नकारात्मक गोष्टी वाटच अडवतात अस नसतं. कधी कधी त्याच नकारात्मक गोष्टींचा वापर विटेसारखा करून पुढे जाण्यासाठी मार्ग तयार करता येतो. 

आफ्टर ऑल कशाला डोक्यावर बसवायचं आणि कशाला पायाखाली घ्यायचं हे ठरवता आलं पाहिजे. 

प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन आणि मॅजिक बघा हातात जे येईल ते तुम्हाला चार पावलं पुढेच घेऊन जाईल ह्याची खात्री मला आहे. 

आपण नकळतच ह्याचा आधी कधीतरी वापर केला असेल हे ही तुम्हाला आठवेल. कदाचित स्वतःसाठी किंवा जवळच्या कुणासाठी तुमच्या तोंडून हे वाक्य नक्की आले असेल, " चल रे करून तर बघू, जे होईल ते होईल , पण ट्राय तर करू 😉" म्हटला आहात ना? 

आठवून सांगा तोपर्यंत मी पुढचा twisted थॉट घेऊन येते. 

आणि हो वरती म्हटल्याप्रमाणे ही माझी पद्धत आहे. गरजेचं नाही की ती तुम्हाला पचेल. अन् तशी जबरदस्तीही नाही. 
सो नाही पटलं , झेपलं तर सोडून द्या. आणि आपल्या कामाला लागा. 

ह्या जगात कुणीही रिकामटेकडं नसतं प्रत्येकाला काही ना काही काम सोपवण्यात आलं आहे. नुसतं बसून राहणाऱ्या माणसाला सुध्दा तस मुद्दाम बसवलेल असतं कारण त्याने इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नये म्हणून😂 
त्यांना बसू द्या नाही तर ते तुमची कामं वाढवतील 🤣


#twisted_थॉट्स
#लेट्स_चेंज_द_वातावरण
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

Twisted थॉटस् लेख १

Twisted थॉट्स 

प्रश्न तुमचा मग उत्तरही तुम्हीच व्हा. 

निराश वाटतंय, नको नको झालंय मनस्थिती, परिस्थिती मध्ये बदल तर हवा आहे पण घरात बसून कस होईल?

मग काय करायचं? 

स्वतःच स्वतःला चियर अप करा. 

स्वतःसाठी नवीन काही घडवून आणण्यासाठी काही मायनर म्हणजे छोटे छोटे बदल करून बघा. 

जमलं तर वेल अँड गुड अन् नाही जमलं तर???

तर कुणी सुळावर थोडी चढवणार आहे? 
पुन्हा नवीन मार्ग वापरून बघूया. 
आयुष्य आपलं आहे मग ते जगण्यासाठी , भरभरून जगण्यासाठी हातपाय पण आपल्यालाच हलवावे लागणार आहेत. 
मेंदू आणि मनही आपलंच आहे मग त्यांना योग्य ट्रॅकवर पण आपणच आणलं पाहिजे हो की नाही? 

मी माझ्या अनुभवातून, शिक्षणातून , साधनेतून जे काही उपाय स्वतःसाठी, ओळखीच्या लोकांसाठी वापरले ते सांगणार आहे. 

तुम्हाला आवडले , पटले तर वापरून बघा आणि रिझल्ट मिळाला तर सांगून बघा , रिझल्टच्या प्रमाणात वाढ होईल. 
तुमचा फायदा डबल होईल ही खात्री. 

बाकी? बाकी कळेल की हळूहळू. 

साईबाबा म्हणतात न, "सबर का फल मिठा होता है।" 
मग असणारच हो ना? 

भेटू लवकरच इथेच. 
योग्य शंका असतील तर नक्की कळवा. नाव न वापरता पुढच्या भागात उत्तर दिले जाईल. ज्यामुळे सगळ्यांनाच उपयोग होईल. 

०४.०२.२०२२
गौरीहर्षल

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

प्रीप्लॅन प्रवास

#प्रीप्लॅन_प्रवास 

एका उंच टेकडीच्या टोकावर नेहमीप्रमाणे निसर्गाची कृपा होती. आजूबाजूचा सगळा परिसर सदैव हिरवाईने नटलेला  असायचा. 

ती तिथून जात असताना एकदा तिला तिथे थांबण्याचा योग आला. As I always say , ह्या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट ही pre planned असते. तुमची इच्छा असो किंवा नसो घडणाऱ्या गोष्टी घडतातच. 
तिचंही असंच झालं. मनाविरुद्धच का होईना पण ती गाडीमधून बाहेर पडून एका मोठ्या दगडावर जाऊन बसली. 

काही क्षणातच तिला जाणीव झाली की इथं काही तरी आहे आपल्यासाठी थांबलेलं. तिने पायातील सँडल काढून टाकले आणि पाय वर घेऊन  बिनधास्त मांडी घातली. डोळे आपसूकच मिटले गेले. 

हळुवारपणे एका वेगळ्या विश्वात प्रवेश झाला. प्रचंड प्रसन्न वातावरण, हवेत ऊबदार थंडावा जो सगळ्या गात्रांना हळूहळू रिलॅक्स (शिथिल) करत होता. भान हरपून ती ते अनुभवत होती. 

संवादाची वेळ जवळ आली होती, तसे आपोआपच मनपटलावर शब्द उमटले. 

"हुशार झालीस की तू , हळूहळू का होईना कधी कुठे काय तुझ्यासाठी योजले आहे कळतंय तुला. आता हेच बघ ना, इथून तू कित्येक वेळा ये जा केली आहेस. पण स्वतःहून कधी थांबलीस का? नाही मग शेवटी आज तुला कारण काढून थांबवावं लागलं कारण ही जागा तुझी केव्हाची वाट बघत होती." 

"माझी वाट? का?" ,तिने विचारलं. 

"तुला देण्यासारखं काही तरी आहे न तिच्याकडे, मग ते तुला द्यायला नको? तू काही स्वतःहून कुठली गोष्ट मागत नाहीस ना माणसाला, ना देवाला, ना इतर कुणाला. तुला फक्त देणं ठाऊक. स्वतःचे हात सदैव देण्यासाठी खुले ठेवून इतरांच्या ओंजळी भरण्यात तुला काय मिळतं ते तुलाच माहीत न? " 

"बरोबर आहे, देताना नाही लक्षात येत माझ्या की घेणाऱ्याला पारखून घ्यावं. पण मुळात जी गोष्ट देण्यासाठीच माझ्याकडे आली आहे ती मी ठेऊन घेऊन काय करणार? असही एकदा हातातून जे निसटले ते निसटले, मग तो क्षण असो, प्रसंग असो, माणूस असो किंवा अजून काही. पुन्हा माघारी फिरून बघण्यापेक्षा समोरच्या मोकळ्या झालेल्या वाटेकडे माझं लक्ष जास्त असतं. शेवटी मला जायचं तर तिथेच आहे न जिथे माझं मन घुटमळत आहे ह्या जन्मी आणि आधीच्या कित्येक जन्मांपासून कुणास ठाऊक? "तिने पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. 

"हं, पण तू एक गोष्ट विसरतेस? आपण एक प्रयोग केला होता आठवतोय? तो संपर्क कायमचा तुटला असं सांगितलं होतं? ",त्यांनी आठवण करून दिली. 

"हो, चांगलंच आठवतंय , ते कसं विसरेन मी? जवळची व्यक्ती म्हणून किती आणि काय काय शेयर केलं होतं मी. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझा तुम्हा सर्वांशी संपर्क तुटला आहे, क्षणार्धात त्या व्यक्तीने पलटी मारली. 
किती आणि काय पातळी गाठली होती माझा पाणउतारा करताना. थोडं जरी कळत असतं तिला तर हे पण कळलं असतं ना की मी तुम्हाला सोडू शकते पण तुम्ही कधीच मला सोडणार नाही. 
तेव्हा पासून तर माझ्या व्यक्त होण्यावर फिल्टर लावले आहेत. माझे अनुभव, संवाद, संकेत, आदेश सगळे आता योग्य वेळी व्यक्त होण्याची वाट बघत आपल्या जागी आहेत. त्यात रोज नव्याने भर पडतेय पण काय उपयोग? मी नाही सांगू शकत कुणाला...."तिने तिचा त्रागा व्यक्त केलाच. 

"तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर, माणसाची जात आहे ही खाल्ल्या मिठाला जागत नाही. जो वाचवायला येतो त्याच्यावरच उलटते. बरोबर? म्हणूनच आम्हाला ही असं वाटतं की सध्या तरी आपलं काम जसं आहे तसेच राहूदे. वेळ आली की बघू. तोपर्यंत तू अभ्यास कर माणूस नावाच्या क्लिष्ट विषयाचा....बरं ह्या जागेला तुला जे द्यायचे आहे ते घेऊन जा जाताना आठवणीने.....",असं म्हणत त्या आवाजाने तिला बंद डोळ्यासमोर एक वाट दाखवली आणि ती त्या वाटेवरून चालत निघाली. 

वाटेवरून पुढे आल्यावर तिला जाणवलं की ती  त्याच टेकडीवर आहे पण आता तिथे तिच्या निसटलेल्या आठवणी मूर्त रुपात आहेत. ती आणि तिचं आनंदी जग , जिथे कुठल्या ही वाईट भावनेला थारा नाही. आहे ते फक्त प्रेम फक्त तिच्यासाठी .... असही निसर्ग आणि पशुपक्षी म्हटलं की तिचं जग पूर्णच होत होतं.

 माणसांच्या जगाशी आपलं नातं फक्त कर्तव्यभावनेपुरत ही गोष्ट तिला जेव्हापासून समजली होती तेंव्हापासून तिचं मन फक्त एकच गाणं म्हणायचं,

"जब यार करे परवाह मेरी
मुझे क्या परवाह इस दुनिया की
तू जीत मेरी जग हार मेरी 
मैं हूं ही नहीं इस दुनिया की....
तुम ही दिन चढे 
तुम ही  दिन ढले 
तुम ही हो बंधू 
सखा तुम ही ..."

नकळतच डोळे पाझरत राहिले. उघडले तेव्हा अस्ताला जाणारे भास्करराव तृप्त झालेल्या तिच्या डोक्यावरून आपले हात फिरवत जणू काही सांगत होते. 
"सगळं होईल तुझ्या मनासारखं.... तुझ्या संयमाचा साक्षीदार माझ्याशिवाय दुसरा कोण आहे?"

शेवटी त्यांच्याकडूनच तर शिकली होती ती देत राहूनही काही न मागणं..... 
(२८ जानेवारी २०२२ नवीन वर्षातला पहिला अनुभव )

#स्वतःला_शोधताना
#अनुभवाच्या_पोतडीतून
#मी_आणि_माझे_अध्यात्मिक_अनुभव
#गौरीहर्षल

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

स्वतःला घडवण्यासाठी बॅच 3

#स्वतःला_घडवण्यासाठी बॅच 3
#संकल्प2023 #21dayschallenge 
2023 हे वर्ष सुरू होताना आपल्या आजूबाजूच्या काही लोकांना अतिशय छान पद्धतीने काहीतरी देता यावं या संकल्पनेतून जन्माला आला स्वतःला घडवण्यासाठी हा 21 दिवसांचा कोर्स. 
 ज्याच्यामध्ये वेगवेगळे 21 टास्क पूर्ण करणे हे बंधनकारक आहे सुरू करताना कुठेतरी माझ्या स्वतःच्या आणि माझ्याबरोबर सगळ्या प्रवासात जोडल्या गेलेल्या वंदना ताईंच्या मनात सुद्धा ही गोष्ट होती की जवळपास 50 पेक्षा जास्त जणी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. 
 वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या या सगळ्या मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करतील.  त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठपर्यंत पुश करावे लागेल. 
 पण पहिले तीन दिवस सोडले तर चौथ्या दिवसापासून आम्हाला अक्षरशः अतिशय छान पद्धतीने प्रतिसाद आमच्या या सगळ्या मैत्रिणींकडून मिळतोय. 
 मी नेहमी म्हणते की आयुष्यातली कुठलीही गोष्ट दत्तगुरूंच्या इच्छे शिवाय घडत नाही. 
 आणि इथे ह्या कोर्सच्या बाबतीतही ती गोष्ट खरी ठरली. 
 कुठेतरी काचकूच करणारे आमच्या दोघींचं मन या सगळ्या रिस्पॉन्स नंतर जास्त उत्साही झाले आहे. 
 आणि पहिली गुगल मीट पार पडल्यानंतर आमच्या सगळ्या मैत्रिणींकडून आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या.  त्यानंतर मात्र आम्हाला कळलं की आम्ही कुठेतरी योग्य मार्गाने जात आहोत.

काही बोलक्या प्रतिक्रिया इथे शेअर करत आहोत....

विमल ताई , 
काल ची Google meet ही एक सुरुवात वाटली वेगळ्या प्रवासाची....जिथे  सख्या भेटल्या तुमचं सर्व काही ऐकून घेणाऱ्या.. हा एक छान प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणीही तुम्हाला तुमच्या रंग रूप,स्वभाव या वरून  judge करत नाही......
खऱ्या अर्थाने सख्या भेटल्या..... Really blessed that I am part of the journey.......Thank you so much Gauri and Vandana Tai🙏🙏🙏🙏

शीतल ताई, 
कालची google meet as usual खूप मस्त झाली. एक एकीचे प्रश्न ऐकून असं वाटत होतं की अरे हे प्रॉब्लेम्स तर आपल्याला पण होते किंवा आहेत.. म्हणजे आपण एकट्याच नाही आहोत.. म्हणजेच आपले प्रोबल्स जगा वेगले नाही आहेत पण आपण आपल्याच दुःखात इतके गुंतलेले असतो की आपल्याला त्याच्या पलीकडे काही दिसतच नाही.. खरं तर इतक्या दिवसांच्या टास्क आणि विश्वास ग्रूप मुळे कळले की आपल्याला गरज आहे फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची.. आपलेच दुःख खूप मोठे करून ठेवले की solution शोधायला आपण जातच नाही.. गौरी ताई आणि वंदना ताईंमुळे तेच खरं शक्य झालंय.. की दुष्टिकोन बदला आयुष्य नक्कीच सुखकर होईल.. ते म्हणतात ना की 'तुझे आहे तुझ पाशी परी तू जगा चुकलासी..' तसेच काहीसे.. 
पण या ७ दिवसांमध्ये चुकलेल्या जागा पण कळत आहेत आणि आपल्या पाशी काय आहे ते पण..

डॉ. गौरी 
Thank you... छान झाली meeting... बऱ्याच जणी मोकळ्या झाल्या.. आपल्या सारखे अनेक आहेत हे समजल्यामुळे एकत्र प्रवासाला अजूनच अर्थ वाटू लागला. वंदना ताई आणि गौरी... मार्गदर्शन खूप छान करता तुम्ही दोघीही . आणि ते लक्षात राहते. प्रॅक्टिकल असते खूप. न कंटाळता ऐकून घेत असता दरवेळी आमचे बोलणे. आणि छान प्रत्येकाच्या कलेने समजावून सांगता. 🙏🏻

सुप्रिया मते, 
गूगल मीट  ही फक्तं भेट नसून कोणाला विचारू शकत नसलेल्या प्रश्नाचे उत्तर आणि तेही  positive वे मध्ये मिळण्याचे व्यासपीठ आहे.  इथे प्रवास चालू केल्या पासून अवघड वाटणारे नाते, प्रासंगिक गोष्टी सहज सुलभतेने हाताळायची आणि त्यातून मार्ग काढायची सवय लावून गेलय . Thank you so much.

रेवती ताई,
काल ची meet एक आरसा असल्यासारखी च झाली. आपण सर्व जणी एकाच नावेच प्रवासी आहोत ही जाणीव खूप प्रकर्षाने झाली. . एक कोणी प्रश्न विचारत होतं, पण उत्तर मात्र सर्वांनाच मिळत होते. . 
मुख्य म्हणजे काय तर आपण आपण स्वतः कसे आहोत ह्याचा स्वीकार करणे आणि स्वतः वर काम करणे एवढंच आपल्या हातात असतं. . .हे कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आपल्या सर्वांचीच आहे, पण जर रोजच्या प्रश्नांची उत्तरं आपण प्रामाणिकपणे दिली स्वतःलाच आणि त्याचा सराव केला तर आपोआप आपण केव्हा वळू हे ही आपल्याला समजणार नाही. .  
गौरी ताई आणि वंदना ताई तुमच्या ऐकण्याच्या कलेचं खरच मनापासून कौतुक. . आणि सर्व सहप्रवासीयांचं अभिनंदन कारण आपण स्वतः ला घडवण्याचा 1 सात दिवसांचा टप्पा अगदी प्रामाणिकपणे पार केलाय. . सर्व जणी ह्याच energy नि पूर्ण दिवस असेच पूर्ण करू आणि स्वतःतल्या नवीन स्वतःला समोर आणू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

आणि त्यासाठीच पुन्हा एकदा 16 तारखेपासून आम्ही स्वतःला घडवण्यासाठी ह्या 21 दिवसांच्या तिसरी बॅच सुरू करत आहोत. 

बऱ्याच जणांना शंका आहेत की आम्ही काही फिजिकल टास्क वगैरे देतो का? तर अजिबात नाही.  सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे टास्क आहे ते सगळे रायटिंग टास्क असतात.  लिहिण्याचे टास्क आहेत.  स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये एका डायरीमध्ये तुम्हाला हे टास्क लिहायचे आहेत. 
 टास्क काय असतील आणि ते कसे करायचे याचे मार्गदर्शन, त्याबद्दलच्या शंकांचे निरसन, रोज ठराविक वेळेला व्हाट्सअप ग्रुप मध्ये करण्यात येईल. 

 सात दिवसांचा एक टप्पा असेल आणि  दर सातव्या दिवशी  गुगल मीट असेल.  ज्या गुगल मिट मध्ये सात दिवसांचा आढावा घेतला जाईल. प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने लिहिली गेली, ते लिहिताना काय काय अडथळे आले?, काय गोष्टी अनुभवल्या? आणि काय गोष्टी बदलण्याची गरज आहे? या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाईल. 

 तर तुम्हाला जर स्वतःच्या दिशेने एखादा पाऊल टाकण्याची इच्छा असेल तर नक्कीच स्वतःला घडविण्यासाठी हा त्याच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. 
 आणि जर आपल्या आजूबाजूला कोणाला या गोष्टींची गरज असेल तर तुम्ही त्यांनाही त्या गोष्टी सांगू शकता. 
सहभागी होण्यासाठी खाली दिलेली इमेज नीट वाचा. 
बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#गुरूवार #संकल्पदिन 
#आई_राजा_उदो_उदो
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

एकटेपणा की गोल्डन पिरियड?

एकटेपणा की गोल्डन पिरियड
खूप जण तक्रार करत असतात की तुम्हाला काय कळणार आहे?आम्ही आयुष्यात काय भोगलं आहे?आम्ही किती एकटे आहोत? आमच्या सोबत कसं कोणीच नाही आहे. 
अशा सगळ्यांना मला एक सांगावसं वाटतं एकटेपणा....मग तो तुम्ही स्वीकारलेला असू दे किंवा तुमच्यावर लादलेला असू दे. जेव्हा तुम्हाला त्या एकटेपणाचा सदुपयोग कसा करायचा हे कळतं ना तेव्हा तुम्हाला तो एकटेपणा किंवा आपलं कोणीच नाहीये ही भावना कधीच छळत नाही. 

 आता कुणी म्हणेल की हे कसं काय करायचं आहे? 
तुमचा आनंद, तुम्हाला कशात आहे हे माहित असतं ती गोष्ट करण्यासाठी सुरुवात करायची. 
 सुरुवातीला मन विरोधच करतं. मग टंगळमंगळ करायला सुरुवात करतं. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ती गोष्ट करायला सुरुवात करतात. तेव्हा हळूहळू मनाला सवय लागते ते इकडे तिकडे भटकत नाही. व्यवस्थित लक्ष देऊन काही गोष्टी करायला सुरुवात करत. 

 आणि मग अशा वेळेला आपल्या लक्षात येतं की अरे इतके दिवस आपण इतरांच्या सहवासासाठी जे गळे काढून रडत होतो, आता त्या गोष्टीवरून आपली जरा सुद्धा चिडचिड होत नाहीये. 
 माझ्या आयुष्यातही अशा गोष्टी झालेल्या आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात जिथे तुम्हाला कधी ना कधीतरी एकटं राहावं लागतं, एकटं राहण्याची वेळ येते. 
अशा वेळेला स्वतःला एकटं फील करून घ्यायचं की त्या मिळालेल्या एकटेपणाचा फायदा करून घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं. 

काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की तू ह्या गोष्टीला कसं डिस्क्राइब करतेस?म्हणजे तू सातत्याने सांगत असतेस की मला दत्तगुरूंचा सहवास मिळतो, ते माझ्याशी बोलतात किंवा त्यांच्याकडून मला संकेत मिळतात. तेव्हा मी एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नच बर का ... कारण काय होतं माहितीये का? जी गोष्ट तुम्ही ऑक्सिजन सारखी अनुभवत असता ती गोष्ट शब्दात नाही मांडता येत. 

 मी दिलेलं उत्तर असं होतं,जसं मी एखाद्या व्यक्तीशी समोर बसून बोलते, एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलते, अगदी त्याच पद्धतीने मी त्यांच अस्तित्व माझ्या आयुष्यात मान्य केलेल आहे. त्यासाठी ते मला दिसलेच पाहिजेत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला त्यांचं अस्तित्व जाणवलंच पाहिजे हा माझा अट्टाहास अजिबात नसतो. दिवसातले 24 तास, आठवड्याचे सातही दिवस, महिन्याचे तीस दिवस ते सातत्याने माझ्या आजूबाजूला आहेत एवढा विश्वास मला त्यांच्याशी नॉन स्टॉप बडबड करण्यासाठी पुरेसा असतो.  

पण म्हणून मी सतत बोलत असते का? तर नाही बऱ्याच वेळेला हा संवाद मनातल्या मनात सुरू असतो. काही गोष्टी असतात ज्यांची उत्तरं सातत्याने विचारली जातात. प्रश्न मी विचारत असते, कधी मला उत्तर मिळतं,कधी कधी मिळत नाही. 
 कधी कधी एक शांतता असते. जी मला कुठेतरी सुरुवातीला खूप जास्त इरिटेट करून जायची. पण हळूहळू लक्षात आलं जेव्हा शांतता असते तेव्हा आपल्याला वेळ दिली जाते आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी की आधी तू अभ्यास कर, तू कष्ट घे, अगदीच तुला उत्तर नाही सापडलं तर मी देतो,मी कुठे पळून चाललोय? 
आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक बाबतीत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची सवय नकळत माझ्या मनाला लागली. आज मला जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा नकळत माझ्या तोंडून काही गोष्टी बाहेर पडतात, उत्तर बाहेर पडतात, हे सगळं काही त्यांचं क्रेडिट आहे. 
 त्यांनी माझ्याकडून माझ्या एकटेपणाला अक्षरशः गोल्डन पिरीयड करत जो काही अभ्यास करून घेतलेला आहे त्याचा मला फायदा होतो.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला मिळालेल्या एकट्या वेळेचा तुम्ही गोल्डन पिरियड बनवणार की अजून काही? 
5.1.2023
#गुरूवार #संकल्पदिन 
बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल