#गेले द्यायचे राहून........

#गेले द्यायचे राहून
          स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
            स्वराचा आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता,"गेले द्यायचे राहुनी , तुझे नक्षत्रांचे देणे". खूप छान गायची ती आणि तितकीच छान माणूसही होती. हो , होतीच कारण आता ती या जगात नव्हती. तिचं जाणं अकाली होतं पण ते तिने मात्र हसत हसत स्वीकारलं होतं.
         अनय तिचा खूप जवळचा मित्र, जिवापाड प्रेम होतं तिचं त्याच्यावर. पण त्याला मात्र खूप यशस्वी व्हायचं होतं आणि त्या धुंदीत त्याने तिचं प्रेम आणि मैत्री दोन्ही धुडकावली.
आज जेंव्हा ती गेली असं त्याला समजलं तेंव्हा त्याला आपल्या यशातला फोलपणा जाणवला. तिच्या सगळ्या आठवणी फेर धरून त्याच्याभोवती नाचू लागल्या. कारण हे प्रोजेक्ट संपताच तिची माफी मागून तिला लग्नासाठी मागणी घालण्याचा त्याचा विचार होता. पण तिने मात्र त्याला तशी संधीच शिल्लक ठेवली नव्हती. 
                  हरवलेल्या अनयची पावलं नकळत सावलीकडे वळली. सावली अनाथाश्रम इथेच तो आणि स्वरा लहानाचे मोठे झाले आणि इथेच पहिल्यांदा भेटलेही. त्यामुळेच स्वराचं जाणं अनय ला पुन्हा आश्रमात घेऊन आलं. तिथे गेल्यावर त्याच्या कानावर तेच सूर पडले तसा तो धावत धावत त्या दिशेने निघाला. बंद दारामागून येणारे ते सूर आणि तो आवाज ऐकून त्याला वाटलं की स्वराच्या जाण्याची बातमी खोटी आहे. पण दार ढकलताच त्याला जे दिसलं त्यामुळे त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या खोलीत ५ वर्षांची इटूकली नीरा गात होती. नीरा सावली आश्रमात आली तेंव्हा १५ दिवसांची होती तेंव्हाच स्वराने तिची जबाबदारी उचलली होती. अनय मात्र विसरून गेला होता हे सगळं. आत्ता हे सगळं काही सेकंदात त्याच्या डोळ्यासमोरून गेलं , आणि निरु ला कवटाळून त्याने ठरवलं काहीतरी मनाशी. 
           सावली अनाथाश्रमच्या ऑफिसमध्ये त्याने देशमुख सरांना निरु ला दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि सोबतच कायमस्वरूपी आश्रमाचा जास्तीत जास्त खर्च उचलण्याचं ठरवलं. लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण झाले. आज स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी जे तिला द्यायचं राहून गेलं होतं ते सर्व निरु सोबतच इतर गरजू मुलांनाही देण्याचा निश्चय करत अनयने  निरुचं बोट धरून आयुष्याची एक नवी सुरुवात  केली.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

टिप्पण्या

Swapnali C Jadhav म्हणाले…
Khar aahe kadhi kadhi ase hote ki kahi hoshti sadhya karnyachya nadat aapan kahi vela apli manas, anandache god kshan harun jato. Jar velich savarlo tar thik nahitar khup ushir hoto kadhi kadhi.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी