#देवाक_काळजी_रे

#देवाक_काळजी_रे

नुकतंच हे गाणं कानावर पडलं. आणि नेहमीसारखं आम्ही आपले शब्दांवर आणि अर्थावर रेंगाळून गाण्याच्या प्रेमात पडलो. फार काही तत्वज्ञान नाहीये अगदी साधं सोपं आहे सगळं पण माणसाला मात्र साध्या गोष्टींनाही अवघड करायची सवय असते.
आयुष्यातले चढ उतार, सतत होणारे बदल त्यामुळे येणारे चांगले वाईट अनुभव विशेषतः वाईट जास्तच ह्यांच्यामुळे एक क्षण असा येतो की सरळमार्गी माणूसही चुकीच्या मार्गावर जातो किंवा जायचं ठरवतो. आणि हल्लीच्या फास्ट आयुष्यात तर संयम उर्फ पेशन्स फारच कमी लोकांकडे असतात. पण चुकीच्या मार्गाचे फायदे आणि तोटेही  प्रत्यक्ष लक्षात येईपर्यंत न भरून येणारं नुकसान करून मोकळे झालेले असतात. त्यानंतर हाती उरलेली निराशा सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार दाखवत असताना ज्याची गरज भासते तो असतो "देव". इथे मी देव ही संकल्पना फक्त मूर्ती अशी नाही म्हणत तर माझ्यासाठी देव म्हणजे मनाच्या कोपऱ्यात सदैव वसणारी अशी एक श्रद्धा असते जी योग्य वेळी,योग्य प्रकारे आणि योग्य रूपातही मदतीला धावून येतेच. गरज असते ती फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या चांगल्या कृत्यांवर किंवा कर्मांवर ठाम विश्वास असण्याची आणि थोड्या संयमाची.

सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा

हे कडवं तर मला फारच आवडलं. जर काहीतरी वाईट, चुकीचं घडलंय तर सगळं नीट होण्यासाठी किंवा करण्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट बघण्याची काय गरज?? "त्या"ने आपल्याला निर्माण करताना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत मग तरीही आपण त्याची वाट बघत का बसतो? तो सुद्धा विचार करत असेल न की बाबा रे चालू तर लाग पुढे फक्त दहा पावलांवर खूप काही चांगलं होणार आहे. पण नाही आपण प्रत्यक्ष कृतीपेक्षा इतर फाफट पसाऱ्यातच जास्त गुंततो आणि परिणामी गुंता वाढतच जातो.
हातापायाने धडधाकट असण्याऱ्या माणसाला तर जास्तच सवय रडगाण्याची. आणि काही झालं की उत्तरं शोधण्याआधीच मीच का? हा प्रश्न विचारण्याची. अशा लोकांनी विचार करण्याची पद्धत बदलण्याची फार गरज असते.
कर्मकांड वगैरे माझा प्रांत नाही आणि मी देवाला सतत धरते अशातलीही नाही. माझ्या मेंदूला पटतील आणि जगताना योग्य वाटतील अशी साधी सोपी तत्व माझी मी ठरवली आहेत. हरण्याचे प्रसंग माझ्याही आयुष्यात खूप आले मीही इतरांसारखी "त्याच्या" शी भांडले पण त्यातून प्रत्येक वेळी बाहेर पडताना मी मनाला एक बजावलं की कधीही असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी असं नाही करायचं. शक्य असतील ते सगळे प्रयत्न करूनही हरलो तर अर्थातच त्याला प्रश्न विचारण्याचा हक्क तो देतोच. हा माझा अनुभव पण प्रयत्न न करताच त्याच्यासमोर कधीच नाही जायचं.
शेवटी तात्पर्य काय तुमची काळजी घ्यायला तो आहेच पण त्याआधी तुम्ही काहीतरी सुरुवात तर करा.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. नुसतं गाणं ऐकूनही बरंच काही कळेल, ऐकून बघा एकदा💐 
#गौरीहर्षल #१४.९.२०१८

टिप्पण्या

सुप्रिया मते म्हणाले…
खूप सुंदर लेख
Smita Mane म्हणाले…
शेवटचा परिच्छेद खुपच खरा आहे.
हरी ला आपल्याला खटल्यावरच द्यायचं असतं तर
हातपाय,मेंदु, बुद्धी कशाला दिली आहे?

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी