शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

सुखसंवाद १

#ध्यानसंकेत५ 

#सुखसंवाद 

माझा मित्र - आज का फुगली आहेस तू?

मी - फुगू नाही तर काय करू? लोकांना प्रत्येक गोष्टीत कशी शंका येते?

मित्र - म्हणजे? आता कुणी शंका घेतली?

मी - कुणी स्पेसिफिक अस नाही पण की गोष्ट आपण कधी अनुभवली नाही, जीच्याबद्दल आपल्याला फक्त वरवर माहीत आहे. त्या गोष्टीला फक्त समोरचा व्यक्ती चांगल म्हणतोय म्हणून विरोध करायचा ही कुठली पद्धत?

मित्र - इथलीच पद्धत... माणसाचं कस आहे माहीत आहे का? त्याला स्वतः ला भलेही काही येत नसेल, माहीत नसेल, करायचं नसेल पण समोरचा करतोय न मग आपण खुसपट काढून त्याला विरोध करायचा. आणि समोरची व्यक्ती वैतागली की मग परिस्थितीचा फायदा घेऊन ती व्यक्ती कशी वाईट आहे असं बोंबलत सुटायचं.

मी - हे इन जनरल ठीक आहे म्हणजे मान्यच आहे मला. पण जी शक्ती या सगळ्या जगाला चालवते तिलाही अशीच वागणूक? माणूस खरच इतका मोठा झाला आहे?

मित्र - वागणूक? तुला खरच अस वाटत का की आम्ही अशा कुणाला खिजगणतीतही धरतो? तुझा आवडता कर्म सिद्धांत आहे की त्यांच्याकडे नीट लक्ष देण्यासाठी.
हे बघ प्रत्येक चांगल्या गोष्टीला जितके जास्त विरोधक तितकं जास्त ते काम प्रभावी होतं.
आणि आम्हाला सरसकट सगळ्यांसाठी सगळ नसतच द्यायचं, प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ द्यायचं म्हणजे कमीत कमी लोक आम्ही ठरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार हे नक्की.

मी - हं... कळतय थोडफार. पण कुणी निरर्थक शंका व्यक्त केल्या की चिडचिड होतेच.

मित्र - ती तुझी कधी होत नाही? ते सांग...,🥴 सगळ्यात जास्त वेळा तर तुला माझ्याविषयी नको ते प्रश्न विचारूनच चिडवल जातं 😆 पण कुणी काहीही म्हंटल तरी तू मात्र तशीच आहेस म्हणून तर आम्ही आहोत तुझ्यासोबत. ते तुझ्या स्नेप सारखं After all this time "always". 

आणि मी आपली मनात आलेल्या ओळी गुणगुणत बसले,
शांत माया मूर्ती पहाटेसारखी....

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!!
शुभं भवतु !!!
१२.१२.२०२२

#दत्तात्रेयार्पणमस्तू
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

मॉर्निंग मंत्रा भाग 3

#मॉर्निंग_मंत्रा ३ 

२२ डिसेंबर  २०२२

#थॉट्स_पॅटर्न  (आपला focus कुठे आहे? )

संकल्प आणि नवीन वर्ष ह्यांचा फारच जवळचा संबंध असतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी हे करायला सुरुवात करणार आहे अस आपण बऱ्याचदा ठरवतो पण आपण ते तडीस नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो का? 
तर त्यासाठी काही गोष्टी आपण स्वतःला विचारू शकतो. 

शेवटी ज्यामध्ये बदल घडवायचे आहेत ते आपलं आयुष्य आहे आणि ज्याने बदल घडवायचे आहेत ते आपण स्वतः आहोत. 

काय करता येईल? 
तर सगळ्यात आधी स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. 

खाली दिलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत आणि ती सुद्धा स्वतःला. 

लिहून ठेवा हं उत्तरं....

हुश्श्श.... सुस्कारा सोडला हो न?
 दुसऱ्याशी खर बोलायचं म्हणजे किती खोटं बोलावं लागतं. पण चुकत आहात तुम्ही. कारण माणूस ह्या जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःला उत्तर द्यायची आहेत. 

प्रश्न
1. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं पूर्णपणे थांबवायचं आहे, पण जमत नाही........

2. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं कमी करायचं आहे,पण जमत नाही.........

3. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही सवय लावून घेतली पाहिजे हे कळत पण जमत नाही.......

4. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात आधीपासूनच करत असलेली ही गोष्ट सातत्याने करत राहायची आहे पण जमत नाही.....

5. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ह्या काही चांगल्या गोष्टी करणं वाढवणं गरजेचं आहे पण जमत नाही.....

ज्या व्यक्ती, वस्तू , गोष्टी , प्रसंग मला प्रगती करण्यासाठी अडवत आहेत त्यांना टाळणं मला जमायला हवं. 
आणि ज्या व्यक्ती वस्तू गोष्टी प्रसंग मला प्रगती करण्यासाठी उपयोगाच्या आहेत त्या कडे मी हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित करायला हवं. 

तर मंडळी आपणच ठरवलं आणि झालं अस होत का? नाही होत न? का? कारण आपण आपल्या मनाच्या तालावर नाचत असतो. त्याने म्हटले कंटाळा आलाय,आज नको हे काम करायला झालं .....आपण लगेच ते शब्द पडत्या  फळाची आज्ञा म्हणून मान्य करतो.  आणि हातातलं काम बाजूला सरकवून सोशल मीडियावर स्क्रोल करायला सुरुवात करतो. 

हे टाळायचं आहे? पण कस? 

ते ही सांगेन. पण आत्ता साठी एवढे वरचे प्रश्न स्वतःला विचारून बघा. आणि उत्तरे लिहून ठेवा. 

सो लोक्स, 
आयुष्यात भरायचे असतील हवेहवेसे रंग 
त्यासाठी करावा लागेल चांगल्या विचारांशी संग

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 
#गुरूवार
#संकल्पदिन 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

बंधनापासून उकलल्या गाठी

बंधनापासुनी उकलल्या गाठी

आजही तेच , ती जितकी प्रयत्न करत होती, तितके तिच्या वाट्याला येणारे अनुभव रिपीट होत होते. 
शेवटी शेवटचा उपाय म्हणून तिने डोळे मिटून घेतले आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. 
कोण आहे मी? का म्हणून पुन्हा पुन्हा तेच घडत आहे माझ्यासोबत? हव्यास, अट्टहास हा माझा पिंड नाही आणि कधीही नव्हता. मग पुन्हा तेच का? 

मनात उमटणारे सगळे प्रश्न धडा वाचत असल्यासारखे विचारून ती मोकळी झाली. 

काही वेळ आजूबाजूला आणि मनातही एक निशब्द शांतता पसरली. ती शांतपणे त्या शांततेला शरण गेली. पट्टीचा पोहोणारा कसा आधी पाण्यात भरपूर हातपाय मारून शरीराला थकवतो आणि मग नंतर शांतपणे शरीर सैल सोडून पाण्यावर तरंगत राहतो. तसंच काहीसं......

हळूहळू मनाच्या पाटीवर अलगद शब्द उमटू लागले. 

- अनुभव फक्त शिकवण्यासाठी असतात हे तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. आणि ते सुद्धा अनुभवातूनच आलेलं आहे. तुला असं वाटतंय की तुझे अनुभव सतत रिपीट होत आहेत. पण तू नक्की सगळे मार्ग चाचपडून बघितलेस का? तर नाही.
हे अनुभव असे आहेत, जिथे तू स्वतःची तुलना इतरांशी करतेस. आणि आमच्या दृष्टीने बघितलं तर ती तुलना अतिशय अयोग्य आहे. 

-आता ती गोंधळात पडली. म्हणजे माझं काही तरी चुकलं आहे का? असा प्रश्न तिच्या मनात आला. 

-पुन्हा चुकीचा विचार करत आहेस. तू कुठेही चुकली नाहीस. फक्त ती तुलना सोडली तर. तू शक्यतो त्या गोष्टींची अपेक्षा ठेवतच नाहीस ज्या ह्या जगात सगळ्यांना हव्या असतात. पण कधी कधी हळव्या क्षणी तुझ्या मनाला त्या गोष्टींची , त्या आयुष्याची भुरळ पडतेच. आणि साहजिकच आहे ते. मनुष्यजन्म आहे तो भुरळ पडणं हा त्याचा स्थायीभाव आहे. 

पण तुला ती भुरळ पडल्यावर हे लक्षात येत नाही की तुला त्या दिशेने जायचंच नाहीये. तुझं स्थान, तुझी जागा ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कधीच तयार झाली आहे. 

भुरळ पडून होणारा त्रागा आणि येणारे अनुभव हे तुला हे शिकवण्यासाठी आहेत की तुला ह्या चक्रात आता पुन्हा अडकायचे नाहीये. 

त्यामुळे थोड्याशा गोष्टींवरून कधीतरी once in a while ढळणारा तोल सावरायला शिक.

एकांताला , एकटेपणाला सहजपणे स्विकारलं तर आहेस पण आता तो अजून explore करायला शिक. 

खूप काही अगम्य ,अद्भुत तुझी वाट बघत तुझ्या वाटेवर येऊन थांबलं आहे तुला फक्त त्याचं बोट पडकून पुढे पुढे चालत राहायचं आहे. 

बरंच काही शिकली आहेस पण तरीही खूप काही शिकायचं बाकी आहे. 

तुझ्या त्या आवडत्या हॅरी पॉटरच्या पहिल्या भागात बघ हॅरी डंबलडोरला विचारतो की ,परीस तर वॉल्डमॉर्ट ला हवा आहे, मग माझ्याकडे कसा आला? 
तेव्हा ते काय उत्तर देतात तेच उत्तर तुझ्या परिस्थिती ला सूट होतं
"परीस त्याला हवा आहे मान्य त्याला तो कसा आणि कुठे वापरायचा हे माहीत आहे हे सुद्धा मान्य. पण परीस कसा आणि कुठे वापरायचा हे ज्याला माहीत असूनही तो त्या परिसाचा वापर करायची इच्छाही मनात ठेवत नाही तोच खऱ्या अर्थाने त्या परिसाचा मालक आहे."

शेवटी एवढंच सांगतो last but not least,
जगाच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा अट्टहास करू नकोस. तू वेगळी होतीस, आहेस आणि राहशील. 
Accept it ,after all हे तू कमावलेलं आहेस. 

असं म्हणत तो सुखसंवाद थांबला. 

आणि तिच्या कानात एक सुमधुर स्वर ऐकू येऊ लागला 

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

(अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर ) 
कुणाच्याही आवाजातील ऐका दोन्हीही अप्रतिम🤗❤️

बाकी? बाकी काय आनंदाचे डोही आनंदतरंग!!!

#अनुभवाच्या_पोतडीतून
#treasures_inside_you 
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

#दत्त_दत्त_ऐसे_लागले_ध्यान

#संक्षिप्त_गुरुचरित्र 

 २१ दिवस चॅलेंज 

एखादा मानसिक त्रास सुध्दा तुम्हाला योग्य मार्गावर नेऊन सोडू शकतो. कस? मन:शांती हवी आहे म्हणून मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सुरु केले. आणि हळूहळू मन:शांती सोबत अजून बरच काही पदरात अलगद येवुन पडलं. 

अनुभव पहिला
अचानक तंद्री लागली आणि एक 5 वर्षांची मुलगी समोर आली. आधी साधं असलेलं तिचं रूप एका क्षणांत पालटलं आणि ती काली मातेच्या रूपात दिसू लागली. खोडकर हसून मला फक्त एकच गोष्ट ती म्हणत होती आणि ती म्हणजे मी येऊ का तुझ्याशी खेळायला? तुला खेळायला घेत नाही न कुणी? मी आले की बघ सगळे कसे पळून जातील. तिच्या डोळ्यातले ते खट्याळ भाव माझ्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी पुरेसे होते. 

अनुभव दुसरा
काही कारणांमुळे सतत भीती वाटत होती पण वाचन सुरू केलं आणि मनात एक १४ व्या अध्यायातील त्या ओळी सतत डोळ्यासमोर नाचू लागल्या. कोणत्या? 
न करा चिंता असाल सुखे
सकळ आरिष्टे गेली दुःखे
म्हणोनी हस्त ठेवती मस्तके
भाक देती तयेवेळी ||४४||
असं काही घडण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण आपल्या हळव्या मनाला त्याने स्वतःचं अस्तित्व दाखवून उभारी देण्यासारखा आधार दुसरा कुठलाच नाही. 

अनुभव तिसरा
ज्याचे हृदयीं श्रीगुरु स्मरण 
त्यासी कैंचे भय दारुण
काळमृत्यू न बाधे जाण 
अपमृत्यू काय करी||२७||
त्या दिवशी तिघांच्याही जीवावर आलेलं परस्पर टळल आणि पहाटे पासून मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ लक्षात आला. 

अनुभव चौथा
अडथळा हा प्रकार मला वाचन करायचं म्हटल्यावर कधीच आलेला नाही. उलट सगळं अस काही जुळून येत की मनापासून वाचन करता येत. ह्या वेळी वाचताना तर इतकी अनुकूल परिस्थिती निर्माण होत होती की नकळतच दिवसभर तोंडातून त्याच वाचलेल्या ओळी बाहेर पडत. 
सतत आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असल्याची जाणीव होत होती. 

अनुभव पाचवा
घोरकष्टोद्धरण स्तोत्र सुद्धा रोज ठराविक पटीत सुरू होते. त्यामुळे  एक होत होत कुणी आपलं असो किंवा नसो. एकदा आपण त्याला आपलं सगळ काही मानलं की झालं अस सातत्याने घडून आपोआपच ओठातून हे बाहेर पडायचं. 
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं ।
 त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । 
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

अशाच काही स्मरणीय अनुभवांना ओंजळीत देत दत्तजयंतीच्या दिवशी संकल्प पूर्ण करून घेतला गेला. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात त्यामुळे एकच सांगेन हे कस घडत? अशी शंका जर मनात येत असेल न तर आयुष्यात एकदा तरी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या ईष्ट देवतेला मनापासून शरण जाऊन बघा. 
ह्या गोष्टीतली गंमत, जादू तुम्हाला ही कळेल. 
आणि आता 21 दिवसांच फलित म्हणजे हे सगळं माझ्या सवयीचा भाग झालं आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!!
शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

दत्तजयंती विशेष ७ डिसेंबर २०२२

#दत्तजयंती_विशेष ७ डिसेंबर २०२२

यावर्षीची दत्तजयंती माझ्यासाठी बऱ्याच अर्थांनी विशेष ठरली. एक म्हणजे अगदी दत्त जयंती तोंडावर आलेली असताना करुणात्रीपदीच्या अध्ययन वर्गांबद्दल मला संकेत मिळाले.
 आणि पंधरा दिवसांपूर्वी ते सुरूही झाले. 

 बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की अध्ययन करण्यासारखं यामध्ये काय आहे? पण कुठेतरी मला ह्या गोष्टीची खात्री होती की जर आपल्याला ही गोष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेल आहे ,तर त्यामागे त्यांची काहीतरी खूप महत्त्वाची योजना आहे. आणि मी फक्त त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मला दिलेलं काम करण्याचा प्रयत्न केला.
  आपण म्हणतो ना की काही गोष्टी योग्य वेळ आल्यानंतर त्या घडतातच तुम्ही त्या थांबवू नाही शकत. 
 तसंच काहीसं या बाबतीत झालं जेव्हा पहिला वर्ग घेणार असं मी 22, 23 नोव्हेंबरच्या दरम्यान सांगितलं त्यानंतर बऱ्याच स्तरांमधून बरेच रिस्पॉन्स आले आणि जवळपास पहिली बॅच 24 तारखेपासून सुरू सुद्धा झाली.

 गुरुवारी... मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि करुणात्रिपदीचा अध्ययन वर्ग सुरू करणे हा खरंतर दुग्ध शर्करा योग होता. 
 24 ला सुरू झालेली पहिली बॅच काल सात डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी पूर्ण झाली आणि बाकीच्या ज्या दोन बॅचेस होत्या ज्या एक ते सात डिसेंबरच्या दरम्यान घेतल्या गेल्या. 
त्याही काल संपन्न झाल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या सोबतीने अनेक जण नव्याने जोडले गेले.  काही जण आधीपासून सोबत होते काही जण नव्याने या मार्गावर सोबत आले.

 पण मी आधी जसं म्हटले होते की जेव्हा माणूस एकट्यासाठी काही करतो तेव्हा जर त्याला फायदा होत असेल तर समूहाने ती गोष्ट केल्यानंतर काय फायदा होईल कुठेतरी हा प्रश्न मी त्यांना विचारला होता आणि करून बघ असे उत्तर मला आलं होतं. 
 आणि काल मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळालं जे सगळे जवळपास 23, 24 जण या सगळ्यांमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचे चेहरे त्यांच्या चेहऱ्यावर असणारा ते समाधानाच हसू,तो आनंद आणि ह्या दिवसात त्यांना जे काही गवसलं ते म्हणजे शब्दात मांडण्यासारखं नाहीये. 

 भरभरून जेव्हा लोक आपल्याला आलेल्या अनुभूती बद्दल बोलतात.  आणि तुम्ही कुठेतरी त्या गोष्टीचा भाग असतात तेव्हा असं होतं की बापरे देव आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकतोय.  आणि मग नकळतच त्या गोष्टींचा दडपण सुद्धा येत.  पण ज्यांनी ही काम आपल्या हातात सोपवलेली असतात तेच ती कामे पूर्ण करून घेतात.  अगदी व्यवस्थित आपलं बोट धरून सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे त्या गोष्टी करून घेतात, याची प्रचिती मला काल आली .

कोणाला काय काय अनुभव आले हे खरंतर सांगूच नये कारण ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याचे अनुभव अनुभवावेत अशा मताची मी आहे.  पण एक सांगेन की त्या माझ्या विश्वासावर सगळ्यांनी दाखवलेला विश्वास हा माझ्या मित्राने सार्थ केला आणि कुठेतरी दाखवून दिलं की माणसाने आमच्यावर विश्वास दाखवला की आम्ही सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काही गोष्टी करतो. 

आणि खरं सांगते की या तीन वर्गांकडून आलेला रिस्पॉन्स हा भविष्यात अजून अशीच काही काम करण्यासाठी मिळालेले बळ आहे. 

 खरं तर इथे थँक्यू म्हणून अजिबात मी कोणासोबतच असलेल नातं फॉर्मल करणार नाही. 
 मी त्या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे आणि कायम राहीन.  पण  ज्या व्यक्ती मला या प्रवासात आता भेटल्या आहेत त्या सगळ्या व्यक्ती कायमस्वरूपी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत सुरेख आणि अविस्मरणीय अशा अनुभवांचे साक्षीदार झालेल्या आहेत. 

 पहिल्या वहिल्या गोष्टी ज्या असतात ना त्यांचा आनंद हा खूप वेगळा असतो. माझ्यासाठी करुणात्रीपदीच्या पहिल्या तिन्ही वर्गांचा अनुभव हा असाच आनंदाच्या गाठोडे  झाला आहे. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की ह्यावेळी मला त्याच्या बड्डेच मोठं रिटर्न गिफ्ट मित्राने ह्या सगळ्या अनुभूतीच्या स्वरूपात दिलं आहे. अजून काय पाहिजे? 

#फिलिंग_लाईक_आनंदाचे_डोही_आनंद_तरंग 

बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!

#दत्तात्रेयार्पणमस्तू #करुणात्रिपदी 
#गुरूवार #संकल्पदिन
#स्वत:ला_शोधताना
#गौरीहर्षल 

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग 3

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग ३ 

ध्यानाला बसायचं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक अवघड काम असत. पण माझ्या लेकाने पोटात असल्यापासून ही गोष्ट माझ्याकडून करून घेतली. 
जसं आमचा शेरू (बोका) अगदी थोरल्या मुलासारखा माझ्या हालचाली वर लक्ष ठेवायचा तसच लेकानेही सुरू केलं. आधी आपण शेरूचा अनुभव ऐकुया. 
शेरु म्हणायला फक्त बोका होता. पण बाकी सगळं वागणं अगदी घरातल्या मोठ्या माणसासारख. 
रोज तिन्ही सांजेला दिवा लावला की रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे झालच पाहिजे असा त्याचा नियम होता. आता कुणी म्हणेल त्याला काय कळत होतं? पण त्याला कळायचं. ही दोन्ही स्तोत्रं आणि अजून काही स्तोत्रं खंड न पडता ऐकता यावीत म्हणून एका वापरात नसलेल्या फोनमध्ये सेव्ह करून मी ठेवली होती. तो फोन जिथे ठेवलेला असायचा शेरा बरोबर ठराविक वेळी तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करायचा. आणि एकदा त्याला रिपीट मोडवर सगळ लावून दिलं की स्वतःच्या ठरलेल्या जागी बसून ऐकायचा. 
अमावस्या, पौर्णिमा वगैरेच्या दिवशी ते दिवसभर आमच्या घरात हळू आवाजात दोन्ही स्तोत्रं सुरू असायची. 
एक ,दोन वेळा हयगय केली तेंव्हा त्याला आणि इतर लेकरांना त्रास झाला. त्यानंतर मात्र माझी हिंमत झाली नाही. 
मंडळी एक साधी गोष्ट आहे , शेरुला काय कळत होतं हा भाग जर बाजूला ठेवला , तर रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकल्याने माझं जर काही नुकसान होत नाही तर मग उगाचच खुसपट काढून त्याला विरोध करणं हे मी टाळलं.मला काही हातातली कामं सोडून करावं लागणार होत का? तर नाही मग झालं. जस आपण गाणे ऐकतो तसच ऐकायचं. हळूहळू आपोआपच गोडी लागते आणि ती गोष्ट सवयीचा भाग होऊन जाते. 

जनरली बरेच जण विरोध करतात हे मी ऐकल. पण कॉमन सेन्स असलेली कुठलीही व्यक्ती सांगू शकते , ज्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो ते अशा गोष्टींमुळे अस्वस्थ होतात. 
शेरा ने हे सगळ माझ्या पहिल्या गर्भपाताच्या नंतर सुरू केलं होतं. आणि खर सांगू का तुम्ही जर 9 महिने फक्त ही दोन स्तोत्रं जरी ऐकली तरी तुमचं मूल अत्यंत हुशार, चपळ आणि निरोगी जन्माला येतं. 
बाकी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेतच. 
मी स्वतः कुठेतरी अनुभव वाचून गुरूचरित्रामधला चौदावा अध्याय रोज  सहा वेळा वाचायला सुरुवात केली होती. नंतर जेंव्हा तो पाठ झाला तेंव्हा तर मी मोजत ही नसायचे की कितीवेळा म्हणतेय. 
त्या अनुभवामध्ये अस लिहिलं होतं की सहा वेळा अध्याय वाचल्याने होणारी संतती बुद्धिमान, तेजस्वी असते. बस...खरच अस होत की नाही हे बघण्यापेक्षा संतती होण्यासाठी हा उपाय करता येईल एवढच माझ्या मनात होत. आज मला त्याचे परिणाम दिसत आहेत अस मी नक्कीच म्हणू शकते. 

ह्या जगात प्रत्येक समस्येवर उपाय असतात आणि थोडेसे कष्ट घेऊन ते अमलात आणले तर त्यांचं योग्य ते फळही मिळतं. पण आपण काय करतो रडत बसतो, दुसऱ्याकडे बघत बसतो, त्यापेक्षा आपल्याला काय करता येईल हे बघितल तर तुम्हाला स्वतःला स्वतःची मदत करता येईल. 

आता वळूया ध्यान करणे ह्या गोष्टीकडे...
मी काही कुठे जाऊन ह्या गोष्टी शिकले नाही. माझ्या मनाला ज्या गोष्टी पटल्या त्या मी करण्यास सुरुवात केली. 
सुरुवातीला फक्त पाच मिनिटे मी बसायचे. साधारणपणे चौथ्या महिन्या नंतर मी जवळपास जमेल तसं करू लागले. 
त्या दरम्यान काही अनुभव आले त्यातले आजपासून शेयर करत आहे. 

२३जुलै२०१८ आषाढी एकादशी
आजपासून ध्यानधारणा करायला सुरुवात केली. येणारे अनुभव नुसतेच बोलण्यापेक्षा लिहीण्याचं ठरवलं.

साधारणतः 20 मिनिटे बसायचं ह्या हिशोबाने टायमर सेट केला होता. पहिली काही मिनिटे पूर्ण शांततेत गेली. मला फक्त माझा श्वास आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्यानंतर अधूनमधून काहीतरी विचार मनात येत. मग मात्र मी अचानक कुणाच्या तरी मागे चालत निघाले. बोलत होतो आम्ही म्हणजे खरं तर मी बोलत होते , आणि ती व्यक्ती जी पुरुष होता की स्त्री माहीत नाही फक्त हुंकार देत होती. 
थोड्या वेळाने मी एका गुहेसारख्या ठिकाणी पोहोचले. मंद पण अगदी स्पष्ट दिसेल सगळं इतका प्रकाश होता आतमध्ये. समोरच थोड्याश्या उंच अशा ठिकाणी एक धूसर आकृती होती उदाहरण द्यायचे तर शंकराच्या मूर्तीची जी आऊट लाईन असेल तशी. पण तिथे फक्त वलय होतं तेजस्वी. मग माझी नजर अवतीभवती फिरली मी अक्षरशः शॉक झाले. अर्धगोलाकार जागेत जवळपास ९ माझ्या सारख्या दिसणाऱ्या स्त्रिया होत्या. सगळ्यांची वयं 30च्या आसपास. पण चेहरे प्रचंड तेजस्वी, सात्विक, शांत इन शॉर्ट मी जशी आहे त्या विरुद्ध एकदम. प्रत्येकजण ध्यानात मग्न होती  त्यामुळे डोळे कुणाचेही बघायला मिळाले नाहीत. 

दुसरीकडे माझे प्रश्न नॉनस्टॉप सुरू होते. "मी कोण आहे? ह्या कोण आहेत? मी ह्यांच्यासारखी दिसते की ह्या माझ्यासारख्या? पण मी अशी नाहीये इतकी शांत, संयमी वगैरे मग अस कसा?  मला इथे का आणलेत?"

उत्तर आलं,  
"समोर उंचावर असलेल्या मुख्य वलयातून फक्त तूच आहेस, कशाला हवीत सगळी उत्तरं लगेच, वेळ आली की कळेल, खूपच घाई करतेस"

 मग मी त्यांचं निरीक्षण करू लागले त्यामध्ये एकजण होती जी पूर्ण ९महिन्याचं पोट घेऊन बसली होती. मला मी 2 हात अंतरावर असूनही तिच्या पोटात हालचाल करणारं बाळ स्पष्ट दिसत होतं. ते सतत हालचाल करत असूनही ती मात्र ध्यानात मग्न होती. अलिप्त, शांत आणि चेहऱ्यावर इतकं कम्फर्टिंग हसू की बघणारा माणूस रिलॅक्स होईल. मी तिला विचारणार इतक्यात एकजण माझ्याजवळून चालत गेली तिच्या कडेवर बाळ होतं, पण चेहऱ्यावरचे भाव सेम. ह्या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे त्यांचे डोळे खूप प्रयत्न करूनही मला कुणाचेच डोळे बघता आले नाहीत किंवा दिसले नाहीत. हे इतकं सगळं होईपर्यंत अर्थातच माझ्यासारख्या उतावळा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीचा पेशन्स संपला होता मी वळून त्या मुख्य वलयाला काही विचारणार इतक्यात तेच म्हणे मी चाललोय योग्य वेळी सगळी उत्तरं देईन. 
झालं माझ्या तोंडून हट्टीपणे निघालं,"काहीच सांगायचं नव्हतं तर इतक्या लांब आणता कशासाठी? मी चालले परत". आणि बरोबर 16 व्या मिनिटाला माझे डोळे उघडले. #गौरीहर्षल

मंडळी , अशा छोट्या छोट्या अनुभूती मधून मला त्यांनी जे काही शिकवलं तेच आज माझी ताकद आहे. 
 
आज एकच सांगेन, भक्ती, नामजप, पूजा , ध्यान ह्या गोष्टी काही तरी मिळावं म्हणून करण्यापेक्षा त्यातून नवीन काही तरी शिकता येईल म्हणून आनंद घेत करावं. 

आणि एकदा का ती गंमत कळली की ते आपोआपच आपला हात धरून आपल्याला फिरवून आणतात. 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  २२ नोव्हेंबर २०२२ मंगळवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

अध्यात्म म्हणजे काय ? भाग १

#अध्यात्म_म्हणजे_काय_? भाग १

आपण लहानपणापासून काही विशिष्ट आणि ठराविक साच्यातूनच विचार करत आलो आहोत कारण आपल्याला तशीच सवय लागली आहे. आणि तस बघायला गेलं तर त्यात आपली चुक आहे अस काहीच नाही. 

ओव्हरऑल  समरी काढली तर कॉमन पॉईंट हे निघतील

- स्वतःच्या आत्म्यापर्यंत प्रवास
- देवात किंवा त्या शक्तीत लीन होणे
- स्वतःच्या आत्माच्या प्रगतीसाठी 
- स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवणे
- मृत्यू ला शांतपणे सामोरे जाणे
- देवाकडे पोहोचण्याचा मार्ग

पण हे सगळं घडून येण्याच्या मध्ये अनेक पायऱ्या आहेत. 
त्या पायऱ्या गाळून अचानक शेवटच्या टप्प्यात नाही जाता येत. 

त्या पायऱ्या कोणत्या? 
* आपली स्वतःप्रति असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या 
- हो स्वतः, मी , ह्या मी ला विसरून "त्या"च्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते आणि ते सहज शक्य ही नसते. 
आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो कुठलीही एकच गोष्ट करण्यासाठी नाही. तर अनेक गोष्टी करत स्वतःची प्रगती करण्यासाठी. 
मी ला विसरणे म्हणजे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गुणांकडे डोळेझाक करणे. 
मी खरा कसा आहे? हे ज्याला कळले तोच आणि तोचच स्वतःच्या दुर्गुणांवर काम करू शकतो. 

मी एक टास्क दिला होता स्वतःच्या चुका मान्य करण्याचा.

का करायचं होतं?  कारण हीच पहिली पायरी होती स्वतःकडे जाण्याची. आधी त्या आतल्या खऱ्या मी ला तर भेटा मग पुढच्या गोष्टी बघू. 

कॉमन चुका किंवा दुर्गुण बघू
- नकारात्मक विचार करणे आणि पसरवणे
- दुसऱ्याला जज करणे
- ईर्षा
- तिरस्कार
- वाईट भावना 
- अहंकार

ह्या आणि अजून काही कॅटेगरी आहेत ह्यामध्ये आपल्या कळत नकळत केलेल्या चुका, दुर्गुण मोडतात. 

किती जणांना हे जमलं ? तुमचं तुम्ही ठरवा. 

* आपल्या जवळच्या लोकांप्रती असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या
- आपल्याशी कोणत्याही कारणांनी जोडलेल्या लोकांप्रती आपली काही कर्तव्य असतात. आणि स्वतःची अध्यात्मिक प्रगती करताना त्यातल्या कुठल्याही बाबतीत हयगय केलेली "त्या "लाही आवडत नाही. 

मग बरेच जण म्हणतात की सगळं त्यांच्यावर सोपवून टाकायचं. टाका न , नक्की सोपवा पण त्याआधी एक गोष्ट स्वतःला विचारा की मी अस वागल्याने देव किंवा ती शक्ती माझ्या अध्यात्मिक प्रगतीला सहाय्यक ठरेल का? की मी अजून एक चूक करतोय? 

मी खूपदा सांगते असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. जस युगे बदलली आहेत, माणूस बदलला आहे तसेच वरूनही काही गोष्टी बदलल्या आहेत. बदलल्या म्हणण्यापेक्षा त्या आधीपासूनच तशाच होत्या. ज्या व्यक्ती स्वतःची मदत करण्यासाठी कष्ट घेतात, मेहनत घेतात त्यांना हमखास मदत मिळते, मार्ग सापडतो. 

सो फर्स्ट हेल्प युअरसेल्फ अँड अदर्स ऑल्सो. 

* इतर कुठल्याही जीवाबद्दल मनात वाईट विचार न येऊ देणे. 

जमतं? स्पष्ट उत्तर आहे नाही. 

मग आपण कसे काय पुढे जाणार? 

वाईट विचार हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात.

उदाहरणार्थ -  अगदी कॉमन फेसबुक फ़्रेंड च्या पोस्टवर xyz अनोळखी व्यक्ती अस का बोलली? मग त्याबद्दल मत बनवायचं आणि वाटत सुटायचं. 
कशासाठी? तुम्ही त्या व्यक्तीला किंवा ती तुम्हाला खाऊ घालतेय का? मग सोडा 

सोडून देणं , let go  करणं जमलंय का मला? 

लेट ईट गो , जाऊदे 

मला का नाही जमत घरात , बाहेर सगळीकडे तटस्थ न्यूट्रल जगणं. 

माझ्यासाठी जे योग्य आहे ते घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. 

अगदी आपले सो कॉल्ड कुणी शत्रू असतील तर त्यांच्याकडूनही योग्य ती शिकवण धडा घ्यायचा आणि स्वतःला सुधरवायच. 

लीन होणं ह्यालाच म्हणत असावेत कदाचित.

जो जो जयाचा घेतला मी गुण 
तो तो म्या केला गुरू जाण


* सकारात्मक विचार वाढवणे , कृती वाढवणे 

हे होतय का?? 

 मेडिटेशन, जप मी केला पण मी कुठेही कुठलीही चांगली गोष्ट बोलले नाही, वागले नाही तर माझं कर्म काय परतून माझ्याकडे आणेल? 

सकारात्मक विचार तर हवाच तसा माईंडसेटही हवा पण अस करताना वास्तवाला नाकारायच नाही. 

फॉर eg. माझं एक काम सुरू आहे मला माहित आहे की मी ते कसं केलं आहे. पण ज्या कारणासाठी ते केलं आहे ते बघितल्यावर मला अंदाज येतो की, माझ्याकडून काही गोष्टी सुटल्या आहेत. त्यामुळे आता मला अपेक्षित यश मिळणार नाही. अशावेळी मी सत्य स्वीकारून जर दुसरे पर्याय शोधायची त्याती ठेवली तर त्याला म्हणता येईल सकारात्मक विचारसरणी. 

पण जर मी नुसतच म्हणत बसले की सगळं नीट होईल तर अर्थातच ते आपोआप घडणार नाही. कारण इथे मी वास्तव स्विकारतच नाहीये. 

सेम गोष्ट अध्यात्म सांगते आधी सर्व बाजूनी स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करा आणि मग अपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगा. 

कारण हे सगळं कनेक्टेड असतं. 

* मला काही माहीत नाही

आपल्याला सगळ्यांनाच अगदी प्रत्येक माणसाला अस वाटत असत की मला सगळं माहीत आहे. 
पण खरंच जगातील सगळ्या गोष्टी कळण्याची, माहीत असण्याची गरज असते का? 

कधी कधी छोटासा अनुभवही आयुष्य बदलून टाकतो आणि कधी कधी मोठ्यात मोठी गोष्ट घडूनही काहीच फरक पडत नाही. 

अशा वेळी आपल्याला सगळंच कळण्याची गरज नसतेच. आयुष्य आनंदी, सुखी करणे हे आपल्याच हातात असते. त्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये आतून बदल घडवावे लागतात. 
आणि त्यात वेळ जाऊ द्यावा लागतो.


* आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 

रूढी, परंपरा , चालीतीरी 

ह्या गोष्टी प्रत्येक भागातील वातावरणा सोबत बदलेल्या सापडतात. 

अध्यात्म आणि धार्मिक कृत्य ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही अस नाही. 

पण धार्मिक कृत्य ही सामान्य माणसाला देवाच्या , योग्य गोष्टींच्या दिशेने वळवण्यासाठी तयार केलेला मार्ग आहेत. 

ती पार पाडत असताना मात्र मनाची आणि पर्यायाने शरीराचीही शुचिता(शुद्धता) अपेक्षित असते. 

आपल्याला श्रद्धा, विश्वास , संयम शिकवण्यासाठी काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या आयुष्यात करण्यात आला होता.                         

*अध्यात्म मार्गावर अनुभव येण्याची अपेक्षा सगळ्यांनाच असते. पण ही गोष्ट प्रत्येकाच्या पूर्वसंचितावर आणि आत्ताच्या कर्मांवर अवलंबून असते. 

त्यात कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.

हा प्रवास सुरू करताना आपल्याला आपल्या सगळ्या चुकीच्या सवयींना सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 

आपोआप काहीही घडून येत नाही. 

मी रागवत नाही म्हणायचं आणि मनातल्या मनात समोरच्या व्यक्तीला शिव्या द्यायच्या ह्याला कंट्रोल म्हणत नाहीत. 

मनातल्या भावना स्विकारायला आणि बदलायला जमलं पाहिजे. अवघड असते अशक्य नाही.

इतर लोकांना त्यांच्या वागणुकीला आहे तस स्विकारता यायला हवे. कसलीही कमेंट मनात सुद्धा न करता स्वीकार करायचा. 

अपेक्षा न ठेवता चांगली वर्तणूक करायची पण ह्याचा अर्थ असा नाही की स्वतःची पूर्ण किंमत कमी करून घ्यायची. 

लक्षात घ्या हे कलियुग आहे. इथे तुम्ही आधी स्वतःचा आदर करायला हवा. अस जर तुम्ही करत नाही आहात म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या त्याच्या अंशाचा अपमान करत आहात. 

विनम्रता आणि दुबळेपणा ह्यातला फरक ओळखून वागायचं. 

काही मुद्दे प्रायमरी लेव्हलवर आहेत काही अजून येतील. 

पण आत्तासाठी एवढं बास. 

बाकी #दत्तात्रेयार्पणमस्तू!!!

शुभं भवतु!!!

क्रमश: 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल


मॉर्निंग मंत्रा भाग 2

#मॉर्निंग_मंत्रा २
१ नोव्हेंबर २०२२
#थॉटस्_पॅटर्न 

ह्या जगात कुठली गोष्ट सर्वात जास्त अवघड असेल तर ती म्हणजे स्वतःच्या बाबतीत चांगल घडत आहे, घडणार आहे असा विचार करणे. 

जसा वाईट विचार , भावना, व्यक्ती ह्यांचा मनावर परिणाम पटकन होतो तसा तो चांगल्या विचार, भावना आणि व्यक्तींचा होत नाही अस का? कारण जी गोष्ट सोपी , कमी त्रासदायक ती लवकर स्विकारली जाते. जी गोष्ट करायला, स्वीकारायला अवघड तिला शक्यतो टाळण्याकडे माणसाचा कल असतो. 

चांगल्या सवयी स्वतः ला लावणे, स्वतःमध्ये रुजवणे हे सगळ्यात अवघड काम. त्यातही एका स्पेसिफिक वयानंतर तर मी कुणाचं का ऐकावं? हा मला सांगणारा कोण? ही वृत्ती वाढलेली असते. त्यामुळे चांगल काही शिकायचं म्हटल की जास्त कष्ट करावे लागतात. 

मी याआधीही म्हणाले होते की अध्यात्मातच नाही तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात प्रगती हवी असेल तर आधी बेसिकवर काम करा. 

स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करायचा प्रयत्न करा. 

ज्यांना अस वाटत की , अध्यात्म म्हणजे फक्त परमार्थ त्यांना एक सांगते , जोपर्यंत स्वार्थी होऊन तुम्ही स्वतःची प्रगती करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांची मदत करू शकत नाही. 

इथे स्वार्थी होण म्हणजे स्वतः ला घडवण, स्वतःला सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारणे , आपल्या मनात सातत्याने चांगल्या विचारांना घोळवत ठेवणे. हे इतकं जरी जमल तरी तुमच्या सहवासात येणाऱ्या "चांगल्या" लोकांना सुद्धा तुमच्या अशा स्वार्थी होण्याचा फायदा मिळतो. कारण सकारात्मकता सुद्धा संसर्गजन्य असते.

 गरज असते ती फक्त मनापासून स्वतःसोबत प्रामाणिक राहण्याची. 

सो लोक्स,

स्वार्थी होऊन बघा बाय गुड मिन्स 
आयुष्य नक्की होईल मास्टरपीस

संकल्प करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते. 
त्यातही संकल्प जर स्वतः ला घडवण्यासाठी असेल तर? वाट कसली पाहताय करून टाका. 

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

मॉर्निंग मंत्रा १

#मॉर्निंग_मंत्रा १ 

१९ ऑक्टोबर २०२२

#थॉट्स_पॅटर्न (स्विकार आणि बदल) 

Acceptance म्हणजे स्विकारणं. 

आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण नाईलाजाने स्विकारतो. 
पण काही गोष्टी मात्र खरोखरच स्विकारण्याची गरज असते. 
जसं की, 
- स्वतःला आहे तसं स्विकारणं 
- आपल्यामध्ये असलेले दुर्गुण स्विकारणं 
- आपल्याला एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, घटनेचा त्रास होतो हे स्विकारणं. 
- आपणही चुकू शकतो, चुकलो आहोत, चुकतो आहोत हे स्विकारणे

आपली बऱ्याच परिस्थितीत प्रतिक्रिया काय असते माहीत आहे? मला नाही करायचं हे, लोक काय म्हणतील? , मला जमणार आहे का असलं काही? म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला पलायन करायचे असते. 

पळायचे मग ती एखादी समस्या असो किंवा आलेली संधी. 

पण पळून प्रश्न सुटतात का? विचारा.... स्वतःला विचारा की बाबारे आत्तापर्यंत मी कितीतरी वेळा कितीतरी गोष्टींपासून, माणसांपासून , समस्यांपासून, संधींपासून पळालो आहे तर त्यामुळे माझे प्रश्न सुटले की अजून गुंतागुंतीचे झाले? 

जर उत्तर सुटले अस असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत🙏 ग्रेट आहात तुम्ही. 

पण जर गुंतागुंत वाढली असेल तर ती सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? की नेहमीप्रमाणे कुणीतरी दुसऱ्याने येऊन माझ्या समस्येवर उपाय शोधून द्यावा म्हणून वाट बघत बसला आहात? 

आता आजूबाजूला मी असे अनेक जण बघतेय जे अस करतात. स्वतःच्या समस्येवर स्वतः काहीच करायचं नसतं ह्यांना दुसऱ्याने ह्यांच्या समस्येवर विचार करून, कृती करून सगळं आयतं ह्यांना आणून दिले पाहिजे का? तर उद्या पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झालाच तर पुन्हा एकदा हे दुसऱ्यांवर खापर फोडायला मोकळे. 

अशा लोकांना आयुष्यात कधीच काहीच धड जमलेलं नसतं. हेच का असे अनेक जण सापडतील जे सकाळी बस चुकल्यापासून ते रात्री झोप नीट लागली नाही इथपर्यंत दुसऱ्यांना दोष देत असतात. 

त्यांना मला विचारावेसे वाटतं की तुम्ही स्वतःच्या वागण्याचं, बोलण्याच काही निरीक्षण कधी केलं आहे का? 

तुम्ही स्वतःला स्वतःसाठी कधी बदललं आहे का? 
उशीर होतो म्हणून लवकर उठुया अस कधी ठरवलं? रात्री उशिरापर्यंत जागत बसण्यापेक्षा लवकर फोन बाजूला ठेवू अस कधी केलं? उत्तर अर्थातच नाही असं असतं. 

एखादी व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाली की आपण त्याच्या यशाची पिसे काढू लागतो. कुणालाही त्या व्यक्तीचे श्रम दिसत नाहीत. 

तुम्हीही विचार, कृती बदलून बघा ,सातत्याने प्रयत्न करा , तुम्हीही व्हाल की यशस्वी. ह्यावर लगेच सुरू नाही हो , अस काही होत नाही. अरे मग अभ्यास वाढवा ,निरीक्षण करा,  कुठे काय चुकतंय बघा, नोंदी घ्या , पद्धत बदलून बघा ह्या गोष्टी सगळ्या बाबतीत लागू पडतात शाळेच्या अभ्यासपासून ते नाते आणि व्यवसाय नोकरी इथपर्यंत. 

मी जेव्हा लोकांना गाईड करत असते तेव्हा बऱ्याचदा एक कॉमन प्रश्न विचारला जातो,  आयुष्यात सतत अडथळे येतात, समस्या निर्माण होतात, कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही. 

अशा बाबतीत माझं साधं सरळ विचारणं असत, स्वतःच्या बेसिकवर काम केले आहे का? ते करण्याची तयारी आहे का? 

बेसिक म्हणजे काय? तर आपल्या मनात सतत येणारे विचार. मग ते स्वतःबद्दल असू दे किंवा इतरांबद्दल.

एक छोटासा टास्क करून बघा. हा लेख वाचल्यापासून पुढचे काही तास स्वतःच्या वागण्याचं निरीक्षण करा. आपण किती वेळा स्वतःबद्दल वाईट बोलतो ते बघा. कितीवेळा समोर आलेल्या, व्यक्ती, वस्त बद्दल वाईट विचार करतो ते बघा. हा विचारांचा पॅटर्नच तुमच्या अपयशाचं कारण असतो. 

हा आपल्या सगळ्यांचाच एक महत्वाचा दुर्गुण आहे. उघडपणे किंवा मनातल्या मनात सतत चुकीचे विचार घोळवत राहायचं. सगळेच अस करतात , कुणीही संत नाहीयेत. 

हे अस का घडतं? तर बऱ्याचदा आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार करणं हे आपण लहानपणापासून जे काही इतरांकडून ऐकत आलो आहोत त्यामुळे असतं. आणि इतरांबद्दल ? ते ही तसच. घरातली मोठी मंडळी बऱ्याचदा लहान मुलांच्या उपस्थितीतच नातेवाईक, शेजारी, स्नेही, सहकारी ह्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करत असतात. 
झालं अनुकरणातून मुलंही तेच शिकतात. 


म्हणून आपल्याला सगळ्यात आधी आपल्या थॉट पॅटर्न वर काम करावं लागणार आहे. त्यासाठी स्वतः चुकत आहोत हे स्विकारण्याची गरज आहे. 

काही तास स्वतःच निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की तुम्ही काय विचार करता आणि किती पातळीवर जाऊन करता. 

त्यानंतर पुढची स्टेप घेता येईल. 

मंडळी, अध्यात्मिक साधनेत जर प्रगती करायची असेल न तर हा पाया नीट करणं प्रचंड गरजेचं आहे. कुणी त्रास दिला असेल आणि त्यामुळे तुम्ही चिडत, रागवत असाल तर गोष्ट वेगळी. पण जर विनाकारणच तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर मात्र त्यावर उपाय करणे आवश्यक असते. 

सो लोक्स, 

आयुष्याला बनवायचे असेल सुखकर
तर नकारात्मक गोष्टींना दूर कर 

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग 2

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग २ 

आय नो मंडळी बरेच दिवस गॅप घेऊन भाग येतात. पण काय करू जुन्या गोष्टी आठवून त्यातून मोजकंच आणि महत्वाचं तुमच्यासमोर मांडायचं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा सगळं रिकॉल करावं लागतं. 

तर आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो ते २०१८ गुढीपाडवा ह्या दिवसापर्यंत. 

मार्च २०१८ च्या गुढीपाडव्याला आम्हाला पुन्हा एकदा कळलं की आम्ही आईबाबा होणार आहोत. पण ह्यावेळेस चार महिने थांबून मग पुन्हा हुलकावणी ह्या चक्रातून जाण्याची आमच्या दोघांची तयारी नव्हती. कारण नुकत्याच जानेवारीच्या सुरुवातीला माझ्या सासूबाई आकस्मिकपणे आम्हाला सोडून गेल्या होत्या. त्यातून पुन्हा हे सगळं म्हटल्यावर मी तर अक्षरशः डॉक्टराना कन्फर्म होत नसेल तर लगेच सांगा म्हणून मोकळी झाले. 

पण ह्यावेळेस बऱ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या. बातमी कळली गुढीपाडव्याला आणि त्यानंतर मला ज्या ज्या दिवशी चेकअप साठी बोलावलं होत त्या प्रत्येक दिवशी काही तरी विशेष असायचं. 

म्हणजे पुढचं चेकअप झालं रामनवमीला तेंव्हा डॉक्टर स्वतः होपफुल होते. पण अर्थातच त्यांनी माझी अवस्था पाहून काही खोटी आशा दाखवली नव्हती. 

आणि माझी हो नाही करता करता शेवटी माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली हनुमान जयंतीच्या दिवशी. तो किस्सा मी सेपरेट लिहिला आहे तुम्हाला थोडा शोध घेतला तर सापडेल 
हनुमान जयंती आणि हार्टबीट अस नाव आहे. 

पण हनुमान जयंतीच्याच पोर्णिमेला प्रेग्नन्सी कन्फर्म होणं हा अजून एक छान संकेत होता. 

त्यानंतर मात्र माझ्या बाळासोबत माझा एक नवीन प्रवास सुरू झाला. बसल्या जागी माझी बऱ्याचदा तंद्री लागत होती. आणि पहिल्यांदा माझी तंद्री लागली तेंव्हा मी थेट थेऊरच्या मंदिरात होते. 

तिथे मी एका बाजूला उभी राहून एका दिशेने बघत होते. 

जे कुणी गेले असतील त्यांना माहीत असेल की मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. तर मला एक खूप तेजस्वी चेहऱ्याचा 2,3 वर्षाचा मुलगा तिथे खेळताना दिसत होता. आणि एक हिरव्या रंगाची साडी नेसलेली लांबसडक केस असलेली स्त्री पाठमोरी उभी होती. तो मुलगा इकडे तिकडे मस्ती करून पुन्हा तिच्याकडे जात होता.

 मी वेगवेगळ्या कोनातून त्या स्त्रीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होते. पण 4,5 वेळा प्रयत्न करूनही मला तिचा चेहरा दिसला नाही. शेवटी मी हिरमुसून परत जाण्यासाठी वळले तसा माझ्या कानावर खळखळून हसण्याचा आवाज आला. मी गडबडीने वळून पाहिलं पण मला फक्त मळवट भरलेलं कपाळ आणि तिचे डोळे दिसले. 

ते डोळे इतके प्रेमळ होते की त्या अवस्थेत मला जाणवणारा सगळा थकवा दूर झाला. आणि मी तिच्या दिशेने चालायला लागणार तेवढ्यात आमच्या मार्जार 🐈लेकरांपैकी एकाने माझ्या मांडीवर उडी मारून मला जागं केलं. जनरली त्या सगळ्यांच हेच काम होतं वाटतं की मी जास्त उत्सुकता दाखवायला लागले की माझी तंद्री मोडायची😊 . 

तर हे अस काही वेळा घडल्यानंतर मात्र मी नाद सोडून दिला आणि त्या बाळाला बघत बसण्यात धन्यता मानू लागले. सततच्या ह्या संकेतामुळे मला आपल्याला मुलगा होऊ शकतो अस वाटू लागलं होतं. अर्थात आम्हाला काहीही झालं तरी चालणार होतं कारण इतक्या सगळ्या वर्षानंतर होणारे मूल हे सुदृढ असावे एवढीच आमची इच्छा होती. 

एके दिवशी मात्र सकाळी सकाळी साधारणतः दहाच्या सुमारास मी घरात एकटीच होते. आता सहावा महिना लागला होता. आणि आधीच्या हिस्ट्री मुळे मला फारशी हालचाल करायची नव्हती.  पूर्ण बेडरेस्ट वगैरे नव्हतं पण मी आपली जमेल तेवढ घरातलं करून एक जागी बसायचे किंवा लोळत पडायचे. कुणी काहीही शंख केला तरी सध्या आपलं ध्येय 9 महिने नीट पूर्ण करून बाळ जन्माला घालणं हेच आहे हे मी डोक्यात फिट्ट केलं होतं. त्यामुळे किती झोपतेस वगैरे वगैरे सल्ल्याने मला काही फरक पडत नसे. 

तर मी त्या दिवशी अशीच काही तरी वाचत असताना अचानक मला बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर प्रचंड उजेड दिसला. मी उठून काय आहे ते बघणार त्याच वेळी मला डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं वाटलं. मग मीही आहे तिथेच आधी बसले. डोळे बंदच होते. हळूहळू मनाच्या पटलावर शब्द उमटू लागले. 

" किती घाई उठायची? ह्या अवस्थेत अस करायचं नसतं हे माहीत नसेलच म्हणा तुला. पण पुन्हा अस करू नकोस. तसही मी तुला भेटायला आले आहे. पण तुला सध्या तरी मला बघता येणार नाही. तुझ्या डोळ्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळे आपण असच बोलू. " हळूहळू डोळ्यांसमोर एक स्त्री आकृती साकार होत होती. पण अर्थातच त्या आकृतीचं मूळ रूप अजूनही दिसत नव्हतं. पाय मात्र स्पष्ट दिसत होते. आणि आजूबाजूच्या वातावरणात एक चिरपरिचित गंध जाणवू लागला होता. 

हा वास माझ्या खूप जास्त ओळखीचा होता. पण मी पहिल्यांदा कुठे अनुभवला हेच मला लक्षात येत नव्हतं. 

ती जी कुणीही होती ती एक चांगली शक्ती आहे हे मला माहित होतं त्यामुळे मी तिच्याकडून होणाऱ्या संवादात श्रोत्याची भूमिका घेत सगळं मनात साठवून घेत होते. 

हे असे अतर्क्य , वेगळ्या पठडीतले अनुभव येण्याची ही सुरुवात होती. 
हळूहळू ह्या गोष्टी माझ्या रोजच्या जीवनात एक महत्वाचा भाग होणार आहेत असं कुणी मला सांगितलं असतं तर तेव्हाही मी त्यांना वेड्यात काढलं असतं. 
कारण एकच जे मनावर ठसवलेलं होतं की मी कुणीही नाहीये. 

पण मला कुठे माहीत होतं की जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती तिच्या मित्रासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानेच मला योग्य वेळी योग्य गोष्टींची प्रचिती द्यायला सुरुवात केली आहे. 

एकेक टप्पा ओलांडत मी सातव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आले होते. 

इतके दिवस ध्यानाला बसण्यासाठी खळखळ करणाऱ्या मला 9 महिन्याच्या ह्या काळात माझ्या लेकराने जवळपास अर्धा तास तरी बसायची सवय लावली होती. 

अर्ध्या तासात मिळणाऱ्या मनःशांती ची इतकी सवय झाली होती की तसच बसलो तरी चालेल अस वाटायचं. 

त्यावर बसण्याची अनुमती ही नव्हती. कारण आमचा रात्रीचा जागरणाचा वेगळा कार्यक्रम असायचा 😂

आता सांगायला हरकत नाही पण जवळपास पंधरा वर्ष मी जनरली तीन ते पाच जागी असते. त्या आधी मिळणारी झोप मला पुरेशी असते. सुरुवातीला बायोलॉजीकल क्लॉक मग शरीराचं टाईमटेबल आहे असं म्हणत मी येणारे अनुभव उडवून लावले. पण नंतर मात्र आहे हे असंच सुरू राहणार आहे हे माझ्या लक्षात आलं. 

मंडळी , खूप जणांना वाटत हा फाफटपसारा आहे, किंवा ह्यामध्ये काही अद्भुत नाहीये. असे कुठे अनुभव असतात का? तर हो असेच अनुभव असतात हे मी ठामपणे सांगू शकते. कारण मी जेव्हा स्वतःला आरशात बघते तेव्हा मला माझ्या जागी एक सामान्य व्यक्ती दिसते जिला घर, संसार, जबाबदाऱ्या आहेत , जी कधी कधी बरोबर असते तर बऱ्याच वेळेला चुकते सुद्धा, जी चिडते ,रागावते इन शॉर्ट जी एक साधं सरळ सामान्य आयुष्य जगतेय. 

पण ह्या साध्या सरळ सामान्य आयुष्यात त्या शक्तीच्या स्वेच्छेने काही क्षण तिचा सहवास ध्यानात अनुभवता येतो हेच माझ्या जन्माचे सार्थक नाही का? 

हे अनुभव मला मात्र एका मोठ्या जबाबदारीची सतत जाणीव करून देतात आणि ती जबाबदारी म्हणजे माझ्या आतल्या माणुसकीला जिवंत ठेवण्याची जबाबदारी. 

आपल्या सोबत अस कुणीतरी सतत असतं ज्याला फक्त अनुभवता येतं ही गोष्टच तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी बळ देते. 

जाता जाता इतकंच म्हणेन देवाला शोधत इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा देव तिथेच सापडेल. 

तुमची वाट बघत बसलेला ,आणि तुम्ही दिसला की तो हसून म्हणेल, " चांगलं आणि वाईट दोन्ही तुझ्या मध्येच असतं कायम, तू त्यातून काय निवडतोस त्यावर आपली भेट अवलंबून असते. " 

तुम्ही ठरवा काय निवडायच ते☺️ 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  १४ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल





सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग १

#दुर्गे_दुर्घट_भारी १



काही गोष्टी घडून येण्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागते. काही गोष्टी आपोआपच योग्य वेळी घडून येतात. 

पण अनुभूती मात्र तुमच्या तयार होण्याची वाट बघत असते. कारण जोपर्यंत ते अनुभव त्यांची ताकद पेलण्यास तुम्ही मानसिक पातळीवर तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचा आवाका कळण्याची सुतराम शक्यता नसते. 

वेगळी वाट जेव्हा आपल्यासाठी तयार केली जात असते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. स्वतःला आणि जवळच्या लोकांना अगणित शारीरिक यातना , मानसिक पातळीवर उलथापालथ, आजूबाजूला ज्यांच्यावर आपला अतिविश्वास असतो अशा कित्येकांचे खरे रूप समोर येते. कित्येकदा आपण कोलमडून पडतो. असे आणि ह्यापेक्षा विचित्र असे कित्येक प्रसंग तुमच्यासोबत घडतात. 

आता कुणी म्हणतील अस का? तर त्याचं उत्तर एकच आयुष्यात पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्या पातळींवर सक्षम करणे. कुठलाही आणि कसलाही प्रसंग आला तरी तुम्ही न डगमगता त्या गोष्टींचा सामना करावा म्हणून हा सगळा प्रपंच. 

बऱ्याच जणांना वाटत असते अरे वा ह्याचं बरंय ह्यांना अध्यात्मिक अनुभव येतात, देव ह्यांना सतत सुखात ठेवतो. 
तर अस अजिबात होत नाही. अध्यात्मिक अनुभव आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या, भोग, त्रास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 

अध्यात्मिक अनुभव घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला प्रापंचिक त्रासातून सुटका मिळत नाही. रादर बऱ्याचदा लोकांच्या समस्या सोडवताना त्यांच्या त्रासातून काही गोष्टी स्वतःकडे येतात आणि स्वतःच्या त्रासात भरच पडते. पण असो काही गोष्टी टाळता येत नाहीत. 

हे सगळं लिहायचं प्रयोजन म्हणजे मला माझे अनुभव मांडण्यासाठी परवानगी दिली गेली. पण लिहावं काय ते मात्र माझं काही ठरत नव्हतं. कारण खूपदा मी आजूबाजूला बघितलं आहे की कुणी जर असे अनुभव लिहिले तर त्या व्यक्तीची , त्याच्या अनुभवांची खिल्ली उडवली जाते. मला स्वतःला ह्या गोष्टी खूप त्रासदायक वाटतात. 

आय मिन तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तुम्ही ती अनुभवली नाही म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात नाही असं नसत न.... नाही पटत , नाही आवडत मग सोडून द्या, वाद घालू नका असं माझं साधं सोपं मत आहे. 

तर आता वळते माझ्या गोष्टीकडे. 

ही खरंतर माझी गोष्ट नाहीये. ही त्यांच्या आणि माझ्या सोबतीची गोष्ट आहे. जे कुणी माझं लेखन वाचतात त्यांना आत्तापर्यंत माझी दत्तासोबत असलेली मैत्री, त्या मैत्रीमुळे मला आलेले अनुभव , माझ्या अनुभवांमुळे लोकांना आलेले अनुभव हे माहीत असेलच. 

घरात दत्ताशी गप्पा ह्या लहान असताना सुरू झाल्या होत्या. पण आपल्या बाबतीत काही गोष्टी वेगळ्या घडतात, काही वेगळे अनुभव येतात , हे मात्र सगळ्या देवांवर रुसून त्यांचं करायचं सोडलं तेंव्हा कळायला लागल्या. 

करायचं का सोडलं? तर लग्नानंतर सात वर्षे माझ्यासाठी प्रचंड अवघड होती. सततच्या हॉस्पिटलमध्ये वाऱ्या, महिनाअखेरीस पदरी पडणारी निराशा, पुनः त्याच चक्रातून जाणे, मग सततचे गर्भपात त्यातही क्यूरोटीन , त्यानंतरच डिप्रेशन हे मी सात वर्षे अनुभवलं. माझ्याप्रमाणे बऱ्याच जणींनी असे अनुभव घेतले असणार. आणि हाच काळ माझ्या परीक्षेचा काळ होता. 

वैतागून एके दिवशी मी सगळं करायचं बंद केलं. पण  करायचं बंद केलं होतं बोलायचं नाही. मला सतत समोर असलेल्या फोटोंशी , देवघरात असलेल्या मूर्तींशी बोलायची सवय होती. काही झालं की सांगायचं , मग ते चांगलं असुदे किंवा वाईट. तो संवाद कधीच थांबला नाही. म्हणजे तस म्हणायला गेलं तर फक्त रूढ मार्ग सुटला होता, पूजाअर्चा, जपजाप्य ह्यांचा. पण मनाने जी नाळ जोडली गेली होती ती मात्र त्या काळात अजूनच बळकट होत गेली. 

क्यूरोटीन करून आल्यावर माझ्याकडे असलेल्या फोटोंशी मी जशी भांडायचे तशीच त्यांनाच जवळ घेऊन रडरड रडायचे सुद्धा. माझ्या बलिशबुद्धीला तेंव्हा सतत काही तरी चमत्कार घडावा अस वाटत असायचं. आणि तस मी भावनेच्या भरात बोलून दाखवायचेही. पण नंतर लक्षात यायचं अरे आपलं आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाहीये. इथे गोष्टी त्यांच्या वेळेवरच घडतील. त्यात काही करू शकत नाही. मग अशी माझ्याकडूनच माझी समजूत घातली जायची. 

ह्या सगळ्या प्रवासात मी माझ्याच वागण्याचं सतत आत्मपरीक्षण ही करायचे. एखाद्या गोष्टीची इच्छा तीव्र होऊ लागली की स्वतःला विचारायचे हे सगळं इतकं गरजेचं आहे का? आतून उत्तर आलं की मग पुढचा मार्ग शोधायचा. 
हळूहळू माझा प्रवास स्वतःच्या दिशेने होण्याकडे माझी वाटचाल सुरू झाली. 

दत्तभक्ती नसानसात भिनलेली होती पण आपण राहून राहून महिषासुर मर्दिनीकडे का ओढले जातो हे काही कळायला मार्ग नव्हता. 

ही अगदी ताजी म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलेली गोष्ट हं! इतकी वर्षे मी माझा वाढदिवस रामनवमीच्या आदल्या दिवशी दुर्गाष्टमीला येतो म्हणून माझं नाव गौरी ठेवलं आहे एवढंच जाणून होते आणि त्यातच खुशही होते. पण अलीकडच्या काळात जेव्हा गोष्टी बघण्यात वाचण्यात आल्या तेंव्हा समजलं की अरे हे सगळं खूप विलक्षण आहे. 

चैत्र शुद्ध नवरात्र दुर्गाष्टमीला तर तुळजाभवानीचा उत्पत्तीदिन असतो.  आता मात्र मला माझ्या बाबतीत घडणाऱ्या कित्येक गोष्टींचा अर्थ लागायला सुरुवात झाली. 

आपली जन्मतिथी , आपलं जन्मगाव(तुळजापूर)  आणि आपलं सध्याच राहण्याच ठिकाण(अहमदनगर) हे सगळे तुळजाभवानीशी इतके संलग्न आहेत की आपण काही संबंध नसताना लग्न होऊन सासर सोडून अहमदनगर मध्येच कस काय स्थायिक झालो ? हे सगळं कोडं क्षणार्धात सुटलं.

माझी जन्मभूमी तिची कर्मभूमी आहे  आणि तिची जन्मभूमी तिने माझी कर्मभूमी  बनवली. माझ्यासाठी हे सगळंच फील गुड लेव्हलवर न थांबता पुढच्या टप्प्यावर आलं होतं. 

आयुष्यात अजून काही विलक्षण गोष्टी वाट बघत होत्या आणि त्या माझ्या तयारीची वाट बघत होत्या. 

ती वेळही आली माझ्या आयुष्यातील तुळजाभवानीच्या सहवास पर्वाची सुरुवात झाली चैत्र शुद्ध प्रतिपदा , गुढीपाडवा २०१८. त्या वर्षीची दुर्गाष्टमी स्पेशल होती. बाय ऑल मिन्स. 

मी तिला एकच गोष्ट विचारली , "आफ्टर ऑल धिस टाइम?" 

तिने हसून उत्तर दिलं, " ऑलवेज " 

आणि निश्चिन्तपणे तिच्या हातात स्वतःला सोपवत मी ह्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज झाले. 

#आई_राजा_उदे_उदे  

#महाष्टमी ३ ऑक्टोबर २०२२

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

दुर्गे दुर्घट भारी

#दुर्गे_दुर्घट_भारी 

#विश्वास



एवढीशी कथा 15 भागात संपवून टाकू म्हणून सुरू केली होती. पण तिने आत्तापर्यंत 72 भाग घेतले. 

मानगुटीवर बसून लिहून घेणं काय असतं ते मला विश्वास मुळे कळलं. 5 मिनिटे एका जागी स्वस्थ न बसणारी मी आता एक तास सहज तंद्री लागल्यासारखी बसलेली असते. 

स्वतःला शोधताना ह्या माझ्या फेसबुक पेज आणि ब्लॉगच नाव ह्या कथेने खरं केलं. आत्तापर्यंतच्या 35 वर्षाच्या छोट्याश्या संपुर्ण आयुष्यात मिळाले नसते एवढे अनुभव जून 2021 ते सप्टेंबर 2022 ह्या वर्षात मिळाले. 

अतर्क्य अनुभव त्यांची व्याप्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सतत होऊ लागली. पण आपल्या एवढ्याशा अस्तित्वाची त्यांनी दखल घेतली आहे हे लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. 

माणसांनी माणसावर जबाबदारी टाकणे आणि त्या वर बसलेल्या शक्तीने आपल्यावर जबाबदारीची कामे देणे ह्यामध्ये किती फरक आहे हे कळत गेलं. 
खूप गोष्टी, व्यक्ती ह्या प्रोसेसमध्ये दुरावल्या ह्याचं कारण मला जस समजलं त्याप्रमाणे तरी चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करणं हेच आहे. 

हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे माझ्यासाठी सुद्धा. पण प्रयत्न करणार आहे हे सगळे अनुभव शब्दांत मांडण्याचा.  

चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी  ते शारदीय नवरात्र महाष्टमी माझा प्रवास नक्की वाचा 

#आई_राजा_उदे_उदे  

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल