असाही दोस्ताना

असाही दोस्ताना .......
जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright……” असं म्हणत नाचणाऱ्या जॉन अभिषेक आणि प्रियांका ऐवजी अक्षताला ती आणि गायत्रीने सेंड ऑफला केलेला भन्नाट डान्स आठवून हसू येत होत आणि हसता हसता नकळत तिच्या डोळ्यात गायत्रीच्या आठवणीने पाणी आलं.
तेवढ्यात “ आई, किती वाईट आहे ग आराध्या!!” असं म्हणत अक्षताच्या लेकीने घरात एन्ट्री केली. लाडक्या लेकीचं आज काहीतरी बिनसलंय हे अक्षताच्या लक्षात आलं. हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत ती अंशिकाच्या जवळ गेली. गोबरे गोबरे गाल लाल झाले होते आणि डोळ्यात कितीतरी मोत्यांची गर्दी झाली होती. अक्षताने डोक्यावरून हात फिरवताच सगळे मोती सांडू लागले. अक्षतानेही मग आधी तिचं रडणं संपू दिलं आणि शांत झाल्यावर तिला विचारलं, “काय झाल पिल्लू?” तसं अंशिकाने सांगितलं कि ती नव्हती दोन दिवस स्कूलमध्ये. त्याचवेळेस सगळ्यांचे प्रोजेक्ट कळाले मग आराध्याला दुसरी मुलगी पार्टनर म्हणून मिळाली, मग हिला राग आला आणि ती बोलली तिला काहीतरी. त्यावरून आराध्याला पण राग आला सो अघोषित अबोला चालू झाला आणि त्याचमुळे आज चिडचिड सुरु होती.
लेकीची समजूत घालून अक्षताने तिला खेळायला पाठवले. आणि इकडे तिचे मन भूतकाळात गेले. ती आणि गायत्री सख्ख्या बहिणी वाटाव्या इतकं साम्य होत दोघींमध्ये.तशा त्या लहानपणापासून ओळखत नव्हत्या एकमेकीना पण आतून जुळलेलं नातं होत ते. कुणालाही हेवा वाटावा असं. रिझल्टच्या आधी गावी गेलेली गायत्री ती परत येणार म्हणून खूप खुश होती अक्षता. पण ती कधीच परत आली नाही चौकशी केल्यानंतरही काहीच अक्षताच्याहाती नाही लागले. ती गेल्यानंतर कित्येक दिवस अक्षता तिला वेड्यासारखी शोधत होती. काहीच पत्ता न सापडल्याने शेवटी तिने तो नाद सोडून दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात ती लग्न करून मुंबईत आली आणि मग हळूहळू जुनं सगळेच धूसर झाले.
 आज अंशिका आणि आराध्या च्या लुटुपुटूच्या भांडणाने तिला गायत्रीची आठवण आली. कशी असेल , कुठे असेल ती याचा विचार करत अक्षता पुन्हा कामाला लागली. तिच्या फोनवर तितक्यात एका अनोळखी नंबर वरून फोन आला.
“हॅलो, अंशिकाच्या आईशी बोलू शकते का?” तिकडून आलेला आवाज ऐकून क्षणभर अक्षताला गायत्रीचा भास झाला. “हो आपण ?” तिने विचारलं.
“ मी आराध्याची आई बोलतेय तन्वी. कालपासून तिचं काय बिनसलंय कळत नाही म्हणून मला वाटलं तुम्हाला कल्पना असेल.”
तन्वीला अक्षताने सगळी स्टोरी सांगितली. मग दोघींनी मिळून संध्याकाळी बागेत भेटण्याचे ठरवले. अक्षताला का कुणास ठाऊक या भेटीची एक ओढ लागली. संध्याकाळी सगळं आवरून ती अंशिकाला घेऊन पार्कमध्ये पोहोचली. आत एन्ट्री करत असतांनाच अंशू...... अशी जोरदार आरोळी कानावर आली आणि त्या मागेच वाऱ्याच्या वेगाने धावत आराध्या अंशिका च्या गळ्यात येऊन पडली. मग लटक्या रागाने एकमेकीना रागावत रुसत दोघी खेळायला निघून गेल्या. त्यांची ती निरागस मैत्री बघण्यात अक्षता इतकी गुंग झाली होती कि तन्वी मागे आल्याच तिच्या लक्षातच नाही आलं.
“कशी आहेस अक्षु?” तब्बल १० वर्षांनी हा आवाज तिच्या कानावर पडत होता पण त्यात जी ओढ होती ती अजूनही तशीच आहे हे जाणवत होतं. गरकन मागे वळून बघितल्यावर अक्षताला धक्काच बसला ती तिच होती जिचा शोध घेण अजूनही अक्षताच्या मनाने थांबवलं नव्हतं. तिची soul sister गायत्री. तिला समोर बघताच अक्षताला काहीच बोलायला सुचेना शांतपणे तिचा हात हातात घेत गायत्रीने तिच्याकडे पहिले. अक्षता तिच्यासमोर गुढघ्यावर बसली कारण गायत्री व्हील चेअर वर होती. पुढचा काही वेळ काहीच न बोलता त्या दोघी बरंच काही बोलल्या. गायत्रीने गावावरून परत येत असताना झालेल्या अपघातात फक्त पायच नाही तर सगळं कुटुंब गमावलं होत. त्यावेळेस खूप पैसा असूनही तिच्यावर एका आश्रमात राहायची वेळ आली होती कारण कित्येक दिवस ती काहीच बोलत नव्हती. मग अशा परिस्थितीत अक्षताला सांगणार तरी कोण? आश्रम ज्यांचा होता त्या डॉ. जोशींनी पुढे होऊन तिला बरं करण्याचा चंगच बांधला. आणि मग २  वर्षांच्या त्यांच्या मेहनतीला फळ आले. गायत्री हळूहळू प्रतिसाद देऊ लागली. तोपर्यंत डॉक्टरांनी तिचं तन्वी असं बारस केलं होत. त्याचं काळात डॉक्टरांच्या मुलाने तिला लग्नाची मागणी घातली आणि ती मिसेस तन्वी जोशी झाली. तन्वीनेही अक्षताला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत अक्षताचेही घराचे दुसरीकडे निघून गेले होते. मग तीही तिच्या संसारात रमली.
आजचा दिवस मात्र त्या दोघींसाठी आणि त्यांच्या मुलींसाठीही खूप स्पेशल ठरला. त्यानंतर अक्षताने स्वतः तन्वीच्या डॉक्टरांची भेट घेत तिच्या पायाच्या बाबतीत चौकशी केली तेंव्हा तिला कळाले कि तिचे पाय अजूनही नीट होऊ शकतात पण प्रंचड मानसिक धक्क्यामुळे तन्वीच शरीर मेडीसिनला हवं तसं प्रतिसाद देत नाही. आता कसोटी अक्षताची होती ती स्वतः सगळे डिटेल्स घेत तन्वीला प्रोत्साहन देऊ लागली आणि काही महिन्यातच तिच्या प्रयत्नांना यश आलं.
आज तब्बल २ वर्षांनतर अक्षता आणि तन्वी मुलींसोबत सायकल राईडला निघाल्या होत्या. बॅकग्राउंडला गाणं वाजत होतं.
जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright, I will be allright...... 

गौरी हर्षल

२३ फेब्रुवारी २०१७

टिप्पण्या

Swapnali C Jadhav म्हणाले…
Khup chan nirmal maitri chi sanklpana mandali tumhi.
नीता म्हणाले…
अशी मैत्री हवी, जिच्यामुळे जीवनातच नाही तर आयुष्याला आधार मिळेल. 🌹

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी