दुर्गे दुर्घट भारी भाग 2

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग २ 

आय नो मंडळी बरेच दिवस गॅप घेऊन भाग येतात. पण काय करू जुन्या गोष्टी आठवून त्यातून मोजकंच आणि महत्वाचं तुमच्यासमोर मांडायचं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा सगळं रिकॉल करावं लागतं. 

तर आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो ते २०१८ गुढीपाडवा ह्या दिवसापर्यंत. 

मार्च २०१८ च्या गुढीपाडव्याला आम्हाला पुन्हा एकदा कळलं की आम्ही आईबाबा होणार आहोत. पण ह्यावेळेस चार महिने थांबून मग पुन्हा हुलकावणी ह्या चक्रातून जाण्याची आमच्या दोघांची तयारी नव्हती. कारण नुकत्याच जानेवारीच्या सुरुवातीला माझ्या सासूबाई आकस्मिकपणे आम्हाला सोडून गेल्या होत्या. त्यातून पुन्हा हे सगळं म्हटल्यावर मी तर अक्षरशः डॉक्टराना कन्फर्म होत नसेल तर लगेच सांगा म्हणून मोकळी झाले. 

पण ह्यावेळेस बऱ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या. बातमी कळली गुढीपाडव्याला आणि त्यानंतर मला ज्या ज्या दिवशी चेकअप साठी बोलावलं होत त्या प्रत्येक दिवशी काही तरी विशेष असायचं. 

म्हणजे पुढचं चेकअप झालं रामनवमीला तेंव्हा डॉक्टर स्वतः होपफुल होते. पण अर्थातच त्यांनी माझी अवस्था पाहून काही खोटी आशा दाखवली नव्हती. 

आणि माझी हो नाही करता करता शेवटी माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली हनुमान जयंतीच्या दिवशी. तो किस्सा मी सेपरेट लिहिला आहे तुम्हाला थोडा शोध घेतला तर सापडेल 
हनुमान जयंती आणि हार्टबीट अस नाव आहे. 

पण हनुमान जयंतीच्याच पोर्णिमेला प्रेग्नन्सी कन्फर्म होणं हा अजून एक छान संकेत होता. 

त्यानंतर मात्र माझ्या बाळासोबत माझा एक नवीन प्रवास सुरू झाला. बसल्या जागी माझी बऱ्याचदा तंद्री लागत होती. आणि पहिल्यांदा माझी तंद्री लागली तेंव्हा मी थेट थेऊरच्या मंदिरात होते. 

तिथे मी एका बाजूला उभी राहून एका दिशेने बघत होते. 

जे कुणी गेले असतील त्यांना माहीत असेल की मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. तर मला एक खूप तेजस्वी चेहऱ्याचा 2,3 वर्षाचा मुलगा तिथे खेळताना दिसत होता. आणि एक हिरव्या रंगाची साडी नेसलेली लांबसडक केस असलेली स्त्री पाठमोरी उभी होती. तो मुलगा इकडे तिकडे मस्ती करून पुन्हा तिच्याकडे जात होता.

 मी वेगवेगळ्या कोनातून त्या स्त्रीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होते. पण 4,5 वेळा प्रयत्न करूनही मला तिचा चेहरा दिसला नाही. शेवटी मी हिरमुसून परत जाण्यासाठी वळले तसा माझ्या कानावर खळखळून हसण्याचा आवाज आला. मी गडबडीने वळून पाहिलं पण मला फक्त मळवट भरलेलं कपाळ आणि तिचे डोळे दिसले. 

ते डोळे इतके प्रेमळ होते की त्या अवस्थेत मला जाणवणारा सगळा थकवा दूर झाला. आणि मी तिच्या दिशेने चालायला लागणार तेवढ्यात आमच्या मार्जार 🐈लेकरांपैकी एकाने माझ्या मांडीवर उडी मारून मला जागं केलं. जनरली त्या सगळ्यांच हेच काम होतं वाटतं की मी जास्त उत्सुकता दाखवायला लागले की माझी तंद्री मोडायची😊 . 

तर हे अस काही वेळा घडल्यानंतर मात्र मी नाद सोडून दिला आणि त्या बाळाला बघत बसण्यात धन्यता मानू लागले. सततच्या ह्या संकेतामुळे मला आपल्याला मुलगा होऊ शकतो अस वाटू लागलं होतं. अर्थात आम्हाला काहीही झालं तरी चालणार होतं कारण इतक्या सगळ्या वर्षानंतर होणारे मूल हे सुदृढ असावे एवढीच आमची इच्छा होती. 

एके दिवशी मात्र सकाळी सकाळी साधारणतः दहाच्या सुमारास मी घरात एकटीच होते. आता सहावा महिना लागला होता. आणि आधीच्या हिस्ट्री मुळे मला फारशी हालचाल करायची नव्हती.  पूर्ण बेडरेस्ट वगैरे नव्हतं पण मी आपली जमेल तेवढ घरातलं करून एक जागी बसायचे किंवा लोळत पडायचे. कुणी काहीही शंख केला तरी सध्या आपलं ध्येय 9 महिने नीट पूर्ण करून बाळ जन्माला घालणं हेच आहे हे मी डोक्यात फिट्ट केलं होतं. त्यामुळे किती झोपतेस वगैरे वगैरे सल्ल्याने मला काही फरक पडत नसे. 

तर मी त्या दिवशी अशीच काही तरी वाचत असताना अचानक मला बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर प्रचंड उजेड दिसला. मी उठून काय आहे ते बघणार त्याच वेळी मला डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं वाटलं. मग मीही आहे तिथेच आधी बसले. डोळे बंदच होते. हळूहळू मनाच्या पटलावर शब्द उमटू लागले. 

" किती घाई उठायची? ह्या अवस्थेत अस करायचं नसतं हे माहीत नसेलच म्हणा तुला. पण पुन्हा अस करू नकोस. तसही मी तुला भेटायला आले आहे. पण तुला सध्या तरी मला बघता येणार नाही. तुझ्या डोळ्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळे आपण असच बोलू. " हळूहळू डोळ्यांसमोर एक स्त्री आकृती साकार होत होती. पण अर्थातच त्या आकृतीचं मूळ रूप अजूनही दिसत नव्हतं. पाय मात्र स्पष्ट दिसत होते. आणि आजूबाजूच्या वातावरणात एक चिरपरिचित गंध जाणवू लागला होता. 

हा वास माझ्या खूप जास्त ओळखीचा होता. पण मी पहिल्यांदा कुठे अनुभवला हेच मला लक्षात येत नव्हतं. 

ती जी कुणीही होती ती एक चांगली शक्ती आहे हे मला माहित होतं त्यामुळे मी तिच्याकडून होणाऱ्या संवादात श्रोत्याची भूमिका घेत सगळं मनात साठवून घेत होते. 

हे असे अतर्क्य , वेगळ्या पठडीतले अनुभव येण्याची ही सुरुवात होती. 
हळूहळू ह्या गोष्टी माझ्या रोजच्या जीवनात एक महत्वाचा भाग होणार आहेत असं कुणी मला सांगितलं असतं तर तेव्हाही मी त्यांना वेड्यात काढलं असतं. 
कारण एकच जे मनावर ठसवलेलं होतं की मी कुणीही नाहीये. 

पण मला कुठे माहीत होतं की जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती तिच्या मित्रासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानेच मला योग्य वेळी योग्य गोष्टींची प्रचिती द्यायला सुरुवात केली आहे. 

एकेक टप्पा ओलांडत मी सातव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आले होते. 

इतके दिवस ध्यानाला बसण्यासाठी खळखळ करणाऱ्या मला 9 महिन्याच्या ह्या काळात माझ्या लेकराने जवळपास अर्धा तास तरी बसायची सवय लावली होती. 

अर्ध्या तासात मिळणाऱ्या मनःशांती ची इतकी सवय झाली होती की तसच बसलो तरी चालेल अस वाटायचं. 

त्यावर बसण्याची अनुमती ही नव्हती. कारण आमचा रात्रीचा जागरणाचा वेगळा कार्यक्रम असायचा 😂

आता सांगायला हरकत नाही पण जवळपास पंधरा वर्ष मी जनरली तीन ते पाच जागी असते. त्या आधी मिळणारी झोप मला पुरेशी असते. सुरुवातीला बायोलॉजीकल क्लॉक मग शरीराचं टाईमटेबल आहे असं म्हणत मी येणारे अनुभव उडवून लावले. पण नंतर मात्र आहे हे असंच सुरू राहणार आहे हे माझ्या लक्षात आलं. 

मंडळी , खूप जणांना वाटत हा फाफटपसारा आहे, किंवा ह्यामध्ये काही अद्भुत नाहीये. असे कुठे अनुभव असतात का? तर हो असेच अनुभव असतात हे मी ठामपणे सांगू शकते. कारण मी जेव्हा स्वतःला आरशात बघते तेव्हा मला माझ्या जागी एक सामान्य व्यक्ती दिसते जिला घर, संसार, जबाबदाऱ्या आहेत , जी कधी कधी बरोबर असते तर बऱ्याच वेळेला चुकते सुद्धा, जी चिडते ,रागावते इन शॉर्ट जी एक साधं सरळ सामान्य आयुष्य जगतेय. 

पण ह्या साध्या सरळ सामान्य आयुष्यात त्या शक्तीच्या स्वेच्छेने काही क्षण तिचा सहवास ध्यानात अनुभवता येतो हेच माझ्या जन्माचे सार्थक नाही का? 

हे अनुभव मला मात्र एका मोठ्या जबाबदारीची सतत जाणीव करून देतात आणि ती जबाबदारी म्हणजे माझ्या आतल्या माणुसकीला जिवंत ठेवण्याची जबाबदारी. 

आपल्या सोबत अस कुणीतरी सतत असतं ज्याला फक्त अनुभवता येतं ही गोष्टच तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी बळ देते. 

जाता जाता इतकंच म्हणेन देवाला शोधत इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा देव तिथेच सापडेल. 

तुमची वाट बघत बसलेला ,आणि तुम्ही दिसला की तो हसून म्हणेल, " चांगलं आणि वाईट दोन्ही तुझ्या मध्येच असतं कायम, तू त्यातून काय निवडतोस त्यावर आपली भेट अवलंबून असते. " 

तुम्ही ठरवा काय निवडायच ते☺️ 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  १४ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल





टिप्पण्या

अनामित म्हणाले…
या वरून एक गोष्ट लक्षात येते की पहाटेच्या ध्यानातून आपण बरेच काही आत्मसात करू शकतो. धन्यवाद हा लेख प्रकाशित केला म्हणून.
अनामित म्हणाले…
साक्षात आई ने तुमच्या pregnancy madhe तुम्हाला आणि बाळा la sath dili ahe Ani ajun hi det असेलच .....
अनामित म्हणाले…
अप्रतिम!😊

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी