दुर्गे दुर्घट भारी भाग १

#दुर्गे_दुर्घट_भारी १



काही गोष्टी घडून येण्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागते. काही गोष्टी आपोआपच योग्य वेळी घडून येतात. 

पण अनुभूती मात्र तुमच्या तयार होण्याची वाट बघत असते. कारण जोपर्यंत ते अनुभव त्यांची ताकद पेलण्यास तुम्ही मानसिक पातळीवर तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचा आवाका कळण्याची सुतराम शक्यता नसते. 

वेगळी वाट जेव्हा आपल्यासाठी तयार केली जात असते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. स्वतःला आणि जवळच्या लोकांना अगणित शारीरिक यातना , मानसिक पातळीवर उलथापालथ, आजूबाजूला ज्यांच्यावर आपला अतिविश्वास असतो अशा कित्येकांचे खरे रूप समोर येते. कित्येकदा आपण कोलमडून पडतो. असे आणि ह्यापेक्षा विचित्र असे कित्येक प्रसंग तुमच्यासोबत घडतात. 

आता कुणी म्हणतील अस का? तर त्याचं उत्तर एकच आयुष्यात पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्या पातळींवर सक्षम करणे. कुठलाही आणि कसलाही प्रसंग आला तरी तुम्ही न डगमगता त्या गोष्टींचा सामना करावा म्हणून हा सगळा प्रपंच. 

बऱ्याच जणांना वाटत असते अरे वा ह्याचं बरंय ह्यांना अध्यात्मिक अनुभव येतात, देव ह्यांना सतत सुखात ठेवतो. 
तर अस अजिबात होत नाही. अध्यात्मिक अनुभव आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या, भोग, त्रास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 

अध्यात्मिक अनुभव घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला प्रापंचिक त्रासातून सुटका मिळत नाही. रादर बऱ्याचदा लोकांच्या समस्या सोडवताना त्यांच्या त्रासातून काही गोष्टी स्वतःकडे येतात आणि स्वतःच्या त्रासात भरच पडते. पण असो काही गोष्टी टाळता येत नाहीत. 

हे सगळं लिहायचं प्रयोजन म्हणजे मला माझे अनुभव मांडण्यासाठी परवानगी दिली गेली. पण लिहावं काय ते मात्र माझं काही ठरत नव्हतं. कारण खूपदा मी आजूबाजूला बघितलं आहे की कुणी जर असे अनुभव लिहिले तर त्या व्यक्तीची , त्याच्या अनुभवांची खिल्ली उडवली जाते. मला स्वतःला ह्या गोष्टी खूप त्रासदायक वाटतात. 

आय मिन तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तुम्ही ती अनुभवली नाही म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात नाही असं नसत न.... नाही पटत , नाही आवडत मग सोडून द्या, वाद घालू नका असं माझं साधं सोपं मत आहे. 

तर आता वळते माझ्या गोष्टीकडे. 

ही खरंतर माझी गोष्ट नाहीये. ही त्यांच्या आणि माझ्या सोबतीची गोष्ट आहे. जे कुणी माझं लेखन वाचतात त्यांना आत्तापर्यंत माझी दत्तासोबत असलेली मैत्री, त्या मैत्रीमुळे मला आलेले अनुभव , माझ्या अनुभवांमुळे लोकांना आलेले अनुभव हे माहीत असेलच. 

घरात दत्ताशी गप्पा ह्या लहान असताना सुरू झाल्या होत्या. पण आपल्या बाबतीत काही गोष्टी वेगळ्या घडतात, काही वेगळे अनुभव येतात , हे मात्र सगळ्या देवांवर रुसून त्यांचं करायचं सोडलं तेंव्हा कळायला लागल्या. 

करायचं का सोडलं? तर लग्नानंतर सात वर्षे माझ्यासाठी प्रचंड अवघड होती. सततच्या हॉस्पिटलमध्ये वाऱ्या, महिनाअखेरीस पदरी पडणारी निराशा, पुनः त्याच चक्रातून जाणे, मग सततचे गर्भपात त्यातही क्यूरोटीन , त्यानंतरच डिप्रेशन हे मी सात वर्षे अनुभवलं. माझ्याप्रमाणे बऱ्याच जणींनी असे अनुभव घेतले असणार. आणि हाच काळ माझ्या परीक्षेचा काळ होता. 

वैतागून एके दिवशी मी सगळं करायचं बंद केलं. पण  करायचं बंद केलं होतं बोलायचं नाही. मला सतत समोर असलेल्या फोटोंशी , देवघरात असलेल्या मूर्तींशी बोलायची सवय होती. काही झालं की सांगायचं , मग ते चांगलं असुदे किंवा वाईट. तो संवाद कधीच थांबला नाही. म्हणजे तस म्हणायला गेलं तर फक्त रूढ मार्ग सुटला होता, पूजाअर्चा, जपजाप्य ह्यांचा. पण मनाने जी नाळ जोडली गेली होती ती मात्र त्या काळात अजूनच बळकट होत गेली. 

क्यूरोटीन करून आल्यावर माझ्याकडे असलेल्या फोटोंशी मी जशी भांडायचे तशीच त्यांनाच जवळ घेऊन रडरड रडायचे सुद्धा. माझ्या बलिशबुद्धीला तेंव्हा सतत काही तरी चमत्कार घडावा अस वाटत असायचं. आणि तस मी भावनेच्या भरात बोलून दाखवायचेही. पण नंतर लक्षात यायचं अरे आपलं आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाहीये. इथे गोष्टी त्यांच्या वेळेवरच घडतील. त्यात काही करू शकत नाही. मग अशी माझ्याकडूनच माझी समजूत घातली जायची. 

ह्या सगळ्या प्रवासात मी माझ्याच वागण्याचं सतत आत्मपरीक्षण ही करायचे. एखाद्या गोष्टीची इच्छा तीव्र होऊ लागली की स्वतःला विचारायचे हे सगळं इतकं गरजेचं आहे का? आतून उत्तर आलं की मग पुढचा मार्ग शोधायचा. 
हळूहळू माझा प्रवास स्वतःच्या दिशेने होण्याकडे माझी वाटचाल सुरू झाली. 

दत्तभक्ती नसानसात भिनलेली होती पण आपण राहून राहून महिषासुर मर्दिनीकडे का ओढले जातो हे काही कळायला मार्ग नव्हता. 

ही अगदी ताजी म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलेली गोष्ट हं! इतकी वर्षे मी माझा वाढदिवस रामनवमीच्या आदल्या दिवशी दुर्गाष्टमीला येतो म्हणून माझं नाव गौरी ठेवलं आहे एवढंच जाणून होते आणि त्यातच खुशही होते. पण अलीकडच्या काळात जेव्हा गोष्टी बघण्यात वाचण्यात आल्या तेंव्हा समजलं की अरे हे सगळं खूप विलक्षण आहे. 

चैत्र शुद्ध नवरात्र दुर्गाष्टमीला तर तुळजाभवानीचा उत्पत्तीदिन असतो.  आता मात्र मला माझ्या बाबतीत घडणाऱ्या कित्येक गोष्टींचा अर्थ लागायला सुरुवात झाली. 

आपली जन्मतिथी , आपलं जन्मगाव(तुळजापूर)  आणि आपलं सध्याच राहण्याच ठिकाण(अहमदनगर) हे सगळे तुळजाभवानीशी इतके संलग्न आहेत की आपण काही संबंध नसताना लग्न होऊन सासर सोडून अहमदनगर मध्येच कस काय स्थायिक झालो ? हे सगळं कोडं क्षणार्धात सुटलं.

माझी जन्मभूमी तिची कर्मभूमी आहे  आणि तिची जन्मभूमी तिने माझी कर्मभूमी  बनवली. माझ्यासाठी हे सगळंच फील गुड लेव्हलवर न थांबता पुढच्या टप्प्यावर आलं होतं. 

आयुष्यात अजून काही विलक्षण गोष्टी वाट बघत होत्या आणि त्या माझ्या तयारीची वाट बघत होत्या. 

ती वेळही आली माझ्या आयुष्यातील तुळजाभवानीच्या सहवास पर्वाची सुरुवात झाली चैत्र शुद्ध प्रतिपदा , गुढीपाडवा २०१८. त्या वर्षीची दुर्गाष्टमी स्पेशल होती. बाय ऑल मिन्स. 

मी तिला एकच गोष्ट विचारली , "आफ्टर ऑल धिस टाइम?" 

तिने हसून उत्तर दिलं, " ऑलवेज " 

आणि निश्चिन्तपणे तिच्या हातात स्वतःला सोपवत मी ह्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज झाले. 

#आई_राजा_उदे_उदे  

#महाष्टमी ३ ऑक्टोबर २०२२

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
खरच, खुपच जीवनाशी संलग्नित आहे. का असा प्रश्न विचारयाचा नसतो. अनुभूती नेच समजले. 🙏🙏
अनामित म्हणाले…
Tumche margdarshan asech chalu rahu de
ऋताली म्हणाले…
काय सुरेख मेळ आहे कर्मभूमी जन्मभूमी
हे वाचल्यावर तर अजूनच खात्री पटली की जे होतं ते त्यांच्या मर्जीने
🙏🏻🙏🏻🙏🏻

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव

comparison 2/8