याद पिया की आए.......

#याद पिया की आए
              संयोगीता जितक्या आर्ततेने सुरांना आळवत होती तेवढ्याच तीव्रतेने अश्रू  तिच्या पापण्यांच्या कडांना ओलांडत होते. आज कित्येक दिवसानंतर ती रियाज करत होती. सूर मनासारखा लागलंय हे  ओसंडून वाहणारे तिचे डोळेच सांगत होते. शेवटच्या आलाप संपवून तिने डोळे उघडले. नेहमीप्रमाणे गुरूंना मनोमन अभिवादन करत तिने रोजच्या कामांना सुरुवात केली.
         संयोगीता वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत होती. तशी तिच्या आईवडिलांची इच्छाच होती. पुढे तिलाही त्यात गोडी वाटू लागल्याने संगीतच तिचा श्वास बनले होते. तिच्या गुरू वंदनाताई सुद्धा तिच्यासारखी शिष्या मिळाल्यामुळे तृप्त झाल्या होत्या. आपल्याकडे असेल नसेल तितकं ज्ञान त्यांनी संयोगीताच्या ओंजळीत टाकलं होतं.
                 वंदनाताईंच्या घरच्यांनाही संयोगीता आता घरातील एक वाटत होती. ताईंचा मुलगा मार्दव आणि संयोगीता एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पुढे दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला. साखरपुडा झाला आणि मार्दवला कंपनीच्या कामानिमित्त काही महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागलं. रोज तसंही फेसबुक , वॉट्सअप्प होतंच बोलण्यासाठी त्यामुळे फारसा दुरावा जाणवत नव्हता. तो परत येताच लग्नाची तारीख काढायची असं ठरलं.  हळूहळू मार्दवच्या येण्याची तारीख जवळ आली. त्याने निघतानाच फेसबुकला स्टेटस अपडेट केलं कमिंग बॅक टू इंडिया. फ्लाईट कनेक्टेड असल्याने त्याला येईपर्यंत सकाळ होणार होती. संयोगीताच्या मनात मात्र उगाच शंकेची पाल चुकचुकली. पहाटेच उठून ती अस्वस्थ मनाने रियाजाला बसली पण आज तिचे सूर का कुणास ठाऊक रुसले होते. इतक्यात तिचा फोन वाजला वंदनाताई बोलत होत्या परतून येत असताना मार्दवचा अपघात झाला होता. क्षणभर संयोगीताच्या नजरेसमोर अंधार पसरला. जेंव्हा ती जागी झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. मार्दव अपघातातून वाचला तर होता पण कोममध्ये गेला होता. आता खरी कसोटी होती. पण वंदनाताईनी संयोगीताला पूर्ण स्वातंत्र्य दिले त्या नात्यातून बाहेर पडण्याचं. संयोगीताने मात्र मार्दवची वाट बघायची असं आधीच ठरवलं होतं. आज ६ महिने झाले होते मार्दवच्या तब्येतीत फरक नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला घरीच लाइफ सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्याला साद घालण्यासाठी म्हणून संयोगीता रोज न चुकता त्याच्या खोलीतच रियाज करत होती. "जौबन बिता जाए रे हाय राम याद पिया की आए......" आज खूप दिवसांनी तिचे सूर मनासारखे लागले होते. तृप्त मनाने ती मार्दवच्या जवळ येऊन बोलत बसणार तोच तिला मार्दवच्या डोळ्यांत हालचाल जाणवली. आणि पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले होते. खऱ्या अर्थाने तिच्या पियाने तिची ती आर्त साद ऐकली होती.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी